थोडे काही जुनेपुराणे, ठेवणीतले..! (१)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
3 Feb 2009 - 12:37 am

राम राम मंडळी,

भारतीय अभिजात संगीताची गेल्या २५ वर्षांहून अधिक श्रवणभक्ति केली, आजही करतो आहे, जमेल तसं शिकतो आहे. अनेक दिग्गजांना अगदी कान तृप्त होईस्तोवर ऐकलं, अनेकांचा सहवास लाभला. आणि या सगळ्या श्रवणयात्रेत अनेक अश्या अनमोल ध्वनिमुद्रणांचा एक लहानसा खजिना गोळा केला, जो कितीही पैसे ओतले तरी बाजारात विकत मिळणार नाही. त्यापैकीच काही ध्वनिमुद्रणांची झलक आपल्याकरता उपलब्ध करणार आहे, त्यावर दोन शब्द बोलणार आहे..

पं गोविंदराव पटवर्धन!

बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.

त्यांनी वाजवलेल्या बसंतीकंसाची एक झलक आपल्याला येथून उतरवून घेता येईल..

बसंत या रंगिल्या-रसिल्या रागात मिसळणारा मालकंसाचा आध्यात्मिक रंग! वास्तविक बसंत आणि मालकंस हे दोन्ही राग स्वभावाने पूर्णत: वेगळे. परंतु बसंतीकंसात त्यांचं बेमालूम मिश्रण करून जे अद्वैत साधलं गेलं आहे ते अद्वैत म्हणजेच हिंदुस्थानी अभिजात संगीताची ताकद!

काय काय बरं ऐकण्यासारखं आहे सदर क्लिपिंगमध्ये?

वाजवण्यातली सफाई पाहा. आलापी, तान वाजवण्यातली सफाई पाहा. बसंतीकंसासारखा जोड राग वाजवताना बसंताचं आणि कंसाचं साधलेलं योग्य बॅलन्सिंग पाहा. मालकंसात पंचम नाही, त्यामुळे मालकंसातून बसंतात येतांना खास करून त्यातील पंचमाचं सौंदर्य गोविंदरावांनी किती सुरेख दाखवलं आहे पाहा! वादनात कुठेही अटकाव नाही की अडणं नाही. एकदा का भक्कम तंबाखू-सुपारीचा बार भरला की मग बघायला नको! वादनातलं गायकी अंग पाहा. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं आहे, स्वत:त अक्षरश: मुरवलं आहे.

माझ्या सुदैवाने मला गोविंदरावांचा अगदी भरपूर सहवास लाभला हे माझं भाग्य. गोविंदरांची सदर क्लिप अगदी अवश्य ऐका आणि कशी वाटली ते सांगा..

सवड मिळेल तशी विविध कलाकारांच्या काही ध्वनिमुद्रणांची झलक जालावर चढवेन आणि त्याबद्दल येथे लिहीन..

असो..

गोविंदरावांसारखा कलाकार पुन्हा होणे मुश्किल आहे. आज हा छोटेखानी लेख लिहितांना त्यांची खूप आठवण येते, त्यांच्या मैफली आठवतात, त्यांची साथसंगत आठवते, कधी कुठल्या मैफलीत थोडी सवड मिळाल्यावर त्यांनी माझी प्रेमानं केलेली चौकशी आठवते आणि मन क्षणभर हळवं होतं! त्यांना माझा सलाम..!

आपला,
(गाण्याबजावण्यातला) तात्या.

संगीतआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

शशिधर केळकर's picture

3 Feb 2009 - 1:37 am | शशिधर केळकर

तात्या बसंती कंसाला 'बहार' आली! बसंताचा प्रभाव जाणवला. कमाल आहे तुमची! क्लिप ने हुरहुर वाढवली - वादन एकदम संपुष्टात आले. आणखी ऐकायला आवडले असते.
गोविंदरावांचे चित्रही उत्तम!

शंकरराव's picture

3 Feb 2009 - 1:48 am | शंकरराव

वा तात्यानु
पं गोविंदराव पटवर्धनां बद्दल क्या कहने, लेख अप्रतिम लिहीला आहे.
हार्मोनियमवादनाची खरी ओळख गोविंदरावांनी करून दिली असेच म्हणावे लागेल.
बसंतीकंस ऍकतो आहोत .. :-)

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 7:16 am | घाटावरचे भट

बसंतीकंस भारीच आहे. गोविंदरावांबद्दल जे काही ऐकलं-वाचलं आहे त्यावरून 'हिअर इज अ मास्टर' हे ठाऊक होतं. हे ध्वनिमुद्रण उपलब्ध करून दिल्याबद्दल तात्यांचे आभार.

चतुरंग's picture

3 Feb 2009 - 7:59 am | चतुरंग

साक्षात देवाचीच बोटे फिरल्याने गोविंदरावांची पेटी गाते!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2009 - 11:07 pm | बिपिन कार्यकर्ते

मला असं काही ऐकलं की जे वाटतं ते शब्दात मांडता येत नाही. त्या मुळे रंगाशेठ म्हणतात त्याच्याशी सहमत असे म्हणून संपवतो.

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

4 Feb 2009 - 2:13 am | संदीप चित्रे

एकदम सहमत

राघव's picture

3 Feb 2009 - 9:54 am | राघव

तात्या, सुंदर लेख! छानच. मनापासून लिहिलेलं जाणवतंय.
थ्ये काम्पुटर चं श्पिकर नको तवा रुसुन बसलंया.. त्यामुळं अंमळ येळ लागंल ऐकावास्नं! #o
कळवतोच तसे ऐकल्यावर!
येऊ द्येत अजून! :)
मुमुक्षु

आनंद घारे's picture

3 Feb 2009 - 11:16 am | आनंद घारे

गोविंदरावांनी गायक कलाकारांना केलेली अप्रतिम साथ मी अनेक वेळा ऐकली होती. कधी कधी तर मुख्य गायकाला मिळाल्या नसतील एवढ्या टाळ्या त्यांच्या हार्मोनियमला पडलेल्या पाहिल्या होत्या. त्यांनी केलेले स्वतंत्र वादन ऐकण्याचा योग एवढा आला नव्ह्ता. बसंती कंस हा जोडरागही तसा कांहीसा अप्रचलित आहे. ऐकायला मजा आली. धन्यवाद. आपला 'ममसुखाचा ठेवा' असाच रसिकांना देत रहा अशी विनंती.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

वृषाली's picture

3 Feb 2009 - 11:37 am | वृषाली

फारच सुरेख वादन.
लेखही सुंदर.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 1:26 pm | घाटावरचे भट

गोविंदरावांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभात पु.ल.देशपांड्यांनी केलेलं भाषण मला माझ्याकडे सापडलं. या भाषणानंतर गोविंदराव आणि पुलं यांच्या सहवादनाचा कार्यक्रम झाला. त्याचाही थोडासा भाग त्या ध्वनिमुद्रणात आहे (सुमारे १३-१४ मिनिटे). मिश्र काफी वाजवला आहे ('उगीच का कांता गांजिता' बहुतेक, माहितगार मंडळींकडून खुलासा अपेक्षित). भाषण तर झक्कासच आहे, नंतरचं वादन त्यावर कळस आहे. दुर्दैवाने ध्वनिमुद्रण सदोष आहे आणि पूर्णही नाहीये. जर सगळं वादन असतं तर जास्त मजा आली असती. असो, एवढं आहे हे ही नसे थोडके. जर कोणाकडे संपूर्ण ध्वनिमुद्रण असेल तर ते कृपया उदारपणे शेअर करावे अशी नम्र विनंती.

विसोबा खेचर's picture

3 Feb 2009 - 2:06 pm | विसोबा खेचर

या संपूर्ण कार्यक्रमाची ध्वनिचित्रफित माझ्या संग्रही आहे! :)

तात्या.

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 2:10 pm | घाटावरचे भट

भारतात आलो की येईन ऐकायला. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2009 - 11:10 pm | बिपिन कार्यकर्ते

भटा, मस्तच रे!!! धन्यवाद!!!

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

4 Feb 2009 - 6:34 am | सहज

तात्या आणी त्यांच्या गुरुंनी लेख व भाषणातुन मजा आणली. :-)

धन्यवाद भटोबा.

नंदन's picture

3 Feb 2009 - 3:16 pm | नंदन

शब्द-सुरांच्या या खजिन्याची कवाडे किलकिली केल्याबद्दल कोकणातल्या आणि घाटावरच्या भटांचे आभार :). बसंतीकंसाच्या वर्णनावरून बोरकरांची 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे' ही अजरामर ओळ आठवली. घा. भ. नी दिलेला दुवाही झकास. पुलंचे भाषण (पेटाड्या, ट्युशन-इंट्युशन वगैरे खासच) आणि शेवटचे पेटीवादन अप्रतिम!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

4 Feb 2009 - 7:16 am | चित्रा

शब्द-सुरांच्या या खजिन्याची कवाडे किलकिली केल्याबद्दल कोकणातल्या आणि घाटावरच्या भटांचे आभार .

असेच म्हणते. धन्यवाद तात्या.

बसंतीकंसाच्या वर्णनावरून बोरकरांची 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे' ही अजरामर ओळ आठवली.

हे छानच. (आणि वेळेवर असे काही चपखल आठवणे हे तर दुर्मिळ).

प्राजु's picture

4 Feb 2009 - 2:00 am | प्राजु

सुरेख क्लिप आहे बसंतकंस... अप्रतिम.
घाटावरचे भट साहेब.... सुरेख आहे ही ध्वनीफित.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिल्लीचं कार्ट's picture

4 Feb 2009 - 2:29 am | दिल्लीचं कार्ट

मला वाटलं की तात्या त्याच्या ठेवणीतल्या जुन्या पुराण्या आयडीं विषयी लिहितो आहे (जसेकी ज. डायर) इथे वेगळेच निघालं

;)

प्रमोद देव's picture

4 Feb 2009 - 9:07 am | प्रमोद देव

बसंतीकंस मस्तच आहे. गोविंदरावांच्या बोटात जादू आहे.
धन्यवाद तात्या.

स्नेहश्री's picture

4 Feb 2009 - 9:54 am | स्नेहश्री

माझ्या आईचे वडिल आणि गोविंदरावांची अतिशय जवळची खास मैत्री होती.
कल्याण अथवा जवळील गावात ते जर कार्यक्रमासाठी येत असल्यास कल्याणात आमच्या आजोबांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा.आजोबा आणि गोविंदराव हे काही वर्ष एका खोलीत रहायचे.
आमची आजी,आई अणि मावश्या त्यांची कायम आठवण काढतात घरी.
तात्या लेख सुरे़खंच. आजी आली की तिला नक्की वाचायला देईन.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

शशिधर केळकर's picture

20 Feb 2009 - 11:53 pm | शशिधर केळकर

तात्या आता पुढचा भाग केव्हा?

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 5:11 am | विसोबा खेचर

लौकरच लिहितो साहेब...

केशवसुमार's picture

21 Feb 2009 - 5:16 pm | केशवसुमार

आज सकाळ सकाळी हा जुना धागा वाचायला मिळाला..पेटी ऐकायला खूप मजा आली...कामाच्या व्यापात कशा कशाला मुकतो आहे ...:(
तात्याबासुंदर लेख.. भटोबांचे पुलंची ध्वनीफित इथे दिल्याबद्दल विशेष आभार
(कानसेन)केशवसुमार..

विकास's picture

21 Feb 2009 - 6:42 pm | विकास

लेख आणि तात्यांनी आणि घाटावरील भटांनी दिलेल्या दोन्ही ध्वनीफिती एकदम मस्त आणि संग्राह्य!

मीनल's picture

21 Feb 2009 - 11:19 pm | मीनल

हो,
मी पण वाचन खूण साठवली आहे.
मीनल.