निमित्त ८ मार्च ...

मनीषा's picture
मनीषा in जनातलं, मनातलं
28 Feb 2009 - 10:12 pm

( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे . ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३र्‍या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे . पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे .
भारताचाच नाही तर जगातील प्रगत अशा युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेचा इतिहास पाहिला तर सगळीकडे महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप मोठा लढा द्यायला लागलेला दिसतो ... अर्थात त्याला काही अपवाद आहेत . पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापुरतेच..
तर या जागतिक महिला दिना निमित्त .... )

निळ्याभोर आकाशात चमचमणारी एकच चांदणी .. माझी नजर तिच्यावरून बाजूला होत नही. विश्वाच्या या प्रचंड पसार्‍यात कशी राहिली ही एकटी ? आणि नुसतीच राहिली नाही तर दिमाखाने चमकतेय ती ......तिच्याकडे पाहताना अनेक विचार मनात येत आहेत .

माझा भारत देश --- त्याच्या महान संस्कृतीचे जगभरात गोडवे गायले जातात. आज या देशाच्या सर्वोच्च पदावर एक महिला विराजमान आहे. देशाची सत्ता ज्या पक्षाच्या हातात आहे त्या पक्षाची सर्वोसर्वा एक स्त्री आहे . पण तरीही .....

माणूस निसर्गाकडून काहीच का शिकत नाही ? ती चमचमणारी चांदणी अवकाशात एकटी राहू शकते , घार आपल्या पंखांच्या बळावर आकाशात भरारी घेते. मग आपल्यालाच हे का रुचत नाही? का बाईने नेहमी घरालाच महत्त्व द्यायचं? कदाचित तो तिचा नैसर्गिक स्वभाव आहे म्हणून असेलही .. पण तिच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊन अनेक स्त्रियांचे कर्तृत्वाचे पंख छाटले गेले आहेत. किती सौदामिनी आकाशात न तळपताच जमिनीवर शिला होऊन पडल्या आहेत.... आपण जन्माला आलो याची खंत करत, आणि मनोमन म्हणताहेत ... " अगले जनम में बिटीयॉ न की जो --- "

अर्थात याला काही तेजस्वी स्त्रिया अपवाद आहेत.. इंदिरा गांधी, किरण बेदी, कल्पना चावला ... या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले की बुद्धिमत्ता, साहस ही काही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाहीये. पण दुर्दैवाने अशा स्त्रिया फक्त अपवादच आहेत. नाहीतर या २१ व्या शतकात सुद्धा तस्लिमा नसरीन सारख्या लेखिकेला लपत-छपत फिरायला का लागतं आहे? तिचा अपराध काय .. तर एक स्त्री असूनही तिने अन्याय्य समाजपद्धती बद्दल लिहिण्याचे धाडस केले. भारतासारख्या प्रगतिशील देशात सुद्धा तिला मोठ्या मुश्किलीने आश्रय मिळतो.. आणी तोंड बंद ठेवलं तरच या देशात राहता येईल नाहीतर जगात कुठेही जा असे सांगण्याची वेळ येते ... असं का व्हावं?

आपला समाज म्हणे प्रगती करतो आहे. प्रगती म्हणजे काय? आधुनिक तंत्रज्ञान? निरनिराळ्या उत्पादनांनी भरून वाहणार्‍या बाजारपेठा?, प्रगत वैद्यकीय ज्ञान? का संचार साधनांमुळे जवळ आलेले जग? .. हा आणि एव्हढाच अर्थ आहे का प्रगतीचा ?
ही तर फक्त भौतिक प्रगती झाली . पण समाजाची मानसिकता कुठे प्रगत झाली आहे? त्यात कुठे बदल झाला आहे? अजूनही रुपकॅवर सारख्या कोवळ्या मुली सती जातातच . अजूनही रोज किती बायकांचे पदर पेटतात आणि किती मुली शाळेचा रस्ता सोडून चुलीसमोर बसतात? अजूनही मुलगी झाली तर तीच्या जन्मदात्रीला अपराधी वाटत आणि मुलगा होण्यासाठी नवस बोलले जातात. मग कसली प्रगती झाली आपली ?

निसर्गाने स्त्री पुरुष यांत भेद केला, पण ती सृजनाची गरज म्हणून . त्याने दोघांनाही एकमेकांना पूरक बनवले. प्रकृती आणि पुरुष -- एकेमेकांशिवाय दोघही अपूर्ण आहेत. यात श्रेष्ठत्वाचा विचारच नाही . निसर्गाने पुरुषाला रक्षणकर्त्याची भूमिका दिली. म्हणून कणखरपणा दिला. तर स्त्रीला सृजनाची शक्ती दिली , संगोपन आणि संवर्धनासाठी म्हणून कोमलता दिली मातृत्वाचं वरदान दिलं. एक संवेदनाशील मन दिलं, बुद्धी दिली .

मग तिचं मन आणि बुद्धी दुर्लक्षित का राहिली ? शरीरालाच एव्हढं महत्त्व का आलं? जे सहज आणि सुंदर आहे , अशा मातृत्वाचे देव्हारे का माजवले गेले? स्त्रीच्या निष्ठेचा उपयोग .. तिलाच गुलाम करण्यासाठी का केला गेला?

फार फार वर्षांपूर्वी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा होता. त्या काळातील स्त्री विद्वान होती, युद्धकुशल, राजकारणपटु होती. अनेक कला आणि विद्या ती मध्ये सामावलेल्या होत्या. मग हळू हळू हे बदललं. का आणि कसं माहिती नाही , पण स्त्री ला दुय्यम दर्जा प्राप्त झाला. एक उपभोगाचं साधन या पलीकडे तिची किंमत राहिली नाही. प्रत्येक संघर्षाच्यावेळी स्त्री पणाला लावली गेली. तिच्या भावना, तिचे विचार याला महत्त्व द्यावं असं कोणाला वाटलंच नाही.

सीतेचे स्वयंवर केले गेले. ती रामाच्या मागून वनवासात गेली. तिथे सुद्धा रामावर सूड उगवण्याचे साधन म्हणून रावणाने तिचे अपहरण केले. रावणाचा वध करून तिला सोडवल्यावर राम म्हणतो .. " आता तू कुठेही जा , तू परघरी इतके दिवस राहिलीस, म्हणून मी तुझा स्वीकार करणार नाही. " स्वीकार ....." हा शब्दच कसा काळजाला घरं पाडणारा आहे , नाही का ? सीतेच्या त्यागाची हीच किंमत झाली. नंतर सुद्धा तिची अब्रू पुनः पुन्हा जगासमोर मांडली गेली..

द्रौपदी तर पाच भावात वाटली गेली. तिला एखाद्या वस्तू सारखी पणाला लावली, आणि दोन राजांच्या आपापसातील कलहात तिच्या वस्त्राला हात घातला गेला. केव्हढा हा पुरुषी उद्दामपणा ? की अहंकार ?

प्रत्येक पिढीतील स्त्री आपल्या दुर्दैवाचा वसा पुढच्या पिढीला देत गेली. मग कितीतरी कथा... किती इतिहास घडले ?
महाराणी पद्मिनी बरोबर हजारो रजपूत स्त्रियांनी जोहार केले, मुगल बादशहांच्या अनेक शहजाद्या जनानखान्यात उसासे सोडत कबरीआड गेल्या. डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले.. इथपर्यंत या सर्व कथा येऊन पोहोचतात, पण अजूनही त्यांचा अंत दिसत नाही. अजूनही रूपकॅवर सती जातातच, अजूनही अनेक शरद सारडा आपल्या पत्नीच्या चितेभोवती दुसर्‍या विवाहाचे फेरे घेतात...........

हे कधी संपणार ? स्त्रीला नेहमी देवी, त्यागमूर्ती इ. विशेषणे दिली जातात, आणि तिच्याकडून तशाच वागणुकीची अपेक्षा केली जाते. पण स्त्री ने सतत त्यागच का करायचा ? आपल्या इच्छा, आकांक्षांना बळी का द्यायचे ? स्त्री ला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीच का? जो पर्यंत ती समाजपुरुषाच्या अपेक्षांनुसार वागते तो पर्यंत ती देवी ... आणि त्या विरुद्ध जाऊन जर तिने स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर ती व्यभिचारी, कुलटा इ. ठरवली जावी ? स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नाही हे जितकं खरं आहे, तितकच पुरुषी वर्चस्व मान्य करून (न पटणारी ) सामाजिक बंधने पाळून जगणे म्हणजेच काही सदवर्तन नाही .

घरातली मोलकरीण कधी सांगते .. नवर्‍याने मारले म्हणून, आपण तिला सहानुभूतीचे काही शब्द ऐकवतो, आपल्या घरी बसून तिची कर्मकहाणी सांगायला आणि रडायला थोडा वेळ देतो .. बस्स.. इतकच. एखादी बाई एकटी राहत असेल तर अनेक नजरा तिच्यावर रोखल्या जातात , शंका-कुशंकांचे बाण तिला घायाळ करतात ... आणि हे सगळं करण्यात आपण बायका सुद्धा सामील असतो.

मग भौतिक प्रगती बरोबरच समाजाची मानसिकता कुठे प्रगत झाली ? हे असच चालणार म्हणून सहजपणे आपण ते स्वीकारतो.. त्याचं आपल्याला वैषम्य वाटत नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बेरीज , वजाबाकी करताना या प्रश्नाची उकल करायला वेळच राहत नाही का आपल्याला ?

या प्रश्नाला खरोखरच अजूनही उत्तर नाही . हे असच चालणार असं सगळ्यांबरोबर आपणही म्हणायचं .

पिढ्या न पिढ्या हेच चालत आलं आहे. समाजात काय चांगलं काय वाईट , काय चूक अन काय बरोबर हे अजूनही परंपरा, संस्कृती इ. प्रमाणेच ठरवले जाते . ज्या रुढी, परंपरा आहेत त्याला आधुनिक समाजातील वैचारिक , वैज्ञानिक निकष लावले जात नाहीत. स्त्रिया शिकल्या , मिळवत्या झाल्या तरीही त्यांची मानसिक गुलामगिरी संपलेली नाही. आणि जो पर्यंत ही मानसिक गुलामगिरी संपत नाही तो पर्यंत हे भयचक्र असच फिरत राहणार..

या चक्राला रोखण्यासाठी फार मोठ्या हिमतीची जरुरी असते. काही जणींकडे ती असते. अशा स्त्रिया आपली सारी ताकद एकवटून या चक्राची गती रोखतात. मग त्यातूनच एखादी मेधा पाटकर होते, एखादी लता मंगेशकर होते. ज्या आपल्या तेजाने चमकतात. त्यांच्या अस्तित्वाने सारा आसमंत झळाळून जातो.

अशा कितीतरी तेजस्वींनी आहेत. अनुताई वाघ, मीरा बोरवणकर, सुनीता विल्यम्स . या सगळ्या बाई 'माणूस' म्हणून जगल्या/ जगत आहेत. त्यांनी आपल्या उदाहरणांनी जगाला दाखवून दिले की स्त्री ही फक्त मोहिनीच नाही , तर ती सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, आणि प्रसंगी दुर्गा सुद्धा आहे.

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

शितल's picture

28 Feb 2009 - 10:41 pm | शितल

मनीषा ताई,
अनेक स्त्रियांच्या भावनांना तुमचे शब्द लाभले आहेत असेच म्हणेन, असे अनेक प्रश्नांनी कित्येक स्त्रियांच्या मनाची घालमेल होत असेल.

यशोधरा's picture

28 Feb 2009 - 10:47 pm | यशोधरा

आवडला लेख.

रेवती's picture

28 Feb 2009 - 11:07 pm | रेवती

मनापासून लिहिलेला लेख आवडला.
काय प्रतिक्रिया द्यावी समजत नाहीये.
खूप मुद्दे, खूप विषय डोक्यात घोळत असतात.
स्वतःलाच प्रश्न असंख्यवेळा विचारले जातात......
उत्तरं मिळत नाहीत. कधी मिळालीच तर आपण एकटे सगळ्यांना बदलू शकत नाही याची जाणीव होते.......
मग आपल्यापासून सुरूवात....
हे नेहमीचच आहे.

रेवती

लवंगी's picture

1 Mar 2009 - 12:25 am | लवंगी

पण एक करण्यासाऱख आहे. आपल्या मुलीला/मुलालासुद्धा स्वाभिमानाच अस बाळकडू पाजव कि कुणी तिला मोडू शकणार नाहि. जो बदल करायचा आहे त्याची सुरवात स्वतापासूनच करायाला हवी.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 12:16 am | विसोबा खेचर

सुरेख लेख..!

किरण बेदी या कर्तृत्ववान स्त्रीबद्दल मला विलक्षण आदर वाटतो..!

तात्या.

समिधा's picture

1 Mar 2009 - 12:35 am | समिधा

खरचं खुप प्रश्न मनातच राहतात. रेवती आणि शितलशी सहमत आहे.
हा लेख खुपचं सुंदर लिहिला आहेत.

चित्रा's picture

1 Mar 2009 - 5:06 am | चित्रा

येणार्‍या महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लेखामागची कळकळ जाणवते. लेखिकेचे विचारप्रवर्तक लेखाबद्दल अभिनंदन.

काही उदाहरणांबद्दल दुमत असू शकले तरी सध्याच्या स्त्रियांच्या स्थितीबद्दलच्या लेखिकेच्या बर्‍याचशा मतांशी सहमत.

चित्रा's picture

1 Mar 2009 - 7:42 am | चित्रा

थोडे अधिक विचारानंतर सुचले ते असे:

रूपकंवर, मंजुश्री सारडा, आणि नंतर जाळली गेलेली एक दिल्लीची युवती (नाव आठवत नाही), या मुलींना स्त्रिया असल्याने असंख्य त्रास झाले आहेत. आजही तरूण मुलींना वेश्याव्यवसायात लावले जाते, त्यांच्या मुलांचे लहानपण संपवून ते व्यवस्थेचे बळी ठरतात. हे जे गुन्हे घडतात ते कायद्याच्या ठोस आणि सरसकट कोणालाही पाठीला न घालता केलेल्या वापराशिवाय कमी होणार नाहीत, कारण ते करणारे अट्टल गुन्हेगारच आहेत.

पण जेव्हा गुन्ह्यांचे स्वरूप हे असे थेट नसते, तेव्हा काय होते? उदा. जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाला किंवा सामाजिक/आर्थिक/शारिरीक उन्नतीला अपसमजाने किंवा रूढींमुळे खीळ घातली जाते - तेव्हा त्या मुलीला पुरेशी वाढीची संधी न मिळण्यामुळे तिच्या जीवनमानावर होणारा परिणाम हा दूरगामी असू शकतो. असा परिणाम लगेच लक्षात येणार नाही, जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असतो. तेव्हा मुलींना वाढीची पुरेशी संधी न मिळणे हा गुन्हा ठरून हे पूर्णत्वे कायद्याच्या कक्षेत येऊन त्यावर अंमलबजावणी होऊ लागेल तेव्हा समाजाला काही प्रमाणात झपाट्याने बदलावे लागेल. (असे काही कायदे सध्या अस्तित्वात आहेत का?)

यापेक्षा थोडे कमी गंभीर स्वरूपाचे दबाव जे भारतीय स्त्रियांवर विशेषतः येतात त्याचे एक उदाहरण म्हणजे समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा. तसे पाहिले तर कुठच्याही नातेसंबंधांत अपेक्षा असतातच, आईवडिलांच्या मुलीकडून, मुलीच्या नवर्‍याकडून, नवर्‍याच्या बायकोकडून आणि सासरच्या मंडळींच्या सुनेकडून, सुनेच्या सासरच्यांकडून. कितीही म्हटले तरी पूर्ण अपेक्षारहित असा संसार करता येत नाही असे वाटते. मग नक्की त्रास कसला होतो? तर अवाजवी अपेक्षांचा. मग त्या स्वतःच्या स्वतःबद्दलच्या अवाजवी अपेक्षा असतील, वा सासरचे, आईवडिल किंवा इतर नातेवाईक यांच्या आपल्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा असतील. त्यात कुठच्या अपेक्षा कधी वाजवी/अवाजवी आहेत हा निर्णय करणे कठीण आहे. हेच सर्वांचे असल्याने साचे तयार केले गेले असावे - कदाचित चांगल्या हेतूनेही असतील. म्हणजे जास्त विचार करायला नको. मूल जन्माला आले की लगेच त्याच्यासाठी अपेक्षांचा साचा तयार आहे. त्यात बसले की झाले. पण तिथेच क्लेशही असतात, कारण साच्यात बसण्याची इच्छा, मनोवृत्ती सर्वांची नसते.

पण कितीही त्रास झाला तरी अशा अपेक्षांचे ओझे झटकून टाकणे अशक्य नसले तरी कठीण असते. कधी अपेक्षा अवाजवी आहेत याचेच वेळेवर ज्ञान होत नाही. कधी त्या वाजवी असल्या तरी मनाविरूद्ध असतात. कधी अवाजवी/वाजवी काय हा निर्णय करण्याचे स्वातंत्र्य नसते. काही का असेना, मुलींची कुतरओढ होताना दिसते. (तसे पाहिले तर पुरूषांकडूनही आपल्या समाजाच्या काही ठोस अपेक्षा असतात. त्यात त्यांनाही त्रास होत नसेल असे नाही. पण स्त्रियांवरची बंधने अधिक जाचक किंवा दुराग्रही आहेत हे मात्र खरे. ) ही कुतरओढ सहजासहजी थांबेल असे वाटत नाही. जर स्त्री-पुरूष दोघांच्याही मनांवर अनेक वर्षांच्या संस्कारांनी किंवा साच्यांनी परिणाम केले असले तर त्यातून बाहेर पडण्यास वेळ द्यावा लागेल, प्रयत्न करावे लागतील.

प्राजु's picture

1 Mar 2009 - 7:23 am | प्राजु

महिलादिनाच्या निमित्त एक अतिशय विचार प्रवर्तक लेख वाचायला मिळाला. उत्तम लेखाबद्दल मनिषा तुझं अभिनंदन!
लेखातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. प्रत्येक वाक्य, "अरे! हे तर माझ्या मनातलेच विचार आहेत" असंच सांगत आहे.
राजकुमार संतोषीचा "लज्जा" हा चित्रपट स्त्री आणि तिच्या एकूण अस्तित्वावर आहे. उत्तम चित्रपट आहे.
अग्निपरिक्षा देऊनसुद्धा सीतेला आश्रमात जावं लागलं.. आणि नंतर सुद्धा पुरूषी अहंकारा पुढे तिला धरणीच्या पोटीच परत जावं लागलं..
जिथे पुरूषोत्तम राम असा वागू शकतो.. तिथे सर्वसाधारण पुरूषाकडून काय अपेक्षा करणार!!

धरती की तरह हर दु:ख सहले, सूरज की तरह तू ढलती जा..
सिंदूर की ;आज निभाने को चूपचाप तू आग मे जलती जा..

पुरूषाच्या मनासारखं जेव्हा स्त्री वागते तेव्हा ती, कौतुकाची धनी असते मग ते तिच्या मनाविरूद्ध का असेना! पण जेव्हा ती तिच्या मनासारखी वागते तेव्हा ती शिव्यांची धनी असते. स्त्री मुक्ती.. ही नक्की कोणकोणत्या गोष्टीपासून मुक्ती हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. कारण समाजाने स्त्रीला इतकं गृहीत धरलं आहे की, स्त्रीला जर मुक्त केलं तर संपूर्ण समाजव्यवस्था बिघडेल हे नक्की..

लेख उत्तम जमला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/