तुकयाची अवली.. .. अवलोकन

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
22 Jan 2008 - 3:29 am

मंडळी,
१५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यन्त जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठि ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरूवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे..
लेखिकेची भूमिका :
आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढि आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची. आपल्या भक्तीनं, अभंगवाणीनं, विद्वत्तेनं , संत पदाच्या शिरोमणी पदावर पोहोचलेले संत तुकाराम हे संत परंपरेतलं बहुमोल रत्न. त्यांच्या आयुष्यात त्यांनी सोसलेले आघात, त्यांची पराकोटीची विठ्ठल भक्ती, आअणि श्वासाश्वासापर्यंत पोहोचलेली त्यांची अभंगवाणी या सगळ्यांचा विचार केला तर संत तुकाराम हे परमेश्वरी अवतार असले पाहिजेत या साक्षात्कारापर्यंत मराठी माणूस पोहोचतो. त्यातच त्यांचं सदेह वैकुंठगमन! म्हणूनच 'तुका आकाशा एवढा' बनून मराठी माणसाचं मन त्यांनी व्यापून टाकलं आहे.
'आवली' संत तुकारामांची द्वितीय पत्नी. संत साहित्याच्या अभ्यासकांनी. इतिहासकारांनी, पुराण्-प्रवचनकारांनी, सिनेमा-नाटककारांनी, साहित्यिकांनी आवलीची एवढीच ओळख ठरवली आणि तेवढीच सांगितली. एवढंच नव्हे तर संत तुकारामांच्या, तरल मनःस्थितीत लिहिलेल्या काही अभंगांचा आधार घेऊन 'आवली ही भांडखोर, कर्कशा, आणि कजाग बाई होती' अशा पद्धतीचं सर्टिफिकेटही तिला देऊन सारे मोकळे झाले.
लेखिकेला एम्.ए. करत असताना, "संत तुकाराम' हा एक पेपर होता. त्यामध्ये संत तुकारामांचं चरित्र संपूर्ण अभ्यासताना, साधकापासून्-सिद्धावस्थेपर्यंत तुकारामांच्यात होणा-या बदलाची त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट क्षणांची भागिदार आणि साक्षिदार असलेली आवली... तिचा कजाग, भांडखोर, कर्कशा असा उल्लेल्ख नेहमी आढळला. पण ती आवली अशी का झाली हा विचार कोणीच केला नाही.. ना तुकाराम महाराजांनी, ना इतिहासकारांनी, ना अभ्यासकांनी, ना साहित्यिकांनी आणि आवली उपेक्षितच राहिली कायमची.
तुकाराम महाराजांसारख्या वटवृक्षाची, एक चिवट, कणखर, मजबूत अशी मुळी बनून आवली कायम जमिनीतच राहिली; नव्हे, ती जमिनच बनून राहिली, उर फाटलेली, भेगाळलेली, जखमी जमिन. त्या पूर्णपणे आंधारातच राहिलेल्या अवलीला, तिच्यातील घायाळ, जखमी, विध्व, आईला, पतीवर निस्सिम प्रेम असूनही त्याने दुर्लक्ष केल्यामुळे संसाराचा गाडा एकाहाती ओढणा-या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठि लेखिकेने केलेला हा खटाटोप.
'आवली ही पुणे परगण्यातील अतिशय श्रीमंत, सधन सावकार आप्पाजी गुळवे यांची लाडकी मुलगी" या एका संदर्भाशिवाय इतिहासात तिच्याबद्दल काहिही माहिती नाही. तिची आई, तिची भावंडं, तिच्या पूर्वायुष्याबद्दल तसेच, संत तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाल्यानंतर त्यांच्यामागे ती कशी जगली? कुठं जगली? तिची मुलं कशी वाढली? त्यांचं पुढे काय झालं? आवलीचा शेवट कुठे , कधी झाला? काहीही धागा इतिहासात नाही. हा इतिहासाचा करंटेपणा की अवलीचं दुर्भाग्य? केवळ इतक्या त्रोटक माहितीवर संपूर्णपणे लेखिकेने उभं केलेलं काल्पनिक विश्व, आवलीच्या बालपणीचे काल्पनिक प्रसंग, काल्पनिक पात्र.... या पुस्तकातून पहायला मिळतात. घरी कामाला असणा-या 'गुणाबाई' या काल्पनिक पात्राच्या मुखी येणारं विठ्ठलाचं नाव आणि तेव्हापासूनच त्याच्याशी आवलीचं असलेलं भांडण, लेखिकेने प्रभावीपणे दाखवलं आहे. 'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला आधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला. तुकारामांचे संसारापासून, मुलांपासून, आपल्यापासून दूर दूर जाणे आणि पुरूष असूनही निष्क्रिय होऊन केवळ देवभक्ती करणे याने पेटून उठणारी, विठ्ठलाला बोल लावणारी आवली ही आपलि वाटू लागते. 'विठ्ठल हा अवलीचा अपराधी आहे' या निष्कर्षावर आपण येऊन पोहोचतो. काम्-धंदा , मुलं-बाळं सोडून तुकाराम करत असलेल्या देवभक्तीपुढं तिनं पेटून उठणं , कदाचित हेच 'कजाग, कर्कशा बाईल' या तिच्या ओळखीला कारणीभूत ठरलं.
तुकारामांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या वेळचा प्रसंग मनाला चटका लावून जातो. "पुन्हा एकवार तिनं बैठकीवर पाहिलं, आणि ती चरकली, ती गोंधळली, ती पुन्हा पुन्हा डोळे विस्फारून पाहू लागली. त्या घटनेचा अर्थ तिच्या लक्षांत येईना. नुसत्या टाळ्-चिपळ्या.. बुवांना सोडून.. बुवांच्या शरिरापासून वेगळ्या.. आवली चरकली. हळू हळू तिला त्या घटनेचा अर्थ कळू लागला.. बुवांचे शब्द आठवले 'आवले, ज्यादिवशी या टाळ्-चिपळ्या माझ्या शरिरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्यादिवशी समज तुझा तुकाराम या जगांत नाही.' ती विलक्षण चरकली. .. बुवांच्या टाळ्-चिपळ्या बुवांशिवाय??? आवलीनं टाहो फोडला "धनी..............! धनी..........!" आणि ती त्या बुवांच्या बैठकीवर कोसळली. तिचा आकांत सगळ्या गावक-यांच काळीज चिरत गेला. विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवत गेला. त्याच्या पायाखालची वीट थरारली. इंद्रायणी क्षणभर वाहायचं थांबली.........."
आवलीला जाणून घेण्यासाठी, तिचं तुकारामांच्या जीवनातलं अस्तित्व समजून घेण्यासाठी प्रत्येकानं जरूर वाचावी अशीच ही कादंबरी आहे. यातला एक भाग मला आवडला तो म्हणजे, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी, घडलेल्या प्रसंगांचं विठ्ठल्-रुक्मिणीच्या दृष्टीकोनातून लेखिकेनं केलेलं विश्लेषण. हा मराठी कादंबरी विश्वातील एक नवा प्रयोगच म्हणावा लागेल. लेखिकेनं स्वतः आवली होऊन लिहीलेलं हे काल्पनिह चरित्र आवलीला न्याय मिळवून द्यायला थोडी तरी मदत करू शकेल.

नाव : तुकयाची आवली
पृष्ठे : १८२
लेखिका : सौ. मंजुश्री गोखले.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Jan 2008 - 6:40 am | विसोबा खेचर

प्राजू,

'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला आधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला.

क्या बात है! प्राजू, उत्तम परिक्षण केलं आहेस. छान, वेगळा विषय आहे. पुस्तक वाचलं पाहिजे!

अवांतर -

तुकोबा म्हटलं की प्रभातच्या 'संत तुकाराम' चित्रपटातील विष्णूपंत पागनीस आणि आवली म्हटलं की त्याच चित्रपटातील गौरी नांवाच्या अभिनेत्रीचा चेहेराच डोळ्यासमोर येतो, इतका मराठी रसिकांवर या चित्रपटाचा प्रभाव आहे! इतकेच काय, संत तुकारामाचे पूर्ण नांव काय होते या प्रश्नाचे उत्तर वर्गात एका मुलाने 'विष्णूपंत पागनीस' असे दिले होते अशी भाईकाकांनी एक आठवण सांगितली आहे! :)

प्राजू, वरील परिक्षण वाचताना संत तुकाराम चित्रपटातील अभिनेत्री गौरी हीच आवली म्हणून माझ्या डोळ्यासमोर येत होती! विठोबाला काळतोंड्या म्हणणारी आणि कुण्या आई मंगळाईचे भक्तिभावाने नामस्मरण करणारी, साधीभोळी परंतु अत्यंत फटकळ, आणि नवर्‍याची सततची विठ्ठलभक्ति पाहून संतापणारी बायको, अशी आवलीची अत्यंत ठसठशीत भूमिका गौरीने उत्तम रितीने वठवली आहे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते!

तात्या.

माझ्या पुढल्या भेटीत हे पुस्तक निदान चाळले तरी नक्कीच जाणार.
आवलीचा विचारही कधी आपल्यामनात येत नाही, तुकारामांच्या समोर. पण हे खरं आहे की तिनं किती हाल सोसले असतील, काही गणतीच नाही.
महापुरुषाची पत्नी म्हणजे काट्यांचं जिण!

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

22 Jan 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश

प्राजु,
परीक्षण छानच लिहिले आहेस,पुस्तक मिळून वाचण्यासाठी मात्र पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबावे लागणार...
स्वाती

प्राजु's picture

22 Jan 2008 - 7:55 pm | प्राजु

तात्या, चतुरंग, स्वाती,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तर सदर कादंबरी भारतातून मागवून घेतली. तुम्हाला तुमच्या भारत भेटीत ही कादंबरी वाचायला मिळो. कारण घरोघरी 'आवली' ही असतेच .. कधी तिचं भांडण नातेवाईकांशी असतं, कधी करिअरशी, कधी या समाजाशी... पण या ना त्या रूपांत आपल्याला आवली भेटतेच संसारासाठी झटणारी, मुलांसाठी तळमळणारी, नव-यासाठी झुरणारी...
आणि म्हणूनच काल्पनिक असली तरी मला ही कादंबरी खूप भावली.

- प्राजु.

स्वाती राजेश's picture

23 Jan 2008 - 4:41 pm | स्वाती राजेश

प्राजु, तुझे या पुस्तकाचे परेक्षण फारच छान आहे.
पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. जेव्हा भारतवारी होईल तेव्हा जरूर वाचेन.
तुकारामांची आवडाबाई आम्ही फक्त "संत तुकाराम" सिनेमात पाहिली.
ती कजाग, भांडखोर दाखवली आहे, पण त्याबरोबर आपल्या मुलांविषयी वाटणारे प्रेम..
ते उसाच्या प्रसंगातुन जाणवते.तुकाराम जेव्हा आपल्या मुलांसाठी ऊस आणतात, येताना ये वाटत वाटत येतात..
घरी येईपर्यंत एकच उरतो तेव्हा तिची ती वाक्ये लक्षात राहतात...

विनायक पाचलग's picture

8 Dec 2008 - 11:14 am | विनायक पाचलग

तर आज १ वर्शाने या ठिकाणी एक नवी प्रतिक्रिया येत आहे .
मी ११ वीत शिकतो.गेल्याच महिन्यात महाविद्यालयात ग्रन्थ्परिक्शण स्पर्धा झाली.
मलाही हेच् पुस्तक मिळाले होते परिक्शणाला.
खुप छान आहे.
सदरचे परिक्शण छानच आहे यात वाद नाही.
मात्र असे राहुन राहुन वाटते की हे परिक्शण नसुन ओळाख आहे.
पुस्तकातिल भावनिक आन्दोलने,समाज,टाळलेल्या अन्ध्श्रध्दा इत्यादी अजुन लिहावयास हवे होते.
असुदे पुस्तक मात्र चान्गले आहे .
सम्पादकान्ची परवानगी अस्ल्यास मी माझे परिक्शण येथे देवु इच्छितो

विसुनाना's picture

8 Dec 2008 - 4:08 pm | विसुनाना

पुस्तकाचं परीक्षान ल्ह्यायला परवाणगी कसली मागतायसा?
बिन्धास्त येऊन द्या की.

विनायक पाचलग's picture

8 Dec 2008 - 9:52 pm | विनायक पाचलग

अओ देतोय दोन लेख विशय एक चालते का नाही माहित नाही म्हणुन विचारले दीन १ २ दिवसात

विनायक पाचलग's picture

8 Dec 2008 - 9:52 pm | विनायक पाचलग

अओ देतोय दोन लेख विशय एक चालते का नाही माहित नाही म्हणुन विचारले दीन १ २ दिवसात

शंकरराव's picture

9 Dec 2008 - 3:04 am | शंकरराव

असे वाट्ते

देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम
कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ...

रेवती's picture

9 Dec 2008 - 4:35 am | रेवती

तू म्हणतेस ते खरे आहे. प्रत्येक घरात एक आवली असते.
आजकाल तुकाराम मात्र फारसं कुणी नसेल (सगळ्या अर्थी "तुकाराम") असं वाटतय.

रेवती

राघव's picture

9 Dec 2008 - 9:49 am | राघव

सुंदर ओळख! आवडली. आता वाचावे लागणार :)
मलाही अवलीबद्दल अपार करुणा वाटते, पण वेगळ्या कारणासाठी.. तिलाही जर डोळसपणे विठ्ठलाची आराधना करता आली असती तर किती छान झाले असते!! तुकारामांसारख्या श्रेष्ठ साधकाची सोबत असतांना तर फक्त आनंद नांदला असता.. पण, मुलांची काळजी आईला कधीच सोडत नाही, भगवंतही आपल्या लेकरांची काळजी घेतोच की!!. त्यासाठी एवढ्या खस्ता खाऊन तिला संसारातच राहावे लागले. तिच्याशिवाय तुकारामांचे चरित्र अपूर्ण राहते ते याचमुळे. ती नसती तर?? यातच ती असण्याचे महत्त्व आहे.
मुमुक्षु