The Love of Crocus and Smilax ह्या ग्रीक दंतकथेचे मराठीत शब्दांकन:
कोणे एके काळी ग्रीस मध्ये 'क्रोकस' नावाचा देखणा तरुण आणि 'स्मिलॅक्स' नावाची एक अप्सरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांचे प्रेम पवित्र असले तरी भूलोकातील मर्त्य मानव आणि देवलोकातील अप्सरेतले हे प्रेमसंबंध देवी-देवतांना मान्य नसल्याने त्यांचा ह्या प्रेमाला विरोध होता. देवी-देवतांचा आपल्या प्रेमाला असलेला विरोध पत्करूनही क्रोकस आणि स्मिलॅक्स ह्यांच्या गुप्तपणे भेटी-गाठी सुरूच होत्या.
एके दिवशी ऑलिम्पस पर्वतावर 'हर्मीस' (Hermes), 'हेरॅकल्स' (Heracles), 'डायोस्कुरी ' (कॅस्टर आणि पोलक्स हे जुळे भाऊ, एकत्रितपणे - Dioscuri) हे 'झ्यूस' देवाचे पुत्र आणि 'नायके' (Νίκe - विजयाची देवी) व अॅगॉन (Agon - स्पर्धांचा देव) ह्या देवतांत 'डिस्कस' (Discus) चा खेळ रंगला होता. आपली पाळी आल्यावर हर्मीसने डिस्क इतक्या जोरात फेकली कि तिने तिथून खूप दूर अंतरावर गुप्तपणे स्मिलॅक्सला भेटण्यासाठी आलेल्या क्रोकसच्या गळ्याचा वेध घेतल्याने त्याचे शीर धडापासून अलग होऊन 'क्रीट' बेटावर जाऊन पडले.
हर्मीसने फेकलेल्या डिस्कचे अंतर मोजण्यासाठी खेळात सहभागी झालेल्या देवी-देवता तिथे पोचल्यावर आपल्या प्रियकराचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून दुःखातिरेकाने त्याच्या धडाशेजारी विलाप करत बसलेली स्मिलॅक्स क्रोकस शिवाय आपले जीवन व्यर्थ असल्याचे सांगून त्यांच्याकडे क्रोकसला पुनर्जीवित करण्यासाठी आर्जवे करू लागली.
स्मिलॅक्सच्या क्रोकसप्रती असलेल्या प्रेमाची उत्कटता आणि समर्पित भावना पाहून तिथे उपस्थित असलेल्या देवी-देवतांचे मन द्रवले परंतु क्रोकसला पुनर्जीवीत करण्याइतके सामर्थ्यवान त्यांच्यापैकी कोणीही नव्हते आणि त्या दोघांचे प्रेमसंबंध अन्य शक्तिमान देवी-देवतांना मान्य नसल्याने त्यांच्याकडूनही ह्याबाबतीत कुठले सहकार्य मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती.
आपल्या हातून अनावधानाने घडलेल्या ह्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून हर्मीसने क्रीट बेटावर पडलेल्या क्रोकसच्या शीराचे रूपांतर 'क्रोकस' वनस्पतीच्या रोपट्यात आणि स्मिलॅक्सचे रूपांतर नेहमी क्रोकस वनस्पतीजवळ उगवणाऱ्या एका काटेरी वेलात करून त्यांना कायमस्वरूपी एकमेकांच्या सानिध्यात राहाता येण्याची व्यवस्था करून दिली.
क्रीट बेटावर ज्याठिकाणी क्रोकसचे मस्तक पडले होते त्याठिकाणी केशर मिळवून देणाऱ्या 'क्रोकस सटिवस' ह्या वनस्पतीची उत्पत्ती झाली आणि मर्त्य मानव असलेल्या देखण्या 'क्रोकस' प्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर असलेल्या तिच्या फुलांच्या वर्तिकांना क्रोकसच्या गळ्यातून त्याठिकाणी ठिबकलेल्या रक्ताचा लाल रंग प्राप्त झाला आणि पुढच्या काळात ग्रीक संस्कृतीत 'केशर' हे प्रेम, दु:ख आणि समर्पणाचे प्रतीक बनले!
*****
केशर उत्पादन आणि त्याच्या वापराचा ग्रीक इतिहास:
ग्रीसमध्ये प्राचीन काळापासून केशराची (क्रोकस सटिवसची) लागवड केली गेली आहे. शतकानुशतके तिथे सुरु असलेल्या केशर लागवडीचा इतिहास खालीलप्रमाणे नोंदवला गेला आहे:
- प्राचीन ग्रीस (इ.स.पूर्व ६ वे शतक ते इ.स. १४६) :
इ.स.पूर्व ६ व्या शतकात तुर्कस्थानातील 'अॅनाटोलीया' द्वीपकल्पातून (Anatolia '/ Asia Minor) ग्रीसमध्ये आलेल्या केशराला त्याचा रंग, स्वाद आणि औषधी गुणधर्मांसाठी खूप महत्त्व प्राप्त झाले होते. ग्रीकांनी केशराचा वापर खाद्य पदार्थांमध्ये, वस्त्रे रंगवण्यासाठी आणि सुगंधी द्रव्ये व सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी केला. काळात ग्रीसचे ऱ्होड्स (Rhodes) शहर केशर उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. - बायझंटाइन काळ (इ.स. ३९५- १४५३) :
बायझंटाइन काळात केशर लागवड फुलत राहिली. सुगंधी द्रव्ये, औषधोपचार आणि स्वयंपाकासाठी केशराचा वापर सुरु होता आणि त्याची भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवरील इतर भागात त्याची निर्यात देखील केली जात होती. कॉन्स्टँटिनोपल (आताचे इस्तंबूल) हे तत्कालीन केशर व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. - ऑटोमन राजवटीचा काळ (इ.स. १४५३ ते १८२१) :
ग्रीसमधील ऑटोमन राजवटीच्या काळात तिथल्या केशर उत्पादनात लक्षणीय घट झाली. तुर्कांनी नवीन पिके आणि शेती तंत्रज्ञान आणले, त्याच्या परिणामी ग्रीसमध्ये केशर उत्पादन कमी झाले होते परंतु पेलोपोनीज आणि क्रीट ह्याठिकाणी केशराची लागवड त्याकाळातही सुरूच होती. - आधुनिक काळ (इ.स. १८२१ ते वर्तमान काळ) :
१८२१ मध्ये ऑटोमन राजवटीपासून ग्रीसने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर केशर उत्पादन पुन्हा वाढू लागले आणि पुन्हा एकदा ते ग्रीक संस्कृतीचे प्रतीक बनले. केशराचे उत्पादन आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. आजघडीला ग्रीस हा जगातील प्रमुख केशर उत्पादक देशांपैकी एक असून ग्रीसच्या क्रीट, लेस्बोस आणि चिओस बेटांवर सर्वाधिक, आणि पेलोपोनीजच्या काही भागांत थोड्याफार प्रमाणात केशर उत्पादन होत असले तरी Protected Designation of Origin (PDO) दर्जा मिळालेल्या 'कोझानी' प्रदेशात उत्पादित होणारे आणि 'क्रोकोस कोझानीज' (Krokos Kozanis) म्हणून ओळखले जाणारे केशर हे जगातल्या सर्वोत्तम दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या केशराच्या प्रकारांपैकी एक मानले जाते.
ग्रीक वैद्यकातील केशराचा वापर:
प्राचीन ग्रीक चिकित्सक आणि वनस्पतिशास्त्रज्ञ डायोस्कोराईड्स (Dioscorides) ह्यांनी आपल्या 'De Materia Medica' ह्या प्राचीन ग्रंथात केशराचे जखम लवकर भरण्यासाठी, सूज उतरवण्यासाठी, मासिक पाळीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी, मनःस्वाथ्य सुदृढ राखण्यासाठी तसेच , नैराश्य, पचनाच्या समस्या, सर्दी-पडसे आणि निद्रानाशाच्या समस्यांचे निवारण करण्यासंबंधीचे औषधी उपयोग आणि त्याच्या कामोत्तेजक गुणधर्मांविषयी लिहिलेले असल्याने विविध पारंपरिक औषधोपचारांत शतकानुशतके केशराचा वापर होत आला आहे.
अलीकडील वैज्ञानिक अभ्यासांमधून केशर नैराश्य आणि चिंता दूर करून मूड सुधारण्यास मदत करू शकते आणि ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आल्याने आधुनिक काळातही ग्रीसमध्ये त्याचा वैद्यकीय वापर आणि सौंदर्यप्रसाधन निर्मितीसाठी उपयोग केला जातो.
ग्रीक खाद्यसंस्कृतीतला केशराचा वापर:
ग्रीक खाद्यसंस्कृतीत अनेक अन्नपदार्थांतली पोषकतत्वे, त्याचे रुचीमूल्य आणि त्यातील आम्लतेचे संतुलन साधण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, लिंबू आणि अन्य मसाल्याच्या पदार्थांच्या जोडीने केशराचाही वापर करण्याची खूप जुनी परंपरा आहे. त्यापैकी काही निवडक लोकप्रिय पारंपरिक ग्रीक खाद्यपदार्थ:
- युवेत्सी - Youvetsi : मेंढा, बैल किंवा कोंबडीच्या मांसापासून तयार केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ. हा पदार्थ शिजवताना केशराचा अतिशय कौशल्यपूर्णरित्या वापर केला जात असल्याने त्यात वापरल्या जाणाऱ्या अन्य मसाल्यांच्या स्वाद आणि सुगंधावर केशर वरचढ न होता त्या पदार्थाला सुंदरशी सोनेरी रंगछटा आणि हलकासा मृदगंध प्राप्त होतो. युवेत्सी हा मांसाहारी पदार्थ सहसा ओरझो पास्ता (Orzo pasta) बरोबर सर्व्ह केला जातो.
- अवगोलेमोनो - Avgolemono : लिंबाचा वापर करून बनवण्यात येणारे अंड्याचे सूप.
- स्पॅनाकोपिटा - Spanakopita (Spinach Pie) : पालक, कांदा आणि फेटा चीजचे सारण भरून तयार करण्यात येणारा एक चविष्ट पदार्थ.
- गारीदेस सागानाकी - Garides Saganaki : कोळंबी, कांदा, टोमॅटो आणि फेटा चीजचा वापर करून बनवण्यात येणारा एक पदार्थ.
एकंदरीत पाहता केशर लागवडीची प्राचीन परंपरा लाभलेल्या ग्रीसमध्ये बायझंटाइन आणि ऑटोमन काळात त्याच्या केशर उत्पादन क्षमतेवर बरा-वाईट प्रभाव पडलेला दिसून येत असला तरी आजघडीला वर्षाकाठी सुमारे सात ते आठ टन केशराचे उत्पादन करून अमेरिका, युरोपियन महासंघातील आणि आशिया खंडातील काही देशांमध्ये ते निर्यात करून पुन्हा एकदा त्याच्या उच्च गुणवत्तेच्या केशर उत्पादनासाठी ओळखला जाऊ लागलेला 'ग्रीस' दर्जेदार केशर उत्पादनाच्या आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करताना दिसत आहे.
*****
आधीचे भाग :
टीप:
- लेखातली सर्व चित्रे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित चित्रनिर्मिती सुविधा देणाऱ्या (Bing) Image Creator ह्या वेबसाईटचा वापर करून तयार केली आहेत.
- 'केशर - गाथा आणि दंतकथा' मालिकेचा हा भाग १३ सप्टेंबर २०२४ रोजी संदर्भसूची (ब्लॉग) आणि मायबोलीवर पुर्वप्रकाशित.
प्रतिक्रिया
18 Oct 2024 - 1:08 pm | श्वेता२४
हा भागही आवडला. नवीन माहिती मिळाली.
19 Oct 2024 - 6:05 am | कर्नलतपस्वी
आपले संशोधन व विषयाची मांडणी बघता आपल्याला विद्यावाचस्पती ही मुक्त मिपा विद्यापीठाने मानद उपाधी द्यायला हवी.
अप्रतिम कृबु चित्रे व लेखांकन.
धन्यवाद.
20 Oct 2024 - 8:26 pm | टीपीके
+१
19 Oct 2024 - 6:24 am | प्रचेतस
हा भागही जबरदस्त, नुसतं केशर आणि त्याचे उत्पादन असे न लिहिता त्या त्या देशातील केशराचा इतिहास, तिथल्या समृद्ध खाद्यजीवनातील त्याचे महत्व, याशिवाय त्याचे औषधी उपयोग अशा विविध अंगांचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवत आहात.
20 Oct 2024 - 9:07 am | अथांग आकाश
सुगंधित लेखमाला!
पुभाप्र!!