नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 May 2024 - 9:32 pm

✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल
✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण
✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग
✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं!
✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल
✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका
✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध

सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या. आणि आठ वर्षांपूर्वी टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या "काहे दिया परदेस" मालिकेचे काही भाग गंमत म्हणून बघितले. तेव्हाही सलग नाही पण अधून- मधून बघितले होते. त्यामुळे कलाकार ओळखीचे आणि आवडीचे झाले होते. ह्यावेळी बघताना वेगळी मजा आली आणि वेब सिरीज बघावी तसे अनेक भाग सलग बघितले गेले. त्यामध्ये असलेली मजा, खुमारी, त्यात दाखवलेल्या नात्यांच्या नानाविध रंगांविषयी लिहावसं वाटलं.

काहे दिया... म्हंटलं की, पहिले आठवते ती त्यातली अतिगोंडस गौरी म्हणजे सायली संजीव! ह्या मालिकेला बर्‍याच प्रमाणात सायलीच्या पदार्पणासाठी लक्षात ठेवलं जाईल! एक अतिशय गुणी आणि सशक्त अभिनेत्री ह्या मालिकेतून समोर आली. पैठणीची गोष्ट, झिम्मा, हर हर महादेव अशा अनेक भुमिकांमुळे नंतर तिचं खूप कौतुक झालं. तिचा अभिनय, बोलण्याची शैली, हावभाव लोकांना खूप आवडले. पण काहे दिया.. मध्ये तिला बघताना सेहवागच्या पदार्पणावेळी सचिनने त्याला जे सांगितलं होतं ते आठवतं. सचिन सेहवागला म्हणाला होता की, तू आत्ता जितका नर्व्हस आहेस, तितका नर्व्हस पुढे कधीच असणार नाहीस, सो हा क्षण एंजॉय कर. आणि मग नर्व्हस असलेल्या सेहवागने पदार्पणात शतक झळकावलं. सायलीचा सुरूवातीचा अभिनय काहीसा कमकुवत कदाचित असेलही. पण तिचा अल्लडपणा, तिचं रॉ असणं आणि तिचं सहजपणे वावरणं ह्यामुळे ती अक्षरश: काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राची "क्रश" बनली! केवळ तिच्यासाठी काहे दिया.. बघणारेच बरेच असावेत! आणि लवकरच तिचा अभिनय, एक्स्प्रेशन्ससुद्धा खूप उत्तम झाले. ह्या मालिकेत ती जशी होती रॉ आणि ओरिजिनल दिसत होती तशी कदाचित ती पुढे दिसणार नाही! त्यामुळेही ही मालिका वेगळी ठरते.

मालिकेतील इतर पात्र- शिव म्हणजेच ऋषी सक्सेना, मोहन जोशी, शुभांगी गोखले, गोड आजी म्हणजे शुभांगी जोशी हेही दिग्गजच. शिवाय वेणू, मितू, शिवचे आई- बाबा- दादी अशी पात्रही खूप प्रभावी आहेत. अभिनय, मांडणीबरोबर कथानकाचं नावीन्यही खूप आहे. एका बाजूला अस्मिता, प्रादेशिकता, संकुचिततेची मानसिकता असताना अशा सामाजिक चाकोरीपलीकडे जाणारी कथा मालिकेमध्ये बघायला मिळते. मालिकेतल्या गौरी सावंतचे बाबा "मराठी अस्मितेचे" पाईक असतात. आपली माणसं, आपली ओळख हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. पण तेही कसे नंतर ह्या मानसिकतेच्या पुढे जातात, ते आणि सगळेच कसे हळु हळु प्रेमामुळे- आत्मीयतेमुळे बदलतात, तू- तू मै मै करून शेवटी सगळ्याचा छोटा असलेला "अहं" विराट अशा "हम" मध्ये कसा सहभागी होतो, हे अनुभवण्यासारखंच आहे!

मालिकेतला शिव शुक्ल अर्थात् ऋषी सक्सेनाचा अभिनयही तितकाच कमाल! त्याच्या बोलण्यात- वागण्यात एक स्पष्टता, विनम्रता आणि शालीनता दिसते. हँडसम तर तो आहेच. पण त्याचे नेत्रबाण! त्याचं नुसत्या डोळ्यांनी फ्लर्ट करणं! अगदी प्रेमाने आणि जिव्हाळ्याने त्याचं "गौरी जी" म्हणणं! अहा हा! भांडण- गैरसमज- रूसवे- फुगवे ह्या वाटेने पुढे जाणारी त्याची व त्याच्या "गौरी जी"ची केमिस्ट्री! एव्हरग्रीन वाटतात हे प्रसंग! प्रेमामध्ये हजार अडचणी येऊनही केवळ डोळ्यांनी गौरीला त्याचं धीर देणं!

मालिकेमध्ये आजी- नात, वडील- मुलगी, सासू- जावई अशा नात्यांमधले रंगही सुरेख दाखवले आहेत. गोड अशी आजी आणि तिची बासुंदी, बर्फी, पुरणपोळी! सगळ्यांचं मन बरोबर ओळखणारी आणि सगळ्यांना जीव लावणारी आजी! लोकप्रिय झालेली ही आजी मात्र मालिकेनंतर लवकरच गेली. त्यावेळी सायली संजीवचे उद्गार होते की, ही केवळ गौरीची आजी नव्हती तर सायलीचीही आजी झाली होती! एव्हरग्रीन आजी, तिची डॅशिंग बॅटींग कायम लक्षात राहील अशी आहे! कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी खंबीर आणि खमकी! गौरे, मी तुका सांगतंय अशी तिची शैली! शिवाय तिचं गौरीच्या बाबांसोबतचं सततचं शीतयुद्ध आणि धुसफुस! सक्षम विरोधी पक्ष असला की, वातावरण कसं चैतन्यमय असतं! शिवाय आजीचं कोंकणी- मराठी मिश्रित हिंदीत बोलणं!

गौरीच्या बाबांचं गौरीसोबतचं नातंही तितकंच भावस्पर्शी. क्वचित रडू येईल इतकं हृद्य. बाबांचा अभिमान असलेली गौरी! जेवताना त्यांचं तिला पहिला घास भरवणं! आणि गौरी- शिवचं प्रेम समोर आल्यानंतरचा त्यांचा त्रागा, उद्वेग आणि नंतरचा समजुतदारपणा! लाडाने वाढवलेल्या आणि शब्दाबाहेर नसलेल्या मुलीला एक पाऊल मागे येऊन मुक्त आकाशामध्ये झेप घेऊ देणं! शुभांगी गोखले अर्थात् गौरीच्या आईचं प्रत्येक भागामध्ये किमान दोनदा "शांत, शांत" म्हणण! मुलगी आईपेक्षा बाबांची जास्त लाडकी आहे हे मान्य करणं! भविष्यात जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती दुर्मिळ होईल, तेव्हा अभिव्यक्तीमध्ये नात्यांचं हे पंचपक्वान्न असलेलं ताट बघायला मिळेल का, हा प्रश्न मनात येतो!

निशा वहिनी! ह्या मालिकेमध्ये असलेली फोडणी दिलेली मिरची! नकारात्मक भुमिका असूनही लक्षात राहील अशी! सगळ्या घडामोडींमागची सूत्रधार! जेव्हा मी नोटबंदीची बातमी बघितली होती, तेव्हा सगळ्यांत आधी मला निशा वहिनीच आठवली होती! कारण तिने लाखो रूपये लपवून ठेवलेले होते! त्याबरोबर कानडी हेल असलेलं मराठी बोलणारा वेणू आणि शिवसाठी वेडी झालेली मितूसुद्धा लक्षात राहतात.

मालिकेच्या उत्तररंगामध्ये वाराणसीचं वातावरण छान दाखवलं आहे! जीवनमानातले बारीकसारीक फरक छान दाखवले आहेत. रितीभाती कशा वेगळ्या असतात, शहरी मध्यमवर्गीय शैली व ग्रामीण भागातला घरंदाजपणा कसा असतो हेही छान दाखवलंय. त्याबरोबर असंख्य फरक व वेगळ्या पद्धती असूनही संस्कार, मूल्यं आणि आस्था कशा समान आहेत तेही छान दाखवलं आहे. अप्रत्यक्ष प्रकारे स्त्री- पुरुष असमानता, स्त्रियांचं चाकोरीबद्ध राहणीमान व पुरुषी मानसिकतेचं वर्चस्व हेसुद्धा त्यात सहज प्रकारे बघायला मिळतं. शिवाय शिवच्या अम्मांकडून "मुन्ना तो बिल्कुल बौराना हो गया है!" असं खास वाराणसीचं हिंदी ऐकताना आणि लिट्टी चोखासारख्या पदार्थांबद्दल ऐकताना आपल्याही ज्ञानात भर पडते!

अशी ही सदाबहार मालिका! कोणताही भाग कुठूनही बघितला तरी छान फ्रेश वाटण्याची खात्री! दिग्गज व नवोदित कलाकारांचं ताकतवान अभिनय आणि सुंदर मांडणी! कधी कधी तर अगदी विनोदी मालिका वाटेल असे भरपूर विनोद आणि खट्याळपणा! आता काही जणांना कदाचित प्रश्न पडेल की, आम्हीही ही मालिका बघितलीय, पण आम्हांला असं कधी जाणवलं नाही! मला इतकंच वाटतं की, आपण जितकं पूर्ण लक्ष देऊन आणि ब्लँक मन ठेवून जेव्हा बघतो तेव्हा अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणवतात. आणि मग त्याचा तितका जास्त आनंदही घेता येतो. आणि अर्थात् ज्यांचं लक्ष गौरीकडे असेल त्यांना कदाचित शिव किती हँडसम दिसतो, हे लक्षात येणार नाही किंवा vice versa सुद्धा! पण निखळ विनोद, अगदी साधी माणसं आणि खर्‍या जीवनाशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तीरेखा ह्यांसाठी ही मालिका बघणं म्हणजे एक आनंददायी सोहळा ठरतो!

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

मुक्तकसमीक्षाअनुभव