(सदर लेख राजकारणाचे विडंबन असून, राजकारणाचा, विडंबनाचा, (तथाकथित) उपरोधिक लिखाणाचा तिटकारा असलेल्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. गेल्यास होणाऱ्या त्रासास लेखक जबाबदार राहणार नाहीत.)
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे "आयसीयू'त असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजारपणाच्या आधीपासूनच बऱ्याच जणांना राजकीय धक्के देऊन त्यांची राजकीय प्रकृती बिघडवून टाकली होती. रुग्णालयात असतानाही ते असे काही करतील, याची भल्याभल्यांनाही कल्पना नव्हती.
अडवानींनी ठाकरेंची भेट मागितली आणि ती नाकारल्याची चर्चा भाजप-शिवसेनेपेक्षाही प्रसारमाध्यमे आणि कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'तच जास्त रंगली. कालांतराने सगळे जण तेही विसरले आणि बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करायला लागल्यावर तर सगळेच हळवे झाले. त्यांना भेटणाऱ्यांची आणि ते लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली. छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांची पुन्हा भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. प्रसारमाध्यमांना कितीही शंका असली, तरी त्या अर्ध्या तासात त्यांनी बाळासाहेबांना कोणकोणती औषधे आहेत, पूर्वी ते कोणती औषधे घेत होते, डॉक्टरांनी काय निदान केले आहे, याचीच इत्थंभूत माहिती घेतली. त्यांना कोणकोणत्या औषधांची ऍलर्जी आहे आणि कोणत्यांचा तिटकारा आहे, हेही उद्धवना सांगायला ते विसरले नाहीत. निघताना बाळासाहेबांनी भुजबळांना थांबवून, ""अरे, निवडणूक लागलीय म्हणे लवकरच?' असा प्रश्न विचारल्याचेही सूत्रांकडून समजते. त्यावर भुजबळांनीदेखील ""हो का, मलाही आत्ताच कळतंय!'' असे उत्तर दिल्याचेही सूत्रांकडून(च) समजते!
भुजबळांच्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाळासाहेबांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस(च) केली. त्या वेळी उद्धव ठाकरेंसह मनोहर जोशी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, विजयसिंह मोहिते, असे अनेक नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या गर्दीमुळे पवारांना बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती न समजल्यामुळे की काय कोण जाणे, निघण्यापूर्वी वीस मिनिटे पवारांनी बाळासाहेबांशी एकांतात चर्चा केली. उपचारांची पद्धती, औषधांच्या वेळा, आजारपणात घ्यावयाची काळजी, आदी साद्यंत माहिती दिल्यानंतर, दोन्ही नेत्यांचे पूर्ण समाधान झाल्यानंतरच पवार तेथून बाहेर पडले म्हणे!
भारताचे उदयोन्मुख "लोहपुरुष' आणि समस्त राष्ट्राभिमानींचे एकमेव आदर्श नरेंद्र मोदी यांनाही बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी जाणून घ्यायचे होते. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याशी चर्चा करून त्यांचे काही समाधान होईना. प्रत्यक्ष भेटण्यासाठी त्यांनी वेळ मागितली; मात्र तेव्हा बाळासाहेब नेमके विश्रांती घेत होते. मोदींची भेटीची इच्छा त्यामुळे अपूर्णच राहिली. योगायोगाची गोष्ट म्हणजे, बाळासाहेबांची प्रकृती बिघडण्याच्या आधी लालकृष्ण अडवानी यांनीही मुंबई दौऱ्याच्या वेळी त्यांची भेट मागितली होती, त्या वेळीही बाळासाहेब नेमके विश्रांती घेत होते. त्यांना झोप लागली होती. त्यामुळे ती भेट होऊ शकली नाही.
अर्थात, या सर्व साध्या-सोप्या, सहज घटनांना उगीचच राजकीय रंग देण्याचे कारस्थानच पत्रकारांनी चालविले आहे, हेही तेवढेच खरे. छगन भुजबळ, शरद पवार यांनी भेटीसाठी काही दिवस आधीच वेळ घेऊन ठेवली होती आणि अडवानी-मोदी यांनी अचानक फोन करून भेटीची वेळ मागितली, हे त्यामागचे सत्य. त्यातही राजकारण आणण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला.
दुसरे एक कारण असेही सांगितले जाते, की अडवानी आणि मोदी यांनी भेटीची वेळ मागताना, राजकीय विषयावरसुद्धा चर्चा होईल काय, याची चाचपणी केली होती म्हणे. रुग्णालयात जाऊन राजकारणाविषयी बोलणे शिष्टाचारसंमत नसल्यामुळे, भेट नाकारण्यात आली, असेही सांगितले जाते. आता बाळासाहेब रुग्णालयातून घरी गेले आहेत. अडवानी-मोदी आता त्यांची भेट घेऊन निवांत चर्चा करू शकतील! आणि हो, या वेळी प्रकृतीच्या चौकशीला पूर्णपणे मज्जाव असेल, म्हणे!
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 7:12 pm | चिरोटा
आहे.
दुसरे एक कारण असेही सांगितले जाते, की अडवानी आणि मोदी यांनी भेटीची वेळ मागताना, राजकीय विषयावरसुद्धा चर्चा होईल काय, याची चाचपणी केली होती म्हणे
मला असे कळले की अडवाणी दिल्लिचा पेठा आणि मोदि उन्धियो घेवुन आले होते बाळासाहेबान्साठि.हे पाहिल्यावर मनोहर जोशी चिडले आणि भेट नाकारण्यात आली.भुजबळ आणि पवार मात्र गुलाब घेवुन आले होते.
भेन्डि
सोलापुर्,कोल्हापुरसह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
10 Mar 2009 - 9:06 pm | प्रकाश घाटपांडे
च ला राजकारणात लई महत्व असतय. अत्रे आन यशवंतराव चव्हाण यांचा ईनोद सांगितला जातो. चव्हानातला च काडुन टाकल्यावर मंग काय राहीन? असा काहिसा. ईडंबन लई आवडले
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Mar 2009 - 7:06 am | सहज
राजकीय नेते क्वचित खरे खरे आजारी पडतात म्हणून खरेच नक्की काय झाले हे पहायला गेले असतील :-)
11 Mar 2009 - 9:59 am | नरेश_
(सदर लेख राजकारणाचे विडंबन असून, राजकारणाचा, विडंबनाचा, (तथाकथित) उपरोधिक लिखाणाचा तिटकारा असलेल्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. गेल्यास होणार्या त्रासास लेखक जबाबदार राहणार नाहीत.)
डिसक्लेमर विशेष आवडले ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
11 Mar 2009 - 11:59 am | अडाणि
मस्तच झालाय लेख... काय मार्मिक लिहलतं...
-
अफाट जगातील एक अडाणि.