मी एक ठार सूर्य वेडी आहे.दूर डोंगरावर जाऊन होणारा सूर्योदय पाहणं माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत.सूर्यनमस्काराने माझ्या शरीरातील चैतन्याचे नातं त्यांच्याभोवती फिरत राहतं.सर्वत्र त्यांच्या उष्णतेची दाहकता नाही तर ऊब..स्निग्ध ऊब सृष्टी धारण करत असते.खुप लहानपणीच मी 'सूर्य पाहिलेला माणूस ' या वेगळ्याच नावाच्या नाटकाने भारावले होते.लागूंचे ते पोस्टर पाहत मोठे झालं की हे नाटक पाहायला हवं अशी सुप्त इच्छा मनाच्या कोपऱ्यात रूजली होती.आयुष्यात काही अशा रूजलेल्या गोष्टी नक्कीच पूर्ण करायचा ध्यास हवा नाहीतर त्या हरवतात कायमच्या.. तसंच झालं हे नाटक प्रत्यक्ष पाहिले नाही.लागू गेल्यावर तर ..संपलच!
याच मनात रूजलेल्या गोष्टी मग तुम्हाला शोधत समोर येतात.तुमची दृष्टी आणि मन स्वच्छ करतात, शांती देतात.
तसेच हे नाटक परवा समोर युट्यूब वर मिळालं.अक्षरक्ष: पाहतांना खुपच आनंद वाटत होता.
सूर्य दृष्टी स्वच्छ करतो, वाटा उजळून टाकतो.पण तो सूर्य सगळ्यांच सहज मिळत नाही.त्यासाठी अंधाराशी लढा द्यावा लागतो तेही शहाणं होऊन पहिल्या तत्त्ववेत्तया प्रमाणे सॉक्रेटिस प्रमाणे.
त्याने पहिल्यांदा समाजातल्या 'अतिशहाण्या',अतिमानवी लोकांचा,लोकांना अंधारात ढकलणाऱ्या रूढींचा अंधार ओळखला.त्यातल्या स्वयंसूर्याने त्याच्या आभाळात प्रकाशाचे लयलूट केली.आणि हाच सूर्य त्याने प्लेटो, ज़ेनोफ़ोन, अरिस्टिपस, एल्सीबिएड्स, क्रिटियास यांना दिला.एक सूर्योदय झाला.. सगळ्यांसाठीच!
या सूर्य पाहिलेल्या लोकांतील संवाद,संभाषण पुढे अजरामर झाले.तरीही झांथिप्पिला तो अधिक समजला असेही शिष्य म्हणत राहिले,कारण सॉक्रेटिसच म्हणायचा ..
By all means marry. If you get a good wife, you'll be happy. If you get a bad one, you'll become a philosopher. Socrates.
पण असा तरूणाईलाच अतिमानवी ऐवजी साम्यक सूर्य देणारा कसा परवडणार अतिमानवी जणांना?खटला भरा, मृत्यू दंड द्या हा सोपा मार्ग.पण सॉक्रेटिस म्हणाला होता "मला असा दंड देऊ नका, पुढच्या अनेक पिढ्या या कृत्यावर प्रश्न करतील,मी अशा मरणाने मरणारच नाही"
पुढे त्याने शेवटच्या दिवशी तुरुंगातून पळवण्याची वाटही तो धुडकावून लावतो.मरणाला घाबरून पळू नयेच हे तो सांगतच होता.
सॉक्रेटिस सर्वात शहाणा आहे, कारण 'आपल्याला पूर्ण ज्ञान नाही' याचे त्याला ज्ञान आहे... सूर्याचा शोध ज्याने त्याने घेत राहावा,अगदी डोळे दिपतील इथपर्यंत..
-भक्ती
सूर्य पाहिलेला माणूस-नाटक
प्रतिक्रिया
16 Feb 2025 - 2:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
16 Feb 2025 - 9:52 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...
17 Feb 2025 - 7:30 pm | चौथा कोनाडा
सुंदर धागा.... या नाटकाबद्द्ल बरेच ऐकले आहे.. हा धागा वाचून जास्त कल्पना आली.
नाटकाच्या लिंक बद्दल धन्यवाद !
लवकरच हे नाटक बघेन.