चांगल्या बातम्या - १

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
16 Aug 2025 - 12:23 am

नमस्कार!
येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे.
आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा.

Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय. अधिक माहिती - लिंक

रेल्वेमार्गिकांवरून हत्ती पलिकडे जात असतांना होणारे अपघात तामिळनाडूत जास्त प्रमाणात होत असत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून बनवलेल्या वॉर्निंग सिस्टीम मुळे, तामिळनाडू मधे २०२३ पासून आजतोवर, अशा हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना टाळले जाऊ शकले आहे. यासाठी १२ टॉवर्स आणि २५ थर्मल कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. ही प्रणाली अशा घटनांची पूर्वसूचना वनअधिकार्‍यांना कळवते आणि अधिकारी त्यानुसार ट्रेन्स ना थांबवतात आणि हत्तींच्या कळपांना क्रॉसिंग करण्यास मदतही करतात. अधिक माहिती - लिंक

समाजजीवनमानतंत्रबातमी

प्रतिक्रिया

राघव's picture

16 Aug 2025 - 12:31 am | राघव

रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना

यास,

हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.

असे वाचावे.

गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

चित्रगुप्त's picture

18 Aug 2025 - 3:41 am | चित्रगुप्त

भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वर :
https://youtu.be/-CY9d70GRaA?si=f7GsEqthpI9bYdVH

मारवा's picture

18 Aug 2025 - 11:11 am | मारवा

चांगल्या बातम्या वेचून वेचून इथे देण्याचा प्रयत्न करतो नक्की.
या सुंदर संकल्पनेसाठी तुमचे मनापासून आभार.

राघव's picture

18 Aug 2025 - 11:59 pm | राघव

मन:पूर्वक धन्यवाद !

भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय.

कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय.
इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं.
अधिक माहिती: लिंक

या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले.
अधिक माहिती: लिंक

अनन्त्_यात्री's picture

19 Aug 2025 - 1:18 pm | अनन्त्_यात्री

रोचक माहिती.

भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो:

अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली.
कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे.

उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे.

अधिक माहिती: लिंक

या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात.
हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

अभ्या..'s picture

19 Aug 2025 - 9:44 pm | अभ्या..

हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात.
वाह्ह्ह्ह्ह.
मस्तच.
ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2025 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली

खरोखर आनंददायी बातमी, अभ्या सरानी सांगितल्याप्रमाणे ओळिओळीत गीता आहे.

गणेशा's picture

21 Aug 2025 - 10:52 am | गणेशा

वाह...
बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

प्रत्येक चांगल्या बातमीसाठी नवा धागा तयार केल्यास वाचनात अन प्रतिसाद देण्यास सुलभता येईल.

तसं करणं जरा अवघड आहे आणि व्यवहार्यही नाही. पण सूचनेसाठी धन्यवाद.

ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे.

एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे.
ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW).

बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते.
अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच.

अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

कंजूस's picture

21 Aug 2025 - 9:58 am | कंजूस

बातम्या आवडल्या आहेत.

राघव's picture

22 Aug 2025 - 3:42 am | राघव

मनःपूर्वक धन्यवाद!

कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय.
फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय.

कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो.
यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते.

अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!!

अधिक माहिती: लिंक १, लिंक २

मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत.
कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते.
रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते.
या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.
अधिक माहिती: लिंक १, लिंक २

गणेशा's picture

28 Aug 2025 - 11:20 am | गणेशा

यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल.

हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत.

धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल

अवांतर:
कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत!

युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे.

प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील.

सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे.

अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2025 - 2:47 pm | चौथा कोनाडा

ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे.
तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2025 - 2:49 pm | चौथा कोनाडा

लेखाचा मुख्य मुद्दा :

कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव's picture

23 Sep 2025 - 1:21 am | राघव

ऑटिझममुळे व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या घरच्यांना होणारे कष्ट यामुळे कमी होऊ शकतील. खूप छान बातमी. धन्यवाद!

कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे.
फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात.

विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत.

“अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.”

अधिक माहिती: लिंक १, लिंक २

चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच.
पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण.
त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच.
पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण.
त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

अभ्या..'s picture

23 Sep 2025 - 2:04 pm | अभ्या..

भारीच.
आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत.
बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी.
नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

राघव's picture

24 Sep 2025 - 8:19 pm | राघव

मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं...

होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!

"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."

ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या:

जय हिंद! जय महाराष्ट्र!

युयुत्सु's picture

14 Oct 2025 - 9:22 pm | युयुत्सु
नावातकायआहे's picture

13 Oct 2025 - 4:33 pm | नावातकायआहे

वा.खु. साठवली आहे.

बाकिच्या धुराळ्यात हा धागा दुर्लक्षित झाला.

भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत!

गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात.

नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे!

मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे.

यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं.

अधिक माहिती:
लिंक १, लिंक २

दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं.
दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत.

"माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे.

यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही.

MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे.

अधिक माहिती: लिंक १, लिंक २

स्वधर्म's picture

25 Nov 2025 - 5:39 pm | स्वधर्म

राघव,
चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे.
वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे.
एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले.

पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही.

अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.