मनोरथाच्या वाटेवर जरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Jun 2024 - 3:30 pm

भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन

निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन

जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन

राहू-केतुची जोडगोळी मग
समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद
सोडवीन निरगाठी

सात अश्व सूर्याचे - त्यांना
थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा
करीन मी निगुतीने

कृष्णविवर सैराट , भटकते
हुडकून मग काढीन
गळाभेट घेईन तयाची -
त्यात विरुन जाईन

मनोरथाच्या वाटेवर जरी
वास्तव पसरी काटे
त्या काट्यातून फूल फुलवी जो
त्याचे संचित मोठे

अविश्वसनीयमुक्त कवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2024 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2024 - 3:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोरथाच्या वाटेवर जरी
वास्तव पसरी काटे
त्या काट्यातून फूल फुलवी जो
त्याचे संचित मोठे

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2024 - 5:51 pm | चौथा कोनाडा

निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन

हे आवडलं !

अनन्त्_यात्री's picture

9 Jun 2024 - 11:13 am | अनन्त्_यात्री

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ही कविता इंग्रजीत गूगल भाषांतर करून कृबु प्रतिमेसाठी वापरली असता खालील चित्रे आली:
(हे प्रयोदाखल करून बघितलेले आहे, बाकी हेतु काही नाही)
.

.

.

अनन्त्_यात्री's picture

14 Jun 2024 - 10:44 am | अनन्त्_यात्री

टाईमपास कवितेला चार चाँद लावल्याबद्दल चित्रगुप्ताय नम:

सूर्याच्या सात घोड्यांपैकी १-२ गायबलेत. बहुधा माझी नजर चुकवून चरायला गेले असावेत.

कर्नलतपस्वी's picture

13 Jun 2024 - 10:07 pm | कर्नलतपस्वी

कवीता सुंदर आहे.

चित्रगुप्तांचे उद्योग खतरनाक वाटले, पण तरी सुद्धा पुरक आहेत.

चित्रगुप्त's picture

13 Jun 2024 - 10:26 pm | चित्रगुप्त

यात (आपले डोके अजिबात न वापरता) भाषांतर आणि चित्रनिर्मितीत संपूर्णपणे कृबुचाच वाटा आहे. नवनवीन प्रयोग करण्यातून ज्ञान मिळत राहील.

अथांग आकाश's picture

14 Jun 2024 - 1:06 pm | अथांग आकाश

कविता आवडली!
मी नजरचूकीने माथेरानच्या वाटेवर जरी शिर्षक वाचले होते :P

खूप सुंदर. एकदा सुरुवातीला "करेन" मग पुढील कडव्यांत "करीन" असे झाले आहे ते पुढील आवृत्तीत सर्वत्रच "करीन" करून घ्या.