आपण देशाबाहेर, आपल्या गावाबाहेर पडलो की नेहेमीच तिथल्या खादाडीची आठवण काढत असतो! मलाही इथे राहून सतत वैशाली, श्रेयस, अभिषेक,गार्डन कोर्ट..... जाऊदे सगळी लिस्ट नाही लिहीत इथे.. पण या सगळ्यांची सतत आठवण होत असते.. पण इथेही काही खायला मिळत नाही असं थोडीच आहे?
इथेही अशी अनेक ठीकाणं आहेत, काही स्पेशल डिशेस आहेत ज्या मला खूप आवडतात.. त्यांची ही कथा!
(अमेरिकेत नसणार्यांना हा लेख असंबद्ध वाटेल, कारण सगळे इथले लोकल रेफरन्सेस आहेत या लेखात.. मात्र पक्क्या खवैय्यला या गोष्टिने काही फरक पडणार नाही असे वाटते.. आणि इथे नक्कीच खवैय्ये आहेत असं माझं मत असल्याने हा लंबाचौडा लेख तुमच्या भेटीला!! ... )
मला इथे मिपावर मला हवं होतं तसं फॉर्मॅटींग अजिबात करता आले नाहीए. ब्लॉगरवर मी ते करू शकलेय जरा.. त्यामुळे इथेही तुम्ही तो लेख पाहू शकता..
अमेरिकेत आल्यापासून, आणि मुख्य म्हणजे नवर्याच्या संगतीने मी खवैय्या झाली आहे.. आधी पाप्याचे पितर होते.. आता काय ते सांगत नाही जाऊदे.. तर मुद्दा हा की मी खवैय्या झालीए.. आधी केवळ जाणीजे यद्न्यकर्म या उदात्त हेतूने जेवायचे.. पानात पडेल ती भाजी दोन पोळ्या.. मूड असेल तर भात. संपलं जेवण..असं दोन वेळा.. आई बिचारी मला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायची.. पण मला तेव्हढी आवडच नव्हती.. दादा भारतात असताना कसं नेहेमी साग्रसंगीत पंगत असायची.. फर्माईशींची रेलचेल.. पण नंतर बंदच पडले..
असं असताना, मी इतकी बदलावे म्हणजे फारच झालं.. इतकी म्हणजे इतकी की आता मला झोपेतही भूक लागते.. सारखे नवीन पदार्थ करायचा(निदान खाण्याचा तरी) उत्साह येतो.. नवरा स्वखुषीने करून देणार असेल तर लॉटरीच! पण एकंदरीत असं आहे.. पण ..
इथेही गोची आहेच.. मला स्वयपाक करायला खूप काही आवडत नाही! :( म्हणजे आवडतो.. पण तेव्हढा पेशन्स नाही.. काहीतरी उरकायचे झाले.. नशिबाने पदार्थ चांगले (?) होतात म्हणुन बरंय..
माझं एक असं.. आणि नवर्याची कथा वेगळीच.. त्याला दर १५ (?) दिवसांनी तरी बाहेरचे जेवण आठवते.. कितीही घरात छान केले तरी बाहेर जाऊन जेवण्याची मजाच वेगळी!
या अशा परिस्थितीमुळे आमचं अमेरिकेतलं पौष्टीक जीवन(पर्यायाने आमचे वजन!) समृद्ध होणार नाहीतर काय?? :)
अगदी सुरवातीला जेव्हा मी येऊन २-४ च दिवस झाले होते, तेव्हा माझा स्वयपाक म्हणजे दिव्य प्रकार होता! मी सकाळी ९.३० पासून कामाला लागायचे. आधी इंडीयात आईला रेसीपि विचारायची. मग ते सगळं सामान एक एक करून टेबलवर दिसेल अशा जागी फोडणीच्या क्रमातच आणायचे. कारण त्या काळात मी हमखास सगळी भाजी फोडणीत घातल्यावर छान चिरून ठेवलेल्या मिरच्या टेबलावरच आहेत वगैरे दृष्टांत व्हायचा.. त्यामुळे सगळं समोर क्रमाने ठेवायचे..म्हणजे आधी मोहरी, मग मिरच्या, मग कांदे आणि मागे जी काही भाजी असेल ती वगैरे!! :)) मग एक एक करून फोडणी जमवायची.. त्याकाळात मीठाचा अंदाज तर नव्हताच..! पण त्याचबरोबर, मिरच्या अती तिखट असतात, आणि साखर अती अ-गोड असते हे ही कळायचे होते.. आता विचार करा काय प्रकरण होत असेल ते भाजी नामक ?! पोळ्या तर विचारायच्याच नाहीत!! सलग २-३ महीन्यांच्या अथक परिश्रमानंतर मला पोळ्या जरा गोल, बर्यापैकी मऊ कॅटॅगरीतल्या जमायच्या... २-३ महीने, तव्यावरून काढतानाच पोळि खायला सुरवात केलीत तर तुमचे दात शाबूत.. नाहीतर! अरे देवा.. त्यातून हो.. माझी गोल्डन टेंपल नामक मैद्याची कणीक! :( जाऊदे.. संपले ते दुष्ट दिवस!
तर एके रात्री नेहेमीप्रमाणे माझा स्वयपाक बिघडला.. पोळ्या तर येतच नव्हत्या! भाजी आणि काहीतरी कोबीची भाजी करणार होते वाट्टं.. कोबी विनाशकाले बुद्धीने फुडप्रोसेसर मधून काढला.. लगदा! म्हटलं करूयात काहीतरी इनोवेटीव्ह! .. भाजी नेहेमी सारखी केली.. नंतर काय वाटलं माहीत नाही , मी त्यात बेसन टाकले.. पीठ पेरून कोबी वगैरे.. झालं भलतंच! स्पष्ट सांगायचे तर ते दिसत होते, कोबीचे पिठले !!
झालं... माझ्या गंगा यमुना सुरू!! काय रडले त्या काळात मी स्वयपाकावरून.. नवरा बिचारा आधीच नव्याने नवरा झालेला.. काही कळेना ह्यात काय रडण्यासारखे! पण मला तो भयंकर अपमान वगैरे वाटायचा.. की नवर्याला काय हे अन्न घालतीय मी जेवायला! :D
मग शेवटी आम्ही निघालो, बाहेर जेवायला.. इतक्या रात्री काय असणार हॉटेल उघडे? टॉपर्स पिझ्झा दिसला.. गेलो.. नवर्याने काहीतरी चिकनचा मागवला होता, माझा पालापाचोळा.. असं जेवण म्हणून खायची सवय नव्हती हो तेव्हा!! चिकन तर सारखं नकोच वाटायचे.. भारतात २ महीन्यातून एकदा आवडीने खायचे.. इथे जरा पंचाईतच ! पण तो पिझ्झा आवडला तसा..
मग अधून मधून हे चालायचेच.. स्वयपाक बिघडला चला बाहेर ! एकदा तर मी खूप उशीरा स्वयपाक करायला लागले.. ११ वाजले असावेत रात्रीचे.. आणि सुरी असली भसकन घुसली बोटात.. भळाभळा भळाभळा रक्त !! अरे देवा.. त्या काळात इतकं चिरून घेतलंय ना मी मला! पण ते डेंजर होतं सर्वात.. जरा जास्तच रक्त होतं.. आणि ते जाऊदे... नवर्याचा दुष्ट्पणा किती ?? लग्गेच मला झोंबणारं ऍंटीसेप्टीक लावायला घेऊन यायचा! आणि मी जी काही आरोळी ठोकायचे..... नंतर मला कळलं त्यात काळजी वगैरे जरा कमीच आहे, नुस्ता दुष्टपणा आहे त्याचा !! :D :D:D:D:D
आता रात्री ११ ला इथे केमिस्ट सोडून काहीही उघडे नसतात.. दुकानं आय मिन... :| एक्सेप्ट डेनीज् डायनर..
२४ तास उघडे(:P).. त्यानंतर तो आमचा कट्टाच झाला! कधीही तिथे जाऊन बसायचे, एक काहीतरी खायला आणि सतत रिफिल होणारी कॉफी ऑर्डर देऊन २-३ तास गप्पा ठोकत बसायचे.. कधी एडवर्ड्स सिनेमाज मधे पिक्चर टाकायचा आणि १ ला यायच जेवायला.. सही प्रकार आहे तो !!
त्यानंतर घरी पिझ्झा ऑर्डर करणे झालेच सुरू.. कधी पापा जॉन्स, पिझ्झा हट, डॉमिनोज, टॉपर्स .. सगळे पिझ्झे अफलातून. तोपर्यंत चिकनलाही जीभ सरावलेली..
पण सर्वात भारी म्हणजे डॉमिनोज चा पिझ्झा आणि ओव्हन बेक्ड सॅंडविचेस.. आह्हा! पापा जोन्सचा क्रस्ट आणि चीझी पिझ्झा.. टॉपर्सचा एकदम जनरसली टॉपिंग्स टाकलेला पिझ्झा, पिझ्झा हटचा पिझ्झा मिया वाला पिझ्झा... एकसे एक आहेत सगळे !! किती खाल्ले तरी कंटाळा येत नाही.. (हे एकावेळेसचे नाही म्हणते.. :) )
टॅको बेलचे नाव आलेच पाहीजे यात.. सुरवातीला म्हणजे चिकन फार गुड बुक मधे नव्हते तेव्हा मी इथला बीन बाहा चलूपा विदाऊट बीफ ट्राय केला होता.. काय बेकार लागली होती चव.. बीन्सना काही चवच नव्हती.. परत कधी वाट्याला नाही गेले मग.. परंतू आत्ता आत्ता एका प्रवासाहून येताना रात्री उशीरा चिकन बाहा चलूपा खाल्ला.. आणि मी मंत्रमुग्ध झाले !! आता मला भूक लागली की चिकन चलूपा आठवतो, यावरून काय ते समजा !! :| बाकी टॅको बेलमधले बरिटोज, सॅलड्स वगैरे सगळं छान असलं तरी त्यांचे कौतुक करून मला चिकन चलूपाचा हिरमोड नाही करायचा ! त्याला बेस्ट पदार्थ इन टॅको बेलचे बक्षिस दिलेच पाहीजे !!
पी एफ चॅंग, चायना बिस्त्रो... आहा! इथे जायचं म्हण्जे एक्दम साग्रसंगीत असतं.. कसंही आवरून , घरच्या कपड्यात नाही काही !! छान आवरून, ठेवणीतले कपडे घालून ( हेहे... हे उगीच!) तिथे जायचे.. कायमच वेटींग असतं तिथे.. पण तो वेळ कसाही जातो.. सुंदर म्युझीक.. भरपूर फुलझाडं, झाडांवर लायटींग, कारंजी, लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, जिथे मोठेही खेळतात.. सुंदर एरिआ आहे एकंदरीत..
खाणं तर क्या कहने.. कंग पाओ चिकन, लेट्युस चिकन रॅप्स, फ्राईड राईस, क्रॅब केक्स,क्रॅब वॉन्टॉन्स .. अफलातून आहेत इथले पदार्थ.. ( चायनिज मधे इथलं पांडा एक्स्प्रेस सुद्धा सहीच ! )
त्याच्यासमोरच आहे, कॅलिफॉर्निया पिझ्झा किचन.. इतकी सुंदर पिझ्झाची चेन मी नाही पाहीली कुठे... सर्वत्र पसरली आहे, आणि सगळीकडे माणसं उतू जात असतात !
इथला थाई चिकन पिझ्झ्यामधे चक्क दाण्याचा कूट आहे..! आणि तो थाई सॉस बरोबर इतका सह्ही लागतो की काय सांगू!! शिवाय माझा अतिशय आवडता पिझ्झा म्हणजे, मॅंगो तंदूरी चिकन पिझ्झा.. यात पिझ्झा बेसवर चक्क आपली एखादी पंजाबी भाजी ओतली आहे टॉपिंग म्हणून असं वाटावं इतकी देसी चव !! नक्की खाऊन पाहावा !! ( भूक लागली आता !! :( )
आमच्या घराजवळच एक मेडीटेरनिअन हॉटेल आहे.. अलिबाबा’ज कॅफे म्हणून.. छोट्टूसं हॉटेल.. १०-१५ बाकडी.. एका मोठ्या खोलीचं एका भिंतीने स्वयपाकघर व हॉटेल अशी विभागणी.. खिडकी मधून ऑर्डर घेणे-देणे चालू.. आणि सतत घमघमाट! तिथे श्वॉर्मा फार छान मिळतो हे माझ्या नवर्याचं मत.. मला त्या ऑड नावामुळे की काय जरा नकोच वाटत होतं.. परंतू तिथे गेलो.. सुरवातीला अपेटायझर म्हणून फलाफल.. वाह.. कोथिंबीर वडीचा चुलत भाऊ इतक्या लांब भेटेल असं वाटलं नव्हतं! आता श्वॉर्माबद्दलही उत्सुकता दाटून आली.. एका छोट्या हॅंडलवाल्या वेताच्या परडीमधून मस्त पेपर मधे गुंडाळलेली एक गुंडाळी दिसली.. त्यात बर्याच ओळखीच्या भाज्या.. रोस्टेड चिकन.. आणि सुंदर मेडीटेरनिअन मसाले.. पण अती प्रचंड.. म्हणजे निदान माझ्या पोटाला ते फार हेवी होतं एकावेळेस.. त्यानंतर बकलावा किंवा खोबर्याच्या केकसदृश गोड पदार्थ खायचा.. बरोबर भातुकलीत असतात तशा छोट्ट्याश्या कपांमधून २-२ घोट तुर्की कॉफी किटलीमधून ओतून प्यायची.. अतिशय गोड प्रकार आहे हा !! :)
मेडीटेरनिअनचा विषय निघालाच आहे तर ’सी साईड ग्रिल’ बद्दल लिहीलेच पाहीजे.. हे नावाप्रमाणे खरंच सी साईडला आहे.. एका साईडला समुद्र आणि दुसर्या बाजूला हार्बर अशा अप्रतिम लोकेशनला हे रेस्टॉरंट आहे.. कंप्लीट मेडीटेरनिअन इंटेरिअरने तुम्ही खरंच त्या विश्वात जाता.. इथे बाबा घनोश(म्हणजे जवळपास आपलं वांग्याचे भरीत) , हमस अप्रतिम आहेतच.. पण इथली चिकन कुबिदे ही डिश अफलातून आहे ! इतकं मुलायम चिकन मी कुठेही नाही खाल्लं!
याच ठीकाणी एक पर्शियन आईसक्रीमही मिळते.. एक्झॅक्ट आपले केशर पिस्ता.. फक्त त्यावर मँगो, चेरीचे तुकडे आणि गुलकंदाचा रस... :) इंटरेस्टींग कॉंबिनेशन राईट ??
थाई फुड.. काय लिहीणार.. चायनिज इतकंच थाईही खूप छान मिळतं इथे.. सावडी( हो अशा नावाचं हॉटेल आहे इथे! मला झोपडीच वाटतं ते.. अरे हो, परवा वाचलं शिकागो का कुठेतरी झोपडी नावाचंच इंडीयन रेस्टॉ. आहे म्हणे!! ( करेक्ट मी इफ आय ऍम रॉंग..)
असो.. सावडी, चार्न थाई, एक्झॉटीक थाई वगैरे काही जागाही सहीच.. सावडी मधल्या लोकांना इंग्लिशचा गंध नाहीए, त्यामुळे तिथे ऑर्डर देणे हा जरा करमणुकप्रधान किंवा कटकटीचा कार्यक्रम असतो! पण पदार्थ बरोबर आल्याशी मतलब.. बेसिल फ्राईड राईस बरोबर कुठलीही चिकन डीश छान लागते खरं.. पण थाई फुड फार तेलकट असते, मला एकदा जरा त्रास झालेला घशाचा, त्यामुळे कमीच झाल्या आहेत वार्या..
मंगोलिअन बार्बेक्यु.. सगळ्या भाज्या, मीट, चिकन काय हवं असेल ते आपण सिलेक्ट करायचे.. आणि मग शेवटी आपल्याला त्या सर्व भाज्या/चिकन वगैरे मंगोलियन बार्बेक्यु सॉस मधे भाजून देतात.. हे ही छान लागते..
मी इथे आल्या आल्या नवर्याचे सुरू झाले.. सुप्प्लॅन्टेशनला(Souplantation) जाऊ ! हेहे .. हे नाव वाचून मला खरच खूप हसू यायचे.. असं कसं नाव.. आणि ते पण सॅलड खाऊन काय पोट भरेल का.. पण एकदा गेलोच.. आणि जातच राहीलो.. ! सुरवातीला सॅलड्सचा बार..इथे जे पाहीजे ते, पाहीजे तित्के मात्र एकदाच घ्या.. मग त्यात, वेगवेगळे बीन्स, लेट्युस, बाकीचे आपले नेहेमीचे सॅलड, सर्व भाज्या, एग्स आणि बरेच काय काय.. त्यात रांच,मेयॉनिज,हनी मस्टर्ड जे काही हवंय ते घ्यायचे.. .. आणि मग तुमच्या सिटींग ऍरेंजमेंटपाशी यायचे.. ती जागा बुक झाली की आतल्या सेक्शनमधे हुंदडायला मोकळे.. आत तर काय अनलिमिटेड सुप्स,केक्स, पिझ्झा, मफिन्स, फ्रुट अन जेली, आईस्क्रिम्स ... कितीही घ्या...
आपल्याला वाटतं सॅलडने काय पोट भरेल.. पण इथे येऊन झोप येईल इतकं खाणं होतं!! सही हॉटेल !!
डाफ्ने( Daphne's) नावाचे ग्रीक रेस्टॉरंट आहे इथे.. तिथेही फेटा चीझ, हमस,पीटा ब्रेड, फलाफल असलेले अपेटायझर्स, वेगवेगळे सॅलड्स, गिरो (Gyro) सॅंडविचेस , आणि अजुनही बर्याच लंच / डिनर मेनुज आहेत इथे.. हे ही सुंदर रेस्टॉरंट आहे.. फक्त या ग्रीक चवीची सवय व्हायला कदाचित वेळ लागेल.. पहील्याच झटक्यात आवडण्यासारखं जरा कमीच आहे..
चिलीज.. खूप रात्रीपर्यंत उघडे असणारे अजुन एक हॉटेल.. फील जरा क्लब सारखाच आहे ! त्यामुळे लोकं फुल्ल धिंगाणा घालत असतात इथे.. इथली साउथवेस्टर्न एग रोल्स ही डीश जर तुम्ही नाही खाल्लीत तर काहीच अर्थ नाही! अप्रतिम ! दुसरा शब्द नाही..असाच इथला अजुन एक प्रकार.. मी नाव विसरले डीशचे.. पण त्यात चक्क लाकडावर भाजलेला , लिंबू वगैरे पिळून तिलापिया मासा दिला होता ! ते प्रेझेंटेशन पाहूनच आपण खरं तर गार होतो ! खाऊन , त्या चवीने अजुनच !! :))
या लिस्ट मधले शेवटचे रेस्टॉरंट म्हणजे ’वुड रांच’ ... आमच्या घराच्या गल्लीतच आहे हे.. सतत गर्दी.. म्हणजे पुण्यातल्या श्रेयस,वैशाली,वाडेश्वर,अभिषेक अशा सगळ्या हॉटेल्सची गर्दी एकत्र केली तर किती होईल.. तितकी!! सतत काय ?? शेवटी गेलोच तिथेही...... नावाप्रमाणे बाहेरूनच इंटेरिअरचा अंदाज आला.. वुडन रस्टीक इंटेरिअर.. आत गेलो.. उंच टेबल- बाकड्यांवर बसवलं.. आख्ख्या हॉटेलात फक्त टेबलावरच्या मेणबत्तींचा उजेड.. आम्ही अपेटायझर म्हणून श्रेडेड ओनिअन फ्राय मागवले.. जरावेळाने वेटरने एक जवळपास बादलीभर तळलेले कांदे आणून ठेवले !!!!! ती क्वांटीटी मी आजवर पाहीलेल्या हॉटेल्स मधली सगळ्यात प्रचंड होती!! एकंदरीत आयडीआ आलीच... काय प्रकरण आहे... पाणी आणि कोक मागवला तर ते आलं आपली लोणच्याची बरणी असते ना? त्यातून !! ती आख्खी बरणी हातात धरून प्यायचं पाणी!! हाहा !! आम्हालाही गंमत वाटू लागली... ऑर्डर घाबरून २ सॅंड्विचचीच केली.. म्हटलं किती येतंय कोणास ठाऊक ! मश्रुम पोटॅटो आणि बार्बेक्यु चिकन सॅंडविचमधे आमचे पोट पूर्ण भरले !! विचार करा काय प्रकार आहे हा...
अफलातून एक्स्पिरिअन्स ...
बाकी तर काय खूप असतात हॉटेल्स.. मी मला आवडणारी इथे लिहीली..
अजुन बीजेज् चा पिझ्झा आहे, हॅबिटचे सॅंडविच, क्रॅब हाऊस चे क्रॅब केक्स, रेड लॉब्स्टरचा ब्रेड, टीजीआय फ्रायडे(म्हणजे, थॅंक गॉड इट्स फ्रायडे!) चे हटके वातावरण, एग्ज अन थिंग्स मधला ब्रेकफास्ट.. ( नवर्यानी सांगितलेली अनमोल माहीती, इथे फक्त अतिशय सुंदर मुलींनाच वेट्रेस म्हणून काम मिळते ! ह्म्म्म... असो... ), युनिव्हर्सल मधले बुका दे बेप्पो या फनी नावाचे इटालिअन रेस्टॉरंट, जॅपनिज यामातो सुशी, कोल्डस्टोनचे बनाना स्प्लिट आईसक्रीम, बास्कीन रॉबिन्सचे आईसक्रीम केक्स, चीझकेक फॅक्टरीमधले केक्स, एकंदरीत त्यांची प्रचंड क्वांटीटी.. याशिवाय इस्ट कोस्ट वरच्या वेगळ्या चेन्स, वेगळी हॉटेल्स असतीलच !
असो... अशी ही सगळी माझी अमेरिकेतील खाद्ययात्रा.. जेव्हा जेव्हा माझ्या स्वयपाकाने दगा दिला तेव्हा तेव्हाचे हे माझे आधारस्तंभ ! ही लिस्ट करून ठेवावी असं डोक्यात होतंच.. ब्लॉगला एक उत्तम चमचमीत विषय मिळाला! :)
एक वि.सू : आम्ही हे सगळं वर्षभरात खाल्लं आहे याची नोंद घ्यावी! तसे एरव्ही तितके खादाड नाही आहोत ! :) :)
प्रतिक्रिया
6 Mar 2009 - 1:09 am | विसोबा खेचर
मस्त चवदार लेख..! :)
एक वि.सू : आम्ही हे सगळं वर्षभरात खाल्लं आहे याची नोंद घ्यावी!
जियो..! :)
तात्या.
6 Mar 2009 - 1:36 am | मिथिला
भाग्यश्री... छान लिहिले आहेस .... आम्ही हे सगळं वर्षभरात खाल्लं आहे याची नोंद घ्यावी! :)
6 Mar 2009 - 1:49 am | संदीप चित्रे
>> इथली साउथवेस्टर्न एग रोल्स ही डीश जर तुम्ही नाही खाल्लीत तर काहीच अर्थ नाही!
कालच रात्री चिलीज मधे साउथवेस्टर्न एग रोल्स खाऊन आलो :)
तसेच बफेलो विंग्जही मला चिलीजइतके बाकी कुणाचेच आवडत नाही !
तू चिलीजमधे मॉर्ल्टन चॉकोलेट केक हे डेझर्ट खाल्ले आहेस का?
नसशील तर खाऊन बघ....... आणि नक्की कळव मला !!!
--------
रूबी ट्युसडेमधेही तिलापिया बेष्ट मिळतो.
जरूर ट्राय कर.
--------
तुमच्या इथे मॅकरोनी ग्रिल किंवा बर्टुचीज ही इटालियन रेस्टॉरंट्स आहेत का?
त्यांचे अनुक्रमे 'पेने रस्टिका' आणि 'टस्कन चिकन विंग्ज' खाऊन बघ :)
---------
टिरामिझु हे डेझर्ट आवडतं का? मग 'ऑलिव्ह गार्डन'ना पर्याय नाही !!!
---------
6 Mar 2009 - 2:20 am | संदीप चित्रे
अग हो... ऑन द बॉर्डर (ओटीबी) राहिलंच की यादीत !
आधी मार्गारिटा प्यायची आणि मग मेक्सिकन फूड एन्जॉयायचं :)
6 Mar 2009 - 1:50 am | नंदन
खाद्ययात्रा मस्त जमली आहे. कोबीचं पिठलं वाचून गंमत वाटली :). डेनीज खरोखर रात्रीच्या वेळी गप्पा हाणायला चांगली जागा आहे. कॉलेजात रात्री बसून लॅबमध्ये एखादं मोठं प्रोजेक्ट संपेपर्यंत सकाळचे ३-४ वाजत. अशा वेळी, डेनीजचाच सहारा असे. डेनी सोडलं तर, त्या काळात जॅक इन द बॉक्स बरोबर खिशाला परवडणारं म्हणजे टॅको बेलच. १.०७ डॉलर्स इतक्या मोठ्या रकमेत अनेक वेळची जेवणं तेव्हा पार पडली होती :)
चिलीज मधल्या मेन डिशेसबरोबर त्यांचा 'मोल्टन चॉकलेट केक'ही बेश्ट असतो. फक्त खाताना कॅलरीजचा विचार करू नये ;). वुड रांचबद्दल प्रथमच ऐकलं. एकदा ट्राय करायला हवं. तात्या म्हणतो, तसा मस्त चवदार लेख झाला आहे!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Mar 2009 - 1:58 am | नाटक्या
पण अजूनही काही वैशिष्ठ्यपुर्ण ठिकाणं राहीली आहेत. अर्थात कदाचित ती लोकल असावीत. पण ह्यात माझीही भर..
१. ऑलिव्ह गार्डन / पास्टा पोमोडोरो / मकॅरोनी ग्रिल - इटालियन
२. थाय क्युजीन्स.. बे एरियात असंख्य. त्यातल्या त्यात माझे फेवरिट "माय थाई"
३. पी. एफ. चँग जरी चायनिज असले तरी तितके ऑथेंटिक नाही. सॅन फ्रान्सीस्को मध्ये चायना टाऊन मध्ये उत्तम चायनिज मिळते. कुंग-पॉ चिकन आणि फिश फिले माझे फेवरिट..
४. बे एरिया मध्ये काही ईंडो-पाकिस्तानी रेस्टॉरंट्स आहेत, शान, शालिमार, पाकवान इ. बिर्यानी आणि तंदूर चिकन तर लाजवाब. आठवड्यातून एकदा तरी जातोच तिथे..
५. सुप्प्लॅन्टेशन सारखेच स्विट टोमॅटो आणि फ्रेश चॉइस - मुलांचे आवडते
६. टॅको बेल सारखेच "चिपोतले", मेक्सीकन मध्ये चिलीज, शेवीज ही दोन मोठी नावं..
७. अमेरिकन फूड साठी: कोकोज, एलिफंट बार सारखे रेस्टॉरंटस..
८. मलेशियन रेस्टॉरंटस: बे एरिया मध्ये 'बनाना लिफ' इथला रोटी-प्राठा (हो रोटी-प्राठा) अप्रतिम. ह्याचा मालक पुर्वी सॉफ्टवेअर इंजिनियर होता नंतर त्याने हे रेस्टॉरंट काढले, आता १० इंजिनियर इतके कमवतो. शुक्रवार-शनिवार या ठिकाणी ३०-४५ मिनिटे वाट बघायला लागते.
९. बे एरियातील असंख्य 'फो' रेस्टॉरंटस, 'फो' म्हणजे तांदळाच्या शेवया, भाज्या आणि कुठल्याही प्रकारचे मांस/मासे या पासून बनवलेले सूप. हा व्हिएटनामी प्रकार आहे. खुप छान लागतो. http://en.wikipedia.org/wiki/Pho
१०. असंख्या भारतीय रेस्टॉरंटस: साऊथ इंडियन (यात उडूपी/मद्रास आणि हैद्राबादी असे दोन उपप्रकार पण आहेत), गुजराथी, नॉर्थ इंडियन, (नेपाळी सुध्दा होते ते बंद झाले).
फक्त नाही ते एकही मराठी रेस्टॉरंट!!! :-( त्यामुळे त्या जेवणासाठी सौ. वर अवलंबून रहावे लागते... :-)
- नाटक्या
6 Mar 2009 - 2:02 am | नंदन
उत्तम यादी. अन्नपूर्णा नावाचे एक नेपाळी रेस्टॉरंट होते ना बे एरिआत?
इथे 'रेड सी' आणि 'हरार' नावाची दोन इथिओपियन हाटेले आहेत. तीही (वारंवार) भेट देण्याजोगी. :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Mar 2009 - 2:37 am | नाटक्या
बहुतेक बंद झाले.. :-(
6 Mar 2009 - 2:49 am | भाग्यश्री
नाटक्या, उत्तम यादी ! मी बरीच विसरले यातले..
मराठी जेवण किंवा सद्ध्यातरी स्नॅक्स खायचे असतील तर आर्टेशिया मधे 'मुंबई की गलीओंसे' ला जाऊ शकता.. साबुदाणा वडा अप्रतिम असतो.. शिवाय कच्छी दाबेली, पावभाजी, बाँबे सँडविच, आपलं इंडो-चायनिज स्टाईल मांचुरिअन.. उत्तम मेनू आहे.. पदार्थ, जेवण उत्तम असते..
पण सद्ध्याच सुरू झाल्याने तो मालक सतत मार्केटींग करून प्रचंड पकवतो.. त्याही पेक्षा तुमच्या जागेपाशी येऊन बडबडबडबडबड बडबड करत बसतो ! एक घासही जात नाही त्यामुळे नीट..
असो.. पण पदार्थ चांगले असतात तसे..
आर्टेशिया मधले तर बरेच रेस्टॉ. आहेत.. राजधानी ए१!! प्रॉपर आपली इंडीयन थाळी.. अप्रतिम जेवण आहे तिथले.. सुदैवाने (तुम्हा सर्वांना जळवायला माझ्याकडे फोटो आहे !) :)
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 2:52 am | टिउ
मेलो, खपलो, ठार झालो!
तात्या फोटो बघुन असं का म्हणतात नेहमी हे आज मला कळालं...
6 Mar 2009 - 2:56 am | नाटक्या
तसे मुंबईतले इतर पदार्थ मिळतात इथे (वडापाव, पाणीपुरी इ) पण अस्सल मराठी पदार्थ नाही मिळत.
पुरणपोळी आणि कटाची आमटी, थालीपिठ, साबुदाणा वडा, सुरळीच्या वड्या, पिठलं-भात, मुगवड्यांची भाजी, अळूचं फतफदं, कोंबडी वडे, कोलंबीच हुमणं, ज्वारी/बाजरी/कळणाची भाकरका, ठेचा/झुणका, मसाले-भात, शेंगोळ्या, खमंग काकडी आणि मुख्य म्हणजे झणझणीत मिसळ, तर्री आणि पाव हे कुठे मिळणार?
- नाटक्या
6 Mar 2009 - 2:57 am | बेसनलाडू
नाटक्या,
तुमच्या घरच्या बे एरिया मिसळपाव कट्ट्याच्या वेळी मी हा मराठी हाटेलाचा मुद्दा बोललो होतो, ते लक्षात आहे का? ;) भांडवलदार शोधायला घेऊयात का? ;)
(धंदेवाईक)बेसनलाडू
6 Mar 2009 - 2:59 am | नाटक्या
आहे का कोणी? माझी तयारी आहे. ;-)
6 Mar 2009 - 2:58 am | भाग्यश्री
ह्म्म.. घरीच.. :|
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 3:05 am | टिउ
बास्स्स्स्स! हा आमचा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद. आता इथे फिरकणार देखील नाही आम्ही.
फोटो बद्दल आणि वरच्या लिस्टबद्दल भाग्यश्री आणि नाटक्या यांचा निषेध!!!
6 Mar 2009 - 6:00 am | स्वप्निल..
शाकाहारींसाठी एकदमच मस्त..
बाकी युनिअन सिटी मध्ये एक कबिला नावाचे भारतिय रेस्टॉरंट आहे..तिथले चिकन कबाब अप्रतिम असतात..
स्वप्निल
6 Mar 2009 - 2:55 am | बेसनलाडू
शान, शाहनवाज, शालिमार आणि पक्वान बरोबर खास हैद्राबादी दम बिर्यानी साठी अतिथी (वोल्फ्-ओल्ड् सॅन् फ्रान्सिस्को इन्टर्सेक्शन्), जाफ्रान् (एल् कमिनो), पीकॉक् (एल् कमिनो आणि डाउन् टाउन् सॅन होजे) आठवल्याशिवाय राहत नाहीत :) मात्र २६/११ नंतर मी शालिमार, जाफ्रान्, शाहनवाज वगैरे पाकिस्तानी हॉटेलांत खाणे बंद केले आहे. बिर्यानी क्।आयची तीव्र इच्छा झाली की गाडी घेऊन अतिथी गाठतो :)
थाय् जेवणासाठी कॅस्ट्रो स्ट्रीट् वरचे ऍमरिन् थाय् आवडते. मकार्थी रान्च च्या रान्च मार्केटकडचे थाय् कॅफे ही ठीक. त्याच भागातले पनांग प्यालेस् सिंगापूर-मलाय् जेवणासाठी आवडते. बनाना लीफ् ची तर बातच न्यारी! डेनीज् म्हणहे खरोखरच 'कट्टा' आहे; पण सगळेच फूड जन्क् या एकमेव क्याटेगरीमधले! पिझा पापा जॉन्स आणि पिझा हट् यांचा आवडतो.
पदव्युत्तर शिक्षणाच्या नॉर्थ कॅरोलायनामध्ये काढलेल्या दिवसांत (दोन वर्षांत) बर्गर किंग, टाको बेल् आणि रकस् पिझा, पापा जॉन्स्, आय् लव् एन् वाय् पिझा हे अन्नदाते होते.
भाग्यश्री, बिगर भारतीय जेवाणाची भूक तुम्ही चाळवलीत! ती सुद्धा दुपारचे जेवण जेवून आल्यावर! निषेध निषेध!!! :D
(खवय्या)बेसनलाडू
6 Mar 2009 - 4:03 am | एक
नाटक्या , बेला
लिस्ट बेस्ट आहे. सॅन फ्रान्सिस्को मधल्या नान-करी ची बिर्याणी पण टेस्ट करून बघ.
मी २ तिथेच खाऊन एक घरी पॅक करून येतो.
ज्यांना चिकन मट्ण पेक्षा अजून चालत असेल त्यांच्यासाठी चेलोकबाबी हा सुद्धा पर्याय उत्त्म आहे.
बेला, धंध्याची आयडीया बेश्ट आहे. जागा शोधावी लागेल. थोडं भांडवल गुंतवायला तयारी आहे.
6 Mar 2009 - 4:21 am | नाटक्या
जागा आहे माझ्या कडे. भांडवलाचं बघा!!! ;-)
6 Mar 2009 - 2:17 am | चकली
डेनीज् आणि तिकडे केलेला टाइमपास खूप आठवला...छानच लिहलस! नूडल्स आणि कं , ओल्ड शिकागो, चिपोटले लिहून भाग २ पण लिहून टाक.
चकली
http://chakali.blogspot.com
6 Mar 2009 - 2:28 am | अनामिक
मस्तं लेख...
इथल्या स्कूलमधले दिवस टॅको-बेल, सब वे, चिपोटले, वेंडीज्, बर्गर किंगमधेच काढलेत. सोबतीला सगळे पिझ्झे होतेच!
चिपोटलेतर दररोच असले तरी चालते... इथली ग्वॉकामोली फ्रेश आणि छान असते!
चिलीज् चा मोल्टन लावा म्हणजे "लै भारी".... आम्हा मित्र-मैत्रीणींचा कट्टा रात्री १० नंतर आणि आम्हाला हाकलेपर्यंत इथेच भरायचा.... ८-१०जणात ३ मोल्टन लावावर ताव मारायला आणि सगळं चिलीज् डोक्यावर घ्यायला काय मज्जा यायची.
आतापर्यंत ज्या-ज्या डेनीज् मधे गेलोय तिथे ३०मिनीटाआधी कधीच ऑर्डर आली नाही... पण इथे हॉट चॉकलेट मस्तं मिळतं... तसचं भरपूर गप्पा मारायच्या असतील, रात्रही असेल तर हे हॉटेल उत्तम आहे.
रुबी ट्युसडे आणि टि.जी.ऍफ मधे माझ्यासारख्या पापापा (पाव-पाला-पाचोळा) खाणार्याला जास्त काही मिळतच नाही!
पी. एफ्. चॅग आणि ऑलिव गार्डनही आवडीचे आहेत.... ऑलिव गार्डन्मधे एकवेळ 'तिरामीसु' खावून बघा.... जन्नत आहे अगदी!
इथं ऍटलांटात 'स्वीट टोमॅटो' नावाचा एक सॅलर्ड बार आहे - के व ळ अ प्र ति म !! नान नावाचं एक (जरा हाय्-एंड वाटावं असं) थाय-फुड हॉटेल आहे... सगळ्याच ऑनट्रे मस्तं असतात!
आणि हो हॉटेल नाही पण स्टार-बक्सला विसरुन कसे चालेल.... इथे भरवलेले कट्टेही मिसतोय!
तुमचा लेख वाचून भूक लागली :)!
-अनामिक
6 Mar 2009 - 2:29 am | टिउ
वाचुनच भुक लागली...पण यातली बरीचशी रेस्टॉरंट्स इथे ईस्ट कोस्टला नाहीत बहुतेक...
आय-हॉप मधले ऑम्लेट्स पण वेड असतात.
6 Mar 2009 - 2:33 am | भाग्यश्री
ओहो... मिपाकर रसिक आणि खवैय्ये आहेत याची पावतीच ही!!
तुमच्या सगळ्यांच्या ऍडीशन्स बद्दल धन्यवाद..
मी लेख लिहीताना नंतर विचार कर-करून ब्लँकच झाले होते, की अजुन कुठले रेस्टॉ. राहीले आहे?.. आठवेचना काही!
बरीच विसरले आहे हे दिसतच आहे !
मी मुद्दाम आपली इंडीयन रेस्टॉ. नाही दिली, कारण आपलंच फुड, वेगळ्या देशातले, वेगळे पदार्थ / हॉटेल्स एकत्र जमवावेत असं वाटून लिहीलं आधी.. पण आता आपण इथे हीसुद्धा हॉटेल्स टाकून लिस्ट परिपूर्ण करूयातच! :)
तसंही आमच्या इथे आमच्या दुर्दैवाने आम्हाला आवडेल असं भारतीय जेवण नाहीच मिळत.. काय वाट्टेल ते करतात..
एकच रेस्टॉरंट आहे इथे उल्लेखण्यासारखे ते म्हणजे वुडलँड हिल्स भागातले "अनारबाग" .. इथला चिकन टीक्का आपल्याला थेट भारतात नेऊन सोडतो !
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 7:06 am | वर्षा
अगं हे अनारबाग आहे कुठे?
आम्ही वुडलँड हिल्समध्ये होतो तेव्हा त्या भागाला सतत नावं ठेवायचो एक धड भारतीय रेस्टॉ नाही म्हणून आणि मग अर्टेशियाला जायचो. त्यातल्या त्यात थाऊजंड ओक्समध्ये (की चॅट्स्वर्थ्मध्ये...?)मध्ये वुडलॅंड्ज नावाचं मस्त साऊथ इंडियन रेस्टॉ सापडलं होतं. :)
6 Mar 2009 - 7:38 am | भाग्यश्री
http://www.anarbaghindiancuisine.com/ इथे बघ गं.. आणि असशील इथे जवळपास तर येऊन जा तिथे.. जाताना आम्हालाही घे बरोबर ! :)
तू म्हणतेस ते वुडलँड्स चॅट्सवर्थला असावे...
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 2:52 am | रेवती
तुम्ही सगळेजण अगदी.......
जाऊ दे आत्ता भावनेच्या भरात काही टंकायला नको....
लेख लई भारी!
रेवती
6 Mar 2009 - 2:55 am | घाटावरचे भट
उत्तम खाद्ययात्रा!!!
बाकी मंगोलियन हॉट पॉट मिळणारी हाटिलंसुद्धा उल्लेख करण्याजोगी आहेत.
6 Mar 2009 - 3:00 am | सूर्य
खाद्ययात्रा छान आहे. बरीच नावे कळली. विकेन्डला कुठे कुठे जायचे ते ठरवुन ठेवतो. ;)
- सूर्य.
6 Mar 2009 - 3:02 am | अनामिक
अजून एक...
प्रवासात, म्हणजे लाँग-ड्राईव, असताना वॉफल हाऊस किंवा क्रॅकर-बॅरलला मुद्दाम जा.... वॉफल हाऊस मधले हॅश ब्राऊन्स्, वॉफल्स् आणि अर्थात रेग्युलर कॉफी काय मस्तं कॉम्बीनेशन आहे... प्रवासातला सगळा थकवा जातो!
आणि एक - पनेरा ब्रेडचे सॅंडविचेसपण उत्तम... इथे एका मोठ्ठ्या पावात एक होल करुन सूप मिळतं... अगेन एकदम मस्तं कॉम्बो!
अनामिक
6 Mar 2009 - 4:23 am | शितल
भाग्यश्री,
तुझी खाद्ययात्री वेस्ट कोस्ट कडुन ईस्ट कोस्ट कधे कधी सरकणार आहे.. ;)
मस्त लिहिले आहेस. :)
मी व्हेजिटेरिअन असल्याने खरे तर येथे माझी उपासमार होते आहे का असे वाटते कधी कधी. :(
6 Mar 2009 - 4:31 am | भाग्यश्री
अगं मी इस्ट कोस्टला आलेच नाहीए.. पण नवरा सांगत असतो एक एक नावं!
एक सद्ध्या इंट्रेस्टींग वाटतंय ऐकून , बहामा ब्रीझ... पण आमच्या इथे नाहीए ते कॅरेबिअन रेस्टॉ..
आणि अगदी खरंय.. व्हेज जरा कमीच ऑप्शन्स आहेत.. मी निदान चिकन,मासे खाते म्हणून बरंय..
एक, नाटक्या, बेसनलाडू...(हे स्वल्पविराम धरूनच वाचणे.. अन्यथा निघणार्या अर्थाबद्दल मी जबाबदार नाही! :)) )
.. तुम्ही नक्की हॉटेल सुरू करा.. आम्ही नक्की येऊ!
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 4:38 am | नाटक्या
एक, नाटक्या, बेसनलाडू...(हे स्वल्पविराम धरूनच वाचणे.. अन्यथा निघणार्या अर्थाबद्दल मी जबाबदार नाही!
बेलाशेठ कळले ना तुमच्या बद्दल मिपाकरांना काय वाटते ते?
- नाटक्या
6 Mar 2009 - 4:52 am | भाग्यश्री
ओये.. मी मजा करतीय बरका.. तीन शब्द एकत्र आले आणि कॉमेडी अर्थ निघत होता म्हणून लिहीले..
आय होप तुम्हीही हच घेताय!
( हे असं काही कशाला वाटेल , मी न ओळखणार्या माणसाबद्दल! :) )
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 5:22 am | नाटक्या
आय होप तुम्हीही हच घेताय!
हो मी हलकेच घेतोय आणि लिहीले पण मजेतच होते. :-) बेसनलाडूचे माहीत नाही :-(
- नाटक्या..
6 Mar 2009 - 9:31 am | बेसनलाडू
जड लागणार्या गोष्टी जगात कमी आहेत आणि मराठी संकेतस्थळांवर नाहीतच, हे मला माहीत आहे. तेव्हा भाग्यश्री, नाटक्याशेठ, काळजी नको.
(निश्चिंत)बेसनलाडू
6 Mar 2009 - 9:50 am | आनंदयात्री
अरे व्वा हे साद-प्रतिसाद वाचलेच नव्हते .. शोभतो बरं नाटक्या बेसनलाडु तुला .. (हवे तिथे स्वल्प किंवा कोणतेपण विराम घालुन घ्यावेत)
:)
-
(फाटक्या) आंद्यालाडु
6 Mar 2009 - 4:36 am | नाटक्या
ईस्ट कोस्टच्या बद्दल तुम्हीच लिहा कि आम्हालाही कळेल :-)
- नाटक्या
6 Mar 2009 - 5:25 am | प्राजु
ऍप्पल बी.. हे एक मस्त रेस्टॉ मस्त आहे..
बाकी पिझ्झांबद्दल काय बोलावं... मॅक ग्रील.. ऑलिव्ह गार्डन.. सुखोथाई..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Mar 2009 - 7:13 am | छोटा डॉन
भाग्यश्रीची खाद्ययात्रा अगदी सुखेख जमली आहे. खोटे नाय बोलत पण बरीच वर्णने वाचुन हेवा वाटला किंवा "काय ऐश करतायत भौ " असे वाटुन गेले. लिखाणातला फ्लो ही छान आहे ...
बाकी आपण जिकडे जातो तिकडचे अन्न हे पुर्णब्रम्ह मानावे म्हणजे हालही होत नाहीत आणि खाण्यातली मजाही लुटता येते.
मस्त ...!!!
असेच अजुन येऊद्यात , आम्ही वाचतो आहोत ...
बाकी ह्या निमीत्ताने तात्यांच्या अशाच एका जुन्या लेखाची आठवण झाली.
( तात्यांच न ? का अजुन कोणी ? )
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
6 Mar 2009 - 7:33 am | मनीषा
खाद्ययात्रेची कथा खूपच रुचकर आहे...
आणि वारकर्यांसाठी मार्गदर्शनसुद्धा
6 Mar 2009 - 8:27 am | विंजिनेर
पी एफ चॅंग चेच ओलाँग मरिअनेटेड सी बास हा अगदी जिभेवर विरघळतो(व्हाईट राईस बरोबर तो अधिक चांगला लागतो. फडफडीत ब्राउन राइसने मजा जाते
असं मला तरी वाटतं).
शेवटी मुखवास म्हणून बनाना-स्प्रिंग रोलस् पाहिजेतच!
लॉरेन्स वरचं कोरियन बार्बेक्यु आणि सेंट्रल ला अगदी लागून असलेले पुष्पा हे अफलातून आहेत.
पुष्पा (हे जुने नाव आहे. सध्या मालक आणि नाव दोन्ही बदललेलं आहे पण जुन्या बे एरियनकरांना पुष्पाच माहिती आहे) एका आंधप्रदेशी मालकाने चालविले आहे.
त्यात मिळणारा अफलातून डोसा, चटणी आणि सांबार हे थेट भारतातले !!
झालंच तर रस्सम सुद्धा डोळयातून पाणी काढणारं असतं
नंतर शेवटी लुसलुशीत गुलाबजाम+व्हॅनिला आईसक्रिम (खास हैदराबादी इष्टाईल!!) किंवा त्या यंत्रा मधून भुसुभुसू गळणारं आंबा आईस्क्रिम!!
अल् कमिनो रियाल वरचं "टेस्ट ऑफ इंडिया" कसं काय विसरलात भाग्यश्री तै?
"अफगाण" हे अस्सल अफगाणी रेस्टॉरंट. तिथले कबाब/व्हेनशन् किंवा सी-फुड राईस हे भरपूर आणि अफलातून असतात!
पाश्चिमात्य जेवणासाठी कॅस्ट्रो वरून व्हिला स्ट्रिट वर वळल्यावर टोकाशी टाईड हाउस ही मायक्रो ब्रुअरी आहे. त्यातले पोर्क रिब्स किंवा बर्गर जरूर खाऊन पहा! जोडीला (चालत असेल तर) ताजी ताजी अँबर बियर पाहिजेच!
कॅस्ट्रोवर ग्रँडमास् एन्शिलाडास पण अफलातून मिळतात. माझ्या मेक्सिकन मित्राने सांगितले की तिथे तो गेल्यावर त्याला त्याच्या मूळ गावातल्या चवीची आठवण येते!!
थोडं दक्षिणेला सॅन डियेगोत "सरवणा भवन" राहिलंच की तै... तिथला उत्तपा आणि मसाला डोसा थेट चेन्नई!!
6 Mar 2009 - 8:53 am | भाग्यश्री
वाह सही लिस्ट आहे..
मी बे एरिआत नाही राहत हो.. तेव्हा मला तिथले काही माहीत नाही..
ऐकून आहे ते फक्त अंबर आणि टर्मरिक.. टर्मरिक मधे जेवले आहे.. उत्तम आहे ते..
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Mar 2009 - 9:07 am | नाटक्या
कसे विसरलो.
"अफगाण" हे अस्सल अफगाणी रेस्टॉरंट. तिथले कबाब/व्हेनशन् किंवा सी-फुड राईस हे भरपूर आणि अफलातून असतात!
फ्रिमॉन्ट मध्ये 'सलांग पास" नावाचे अफगाण रेस्टॉरंट आहे. तिथे बोलानी नावाची डिश मिळते, असते आपल्या आलू-पराठया सारखी पण चव अगदी लाजवाब...
तसेच इटालियन मध्ये आणखी एक नाव म्हणजे "चिज केक फॅक्टरी". नावाप्रमाणेच इथले चिज केक अतिशय सुंदर. वेगवेगळ्या प्रकारचे पास्टे तर आहाहा!! आणि सगळ्यात लाजवाब म्हणजे 'बफेलो ब्लास्ट' म्हणजे 'बफेलो विंग्ज' सारखाच प्रकार पण बोनलेस चिकनने बनवलेला.
तसेच पी एफ चॅंगचे 'लेट्यूस व्रॅप' पण सुंदर..
काय आहे ही लिस्ट संपता संपत नाही. काय करणार आमचे ब्रिदवाक्यच आहे "खाण्यासाठी (पिण्यासाठी सुध्दा) आम्ही कुठेही आणि कधीही जातो"
- नाटक्या
6 Mar 2009 - 8:46 am | सहज
माझे नाव सहज आहे . मी देखील glutton आहे.
6 Mar 2009 - 9:21 am | आनंदयात्री
>>, तव्यावरून काढतानाच पोळि खायला सुरवात केलीत तर तुमचे दात शाबूत.. नाहीतर! अरे देवा.. त्यातून हो.. माझी गोल्डन टेंपल >>नामक मैद्याची कणीक! Sad जाऊदे.. संपले ते दुष्ट दिवस!
एक नंबर !!
6 Mar 2009 - 10:31 am | चित्रा
लेख फारच मजेशीर आहे. :) लिहीण्याची मनमोकळी शैली आवडली.
अवांतर - नवर्याला दहा (आपल्याला न जमणार्या) गोष्टी करून घालण्याचा प्रत्येक मुलीला का सोस (सुरूवातीला) असावा, हे एक आश्चर्यच आहे. (म्हणजे मलाही होता - एकेकाळी. पण नवर्यांना असते का असे काही लग्नाआधी वाटत की, अमूक एक गोष्ट मी माझ्या बायकोला करून देणार(च), करून खायला घालणार(च) किंवा असेच काही?! काय कोण जाणे? )
6 Mar 2009 - 10:36 am | छोटा डॉन
का नाही ?
भरपुर असते अशी इच्छा आणि त्यात मज्जाही आहे आणि मला जरा हे रोमँटिक वाटते ... :)
माझ्या लग्नानंतर हवे तर माझ्या बायकोला विचारा की मी काय काय करुन खाऊ घातले ते ;)
मला ज्याम इंटरेस्ट आहे अशा गोष्टीत ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
6 Mar 2009 - 4:55 pm | ऍडीजोशी (not verified)
डाण्या मेल्या तुला भुर्जी सोडून अजूनही काही काही बनवता येतं हे सांगितलं नाहीस गधड्या
6 Mar 2009 - 10:53 am | प्रकाश घाटपांडे
आमी हळद लावायचा सुष्टपना करायचो.)) :-))
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Mar 2009 - 6:01 pm | मेघना भुस्कुटे
मस्तच झाला आहे लेख. तू म्हणालीस तसं अमेरिकेतल्या हाटेलांबद्दल काहीही माहीत नव्हतं, तरी जाम धमाल आली वाचायला (याचा अर्थ मी खवैयी आहे!!!!).
आता असंच तिथली ग्रोसरी शॉप्स आणि भारतीय प्रकार मिळवायला करावी लागलेली यातायात, त्यात हाताला लागलेल्या काही अनमोल आणि अनपेक्षित चिजा याच्याबद्दल लिही ना. धमाल येईल. (जीव हावरा हावरा!!!!)
6 Mar 2009 - 11:18 pm | भाग्यश्री
धन्यवाद सगळ्यांचे भरभरून प्रतिसाद दिल्याबद्द्ल !!
चित्रा, तुम्ही म्हणताय ते खरंय.. स्वयपाकात काहीही धड येत नसतानाही मला रोज नवीन पदार्थ करायचा उत्साह मात्र होता! आणि या हलाखीच्या दिवसात( :) ) माझ्या नवर्याच्या स्वयपाकामुळेच(आनि अर्थात या वरच्या लिस्टने!) आमची पोटं भरली आहेत.. त्याच्या काही स्पेशल डिशेस असतात त्या तोच करतो उत्साहाने.. पण एकंदरीत मी सद्ध्या रिकामी, आणि घरातच असल्याने मीच स्वयपाक हे माझंच काम आहे असं समजत आहे.. ( जरी त्याचं कुकींग माझ्यापेक्षा अप्रतिम असलं तरी!)
मेघना, सही आयडीआ दिलीस.. आता लिहावसं वाटलं तर निदान विषय तरी मिळाला!! :)
पुन्हा एकदा धन्यवाद! मजा आली खूप ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/