अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार!
✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात
✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा!
✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश!
✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस
✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे
✪ सितारों की महफील में कर के इशारा
✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत
✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती
✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर
नमस्कार. सध्या आकाशामध्ये C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू छोट्या टेलिस्कोपने बघता येण्यासारखे आहेत. सूर्याला वळसा घालून परत जाताना अगदी अचानक शोधला गेलेला स्वॅन आणि हा लेमन. पावसाळ्याचा शेवट जवळ आल्यावर आकाश काहीसं मोकळं झालं आहे. पुण्यातूनही हे दोन्ही धुमकेतू आकाश चांगलं असेल तर दिसू शकतात. पण आकाश बघण्यासाठीचं उत्तम आणि आपुलकीचं ठिकाण म्हणजे मावळमधलं अंजनवेल! काल माझ्या मित्रासोबत- गिरीश मांधळे- दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलर घेऊन तिथे जायला निघालो. शाळा- कॉलेजच्या दिवसांमधली गाणी आणि शहर मागे पडल्यावर सुरू होणारा सह्याद्री! हिंजवडी- घोटावडे- कोळवण- जवन मार्गे अंजनवेल. वाटेतल्या हडशी तळ्यावरून दिसणारं रमणीय दृश्य! पर्वतांची हिरवी रांग! पण आज ढग आहेत. पुढे तर चक्क पाऊस पडतोय. तिकोना किल्ला ढगांमागे लपला आहे! आजच्या आकाश दर्शनाचं कसं होणार हा प्रश्न पडतोय.
सगळीकडे पर्वतरांगा आणि नागमोडी रस्ता! पवना जलाशयाचं निळं पाणी! ढगांचं आक्रमण पण कुठे कुठे निळाई! अंजनवेलमध्ये पोहचलो. आठवड्याच्या मधला दिवस असल्यामुळे अतिशय रम्य शांतता आहे. हलकीशी थंडी आहे. अंजनवेल परिसरातला ओढा! त्याची गर्जना अंतर्मुख करतेय. काही क्षण तिथल्या निसर्गासोबत घालवले. अंजनवेलचे राहुलजी, मनोजजी बोरसे, गिरीश व इतर जणांसोबत गप्पा झाल्या. थोड्या वेळाने मोठा पाऊसच सुरू झाला! संध्याकाळी दिसणारा पहिला धुमकेतू C/2025 R2 (SWAN) तर गेला! बाकी बॉजेक्टस तरी बघायला मिळावेत. पण मन सांगतंय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! काही क्षण दिवे गेले तेव्हाचा घनघोर अंधार, पाऊस, झर्याची कोसळधार! अंतर्मुख करणारा अनुभव.
(फोटोंसह हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल. ब्लॉगवर माझे आकाश दर्शन, ध्यान, सायकलिंग, फिटनेस, विज्ञान प्रयोग अशा विषयांवरचे लेख उपलब्ध)
.
.
.
गप्पांसोबतच आपुलकीचं जेवण पार पडलं. आणि अखेर पाऊस थांबला! आणि चक्क कुठे कुठे मोकळं आकाश दिसतं आहे. थोड्याच वेळात बर्यापैकी आकाश मोकळं झालं आणि सुरू झाली तार्यांची मांदियाळी. पहिलं सत्र गाजवलं चंद्र आणि शनिने. शनिचे टायटन, रिया व इतर दोन उपग्रह गिरीशच्या ८ इंची दुर्बिणीतून दिसले. सध्या अर्थातच एका रेषेसारखी दिसणारी कडी! चंद्रप्रकाश जवळ असूनही माझ्या ४.५ इंची दुर्बिणीतूनही टायटन दिसू शकला. नंतर अल्बिरो, ६१ सिग्नाय (ज्या तार्यामुळे पॅरालॅक्स पद्धतीने तार्यांचं अंतर मोजण्याची सुरूवात झाली तो तारा), अभिजीतजवळचे झीटा व डेल्टा लायरे जोडतारे बघितले. आणि आकाश किती म्हणजे किती मोकळं झालंय हे कळालं! चंद्रप्रकाशाची चादर पांघरलेली देवयानी आकाशगंगा म्हणजे एंड्रोमिडा गॅलक्सीही दिसली. ईटा शर्मिष्ठा जोडताराही बघितला. पावसाळ्यानंतरच्या ह्या आप्तांशी पहिली भेट सुरू झाली! "जवळची" मंडळी भेटली म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही! त्यातच मित्रांची सोबत आणि गप्पा.
पहाटे ४ वाजता उठून दुसरा धुमकेतू बघायचा असं ठरवून आवराआवर करायला सुरूवात केली. तरीही मोह आवरत नसल्यामुळे आकाश दर्शन सुरू राहिलं. आकाशातील सप्त माता- कृत्तिका तारकागुच्छ, पर्सियस डबल क्लस्टर व एम- ३४ क्लस्टर बघितले. दव सुरू झालं! चंद्र प्रकाश असूनही तळपणार्या तार्यांचे फोटो घेतले. आणि अखेरीस पहाटे ४ ला उठायचं ठरवून रात्री ११:३० ला निद्रेला शरण जायचा निर्णय घेतला. दवाचा पाऊस सुरू झाला आहे आणि छतावर टप टप आवाज येतोय!
पहाटे वेळेवर जाग आली. अंजनवेलमध्ये पहाटेचं आकाश "कसं आणि काय" असतं चांगलं माहिती असल्यामुळे लगेच तयार झालो! कडक थंडी! चंद्र पश्चिमेला कलला आहे! पुनर्वसू व प्रश्वाच्या मध्ये अर्थात् स्वर्गद्वारात पोहचलेला गुरू तेजाने तळपतोय! तिकडे व्याध आणि अगस्त्य! मृगही पश्चिमेकडे कललंय. शर्मिष्ठा मावळतीकडे झुकल्या आहेत आणि तेजस्वी ब्रह्महृदय- सारथीचा पंचकोन! आणि अर्थातच कृत्तिका- रोहिणी! रोहिणीतला झीटा टाउरी जोडतारा डोळ्यांनी छान दिसतोय. पण आता पहिले धुमकेतू C/2025 A6 (Lemmon) चा शोध! सप्तर्षी तारकासमूहामध्ये हा ५.७ तेजस्वितेचा धूमकेतू तानिया ऑस्ट्रेलिस तार्याच्या जवळ आहे. ठळक आणि अंधुक तार्यांच्या मदतीने त्याचा माग काढायला सुरूवात केली. त्याची क्षितिजापासूनची उंची साधारण २० अंश आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात तो दिसला नाही. बायनॅक्युलर आणि साडेचार इंची टेलिस्कोपने शोध सुरू ठेवला. पण अजून क्षितिजापासून जास्त उंचीवर नसल्यामुळे त्याचं तेज थोडं कमी आहे.
गिरीशने त्याचा ८ इंची टेलिस्कोप सेट केला आणि थोड्याच वेळात त्याला तो धुमकेतू सापडला! व्वा! कापसाचा जणू पुंजका! ढगाचा जणू तुकडा! काल देवयानी आकाशगंगा दिसली तिच्याच सारखा! अंधुक पण स्पष्ट दिसतोय. आणि लगेच माझ्या टेलिस्कोपमधूनही तो दिसला. बायनॅक्युलरमधूनही दिसला! व्वा! मनसोक्त त्याचं निरीक्षण केलं! शेवटी १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा ना तो!
हे दोन्ही धुमकेतू पुढचे साधारण १५ दिवस तरी छोट्या दुर्बिणीतून दिसू शकतील. त्यांचं स्थान व दिसण्याची वेळ बदलत राहील व आकाश दर्शनाच्या साईटवर बघता येईल. धुमकेतूचं निरीक्षण करून झाल्यावर गिरीशने त्याचा मोठ्या दुर्बिणीतून फोटोसुद्धा घेतला. हळु हळु झुंजूमुंजू सुरू झालं! धुमकेतूनंतर गुरूचं दर्शन घेतलं! गुरू आणि त्याचे चार उपग्रह. दोन उपग्रह त्याला अगदी चिकटून दिसले. कृत्तिका, मृगातला तेजोमेघ, बीहाईव्ह क्लस्टर, व्याधाजवळ एम- ४१ तारकागुच्छ असे नेहमीचे आप्तही भेटले. त्यांना भेटताना मध्ये मध्ये भुरटे अतिथीसुद्धा येत आहेत! चंद्र प्रकाश असूनही आकाश किती स्वच्छ आहे! आणि तितकंच दव पडतं आहे! विंटर अल्बिरो अर्थात् १४५ कॅनिस मेजर जोडतारा बघितला. फटफटायला लागलं आणि तेजस्वी शुक्र दिसला. तो सध्या सूर्याच्या पलीकडे आहे व जवळ जवळ ९३% प्रकाशित आहे. त्याचं तेजस्वी गोल बिंब दिसलं. शेवटी परत एकदा चंद्राचं निरीक्षण केलं. गिरीशने काही सुंदर फोटोज घेतले. आणि हळु हळु पहाटेचं सत्र आटोपतं घेतलं.
.
.
गिरीशचा टेलिस्कोप व त्याने घेतलेला फोटो
.
अंजनवेलमध्ये आकाश दर्शन किंवा राहण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. पावसाळ्यातला सह्याद्री आणि हिरवाई! शांततेला आणखी गहन करणारी ओढ्याची गर्जना. हिमालयातल्या पहाडी नदीचीच आठवण व्हावी अशी गर्जना! दिवस उजाडल्यावर अंजनवेल परिसरातील निसर्गाचा आनंद घेतला. गहन शांतता आणि आल्हाद. परतीच्या वाटेवरही धुक्याच्या अवगुंठनातले डोंगर दिसले. सुंदर घाट रस्ता आणि फुलांचा बहर! एकाच रात्रीत ढग, मुसळधार पाऊस, निरभ्र आकाश आणि दवाचा पाऊस असा निसर्गाचा अविष्कार बघायला मिळाला! अंजनवेलमध्ये येत्या काही दिवसांमध्ये धुमकेतू निरीक्षण सत्र होणार आहे. त्याशिवाय अंजनवेलमध्ये २७ ते २९ ऑक्टोबर आणि ३ ते ५ नोव्हेंबर असे मुलांसाठी दोन शिबिर होणार आहेत (२ दिवस ३ रात्री). तिथेही मी आकाश दर्शन, मुलांचे फन- लर्न उपक्रम, विज्ञान व गणितातील गमती, ट्रेकिंग, योगनिद्रा अशी सत्रं घेणार आहे. त्याबद्दल आणि धुमकेतू निरीक्षणाच्या सत्राबद्दल माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता.
धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक ८ ऑक्टोबर २०२५.
प्रतिक्रिया
9 Oct 2025 - 11:47 am | सुधीर कांदळकर
सतत चार साडेचार महिने ढगाळ आकाशानंतर मोकळे आकाश पाहून बरे वाटले. लेखातले वर्णन सुरेख जमले आहे. आकाशाचा पटच डोळ्यांसमोर उभा राहिला.
पण वर्णनाशी जुळणारे फोटो नसल्यामुळे खट्टू झालो. तरीही सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.
12 Oct 2025 - 8:55 pm | मार्गी
@ सुधीर कांदळकर सर, हो, खरं आहे. पण एस्ट्रो फोटोग्राफी खूपच वेगळी गोष्ट आहे. वेगळं डोमेन आहे. आणि धुमकेतूचा चांगला फोटो हवा असेल तर डीएसएलआर, ट्रॅकर असं सगळं हव. हे फोटो पाहा कसे वाटतात-
अपडेट-
धन्यवाद!
अपडेट-
दोन धूमकेतूंचं एकाच रात्री निरीक्षण
अतिशय निरभ्र आकाशातला दीपोत्सव
नमस्कार. मावळमधल्या अंजनवेल कृषि पर्यटनमध्ये एकाच रात्री C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू बघता आले. पाऊस गेल्यानंतरचं अतिशय निरभ्र आकाश. धनुराशीपासून श्रवण आणि थेट अभिजीत तार्यापर्यंत आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसला. एका वेळेस तर देवयानी आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पुसटशी दिसत होती. कित्येक तारकागुच्छ बघता आले. त्याशिवाय इतरही कित्येक ऑब्जेक्ट बघता आले. हे फोटो नक्की पाहाल.
1: धनुराशीतील आकाशगंगेचा पट्टा
2: फाय ओफिउशी तार्यालगत C/2025 R2 (SWAN) धूमकेतू
3: श्रवण ते अभिजीत तार्याच्या परिसरातील आकाशगंगेचा पट्टा
4: व्याध, मृग आणि रोहिणी नक्षत्र
5. व्हिडिओ- धनुरास भागातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स
6. व्हिडिओ- श्रवण- अभिजीत परिसरातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स
7- 8: चंद्र
धन्यवाद.
14 Oct 2025 - 4:43 pm | मार्गी
नमस्कार. प्रोसेस केलेले फोटो अतिशय अविश्वसनीय आलेत! माझाच विश्वास बसत नाहीय. २० सेकंद एक्स्पोजरच्या ५० इमेजेस सीक्वेटरमध्ये स्टॅक केल्या. तेव्हा हे मिळालं-
धन्यवाद.