तुझा सूर्य मला उसना दे !

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
22 Feb 2009 - 10:46 pm

अभ्यागता तुझा सूर्य मला उसना दे,
खरंय की, तूच वाट चुकलेल्या पान्थस्था सारखा आलास,
आशा होती तुला
अंधारल्या माळावरच्या मिणमिणत्या कन्दिलाचीच फक्त ......
अरे पण माझ्या कड़े तर सूर्य होता !
अर्थात .. तुला हे ठाऊकच नाही म्हणा.
अरे, अनंत कालपटावर स्वतेजाची पखरण करणारा
माझा सूर्य .....
तो असंख्य जीवनांचा जनक !
त्या चन्डान्शुच्या प्रखरतेने निथळतानाही वाटे....
त्याचा अनादी जीवनांश तो किरणकरांनी
आम्हाला देतोय.
अभ्यागता ! पण हां इतिहास झाला.
आमचा सूर्यही आता मळल्यासारखा झालाय बघ.
वाटते कळिकाळपटाशी झुंजत तो श्रांत झालाय !
त्या हिरण्य गर्भावर चढलीत जळमटे .... आणि ..
तिमिराच्या वाटा त्याच्या अंगांगावर पसरताहेत !
म्हणून ..अभ्यागता !
तुझा सूर्य मला उसना दे !
- सागरलहरी

कवितामुक्तकप्रकटन