चपाती आंदोलनाचे गूढ

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
1 Jan 2025 - 1:13 am

chapati

आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का?
"चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का?
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का?
आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले?

चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला माहित नाहीत. अनेकांनी ह्या आंदोलनाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु एखाद्या गुप्त चळवळीचा भाग असल्यासारखी पुरेशी आणि ठोस माहिती उपलब्ध नाही. ह्या चपातीने तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीची आणि पर्यायाने इंग्रजांची झोप उडवली होती असे दिसते.

हे वर्ष आहे १८५७. त्या वेळेसचा भारत खूप वेगळा होता. १७५७ ची प्लासीची लढाई जिंकल्यानंतर कठपुतळी नवाबाला गादीवर बसवून आणि दिवाणी हक्क (the right to collect revenue) मिळवून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू होऊन १०० वर्षे झाली होती परंतु कोणीही सुखी नव्हते. राजे, महाराजे, सरदार, नवाब कंपनी सरकारचे मांडलिक झाले होते. शेतकऱ्यांचे शोषण होत होते आणि भारतीय समाजात अस्वस्थता होती. तेव्हा मेरठमधील सैनिकांनी बंड करण्याचा निर्णय घेतला त्या सर्वांना कोर्ट मार्शल करून कंपनी सरकारने तुरुंगात टाकले. पुढचा भारताच्या पाहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. इंग्रजांनी ह्या लढ्याला त्यांच्या इतिहासात १८५७ चा मोठा विद्रोह असे म्हटले आहे. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी खरोखरच घाबरली होती. त्यांना वाटले आता त्यांचा खेळ संपला परंतु स्वातंत्र्य लढ्याच्या आधी, काही महिन्यांपूर्वी त्यांना आणखी एका रहस्यमय गोष्टीची मोठी भीती वाटली होती, ती म्हणजे “चपाती आंदोलन” !

फ्लॅशबॅक
हे आहे फेब्रुवारी १८५७. स्वातंत्र्य संग्राम अजून काही महिने दूर आहे पण मथुरा येथे तैनात असलेल्या मार्क थॉर्नहील (Mark Thornhill) नावाच्या एका इंग्रज मॅजिस्ट्रेटला एक आश्चर्यजनक भेट मिळाली. एके दिवशी त्याला त्याच्या टेबलावर विचित्र दृश्य दिसले. काय होते ते? ते होते चार चपातीचे तुकडे. त्याला चपाती म्हणजे काय माहित असेल कि नाही शंकाच आहे. त्याने चौकशी केली तेव्हा कळले शेजारच्या गावातून एक माणूस आला आणि त्याने चपात्या गाव प्रमुखाकडे सुपूर्त केल्या व नवीन चपात्या करून पुढील गावी देण्यास सांगितले आहे. आजकालच्या जमान्यातील MLM (Multi Level Marketing) साखळी सारखे हे चपाती MLM होते का? हा एखाद्या गुप्त चळवळीचा भाग होता का? आणि जर कंपनी सरकारच्या विरोधात एखादी गुप्त चळवळ होती तर त्या मॅजिस्ट्रेटच्या टेबलवर चपात्या ठेवून त्याला माहिती देण्याची काय गरज होती? कि भारतीयांच्या राजद्रोह किंवा देशद्रोहाच्या अवगुणांप्रमाणे एखाद्याने कंपनी सरकारला हि गुप्त माहिती देऊन काही वैयक्तिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता? सगळेच गूढ आहे.

मार्क थॉर्नहीलने ह्या चपाती मागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याला हा कंपनी सरकारच्या विरोधात एखाद्या कटकारस्थानाचा भाग वाटला असावा. त्याने ह्या घटनेची सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला. आणि त्याला काय सापडले याचा अंदाज लावा. ह्या चपात्या केवळ मथुराच नव्हे तर दक्षिणेकडील नर्मदा नदीपासून नेपाळपर्यंत सर्वत्र जात होत्या. केवळ लहान सहान गावातूनच नव्हे तर इंदोर, ग्वाल्हेर, अलाहाबाद, दिल्ली येथून देखील अक्षरशः हजारो चपात्या वितरित केल्या जात होत्या. आणि प्रत्येक रात्री जवळजवळ 300 किलोमीटर वेगाने पुढे वाटल्या जात होत्या. या गतीची ईस्ट इंडिया कंपनीला काळजी वाटली कारण त्यांचा टपालही तितका वेगवान नव्हता. परंतु ह्या माहिती बद्दल शंका घेण्यास वाव आहे कारण एका रात्रीत एव्हढे अंतर कापणे शक्य होते का हे प्रश्न आहे. चपाती आंदोलन नक्की कोठून सुरू झाले हे अद्याप माहित नाही परंतु अज्ञात लोकं आणि कित्येकदा इंग्रजांच्या चौकीचे चौकीदार देखील कमळ किंवा बकरीचे मांस बरोबर घेऊन गावोगावी चपात्या घेऊन जात असत. कमळाचे फुल किंवा बकरीच्या मांसाचे काय प्रोयोजन होते न कळे, हे देखील एक गूढच आहे.

आता कल्पना करा की तुम्ही १८५७ च्या भारतातील इंग्रज अधिकारी आहात. तुम्हाला अशा गूढ चपात्या सर्वत्र फिरताना दिसत आहेत, तुम्ही घाबरून जाण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की हा एका षडयंत्राचा भाग आहे. तत्कालीन मूठभर इंग्रजांविरुद्ध जर सगळे भारतीय एकत्रित उभे राहिले तर काही खैर नाही ह्याची इंग्रजांना जाणीव होती म्हणून त्यांनी ह्या चपाती आंदोलनाच्या मुळाशी जायचे ठरवले. त्यांनी गुप्त कोड, निरोप किंवा पत्रांसाठी चपात्यांची तपासणी केली, या साध्या चपात्या होत्या. लोकांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही हाती लागले नाही. जणू सारा देशच या गूढतेत अडकला होता. त्याकाळी धोरणी इंग्रजांचे गुप्तहेर नक्कीच असावेत परंतु त्यांच्या हाती देखील काहीही माहिती लागली नाही असे दिसते त्यामुळे इंग्रज अधिकारी गोंधळलेले आणि भयभीत झालेले होते.

ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करणारे लष्करी सर्जन, डॉ. गिल्बर्ट हॅडो (Dr. Gilbert Haddow), ह्यांनी मार्च १८५७ मध्ये ब्रिटनमधील आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात ह्या चपाती आंदोलनाच्या विचित्र चळवळीचे वर्णन वाचायला मिळते.
“There is a most mysterious affair going on throughout the whole of India at present. No one seems to know the meaning of it. It is not known where it originated, by whom or for what purpose, whether it is supposed to be connected to any religious ceremony or whether it has to do with some secret society. The Indian papers are full of surmises as to what it means. It is called the chapati movement.”

चपाती चळवळ समजून घेण्यासाठी १८५७ मधील भारताची अवस्था समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा ब्रिटीश-व्याप्त भारतातील तणाव सर्वकालीन उच्च पातळीवर होता. भारतीयांचा कंपनी सरकारवर विश्वास नव्हता, सर्वत्र भीतीचे वातावरण होते, कंपनी सरकारचा जुलूम चालू होता. असंतुष्ट भारतीय शोषक ब्रिटीश राजवटीला कंटाळलेले होते. त्यामुळे अफवा चपातींपेक्षा वेगाने पसरत होत्या. एक अफवा अशी होती की प्लासीच्या लढाईनंतर १०० वर्षांनी भारतातील परकीय राजवट संपेल आणि प्लासीच्या लढाईला १०० वर्षे पूर्ण झाली होती त्यामुळे भारतीयांना काहीतरी घडण्याची अपेक्षा असावी. दुसरी शक्यता अशी आहे कि इंग्रज हे भारतीयांच्या धर्म श्रद्धा (हिंदू आणि मुस्लिम) बदलण्याच्या प्रयत्नात होते आणि हे अंशतः खरे आहे. इंग्रज मिशनऱ्यांनी धर्म प्रसार करण्याचे काम हाती घेतले होते. त्यात नवीन आलेल्या बंदुकीच्या गोळ्यांना (ज्याचे cartridges दाताने उघडावे लागत असे) गाईची आणि डुकराची चरबी लावल्याची वदंता होती त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष होता. तिसरी शक्यता कॉलराविषयी आहे. आजूबाजूला कॉलराचा मोठा उद्रेक झाला होता. तत्कालीन समजुतीप्रमाणे कॉलरावर मात करण्यासाठी चपाती अन्न वाटप करण्याचा तोडगा कोणी सुचवला असेल आणि हे आंदोलन त्याचा परिपाक असेल काय? म्हणजे त्यात काहीही कटकारस्थान नसून केवळ एक मानवतावादी मिशन असेल काय? आणखी एका शक्यतेनुसार चपाती सारखी साधी गोष्ट वापरून गूढ वातावरण तयार करून भारतीय इंग्रजांचे मानसिक खच्चीकरण (Psychological warfare) करत होते काय? राजकीय संदेश पसरवण्यासाठी अशिक्षित बंडखोरांना लिखित माहिती देण्याऐवजी केवळ चपात्या वापरण्यात आल्या अशी इंग्रजांची धारणा असावी. परंतु त्यांनी जंग जंग पछाडून देखील ह्या मागचे गूढ उकलले नाही. पुढच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वतयारीची हि सूचना तर नव्हती कारण वेल्लोरच्या बंडाच्या वेळी देखील असेच चपाती आंदोलन झाल्याचे समजते.

एकूणच, चपाती आंदोलनाने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले होते हे खरे. चपातीवर एकही शब्द लिहिलेला नसल्यामुळे किंवा कोणतीही सांकेतिक खूण नसल्याने, चपाती आंदोलन चालवणाऱ्यांना थांबवण्याचे किंवा अटक करण्याचे कारण न मिळाल्याने इंग्रज संतापले होते. चपाती वितरित करणारे अनेकदा स्वतः पोलीस चौकीदार होते आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे, चपाती वितरित करणारे ह्या कृतीच्या उद्देशाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. चपात्या खऱ्या होत्या पण त्या कशासाठी आहेत हे कोणालाही, अगदी त्या घेऊन धावणाऱ्यालाही माहीत नव्हते हे अतिशय आश्चर्यजनक आहे.

पुढे अनेक वर्षांनंतर, Life During the Indian Mutiny या पुस्तकात, लेखक जे डब्ल्यू शेरर (J W Sherer) यांनी कबूल केले की जर ह्या रणनीतीमागील उद्देश रहस्यमय आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करणे हा असेल, तर हा प्रयोग खूप यशस्वी झाला होता. गूढ, रहस्यमय चपाती आंदोलनाने इंग्रजांना गोंधळात टाकले होते आणि हे आंदोलन वसाहतवादी राजवटीविरुद्ध मानसिक युद्धाचे प्रभावी शस्त्र ठरले. १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम शमल्यावर इंग्रजांनी चपाती आंदोलन हि एक अर्थहीन चळवळ होती असे सांगून त्यावर पडदा टाकला मात्र चपातीने इंग्रजांना घाम फोडला होता हे नक्की. त्यानंतर इस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात येऊन ब्रिटनने भारतीय उपखंडाचा वसाहत म्हणून अधिकृतरीत्या ताबा घेतला.

सध्याच्या जमान्यातील इंग्रजांना एकेकाळी त्यांना चपाती सारख्या निरुद्रवी खाद्य पदार्थाची भीती वाटली होती हे माहित देखील नसेल. त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.

तुम्हाला ह्या रहस्यमय आंदोलनासंदर्भात आणखी काही माहिती असेल तर जरूर सांगा.

माहितीदायकत्वास होकार लागू !!

इतिहासलेख

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

1 Jan 2025 - 3:55 am | चित्रगुप्त

मनोरंजक आणि उत्कंठावर्धक लेख.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2025 - 6:21 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

वामन देशमुख's picture

1 Jan 2025 - 7:37 am | वामन देशमुख

ऐकावे ते नवलच!

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Jan 2025 - 8:30 pm | चंद्रसूर्यकुमार

रोचक प्रकार. हो अशा पोळ्या गावोगावी पाठवून त्यातून क्रांतीचा संदेश पसरवला गेला असे वाचले आहे. पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते. नाहीतर नुसत्या पोळ्या दुसर्‍या गावातून आपल्या गावात आल्या तर त्यामुळे ब्रिटीशांविरोधात उठाव करावा असे इतक्या (म्हणजे अनेक लाख- कदाचित कोटीही) लोकांना वाटणे याची तर्कसंगती लावता येत नाही.

लेखाबद्दल धन्यवाद

टर्मीनेटर's picture

2 Jan 2025 - 12:31 pm | टर्मीनेटर

पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते.

हो, लेखात म्हंटल्याप्रमाणे लाल कमळ आणि बकऱ्याच्या मांसाचे लहान तुकडेही सहसा त्या पोळ्यांबरोबर असत, आणि "सब लाल हो गया हैं" असा एक गुढ तोंडी संदेशही त्या वस्तु एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचवणारे धावपटु देत असत म्हणे. त्या चपात्या, कमळाचे फुल, बकऱ्याचे मांस आणि ह्या संदेशाचा नक्की काय परस्पर संबंध होता राम जाने!

रामचंद्र's picture

1 Jan 2025 - 9:08 pm | रामचंद्र

हा पोळी/रोटी गूढ प्रवास इतकं अंतर झटपट होऊ शकला असेल तर तीही इंग्रजी/कंपनी सरकारचीच कृपा म्हटली पाहिजे. अन्यथा इतक्या झपाट्याने अशी हालचाल इंग्रजपूर्व (उत्तर) भारतात अशक्यच ठरली असती.

चौथा कोनाडा's picture

1 Jan 2025 - 10:22 pm | चौथा कोनाडा

प्रथमच चपाती आंदोलना बद्दल वाचण्यात आले.
अ ति श य रोचक प्रकरण आहे असं दिसते.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

एकंदरीत हा प्रकार रहस्यमय आहे खरा! आणि इतक्या वर्षांनंतरही त्या मागचे गूढ उकलले नाही ह्याचे आश्चर्य वाटते!

त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.

"चपाती-ब्रेड" हि द्विरुक्ती आहे पण 'चाय-टी' म्हणजे दुधाचा चहा आणि नुसता 'टी' म्हणजे कोरा चहा/ब्लॅक टी असे अर्थ त्यातुन अभिप्रेत असतात.

या निमित्ताने घडीच्या पोळ्या या आपल्या दैनंदिन आहारात कधी समाविष्ट झाल्या असाव्यात कोणी सांगू शकेल का? कारण सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी पुण्यासारख्या शहरातही ब्राह्मणवर्गातही घरोघरी पोळ्यांपेक्षा भाकरीच केल्या जात असं ऐकून आहे. रोजच्या आहारात त्या तितक्याशा प्रचलित नव्हत्या.

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2025 - 9:37 pm | चौथा कोनाडा

आंजावर शोधल्यावर हे सापडलं :

हजारो वर्षांपासून गहू पिकवला जात असल्याने रोटी बनवण्याची पाककला विकसित होत गेलेली दिसते. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये तर याचे साद्यंत वर्णन येते. गव्हाचे पीठ केल्यावर त्यात थोडे तूप व मीठ घालून दूध व पाणी या दोन्हींच्या साहाय्याने कणीक भिजवावी, असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांडय़ांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. हीच आपली पोळी असावी.

चपाती हा शब्द सगळ्या प्रांतात आढळतो. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा. पोळी हा शब्द मात्र सर्व प्रांतांमध्ये नाही. तो महाराष्ट्रात विशेषत्वाने आढळतो. सोमेश्वराच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा. १६ व्या शतकातील ‘भावप्रकाश’नामक ग्रंथात रोटीका असा संस्कृत उल्लेख आहे. ती आजची रोटी. याच दरम्यानच्या ऐन-ए-अकबरीमध्ये चपातीचा उल्लेखही आढळतो.

पण घडीची पोळी याबद्दल काही सापडलं नाही ! माझ्यामते पोळीचा शोध लागतानाच घडीची पोळी करण्याची कृती सापडली असावी.. व्याख्या साधी सोपी : जी मऊ आहे आणि घडी घालता येते अन प्रवासात न्यायला सुटसुटीत अन टिकाऊ !

रामचंद्र's picture

2 Jan 2025 - 10:07 pm | रामचंद्र

घडीची पोळी म्हणजेच आपण रोज खातो ती पोळी. शंका एवढीच आहे, की हा प्रकार महाराष्ट्रात किमान काही शतके नक्कीच माहीत असावा पण रोजच्या आहारात त्याचा समावेश या शतकभरातलाच असावा. यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?

यश राज's picture

2 Jan 2025 - 1:52 pm | यश राज

एकदम नविन व वेगळीच माहिती.

कानडाऊ योगेशु's picture

3 Jan 2025 - 1:39 pm | कानडाऊ योगेशु

मी असेही ऐकले आहे कि फुगलेल्या पोळीत/भाकरीत संदेश लिहिलेला कागद सरकाऊन पुन्हा पोळी/भाकरीचे तोंड बंद करुन ती पाठवली जात असे.

Bhakti's picture

4 Jan 2025 - 11:47 am | Bhakti

अच्छा!
ही पद्धत एकदा तरी वापरून पाहते ;)

वाजवा रे वाजवा चित्रपट आठवला.

एवढस काय? . . वांग. त्याला काय? देठ. तुमची आमची कायमची भेट.
https://youtu.be/gNmbChjJ3HQ?si=c2S5dskupoXkmI1b
नुसतं नॉस्टॅल्जिया..ते रविवारचे सिनेमे...ती निखळ धमाल..ओह मिसिंग.
हो कोणता डबा कोणासाठी हे सांगत जा, चिठ्ठी काय पाठवता...आठवतेय ;)

गवि's picture

4 Jan 2025 - 3:16 pm | गवि

:-))

चिठ्ठी खाता आली असती का? भाजी वाचता आली असती का?

चित्रगुप्त, मुक्त विहारि, वामन देशमुख - तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार
चंद्रसूर्यकुमार - खरे आहे, तर्काच्या कसोटीवर असे नुसत्या चपात्या वितरित करण्याने क्रांती होईल हे पटत नाही
टर्मीनेटर - 'सब लाल हो गया हैं' म्हणजे काय किंवा कमळ, बकऱ्याचे मांस ह्याचा काय संबंध असावा हे कळत नाही.
रामचंद्र - आजकाल वाहतुकीची सर्व साधने उपलब्ध असल्याने ३०० किमी चा प्रवास एका रात्रीत शक्य आहे परंतु तो तेव्हा कसा जमत असेल?
चौथा कोनाडा - हो, हे रोचक प्रकरण आहे खरे. ह्याला क्रमशः नाही.
टर्मीनेटर - हो खरंच गूढ आणि रहस्यमय आहे हे आंदोलन
रामचंद्र - माझ्यामते पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत्वे ज्वारी, बाजरी नाचणी इत्यादींच्या भाकरीच खात असत. पुराणपोळी सणासुदीला करत असावेत. तेव्हा खपली गहू असे, असे ऐकले आहे
यश राज - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
कानडाऊ योगेशु - इंग्रजांनी नक्कीच ह्या पोळ्या उघडून बघितल्या असतील परंतु त्यांना काहीही सापडले नाही.
Bhakti - चिनी मंडळींच्या फॉर्च्युन कूकीज मध्ये संदेश लिहिलेला कागद असतो तशी तुमची फॉर्च्युन चपाती/पोळी होईल.
गवि - त्या 'वाजवा रे वाजवा' चित्रपटात चपातीसंदर्भात काही होते का?

उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली.
थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून -

चपाती आंदोलनाचे गूढ

चपाती फिरत होती गावोगावी,
गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी।
कधी कुणी नेली, कधी कुणी दिली,
शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली।

साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या,
झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या।
नाही राजा, नाही सेनापती,
जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या।

घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी,
ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी।
द्रोणासारखी पसरली ती जाळं,
ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार।

कधी ती असहकार, कधी ती बंड,
चपातीचं गूढ राहिलं अनंत।
भारतीयांची एकता, एक लढाईची आस,
त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास।

आजही विचारतो इतिहास,
कोण होतं ते सूत्रधार खास?
चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही,
पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही।

धन्य ती पोळी, धन्य ती भावना,
जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला।
चपाती आंदोलनाचा हा इतिहास,
राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।

विजुभाऊ's picture

12 Jan 2025 - 9:01 am | विजुभाऊ

हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. Chat-GPT वापरून कविता लिहीणे म्हणजे फॉर्म्युला वन घेऊन कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यासारखे आहे

चामुंडराय's picture

20 Jan 2025 - 3:07 am | चामुंडराय

तसे झाले तर The Monk Who Sold His Ferrari प्रमाणे "The Man Who Drove His F-१ To टपरी For च्या" प्रसिद्ध होईल !!
:)

माझ्या वाचनात असे आले आहे की सर्वप्रथम ज्याने TEA हा शब्द इंग्रजीत आणला, त्याने चाय - चा- च्या अश्या कानावर पडलेल्या ध्वनीचे स्पेलिंग TEA असे केले.
-- जसे NATURE, CAPTURE, ARCHITECTURE या शब्दांमधे 'T' चा उच्चार 'च' होतो, तसे.