सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in जनातलं, मनातलं
2 Jul 2024 - 1:27 pm

इशारा:

१. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.

२. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत.

---

नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो.

खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे.

आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात. मीही २०२४ नवीन वर्षांचे काही संकल्प केले होते. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे -

-: (बाकीचे उद्योग सांभाळून) ऑप्शन्स् ट्रेडिंग मध्ये महिना किमान १ लाख मिळवणे :-

अर्थात हे एक उद्दिष्ट म्हणजे इतर अनेक लहानसहान उद्दिष्टे, नियोजन, अंमलबजावणी इत्यादींचा समुच्चय होता-आहे.

मी व्यावसायिक व हौशी गुंतवणूक सल्लागार नाही, त्यासंबंधित विकत व फुकट असे कोणतेही उत्पादन, सेवा वा प्रशिक्षण देत नाही. माझ्या लिखाणावर विश्वास ठेवायचा की नाही याचे स्वातंत्र्य मिपाकरांना आहे. माझे लिखाण कुणाला पटवून देण्याचा प्रयत्न करावा की नाही याचे स्वातंत्र्य मला आहे.

या लिखाणाच्या संदर्भात मी ट्रेडर आहे, इन्व्हेस्टर नाही.

साधारणतः २०१९ पासून मी स्टॉक मार्केटात रस घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी कोणतेही विकतचे मार्गदर्शन घेतले नाही. युट्युब, झेरोधा वर्सीटी, मिपावरील संबंधित लेख, इतर संस्थळे व स्नेही-मित्रमंडळी हेच माझे मार्गदर्शक होते आणि आहेत. सगळ्यांसारखीच मी पण इक्विटी इन्व्हेस्टमेंट मग ट्रेडिंगने सुरुवात केली. नंतर कधी हवेत भरारी घेत, कधी ठेचकाळत तर कधी कपाळमोक्ष करून घेत वाटचाल सुरु ठेवली. मग भीतभीत इंडेक्स ऑप्शन्स् खरेदी करायला सुरुवात केली. शेवटी इंडेक्स ऑप्शन्स् विक्री कडे वळलो.

१ एप्रिल २०२३ पासून मी इंडेक्स ऑप्शन्स् विक्री गांभीर्याने करायला सुरुवात केली. त्यासाठी भांडवल जास्त असले तरी संयम, स्वनियंत्रण आणि सातत्य या आधारावर थोडाफार नफा मिळवता येतो असे मला वाटते. अर्थात अनेक वेळा प्रचंड तोटा होतो, स्टॉप लॉस प्रत्येक वेळी साथ देईलच असे नाही. पण तोटा अधिक शुल्क यापेक्षा प्रत्यक्ष नफा जास्त असायला हवा.

सर्वच धंदे सर्वांसाठीच नसतात. स्टॉक मार्केट ट्रेडिंग हाही एक धंदा आहे. तो सर्वांनाच करता येईल असे नाही, पण त्यातून कुणालाच नफा काढता येत नाही असेही नाही. ज्याचा त्याचा वकूब असतो. परमेश्वराची कृपाही असावी लागते.

सुदैवाने माझे व्यावसायिक काम, वेळेच्या बाबतीत बरेच लवचिक आहे. त्याव्यतिरिक्त ट्रेडिंगसाठी मी रोज किमान तीन-चार तास देऊन काम करतो. ज्यादिवशी दिवस वेळ मिळाला नाही त्यादिवशी ट्रेडिंग करत नाही, पण रात्री आढावा घेतो. अर्थात प्रत्येक दिवस ट्रेडिंगचा असतोच असे नाही!

श्री तिरुपती बालाजी कृपेने सध्या मी मागच्या पाच महिन्यांपासून दरमहा सरासरी ८० हजार शुल्कोत्तर नफा प्राप्त केला आहे. पुढेही असाच नफा मिळत राहील असे नाही, वाढू-घटू शकतो. माझा बेंचमार्क दरमहा सरासरी १ लाख शुल्कोत्तर नफा मिळवणे हा आहे. सध्या ९ लाख भांडवल गुंतवलेले आहे. ते १३-१५ लाखांपर्यंत नेऊन नफ्याचा बेंचमार्क क्रॉस करणे हे उद्दिष्ट आहे.

या वर्षाअखेरीपर्यंत, किमान मार्च अखेरीपर्यंत तरी हे उद्दिष्ट साध्य होईल अशी आशा आहे.

- कांदा लिंबू

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

2 Jul 2024 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले

वाह.

काँग्रॅच्युलेशन्स.

चौकस२१२'s picture

2 Jul 2024 - 2:20 pm | चौकस२१२

९ लाख भांडवलावर महिना ८० हजार म्हणजे वर्षाचे ९लाख साठ हजार म्हणजे 106% हुन अधिक वार्षिक परतावा.... या बद्दल अभिनंदन
हे फार कठीण आहे, (हो अगदी ऑप्शन मधील लिव्हरेज धरले तरी )
हरकत नसेल तर काही प्रश्न

- यात सातत्य किती आहे ( सरासरी ८० हजार असेल तरी मोठे खड्डे आणि उंचावतटे किती आहेत ? Draw down
- या साठी आपण जोखीम किती पत्करता म्हणजे काय "विकता"
१) नेकेड ऑप्शन विकणे
२) कवर्ड ऑप्शन विकणे (बद्दल एक प्रसिद्ध म्हण आहे " जो माणूस कवर्ड ऑप्शन विकतो तो रोज/ दरमहा राजा सारखा खातो पण जेवहा हरू लागतो तेवहा एखाद्या सम्राटासारखा हागतो "
३) ऑप्शन स्प्रेड विकणे / विकत घेणे
4) नुसते ऑप्शन विकत घेणे

Expiry शेवटच्या दिवशी भारतात इंडेक्स ऑप्शन हे कॅश सेटल्ड असतात कि प्रत्यक्ष इंडेक्स फ्युचर वर सेटल होतात?

Expiry शेवटच्या दिवशी भारतात शेअर ऑप्शन हे कॅश सेटल्ड असतात कि प्रत्यक्ष शेअर डिलिव्हरी कि शेअर फुचर वर सेटल होतात ?

कांदा लिंबू's picture

3 Jul 2024 - 10:32 am | कांदा लिंबू

जुन महिन्यात झालेला -

- तोटा - सव्वा लाख
- नफा - एक लाख नव्वद हजार
- शुल्कोत्तर निव्वळ नफा - ६५ हजार

सात-आठ महिन्यांत -

- एकाच दिवसात झालेला सर्वोच्च नफा - ४८०००
- एकाच दिवसात झालेला सर्वोच्च तोटा - ६७०००

मी नेकेड ऑप्शन्स् विकतो. पुट / कॉल दोन्ही विकतो. कवर्ड् / स्प्रेड् वगैरे करत नाही. यात प्रचंड जोखीम आहे, मर्यादित नफा आहे. नफ्याची वारंवारिता अधिक आहे.

१० टक्के स्टॉपलॉस, २० टक्के नफा असे साधारण नियोजन करतो, वेळ पाहून त्यात थोडाफार बदल करतो. थोडेफार चार्ट्स्, विक्स् वगैरे बघतो, खूप जास्त तांत्रिक माहिती बाळगत नाही, माहिती प्रदूषण करून घेत नाही. "आधी झालेला तोटा आता भरून काढायचा आहे" अशी मानसिकता ठेवत नाही.

अजून शिकाऊ उमेदवार आहे, "past performance is not an indicator of future returns" याची जाणीव आहे.

चौकस२१२'s picture

3 Jul 2024 - 6:24 pm | चौकस२१२

मी नेकेड ऑप्शन्स् विकतो.
कवर्ड् / स्प्रेड् वगैरे करत नाही. यात प्रचंड जोखीम आहे

विरोधाभास जाणवला
नेकेड ऑप्शन विकण्यात स्प्रेड विकण्यापेक्षा जास्त जोखीम असते / असू शकते विशेष म्हणजे नेकेड कॉल विकण्यात जास्त धोका हि आणि फाय द हि

दोन्ही ची "शक्यता" प्रोबॅबिलिटी सारखी असेल म्हणजे असे कि समजा इंडेक्स १००० ला आहे आणि
अ ) १००५ चा कॉल विकलात काय
किंवा
ब) १००५-१०१० चा कॉल स्प्रेड विकला काय
इंडेक्स १००५ च्या वर गेली तर दोन्ही कडे तोटा होऊ शकतो ,

अ ) मध्ये अमर्यादित
ब) मध्ये मर्यादित
इंडेक्स १००५ च्या खाली राहिली तर
अ ) मध्ये ब) पेक्षा जास्त फायदा होणार हे खरे

कांदा लिंबू's picture

3 Jul 2024 - 9:09 pm | कांदा लिंबू

विरोधाभास जाणवला

मी नेकेड ऑप्शन्स् विकतो. कवर्ड् / स्प्रेड् वगैरे करत नाही. यात प्रचंड जोखीम आहे.‌

यातील "यात प्रचंड जोखीम आहे" हे व इतर, "मी नेकेड ऑप्शन्स् विकतो" यालाच लागू आहे.‌

माझा लेखनदोष!

चौकस२१२'s picture

2 Jul 2024 - 2:23 pm | चौकस२१२

नेकेड ऑप्शन विकणे बद्दल एक प्रसिद्ध म्हण आहे " पैशाची नाणी ( चिल्लर ) कमवण्यासाठी रोड रोलर पुढे हात घालणे "

अमर विश्वास's picture

2 Jul 2024 - 2:49 pm | अमर विश्वास

अभिनंदन ..
सध्या बाजारात बुल रन चालू आहे.. मार्केट सात्यत्याने वर जातंय .. त्याच्या जरूर फायदा ह्या ..

काही महिन्यांनी मार्केट volatile होण्याची शक्यता आहे .. पण तोपर्यंत तुमचे ट्रेडिंग मॉडेल अजून मॅच्युअर झाले असेल

happy trading

शाम भागवत's picture

4 Jul 2024 - 3:55 am | शाम भागवत

सहमत आहे.
बुल रन मध्ये चुका दुरूस्त करायला वाव मिळू शकतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण नुकसानीपेक्षा जास्त असू शकते. तसेच चुका दुरूस्त करायला फारसा कालावधी लागत नाही.

मात्र साईडवेजमध्ये चुका दुरूस्त करायला वेळ लागतो. त्यामुळे पेशन्स असलेली माणसे नफा मिळवू शकतात.

मंदीमधे झालेल्या चुका वर्षानुवर्षे दुरूस्त करता येत नाहीत. पेशन्स बरोबरच नविन भांडवलाची उपलब्धता असलेला नफा मिळवू शकतो. बाकीच्यांना वाट पाहाणे किंवा. नुकसान सोसून बाहेर पडणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात.

कंजूस's picture

2 Jul 2024 - 5:34 pm | कंजूस

बरं चाललंय एकूण.
यातून अजून टॅक्स जाईल ना. कुणाला लॉस झाल्यास काय वजावट मिळेल? कारण हा धंधा म्हणून धरत नाहीत असं समजून आहे.

आयकर फॉर्म ३ भरून धंदा दाखवता येतो. इतर खर्चही दाखवता येतात.

पॅट्रीक जेड's picture

2 Jul 2024 - 5:35 pm | पॅट्रीक जेड

छान. शुभेच्छा.

कपिलमुनी's picture

3 Jul 2024 - 10:46 am | कपिलमुनी

शुभेच्छा

बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत नसल्याने एकूण शेअर बाजाराबद्दलचे सर्वच लेख डोक्यावरून जातात. अगदी तोंडओळख किंवा प्राथमिक माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेत असे वाटणारे लेख देखील सामान्य वाचकाला निम्म्याहून अधिक संकल्पना माहीत असतात असे गृहीत धरून धडाधड तांत्रिक शब्द टाकत जातात.

म्हणजे एखाद्या वैद्यकीय विषयाची सामान्य लोकांना प्राथमिक माहिती देताना एखाद्या डॉक्टरने अँटेरियर, पोस्टेरियर, इन्फेरीयर आस्पेक्ट ऑफ सुप्राक्लॅव्हिक्युलर नोड्स, PTCA फॉर CAD वगैरे.. वगैरे.. शब्द लीलया फेकावे तसे.

पॅट्रीक जेड's picture

3 Jul 2024 - 7:40 pm | पॅट्रीक जेड

अगदी अगदी, नेकेडा ऑप्शन, कव्हर्ड ऑप्शन्स काय आहेत हे वरून गेलं.

आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी त्यांचे ज्ञान दिसते इतकेच. एकमेकांत हाय काँटेक्स्ट चर्चा चालू असली की बघणारी पब्लिक अचंबित होऊन "वॉव" याखेरीज काही म्हणू शकत नाही.

खालील संज्ञा / शब्द हे अगदी सामान्य ज्ञान असेल तर मात्र माझे वरील प्रतिसाद रद्द समजावे.

...
इंडेक्स ऑप्शन्स् विक्री
पुट कॉल
ऑप्शन स्प्रेड
स्टॉप लॉस,
नेकेड ऑप्शन

शिवाय खालील वाक्यांनी अधिकच डगमग होते मनात:

ज्याचा त्याचा वकूब असतो. परमेश्वराची कृपाही असावी लागते.

पॅट्रीक जेड's picture

3 Jul 2024 - 8:55 pm | पॅट्रीक जेड

आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी त्यांचे ज्ञान दिसते इतकेच. एकमेकांत हाय काँटेक्स्ट चर्चा चालू असली की बघणारी पब्लिक अचंबित होऊन "वॉव" याखेरीज काही म्हणू शकत नाही.


१००० टक्के सहमत. काय चाललंय हे पाहून “वाव” लोक किती हुशार असतात नी आपण काय करतोय असा प्रश्न पडला.
शेवटी शुभेच्छा लिहून कलटी मारली.

यावर भरपूर माहिती उपलब्ध आहे , सोपी आणि किचकट होणारी दोन्ही
https://www.optionseducation.org/optionsoverview/what-is-an-option

धागाकर्ते आणि मला दोघांनाही यात रस आहे आणि थोडी माहिती आणि अनुभव म्हणून चर्चा केली ,,, त्यात हरकत घेण्यासारखे काय आहे कोण जाणे ?
तुम्ही "वॉव"म्हणून नाही .. काय वाटेल ते काढताय !

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2024 - 2:01 am | प्रसाद गोडबोले

गवि सर,

काही सर्वसाधारण लोकांना समजतील अशी उदाहरणे देऊ का ?

कॉल ऑप्शन :
समजा तुमच्याकडे शेती आहे, हे बख्खळ २०-२५ एकर . अन तुम्ही घेताय उस . आता हाय का, एवढा उस घेतला अन उसाचा दरच पडला तर काय करणार ?
मग एक शेतकरी म्हणुन तुम्ही म्हणु शकता - २५०० रेट ने घेणार असेल तर मी उस विकायला तयार आहे . हा झाला कॉल ऑप्शन. इथे शेतकरी कॉल ऑप्शन सेलर आहे. आता समजा कोणी कारखान दाराने विकत घेतला तुमच्याकडुन हा कॉल ओप्शन तर तो बायर झाला . तो तुम्हाला कॉल ऑप्शन ची किंमत अ‍ॅडव्हान्स पेमेंट देईल. आता समजा उसाला २५०० च्या वर दर मिळाला तर ऑप्शन इन द मनी क्लोज झाला असे म्हणतात , आणि त्या परिस्थितीत शेतकर्‍याला झक मारत २५०० रुपायाने विकावे लागेल. पण समजा २५०० च्या खाली दर मिळाला, तर त्याला ऑट ऑफ द मनी म्हणातात, आणि तेव्हा कारखानदाराकडे ऑप्शन एक्सरसाईझ न करण्याचा पर्यात अर्थात ऑप्शन असेल. (२५००पेक्षा स्वस्त मार्केट मध्ये मिळत असल्यावर तो तुमच्याकडून कशाला महागातला उस विकत घेईल. )

पुट ऑप्शन :
पण ह्यात रिस्क कारखानदारालादेखील आहेच ना. समजा उस दर २५०० च्या कैक पटीने वर गेला तर त्याचे सगळे प्रॉफिट मार्जिन गडबडाणार आहे . त्यामुळे कारखान्दार म्हणु शकतो - की कोणी २५०० ला उस विकायला तयार असेल तर मी व्हिकत घ्यायला तयार आहे, असे कॉन्त्रॅक्ट करुन द्यायला तयार आहे. हा झाला पुट ऑप्शन . आणि कारखान्दार झाला पुट ऑप्शनचा विक्रेता. आता शेतकरी हा ऑप्शन विकत घेऊ शकतो काही प्राईस पे करुन . आता समजा उसाला मार्केट २५०० पेक्षा कमी भाव मिळाला तरीही शेतकरी २५०० ह्या भावाने कारखानदाराला माल विकेल, अन कारखानदाराला झक मारत विकत घ्यावा लागेल. अन हेच २५०० पेक्षा जास्त भाव निघाला तर शेतकरी ऑप्शन एक्स्रसाईझ च करणार नाही, वाढीव भावाने मार्केट मध्ये विकेल !!

आता विचार करा की एकदा ऑप्शन विकत घेतला की तो विकत घेणारा निश्चिंत आहे कारण त्याला फक्त नाममात्र ऑप्शन प्रिमियम भरुन आपली भविष्यातील खरेदी /विक्रीची किंमत ठरवलेली आहे . तसेच ऑप्शन विकणारा ही खुष आहे कारण त्याने व्यवस्थित विचार करुन असाच ऑप्शन विकला आहे की जो इन द मनी होणारच नाही! होण्याची प्रोबॅबिलिटी मोजुन मापुनच विकले आहे ते. अर्थात त्याला १ स्क्वेयर फुट जमीन न घेता, शेती न करता केवळ "सुनियोजित रिस्क घेऊन" शेतीतुन पैसे कमवता येणार आहेत !!

बाकी जास्त लिहित नाही कारण ते उगाच जार्गन होईल. पण वरील एका कन्सेप्ट मुळे मार्केट किती प्रचंड इफिशियंट होईल ह्याचा विचार करा !

आता शेवटी प्रश्न राहतो की

ह्या ऑप्शनची , ह्या कॉन्ट्रॅक्टची किंमत कशी ठरवणार ?

तर हे आहे The Trillion Dollar Equation

trillion

https://www.youtube.com/watch?v=A5w-dEgIU1M&t=35s

cp

रिटायर झाल्यावर कधीतरी निवांतपणे ह्याविषयावर सविस्तर लिहावे असा विचार आहे . बघु कसा योग येतो ते. :)

शाम भागवत's picture

4 Jul 2024 - 3:43 am | शाम भागवत

अतिशय चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे. शेतकरी व कारखानदार दोघही आपली धंद्यातली जोखीम कशी कमी करतात ते लक्षात येते. धंद्यातली जोखीम कमी करणे ह्या हेतूनेच या प्रकारांचा जन्म झाला आहे.
मात्र मी कारखानदारही नाही. शेतकरीही नाही. जमीन नाही व उसही नाही तेंव्हा त्याला सट्टा म्हणतात.

ऑप्शन हे एक साधन आहे , सट्टा म्हणून हि वापरू शकता किंवा विमा म्हणून हि
( तरी सट्टा आणि ट्रेडिंग यात एक सूक्ष्म फरक आहे .. घोडयावर तो जिंकावा म्हणून पैसे लावने आणि बेटफेयर सारखया एक्सचेन्ज वर "ट्रेडिंग" करने यात जो फरक आहे तोच " तो एक वेगळा विषय आहे )

समजा तुमच्या कडे टाटा चे समभाग आहेत आणि ते दीर्घकाळ तुम्हाला ठेव्यायचे आहेत पण मध्येच ते खूप खाली जाण्याची शक्यता आहे तर तेव्हा तुम्ही पुट ऑप्शन विमा म्हणून विकत घेऊ शकता ... याला मॅरीड पुट असे म्हणतात
ऑप्शन चा वपर इतकया विविध प्रकारे करता येतो कि लोक त्या विषयात डॉक्टरेट पण करू शकतील

असो आयुष्य हेच सट्टा आहे ...

पॅट्रीक जेड's picture

4 Jul 2024 - 9:32 am | पॅट्रीक जेड

असो आयुष्य हेच सट्टा आहे ... दवनीय.

प्रगो.. फार उत्तम समजावले. धन्यवाद. याला म्हणतात सर्वांसाठी ज्ञान.

इथे एक शंका आली. केवळ सुनियोजित ऑप्शन विकून शेती नसताना कमाई कशी करणार. ऊस प्रत्यक्षात विकायची वेळ आली की तो द्यावा लागणार ना? अशी वेळ शंभर टक्के येणार नाही असे कसे गृहीत धरता येईल ? अशा वेळी केवळ हवेत ऑप्शन विकून प्रत्यक्षात ऊस अस्तित्वात नाहीच असे झाले तर शेतकऱ्याला काहीच liability नाही का?

की हा प्रश्न अडाणीपणाचा आहे?

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2024 - 11:42 am | प्रसाद गोडबोले

हा प्रश्न अडाणीपणाचा आहे?

नाही नाही , मुळीच अडाणीपणाचा नाही हा प्रश्न. बहुतेक शिकागो स्टॉक एक्चेंजला असा प्रकार आधी घडला आहे फार पुर्वी १८६०-६५ मध्ये. कोणीतरी कॅटल ट्रेड अर्थात बीफ साठीचा फॉरवर्ड ट्रेड केलेला होता ( अर्थात भविष्यात मी अमुक अमुक इतक्या गायी विकत घेईन ) आणि शेवटच्या दिवशी त्याला एवढ्या सगळ्या गायी घेऊन घरी जावे लागले होते =))))
ह्याला फिजिकल सेटलमेंट म्हणातात, आता शक्यतो ते होतच नाही, आता कॅश सेटलमेंट होते अर्थात ऑप्शन इन द मनी असल्यास त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरवलेल्या आणि खर्‍या किमती मधील फरक एवढेच पैसे एक पार्टी दुसट्या पार्टीला ट्रान्स्फर करते बस्स. आणि ऑप्शन आऊट ऑफ द मनी असल्यास विषयच येत नाही.

आता तुम्ही जी शक्यता वर्तवलीत ते होऊच शकते.

मी जी उदाहरणे दिलेली आहेत त्या ऑशन ट्रेड ला नेकेड ऑप्शन म्हणतात , अर्थात त्यामध्ये तुम्ही म्हणता ती रिस्क राहतेच. म्हणुनच कव्हर्ड ऑप्शन ची कन्सेप्ट आहे. तुम्ही जो ऑप्शन विकता त्याचाच विरुध्द ऑप्शन अजुन जास्त डीप साईड ने विकत घेऊन ठेवता !

अर्थात तुम्ही २५०० रुपये ने १०० टन उस विकेन असा ऑप्शन विकला असेल आणी समजा उस २६०० -२७०० असा वर गेला तर तुमचे नुकसान होणार आहे म्हणुन आधीच २५५० रुपये रेट ने मी १०० टन उस विकत घेईन असा ऑप्शन विकत घेऊन ठेवायचा ! त्यामुळे नेहमीच मर्यादित नुकसान होईल.

आणि तसेही आता अ‍ॅक्च्यल डीलीव्हरी द्यायची वेळ येतच नाही. कारण ते कोणालाच कंन्व्हिनियंट नसते . फिजिकल सेटलमेंट कदाचित फक्त काही अत्यल्प कमोडिटी ऑप्शन मध्ये तेही केवळ ऑव्हर द काऊंटर अर्थात आपले आपण केलेल्या ट्रेड मध्ये होत असावी असा माझा अंदाज आहे. शेयर मार्केट मध्ये कधीच होत नाही. अर्थात एवढा उस अस्तित्वात नाहीयेच ! हा केवळ सट्टा आहे.

अहो उसाचे, कमोडीटीज चे किंवा शेयर्सचे , इंडेक्सचे सोडा , आता तर वेदर ऑप्शन अ‍ॅन्ड फ्युचर्स पण असतात , अर्थात पाऊस पडणार की नाही ह्यावर तुम्ही बेट घेऊ शकता !!

माझा आवडाता बेट म्हणजे निर्मला मामी अन पॉवेल तात्या इंट्रेस्ट रेट कितीने वाढवणार की कमी करणार हा आहे ;)

आणि महत्वाचे म्हणजे हे सर्वांसाठी ज्ञान नाही. हे म्हणजे सुंदर क्यूट फिश बाऊल मधील गोल्डफिश दाखवल्या सारखे आहे, बाकी फायनान्शियल मार्केट हे समुद्रासारखे आहे , त्यात शार्क आहे, ओर्का आहेत , सी वॉट्र क्रोकोडाईल आहेत , विषारी जेली फिश आहेत ... अजुन खुप खुप मजा आहे . =))))
आम्ही आधी ब्लु व्हेल मध्ये काम केले आहे , तुर्तास हम्पबॅक व्हेल साठी काम करत आहोत ;)

इत्यलम.

गवि's picture

4 Jul 2024 - 12:03 pm | गवि

अत्यंत रोचक.

म्हणजे सट्टा हे यातील अनेक व्यवहारांचे सत्य आहे. त्यामागे काही value creation नाही. केवळ अंदाजाचा खेळ आहे. माझी शंका खरी ठरली. कोणत्याही value creation involved नसलेल्या गोष्टीतून रोज किंवा सतत पोजिटीव्ह उत्पन्न किंवा इव्हन कधी तोटा पण बऱ्याचदा फायदा असे होऊन दीर्घकालीन नेट लाभ होणे अशक्य आहे हे बेसिक तत्व आहे. आपण रोज खेळतो याचा आनंद म्हणून ते ठीक आहे. ॲमवेशी तुलना करण्याचा मोह झाला. किंवा सध्याचे क्रिप्टो.

गवि's picture

4 Jul 2024 - 12:07 pm | गवि

र च्या क ने.

तुम्ही उत्तम रित्या शिकवू शकता असे दिसते. पुढे कधीतरी कॉर्पोरेट , लाईफस्टाईल, हॅपिनेस, अर्थशास्त्र, गणित, तत्वज्ञान (कोणताही क्लिष्ट पण सोपा केल्यास रोचक होणारा) विषय यांचा कोच होण्याचा विचार केला आहे का?

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2024 - 2:48 pm | प्रसाद गोडबोले

Value addition म्हणजे दररोज वर खाली होणाऱ्या मार्केट मध्ये तुम्ही व्यवस्थित हेजिंग केले तर नुकसान मर्यादित ठेवता येते.
पण सट्टा म्हणून खेळणाऱ्या लोकांबाबत तुम्ही म्हणालात ते एकदम १००% सत्य आहे. माझ्या माहितीनुसार सेबी ने ह्यावर रक रिपोर्ट पब्लिष केलेला आहे ज्यात असे म्हणाले आहे की ऑप्शन खेळणाऱ्या लोकातील ९०% लोक नुकसानीत आहेत, आणि जे फायदा कमावतात त्यांचा फायदा त्यांनी घेतलेल्या रिस्कक्या तुलनेत अत्यल्प आहे.

बाकी कोच असे नाही पण मॉडर्न प्रवचनकार व्हायला नक्की आवडेल. फायनान्स , अध्यात्म, फिलॉसॉफी, इतिहास, संस्कृत वगैरे वगैरे सगळं एक करून एकदम परफेक्ट मिसळपाव :D आहे तो विचार मनात . बघू कधी योग येतो ते. :)

गणित आणि फिजिक्स घ्या त्यात. ते असलेच पाहिजे. सर्वांच्या मुळाशी तेच आहे.

बाकी हायड्रोजन ॲटम्स व्हेन गिव्हन इनफ टाईम, टर्न इन टू ह्युमन्स.. ;-)

गवि's picture

4 Jul 2024 - 3:26 pm | गवि

Value addition म्हणजे दररोज वर खाली होणाऱ्या मार्केट मध्ये तुम्ही व्यवस्थित हेजिंग केले तर नुकसान मर्यादित ठेवता येते.

Value addition म्हणजे तुम्ही त्यातून पैसे लावून श्रीकृपेने काही बँक बॅलन्स वाढवला अशा अर्थाची वाढ नव्हे.

Value creation अशी शब्दयोजना करताना उद्देश असा की यामध्ये या व्यवहारात ग्राउंड लेव्हलला कोणतीही प्रत्यक्ष भर पडत नाहीये. कोणीतरी तिसरा value क्रिएट करतोय किंवा करत नाहीये.. आणि इथे फक्त त्याचा अंदाज लावून एकमेकांत विशिष्ट संपत्तीचे फिरणे चालू आहे. कोणत्या जिलबीवर माशी बसेल, किंवा कोणता संघ जिंकेल, किंवा आज अंड्याचा भाव काय असेल या सर्व आपापत: घडणाऱ्या घटना वापरून एक शक्यता निर्माण होते त्यावर पैसे लावणे, यात फारसा गुणात्मक फरक जाणवला नाही.

कोणत्या जिलबी वर माशी बसेल याबद्दल माझा अभ्यास आहे. अमुकदास हलवायाची जिलबी मी बरोब्बर ओळखतो आणि माशीला ती जास्त आवडते. वगैरे अभ्यास त्यामागे असू शकतो. बाकी ट्रेण्ड आणि त्यातून पुढील तासा तासाचे अंदाज कोणत्याही random गोष्टीतून देखील प्रोजेक्ट करता येतात.

माझे आकलन चुकीचे देखील असू शकेल. दिसले ते असे भासले.

चौकस२१२'s picture

4 Jul 2024 - 5:55 pm | चौकस२१२

ह्याला फिजिकल सेटलमेंट म्हणातात, आता शक्यतो ते होतच नाही,
अनेक बाजारात होऊ शकते म् खनिज तेल , सिंगापोर एक्सचेंज नैसर्गिक रबर इत्यादी
सगळेच कंत्रात कसा शेततलेड असतात्तच असे नाही

All stock F&O contracts traded on Indian exchanges require compulsory delivery. If an individual holds an ITM stock option or a futures contract upon expiry, they must give or take delivery of the underlying stock². Conversely, OTM stock options are worthless upon expiry and do not impose any delivery obligation⁸. Index F&O contracts, on the other hand, are cash-settled.

असंका's picture

5 Jul 2024 - 5:30 am | असंका

+1...

कांदा लिंबू's picture

18 Jul 2024 - 10:57 am | कांदा लिंबू

प्रगो.. फार उत्तम समजावले. धन्यवाद. याला म्हणतात सर्वांसाठी ज्ञान.

१०८% सहमत!

प्रगो, जोरदार धन्स्!

---

अवांतर: एखादा विषय समजावून सांगण्याची हातोटी माझ्यात नाही आणि या धाग्याचा तो उद्देश्यही नाही.

---

सवांतर: @प्रगो, "नवशिक्यांसाठी शेअर बाजार" अशी एखादी लेखमाला काढावी अशी विनंती.

कांदा लिंबू's picture

18 Jul 2024 - 10:34 am | कांदा लिंबू

बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत नसल्याने एकूण शेअर बाजाराबद्दलचे सर्वच लेख डोक्यावरून जातात. अगदी तोंडओळख किंवा प्राथमिक माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेत असे वाटणारे लेख देखील सामान्य वाचकाला निम्म्याहून अधिक संकल्पना माहीत असतात असे गृहीत धरून धडाधड तांत्रिक शब्द टाकत जातात.

सर्वसाधारणपणे सहमत.

पण या धाग्याचा उद्देश्य "स्टॉक् मार्केट्ची ज्यांना कल्पना आहे त्यांच्याशी आपला अनुभव शेअर् करणे" असा होता. त्याअनुषंगाने झालेल्या चर्चेत काही जार्गन्स् इतरांना न समजणे हे स्वाभाविक आहे.

---

प्रतिसादाला अंमळ उशीर झाल्याबद्धल खेद.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2024 - 10:02 pm | मुक्त विहारि

अभिनंदन...

शाम भागवत's picture

4 Jul 2024 - 4:02 am | शाम भागवत

अभिनंदन.
मला फक्त रोखीत शेअरची खरेदी विक्री करणे जमते.
हातात पैसे असतील तर सगळे पैसे देऊन खरेदी करायची आणि खात्यात शेअर्स असतील तरच विकायचे ह्या सोप्या नियमांवर अवलंबून रहायला आवडते.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे इश्वरकृपा लागतेच. किंबहुना तीच महत्वाची.
_/\_

टर्मीनेटर's picture

4 Jul 2024 - 1:24 pm | टर्मीनेटर

"लाखात एखाद्याच्या नशिबात जुगारात दिर्घकाळ यशस्वी होण्याचा योग असतो"असे म्हणतात.
लेख वाचल्यावर आपण (त्या) 'लाखातले एक' असल्याचे जाणवले. त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्यावर श्री तिरुपती बालाजीची कृपा अशीच कायम राहो! तसेच आपल्या ह्या यशाला/नशिबाला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून "आपल्या आयडीत असलेल्या 'लिंबाच्या' खाली एक लहानसा 'कोळसा' आणि वर सात हिरव्यागार 'मिरच्या' काळ्या दोऱ्यात किंवा तारेत ओवून कुठेतरी टांगावे" असा एक आगंतुक सल्ला 😀
('आगंतुक सल्ला' ह. घ्या. हे. वे. सां. न.)

@ 'शाम भागवत' आणि 'चौकस२१२'

"तेंव्हा त्याला सट्टा म्हणतात."
---
"ऑप्शन हे एक साधन आहे , सट्टा म्हणून हि वापरू शकता किंवा 'विमा' म्हणून हि"

+१०००

इक्विटी मधली गुंतवणूक आणि त्यावर आधारित खरेदी विक्रीतुन होणारा नफा-तोटा हा 'व्यापाराचा' भाग झाला, पण अशा प्रकारच्या वायदेबाजारातील 'बेटींग'लाच (गावरान-रांगड्या भाषेत मटका/जुगार, आणि मवाळ-सभ्य भाषेत) 'सट्टा' म्हणतात!

"जगात कुठल्याही गोष्टींपासून होणाऱ्या नफा-नुकसान किंवा आबादी-बरबादीला एक मर्यादा असते, परंतु 'वेश्यागमनाचा छंद/ सवय' आणि 'जुगाराचा नाद/व्यसन' ह्या दोन गोष्टी त्याला अपवाद आहेत. त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसान/बरबादीला कोणतीही मर्यादा नसल्याने आयुष्यातून उठवू शकण्याची क्षमता असलेल्या ह्या दोन गोष्टींच्या वाटेला चुकूनही जाऊ नकोस."

अशा आशयाचे संस्कार 'योग्य' संस्कारक्षम वयात आल्यापासून घरातून मिळाले आहेत. त्यापैकी पहिल्या गोष्टीचे आजतागायत कसोशीने पालन केले आहे पण दुसऱ्या, म्हणजे 'जुगार' ह्या गोष्टीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने पर्यटनानिमित्त भेटी दिलेल्या देशी-विदेशी कॅसिनोंमध्ये (अर्थात खास जुगार खेळण्यासाठी म्हणून अद्याप एक छदामही खिशातून खर्च केला नाही आणि कधी करणारही नाही, पण) प्रवेश शुल्कातच मिळणाऱ्या 'प्रोत्साहनपर' चिप्स वापरून जुगार खेळण्याचे जे दोन्ही हातांच्या बोटांवर मोजले तरी एक-दोन बोटे शिल्लक राहतील इतके मर्यादित प्रसंग आले त्यांचे 'बुक' बघितले तर त्यात फायदाच झालेला दिसतोय, पण शेअरबाजारात अपरिपक्वतेतुन केलेल्या बेफाम सट्टेबाजीतून खूप मोठे आर्थिक नुकसान सोसल्याच्या स्वानुभवावरून त्या वाटेला चुकूनही जाऊ नये असे माझे वैयक्तिक मत बनले आहे.

मानवाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे 'आर्थिक समस्या', 'मानसिक समस्या' आणि 'शारीरिक समस्या' हे वर्गीकरण आणि ह्या तिन्हींचा एकमेकांशी असलेला परस्परसंबंध विचारात घेता त्यांच्या गंभीरतेचे कमी-अधिक प्रमाणही व्यक्तिसापेक्ष असते ह्याविषयी दुमत नाही. सकारात्मक मानसिकता असल्यास अशा व्यवहारांतून झालेले आर्थिक नुकसान भविष्यात अन्य मार्गांनी भरूनही काढता येते, पण अशा नुकसानीची हाय खाऊन मनःस्थिती बिघडल्यास आर्थिक समस्येच्या सोबतीला मानसिक समस्याही हजेरी लावते आणि बिघडलेल्या मानसिकतेतून शारीरिक व्याधी/समस्याही उद्भवल्यास प्रकरण हाताबाहेर गेल्याने कित्येक व्यक्ती आयुष्यातून उठल्याची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती हालाखीची झाल्याची उदाहरणे समाजात कमी नाहीत.

अर्थात असे लाखात एखाद्याचे असते तसे नशीब, ऋषी-मुनी-साधू-संत-तपस्वींच्या तोडीचा संयम/स्वनियंत्रण, नुकसान सहन करण्याची क्षमता आणि दैवाचे फासे उलटे पडण्यातून कठीण प्रसंग उद्भवल्यास त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी लागणारी कणखर मानसिकता आणि कौटुंबिक पाठबळ ज्याच्या पाठीशी असेल त्याने 'कुठे थांबावे' ह्याचे तारतम्य राखून असे मार्ग चोखाळण्यास काही हरकत नाही.

जाता जाता एक किस्सा: मागे मी एका सब-ब्रोकिंग फर्ममध्ये 'सायलेंट पार्टनर' होतो त्यावेळी रोज बोल्टवर जायला जमायचे नाही पण औद्योगिक वसाहतीतील ग्राहक कंपन्यांचा सुट्टीचा दिवस असलेल्या शुक्रवारी फावला वेळ मिळायचा तेव्हा उपस्थिती नोंदवायचो. त्यावेळी तिथे स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आणि सेवाकाळ पूर्ण करून निवृत्त झालेले अनेक 'काका' लोक असायचे. त्यातली फ्युचर ऑप्शन्स, कॉल, पुट आदी व्यवहार करणारी बहुतांश मंडळी कुठल्या कुठल्या वेबसाईट्स वरून प्रिंटआउट काढून आणलेले चार्ट्स, वैयक्तिक डायरीतील नोंदी, अर्थविषयक वृत्तपत्रे-मासिके, 'भाव कॉपी' वगैरे फडफडवत चर्चा करत बसायची. एक शांत पण मिश्किल स्वभावाचे 'काका' मात्र त्याला अपवाद होते.

निवृत्त होईपर्यंत कित्येक वर्षे केवळ दीर्घ कालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने शेअर्स खरेदी करण्यातून तयार झालेल्या त्यांच्या तगड्या 'पोर्टफोलिओ'च्या आधारावर इंट्राडे ट्रेडिंग करून ते रोज 'हँडसम' नफा मिळवत. त्यांच्यामते उपरोल्लिखित अभ्यासू 'चार्टीस्ट' मंडळी काय आणि 'मेन', 'जनता', 'कल्याण', 'वरळी' वगैरे मटक्याच्या बाजारांच्या चार्ट्सचा अभ्यास करून ओपन-क्लोजचे 'आकडे' आणि 'पाने' काढणारी मंडळी काय, आणि रेसकोर्सवर 'कोल्स'चा अभ्यास करून 'घोडे' ठरवणारी मंडळी काय, सगळे एकाच दर्जाचे 'सट्टेबाज' 😂
खरंतर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते पण त्यावेळी 'सट्टेबाजीची' अशी काही हवा डोक्यात गेली होती कि त्यांच्यातला 'गुरु' ओळखेपर्यंत ह्या लेट लतीफ 'शिष्याचे' भरपूर नुकसान होणे हे विधिलिखित असावे!
असो...

"वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसी को नही मिलता" ह्या सत्यवाचनावर गाढ श्रद्धा असलेला...
- (श्रद्धाळू) टर्मीनेटर

दीर्घ कालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने शेअर्स खरेदी करण्यातून तयार झालेल्या त्यांच्या तगड्या 'पोर्टफोलिओ'च्या आधारावर इंट्राडे ट्रेडिंग करून

(श्रद्धाळू) टर्मीनेटर सहेब , हा विरोधाभास आहे ,,, कारण जर हे काका लांब पल्याचे गुंतवणूकदार होते तर ते इंट्राडे सारखा व्यापार का खेळतील?

कदाचित तुम्हाला असे म्हणायचे असेल कि वर्षूनवर्षे गुंतवणूक केलेल्या फायदयांतून थोडे पैसे अश्या इंटर डे ट्रेडिंग मध्ये "खेळायला " वापरायाचे

चौकस२१२'s picture

4 Jul 2024 - 5:26 pm | चौकस२१२

बरेच जण येथे म्हणत आहेत कि शेअर बाजार / सौदा बाजार ( फ्युचर आणि ऑप्शन ) सट्टा आहे,, हे जरी १००% चुकीचे नसेल तरी १००% सत्य हि नाही , आणि "आपण नाही त्यातले" अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी हा विचार कधी केलाय का कि तुमचे "पेन्शन फंड " किंवा विमा कंपन्या/ बँक तुमचच्या कडून घेतलेल्या पैशाचे काय करतात? ते बाजारात "गुंतवतात" आणि "खेळतात" पण ..

हा हे खरे कि फ्युचर मध्ये तश्या अर्थाने Value addition होत नाही पण
शेअर मध्ये होते, म्हणजे असे कि एखाद्या चांगळी कल्पना असणाऱ्या / समस्या सोडवणारा नवीन उद्योगात तुम्ही पैसे गुंतवता तेवहा समाजाला त्याचा काहीतरी फायदा ( आणि त्या मालकाला पण) होण्याची शक्यता असते आणि तुम्ही त्यात गुंतवत असता ... लांब पल्यासाठी
हि आयुधे ( टूल ) आहेत , तुम्ही कसे वापरताय त्यावर ती उपयोगी किंवा जुगारीची आयुधे होऊ शकतात
सरसकट सगळे जुगार हे म्हणणे एकांगी पणाचे होईल

असो यात सगळ्यांनाच रस असाल पाहिलेज असे नाही पण ज्यानं आहे त्यांनी चर्चा केली तर हरकत नसावी कोणाची!

केवळ माहिती म्हणून
इन्शुरन्स कंपनीय काय करतात ( किंवा लॉईड्स लंडन ची खाजगी सिंडिकेट ) ते जेवहा इन्शुरन्स विकतात तेव्हा हि जोखीम स्वीकरता आणि १०० जननाकडून प्रीमियम घेऊन २ जाणंच एखादा दावा करतील असा हिशोब असतो ( याचे पक्के गणित माहित नाही पण कल्पना अशी )

आता हीच कल्पना तुम्ही शेअर बाजारात शेअर + ऑप्शन मध्ये वापरून तुम्ही स्वतः इन्शुरन्स कंपनी बनू शकता कसे?

पूट ऑप्शन ची व्याख्या अशी आहे कि " पूट ऑप्शन जो विकत घेतो त्याला अमुक अमुक शेअर अमुक अमुक किमतीला अमुक तारखेपर्यंत दुसर्याला विकण्याचा "हक्क" मिळतो" येथे हे समजून घ्या कि "हक्क" आहे जबाबदारी नाही ,,,
या उलट जी व्यक्ती हा पुट विकतो त्याचं कडे हि "जबाबदारी " असते कि जर ऑप्शन "एक्सरसाईज " केला समोरच्याने तर तो त्याला ठरलेल्या किमतीला विकत घ्यावा लागतो
समजा एक शेअर १०० रु ला आहे आणि तुम्हाला असे वाटते कि अमुक तारखेपर्यंत (१ आठवडा धरू ) हा शेअर ०० च्या खाली जाणार नाही तर तुमि १०० या " वायदे किमतीचा " पुट बाजारात विकू शकता आणि त्यासाठी तुम्हला २ रुप्ये मिळतील ते तुमचे झाले ( त्यास्तही १०० रु तुम्हाला ब्रोकर/ एक्सचेंज कडे ठेवावे लागतील )
जर शेअर १०० च्या वरती राहिला तर हा ऑप्शन "विरून" जाईल आणि तुम्हाला तुमचे १०० परत मिळतील + २ प्रिनियम मिळालेला आहेच
१०० वर आठवड्याला २% फायदा , वार्षिक ५२ गुनिले २ = १०४%

या उलट
तर समजा शेअर ९० ला गेलला तर समोरचा तो पुट एक्सरसाईज करेल आणि तुम्हला १०० देऊन ते शेअर विकत घ्यावे लागतील
एकूण हिशोब काय तर तुमचा शेअर ची बाजरी किंमत ९५ , तुम्ही दिले -१०० आणि २ प्रिनियम मिळालेला = दिले ९८
एकूण तोटा ३ रु

असो

बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त राहून त्यातील तेजी आणि महामंदीची तीन आवर्तने( cycles) पाहून मी स्वतः या निष्कर्षाला आलो आहे कि

फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये सातत्याने नफा मिळवणे हि गोष्ट ९९% लोकांना अशक्य आहे.

जसे कॉलेजात असणारा एखादा फाटका मुलगा एखाद्या फाटकांद्यापोरीला पटवून जातो हे पाहून अनेक बऱ्या/ चान्गल्या मुलांचा जळफळाट होतो

तशीच स्थिती चढत्या बाजारात नफा मिळवणाऱ्या एखाद्याकडे पाहून खिशात चार पैसे बाळगणाऱ्या माणसांची होते. यामुळे ते इर्षेने या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारात हात घालतात. सुरुवातीला त्यांना चांगला नफा होतो सुद्धा. पण त्यामुळे आपल्याला हा बाजार "समजला" आहे या गैरसमजात ते इर्षेने खेळु लागतात आणि भारी नुकसान घेऊन बाहेर पडतात.

दर पाच वर्षांनी हाच प्रकार परत परत होताना मी पाहतो आहे.

मला बादल सिनेमा माहीम ची एक आठवण येते. तेथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी एक सीट रिकामी होती.

त्यामुळे आपली सीट सोडून कुणी तेथे येऊन बसला आणि मागे रेलला कि सीट उलटी होत असे आणि तो माणूस मागे पडत असे.

मग तो उठून गेला कि काही वेळाने परत दुसरा माणूस.

सिनेमा ऐवजी हाच प्रकार पाहून आमचे हसून हसून पोट दुखू लागले होते.

First law of thermodynamics सारखा First law of economics आहे तो म्हणजे

money can neither be created nor destroyed, only it changes pockets.

पॅट्रीक जेड's picture

5 Jul 2024 - 12:07 pm | पॅट्रीक जेड

प्रतिसाद आवडला.

इर्षेने खेळु लागतात आणि भारी नुकसान घेऊन बाहेर पडतात.
असे फसण्याचे अजून एक कारण म्हणजे , फुचर आणि ऑप्शन मध्ये अग्नगभूत "लिव्हरेज " असते ती दुधरी तलवार आहे ती नाही समजली तर एक दिवसात +१०० किंवा _१००% होऊ शकते ,,, ( यात फुचर मधेय साधारण १:५ लिव्हरेज मिळते , ऑप्शन मध्ये अजून एक घटक म्हणजे ( जो फुचर किंवा शेअर मध्ये नसतो तो म्हणजे जसा " वेळ" जातो ( टाइम व्हॅल्यू ) तशी
म्हणजे तुम्ही एखाद्या शेअर किंवा इंडेक्स किंवा शेतीमालावर बेतलेला ऑप्शन ) विकत घेतलात आणि जर त्याची मुदत संपेपर्यंत ते अंडरलायिंग जिथे आहे तिथेच राहिले तर त्या पोषण ची किंमत शून्य होते ( घटनारा / गळात जाणारा वेळ - टाइम डिके )

असो परत म्हणतो हे एक उत्तम आयुध आहे , समजून वापर केला तर फायदा होऊ शकतो ....
त्याचं वाटेला जाणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न जरी असला तरी या कालपेनल कोणी सरसकट धुडकावून देऊ नये हि विनंती ( तुमचे मुचुअल फंड हैच वपर करीत असतात तुम्हाला आवडो कि ना आवडो )

आग्या१९९०'s picture

5 Jul 2024 - 2:00 pm | आग्या१९९०

ऑप्शन मध्ये अजून एक घटक म्हणजे ( जो फुचर किंवा शेअर मध्ये नसतो तो म्हणजे जसा " वेळ" जातो ( टाइम व्हॅल्यू ) तशी
म्हणजे तुम्ही एखाद्या शेअर किंवा इंडेक्स किंवा शेतीमालावर बेतलेला ऑप्शन ) विकत घेतलात आणि जर त्याची मुदत संपेपर्यंत ते अंडरलायिंग जिथे आहे तिथेच राहिले तर त्या पोषण ची किंमत शून्य होते ( घटनारा / गळात जाणारा वेळ - टाइम डिके )

अंडरलाईनच्या स्पॉट प्राइसपेक्षा फ्युचर प्राइस प्रीमियम किंवा डिस्काउंट असल्यास एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याचदा फ्युचर आणि स्पॉट प्राइस समान होतात, अशावेळी अंडरलाईन प्राईस स्थिर राहिल्यास फ्युचर विकत घेतल्यास किंवा विकल्यास नफ्यातोट्यावर परिणाम होऊ शकतो टाईम डिके सारखा.

एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याचदा फ्युचर आणि स्पॉट प्राइस समान होतात,
हो होणारच .... हे गृहीतच आहे

कांदा लिंबू's picture

18 Jul 2024 - 11:01 am | कांदा लिंबू

फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये सातत्याने नफा मिळवणे हि गोष्ट ९९% लोकांना अशक्य आहे.

UPSC परीक्षेतून अधिकारी होणे ही गोष्ट ९९% परीक्षार्थींना अशक्य आहे.*

*नेमक्या आकड्याबद्धल चूभूदेघे.

समांतर उदाहरण देणे म्हणजे मूळ विधान मान्य करणे असे होते.

इथे सूक्ष्म फरक आहे.

UPSC परीक्षेतून अधिकारी होणे ही गोष्ट ९९% परीक्षार्थींना अशक्य आहे.*

इथे लाँग टर्म नेट आणि रेग्युलर आऊटकमचा विषय नाही.

म्हणजे दर वर्षी UPSC परीक्षा देत राहिले की कधी सिलेक्ट व्हाल (१) किंवा कधी कधी नाही (०)

पण अधिक वेळा नियमित आऊटकम १ असेल आणि दीर्घकाळ सातत्य ठेवल्यास एकूण लाँग टर्म मध्ये ० पेक्षा १ च जास्त असतील असा दावा UPSC बाबत नसावा.

जिंकण्याची शक्यता १ टक्का आणि हरण्याची शक्यता ९९ टक्के असलेला कोणताही खेळ (ते सोडा, ५० ५० टक्के असलेला खेळ देखील) दरमहा*, नियमित, आणि दीर्घकाळापर्यंत मोजल्यास पॉझिटिव्ह परतावा, देत राहू शकतो हा दावा फार वजनदार वाटत नाही इतकेच. (तिन्ही ठळक पॉइंट एकत्र महत्वाचे)

*दरमहा म्हणजे एखाद्या महिन्यात लॉस, मग फायदा, पण सातत्याने पाहिल्यास जमेची बाजू जास्त असे मानू.

हे सर्व केवळ इथे प्र गो आणि आंद्रे यांनी केलेले फ्युचर ऑप्शन्स बद्दलचे विवरण गृहीत धरून झालेले मत आहे

-स्टाटिस्टिक प्रेमी गवि

कांदा लिंबू's picture

18 Jul 2024 - 4:00 pm | कांदा लिंबू

समांतर उदाहरण देणे म्हणजे मूळ विधान मान्य करणे असे होते.

सांख्यिक विवेचन मान्य आहे.

---

  1. UPSC परीक्षेत शेकडा ०.०००१३८ जण यशस्वी होतात = नोकरीला लागतात.
  2. ऑप्शन्स् ट्रेडिंग् मध्ये शेकडा दहाजण यशस्वी होतात = पैसे कमावतात.

असे असताना -

  1. ऑप्शन्स् ट्रेडिंग् च्या नादाला लागू नको, बरबाद होशील.
  2. UPSC परीक्षेच्या नादाला लागू नको, बरबाद होशील.

या सल्ल्यांमध्ये काही व्यावहारिक फरक आहे का?

---

तरीही, मी धाग्यात सांगितल्याप्रमाणे,

मी व्यावसायिक व हौशी गुंतवणूक सल्लागार नाही, त्यासंबंधित विकत व फुकट असे कोणतेही उत्पादन, सेवा वा प्रशिक्षण देत नाही.

मी केवळ माझा तुटपुंजा अनुभव इथे शेअर करत आहे.

बाकी ज्याची त्याची मर्जी.

---

मिपाकरांनो, चुकूनही ऑप्शन्स् ट्रेडिंग् / स्टॉक मार्केट च्या नादाला लागू नका, बरबाद व्हाल.

ऑप्शन्स् ट्रेडिंग् मध्ये शेकडा दहाजण यशस्वी होतात = पैसे कमावतात.

असे प्रमाण नक्की पडत असेल तर मग सर्वच चर्चा कामकाजातून वगळावी. जर एखादी "सिस्टीम बाय डिझाईन" सातत्याने वाढता आलेख असणारा फायदा देऊ शकत असेल तर मग काहीच आक्षेप नसावा. दहा जण जे करू शकतात ते पोटेन्शियली पन्नास जण पण करू शकतात. जर या स्कीममध्ये महिना १ ते महिना ३६ (उदा) उत्पन्नाचा आलेख थोडा वरखाली पण दिशा चढ दाखवत वाढत जाणारी असेल तर फारच उत्तम मार्ग आहे.

आंद्रे वडापाव's picture

18 Jul 2024 - 8:30 am | आंद्रे वडापाव

ऑप्शन ट्रेडिंग मधे सर्वसामान्यांनी पैसे गमावू नये म्हणून, (किँवा जे फंड मॅनेजर नाहीत, ज्यांचा पोर्टफोलिओ किरकोळ स्वरूपाचा आहे) अश्यानी ऑप्शन ट्रेडिंग मधे ( जंगली रमी, ड्रीम एलेवन) प्रमाणे पैसे "लावू" नये म्हणून...
फी वाढवणे, लोट साइज् मोठा करणं, अश्या गोष्टी सेबि करणार आहेः असे ऐकिवात आहे...
(डिलिव्हरी बेस्ड किरकोळ गुंतवणूकारांसाठी या गोष्टी लागू नाहीत)...

आजचे गाणे: हे हे हे हे हे हे हे हे हे
तदबीर से बिगड़ी हुई, तकदीर बना ले
तकदीर बना ले
अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले
लगा ले दाँव लगा ले...

se

Sebi to tighten F&O rules, contract value may rise 5x

प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडतंय! आधी निफ्टी चा लॉट ५० चा होता परवा २५ चा केला.

अश्या प्रकारच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आपण चिमूटभर मीठ घालून चाखायला हव्यात.

ही चार वर्षांपूर्वीची बातमी पहा.

Sebi considers short selling ban, trading curbs to reduce market volatility

प्रत्यक्षात यातलं अजून काय झालंय?

---

अवांतर: "मोठे मासे लहान माशांना खातात" किंवा वेगळ्या शब्दांत "Eat or be eaten" या नियमाला स्टॉक् मार्केट् कसे अपवाद असेल?

---

सवांतर: ऑप्शन्स् ट्रेडिंग् ला कुणी सट्टा म्हणेल, जुगार म्हणेल, जोखीम म्हणेल, संधी म्हणेल, उद्योग म्हणेल, कुणी अजून काही म्हणेल; त्यांचं म्हणणं त्यांच्यापाशी. तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे पैसा मिळवत असाल तर कोण काय म्हणतं हे गैरलागू आहे.

- हे विधान कोणत्याही कामाला लागू आहे.
- मतभिन्नतेचा आदर वगैरे देखील लागू आहे

तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे पैसा मिळवत असाल तर कोण काय म्हणतं हे गैरलागू आहे.

अगदी मान्य.

पण जुगार सट्टा आणि उद्योग या वेगळ्या गोष्टी.
जुगार हा मनोरंजक खेळ.

उद्योग म्हणजे ज्याचा उद्देश वस्तू किंवा सेवा यांच्या निर्मिती द्वारे नवीन value निर्माण करणे.

हां.. सट्टा जुगार बेटिंग घेणे याचा अड्डा, स्लॉट मशीन लावून धंदा असे काही करत असल्यास एक उद्योग म्हणता येईल. कायदेशीर बद्दल माहीत नाही.

पण जुगारात पैसे लावणे हा उद्योग होऊ शकेल याबद्दल तीव्र शंका.

कांदा लिंबू's picture

18 Jul 2024 - 10:28 am | कांदा लिंबू

पण जुगारात पैसे लावणे हा उद्योग होऊ शकेल याबद्दल तीव्र शंका.

मी इथे स्पेसिफिकली स्टॉक् मार्केट् / ऑप्शन्स् ट्रेडिंग् यांबद्धल बोलतोय. बाकी मटका / लॉटरी / सट्टा / रेस / पत्ते / कॅसिनो यांबद्धल नाही.

चौकस२१२'s picture

19 Jul 2024 - 5:22 am | चौकस२१२

"जुगार हा धंदा होऊ शकतो"
याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोडे / खेळ यावर बरेच दशके फक्त घोडा/ खेळाडू जिकेलं या एकाच प्रकारे मागे पैसे बुकी कडे ( ज्या देशात कायदेशीर आहे त्या बद्दल बोलत आहे ) लावता यायचे = जुगार,
बेटफैर सारखे "बेटिंग एक्सचेंज" सुरु झाले स्टोक एक्सचेंग सारखेच त्यामुळं दोन्ही बाजूने पैसे लावून "ट्रेडिंग " शक्य झाले = "उलाढालीचा धंदा करणे शकय झाले मग तो घोडा असो कि क्रिकेट चा संघ "
अ जिकणार याचा बाजार चालू आहे १:३
त्याला आपण त्याला बॅक केले १० देऊन ३० एकूण परत मिळण्याची शक्यता निर्माण होते
थोड्या वेळाने अ जिकंत आहे असे वाटले तर त्याचा "बाजारभाव" १:२ झाला ( शक्यता वाढली ) तर बाजारात ती बँक बेट बंद करून नफा होऊ शकतो
ढोका तर आहेच , शेअर सारखेच
हे करावे कि नाही, कि फक्त वस्तू आणि सेवा देणाऱ्या उद्योगातच उलाढाल किंवा गुंतवणूक करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी लीगल बेटिंग एक्सचेंज यावर जरूर महती शोधावी
( अप्लाय देशात आशय गोष्टीत भाग घेणे बेकायदेशीर असले तर त्या वाटेल जाऊ नये )

याशिवाय कायदेशीर रित्या कॅसिनो वगैरे खेळ मांडणे हा तर उद्योग आहेच पण आपण त्या बद्दल चर्चा करीत नाही आहोत ,

सुबोध खरे's picture

19 Jul 2024 - 10:11 am | सुबोध खरे

markets regulator Sebi showed that the futures and options (F&O) trading was a loss-making proposition for investors.The report revealed that 89% investors lost money through these activities, and only 11% made profits.

If you study the Sebi report in detail, you will find that about half of those who make money earn trivial profits of a few thousand rupees in a year. They would have earned more even with a bank fixed deposit.

The craziest part of this story is that no one in the industry mentions one simple fact: unlike equity, which is backed by the open-ended growth of the economy, F&O is a zero-sum game. Whenever someone earns a profit, it comes out of another trader’s pocket.

So, if all the losses are someone else’s profits, who is pocketing all the money that the ordinary investors are losing? Take a guess

It’s clear that the brokers, exchanges, and those lending stocks profit from this activity,

As a reader of this publication, you are almost certainly an individual investor who is interested in making money from investments.
However, you should understand that this activity is not designed for you to make money. Instead, it's designed, managed and run to take your money away.

All the talk about derivatives being beneficial for one reason or another is just propaganda.

Avoiding this potentially harmful activity might be the best choice for individuals, as it seldom brings any benefits. The facts speak for themselves: with a vast majority of individual traders reaping minimal, if any, benefits from F&O trading, one must ask if it is worth the gamble.

Wisdom lies in taking a step back, analysing the facts, and making informed decisions, in order to safeguard your financial future. As the saying goes, ‘It’s not about how much money you make, but how much you keep.’

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/wealth/invest/individual-investors-...

चौकस२१२'s picture

19 Jul 2024 - 1:53 pm | चौकस२१२

F&O is a zero-sum game.
खरे आहे , मान्य
म्हणून रिटेल सर्वसामान्यानाने याचा अजिबात उपयोग करूच नये? हे एकांगी होईल

हे "डेरिव्हेटीव्ह " का निर्माण झाले हे समजून घेतले तर एकांगी विचार रहाणार नाही

शेतीमाल आणि इतर उत्पादने जी एकसारखी ( कॉमोडिटी) झालेली असते त्यांचच्या उत्पादकांना विमा म्हणून फुचर सुरु झाले मग ऑप्शन चा शोध लागला असणार

जरी सेबी किंवा जगातील इतर सरकारी नियत्रंण करणाऱ्या संस्थानी "याचा वापर फक्त उत्पादकांनीच करावा" असे बंधने घातले तरी जेवहा उत्पादक हा विमा घेऊ इच्छितो तेवहा तो विमा विकणारा पण कोणी तरी पाहिजे ना !

पुट ऑप्शन विकत घेणे म्हणजे विमा घेणे
पुट ऑप्शन विकणारा = विमा देऊन जोखीमस्वीकारणारी संस्था किंवा व्यक्ती

हे बंद करावे असे कोणाचे म्हणणे असले तर मग आयुर्विमा पण बंद केला पाहिजे !

दुर्दैवाने पुढे मूळ उत्पादनातील उलाढालीपेक्षा त्यावर बेतलेल्या या डेरीवेटीव्ह वरील उलाढालच फार वाढली आहे हे हि नाकारत येत नाही
कलियुग म्हणूयात हवे तर ...

आग्या१९९०'s picture

19 Jul 2024 - 8:44 pm | आग्या१९९०

डेरिवेटिव्हमधील व्यवहारावर स्टॉक एक्सचेंजचे नियंत्रण असते. प्रमाणाबाहेर व्यवहार होण्यापूर्वी market wide position ने पुढील व्यवहार रोखले जातात. योग्य तो रिस्क रिवॉर्ड रेशो आणि स्टॉप लॉस ठेवून व्यवहार केल्यास फायदा होतो. अर्थात हातात खेळते भांडवल असावे.

सुबोध खरे's picture

19 Jul 2024 - 7:43 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने पुढे मूळ उत्पादनातील उलाढालीपेक्षा त्यावर बेतलेल्या या डेरीवेटीव्ह वरील उलाढालच फार वाढली आहे

हाच खरा प्रश्न आहे.

पाच रुपयाच्या गोष्टी वर पाच हजार रुपयाचा सट्टा लावल्यास झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारी सामान्य माणसे त्यात अडकतात आणि उगाच आपली कष्टाने कमावलेली संपत्ती गमावून बसतात.

बाजारात लोभ आणि भय या दोन गोष्टीमुळे सामान्य माणसं आपलं नुकसान करून घेतात आणि बाजाराला दोष देऊन त्यातून बाहेर पडतात.

आणि हीच प्रक्रिया डेरिव्हेटिव्ह्स मध्ये फार पटकन होते आणि माणसे मोठे नुकसान सोसून / कफल्लक होऊन बाहेर पडतात.

एक दोन टक्के जास्त व्याजाच्या लोभामुळे संशयास्पद पतपेढ्यात किंवा सहकारी बँकात पैसे गुंतवून पैसे बुडाल्यावर नशिबाला आणि सरकारला दोष देणारे असंख्य लोक आपल्या रोजच्या पाहण्यात आहेतच.

ता क. -- गेली १८ वर्षे बाजारात गुंतवणूक करत असूनही मला डेरिव्हेटिव्ह्स मधले काहीही समजत नाही आणि मी त्यात एकही पैसा आजतागायत गुंतवलेला नाही.

वर दिलेला लेख हा इकॉनॉमिक टाइम्स मधील आहे. त्यात माझा सहभाग शून्य आहे.

पॅट्रीक जेड's picture

19 Jul 2024 - 7:54 pm | पॅट्रीक जेड

२०१६ साली कॉल ऑप्शन मध्ये मी माझ्य वयाच्या २४ व्या वर्षी माझा सहा महिन्याचा पगार गमावला होता. माझ्यामुळे नादाने लागलेले माझे दोन चार सहकारीही ५० हजार ते लाखभर रुपयात डूबले होते, माझा तमिळ बॉस तर तेव्हाच ५ लाख मायनस मध्ये गेला होता, सरकार मार्केट ला दोष न देता मला दोष द्यायचा तूच नादाला लावलं बोलला:(
दोनेक वर्षाआधी बोलणं झालं तेव्हा त्याने स्क्रिनशॉट पाठवले होते फ्यूचर मधे १५ लाख प्रॉफिट होतं. बोलला.
माझा सहा महिन्याचा पगार नंतर कोरोनात एसबीआय १८० रुपयाला घेऊन दुप्पट किमतीत विकून मी वसूल केला.