“ मून पे कदम रखनेवाला पहला इंसान कौन था ?” लेक्चर हॉलमध्ये प्रोफेसर विरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसने प्रश्न विचारताच एकापाठोपाठ अनेक आवाज ऐकू येतात उत्तरादाखल, “ नील आर्मस्ट्रॉंग, सर. ”
“ obviusly he was, we all know it. लेकिन दुसरा कौन था ? ”
“.....”
विचाराला फारसा अवधीही न देता लगेचच व्हायरसचं पुढचं वाक्य कानावर पडतं,
“ Don't waste your time, it is not important. Nobody remembers the man whoever came second..”
‛थ्री इडियट्स' चित्रपटातील हा प्रसंग. असंच काहीसं ‛दुसरेपणाचं’ नशीब घेऊन जन्माला आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे ‛डॉ. रखमाबाई राऊत' ! डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यानंतर झालेल्या भारतातील दुसऱ्या महिला डॉक्टर ! दुर्दैवाने डॉ. आनंदीबाई जोशी दुर्धर आजारामुळे वैद्यकीय सेवा देऊ शकल्या नाहीत, तेव्हा ‛ प्रॅक्टिस करू शकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ’ म्हणून डॉ. रखमाबाई यांच्याकडे उशिरा का होईना, बघितलं गेलं आणि चित्रपटातील हा संवाद अगदी खरा असल्याचं जाणवलं!
रखमाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होण्याचं तरीही केवळ हेच एकमेव कारण मात्र नक्कीच नाही. ज्या काळी स्त्रियांना व्यक्ती म्हणून, जिवंतपणाचं लक्षण म्हणून स्वतःचं मत असू शकतं, याची साधी जाणीवही कुणाला नव्हती, त्या काळी नकळत्या वयात संमतीशिवाय झालेलं लग्न समज आल्यावर नाकारण्याचं त्यांनी दाखवलेलं धारिष्ट्य मला विशेष उल्लेखनीय वाटतं. Dare to say ‛No', when you don't want to say yes, ही आजही कित्येक स्त्रियांना न जमणारी गोष्ट त्यांनी एकोणिसाव्या शतकात शक्य करून दाखवली. निष्क्रिय, निरुद्योगी नवऱ्यासोबत न राहण्याच्या त्यांच्या भूमिकेवर ‛केसरीमधून' लोकमान्य टिळकांनी ‛हिंदूंच्या परंपरांवरील डाग' म्हणत घणाघाती टीका केलेली असतानाही त्या ठाम राहिल्या. न्यायालयाने नवऱ्यासोबत राहा, अन्यथा तुरुंगवास पत्करावा लागेल, असा पर्याय ठेवल्यावर त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवली. हा निकाल फेटाळण्यासाठी थेट राणी व्हिक्टोरियाला मध्यस्थी करण्यास भाग पाडून लंडन येथे प्रिव्ही कौन्सिलमध्ये हा खटला उभा राहण्याची यानंतर चिन्हे दिसू लागली. आपल्या विरुद्ध वाढत चाललेल्या जनमताचा कौल लक्षात घेऊन शेवटी नवऱ्याने लग्नाच्या आणि कोर्टकचेरीच्या खर्चाचा मोबदला म्हणून रखमाबाईंकडूनच दोन हजार रुपये मागून घेत हा जगावेगळा घटस्फोट दिला. भारतातील घटस्फोटाच्या या ‛पहिल्या' खटल्याचा परिणाम म्हणून बालविवाहाविरोधातील आंदोलनाला गती मिळाली आणि विवाहासाठी ‛संमतीवय कायदा १८९१' पारित करण्यात आला.
सावत्र वडील डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांचा परीसस्पर्श दोन वर्षांच्या लहानग्या रखमाबाईच्या आयुष्यात केवळ ‛सावेऐवजी राऊत’ असा आडनावात बदल करणारा नव्हे, तर सर्वार्थाने कलाटणी देणारा ठरला. पुढे ‛लंडन स्कूल ऑफ मेडिसीन' येथे त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. बाळंतपणाचे शास्त्र व शस्त्रक्रिया यात विशेष प्राविण्य मिळवले. दुर्दैवाने तिथेही वैद्यकीय शिक्षण जरी मुलींना दिले जात असले, तरी मुलींना पदवीदान करणे विद्यापीठाच्या कायद्यात बसत नव्हते. त्यामुळे स्कॉटलंड येथून दिलेल्या शेवटच्या परीक्षेनंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या मेडिकल रजिस्टरमध्ये सनदशीर रित्या दाखल झाले. गोऱ्यांच्या देशात कपाळावर कुंकू, साडी, लांब बाह्यांचा ब्लाऊज अशा साध्याशा भारतीय पेहरावात वावरणाऱ्या रखमाबाई आता डॉ. रखमाबाई राऊत, एम. डी. होऊन १८९४ मध्ये भारतात परतल्या.
आपल्या वैद्यकीय सेवेची सुरुवात त्यांनी मुंबई येथील कामा हॉस्पिटलमध्ये हाऊस सर्जन म्हणून केली. लंडन येथील डफरीन संस्थेच्या साहाय्याने मुंबई, दिल्ली, मद्रास, राजकोट येथील हॉस्पिटल उभारणीत त्यांचा सहभाग होता. मुंबईनंतर त्यांनी सुरत, राजकोट येथे आपली वैद्यकीय सेवा दिली. त्या काळी जीवावर बेतलं, तरीही बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये जायची स्त्रियांची तयारी नसायची. तेव्हा शेळीचं बाळंतपण करून दाखवून त्यांनी त्यांची भीती घालवली. १८९६ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीची दखल घेऊन ‛इंग्रज ए हिंद' या उपाधीने त्यांना गौरविण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना आणि त्यानंतरदेखील समाजप्रबोधनाचं महत्त्व जाणत स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. विधवा स्त्रियांसाठी ‛वनिता आश्रमाची’ स्थापना केली. कामाठीपुरामधल्या देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने ठेवली. अस्पृश्यांसाठी गावदेवी येथील विहीर खुली केली. अखेरपर्यंत समाजाचं ऋण फेडत राहून वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अखंड ज्योत शांत झाली. स्वतः जन्मदात्री आई न होताही अनेकांना या जगात येण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या माउलीचा, ‛रखमाईचा' आपल्याला विसर पडावा, ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे.
रखमाबाईंच्या योगदानाच्या गोषवाऱ्याचा विचार करत असताना योगायोगाने लक्ष्मी यादव यांची ‛ एक मुलगी हरते तेव्हा...’ ही कविता वाचनात आली.
‛जेव्हा एक मुलगी एक पाऊल मागे घेते,
तेव्हा अख्खा समाज दहा पावलं मागे गेलेला असतो...
एक मुलगी हरते,
तेव्हा संविधान हरतं,
देश हरतो...’
रखमाबाईंचं आजची स्त्री, समाज, संविधान, देश काय देणं लागतो, ते आता नेमकं समजतंय.
॥ रखमाई ॥
“तो हा विठ्ठल ‛नव्हेच’ बरवा,” 'रखमाई' वदली,
रुसली, बसली अडून ती, जनरितीस ना बधली ।
“रहायची ‛ना‘ उभी मंदिरी, तुझिया वामांगी,”
तिच्या लढ्याची कथा सातही समुद्र उल्लंघी ।
विरोधात ‛केसरी' गरजला, हट्ट तरी ठाम,
न्याय मिळे कलियुगी मोजुनी तिला उलट दाम ॥
उमलविण्या पाकळ्या कधी ना, भ्रमर करी घाई,
वाट चांदण्याची शरदाच्या चकोरही पाही ।
मनुष्यास का कळे न गोडी, जरा थांबण्याची,
कठोर भाषा निरुपाया त्या बरी कायद्याची ।
विवाहास संमती वयाचे दिले तिने भान,
लेकींना पाठच्या दिसे स्वप्नांचा सोपान ॥
बाप वृक्ष होउनी उभा लाडक्या मुलीसाठी,
गगनावेरी वेलु चढे, वळुनी बघे न पाठी ।
पायतळीची वाट न ती मळलेली उबदार,
पाऊल ‛एक' अवघे आधी गेलेले पार ।
वाट फुटे वाटेस बिकट, लाटेस जशी लाट,
घाट घाट उजळीत तरीही ज्योत निघे धीट ॥
अडलेल्या बाईस द्यावया सुटकेची ग्वाही,
आली सरसावुनी पुढे ती माय लांब बाही ।
विकारांहुनी विचारांसवे झुंज तिची आधी,
इतिहासाच्या पानी ती नवपर्वाची नांदी ।
व्रत सेवेचे अखंड वाहे, जशी ‛चंद्रभागा’,
कर्मक्षेत्र ‛पंढरी' नि झाला देह ‛विठु' अवघा ॥
वृत्त - पतितपावन
( मात्रा - ८,८,८,२ = २६ )
******
प्रतिक्रिया
22 Mar 2024 - 10:19 am | अहिरावण
एका चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख.
22 Mar 2024 - 11:44 am | गवि
कमाल आहे. डॉ. रखमाबाई यांच्याविषयी आधीही वाचले होते. डॉ. आनंदी आणि डॉ. रखमाबाई या दोघींचे धाडस आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आनंदीबाई डॉक्टर झाल्यानंतर फार काळ रुग्णसेवा करू शकल्या नाहीत. त्यांचे अकाली निधन झाले.
रखमाबाई यांनी मात्र दीर्घकाळ प्रत्यक्ष रुग्णसेवा केली. त्या अर्थाने त्यांचे महत्व खूप आहेच. पहिला दुसरा तिसरा ही नंबरवारी खरेच चुकीची वाटू लागते.
22 Mar 2024 - 1:43 pm | किसन शिंदे
लेखाची सुरूवातीची काही वाक्य वाचून असे म्हणावे वाटते की, समर्पक वाक्य, प्रसंग, उल्लेख लेखामध्ये बेमालूमपणे पेरायची लेखिकेची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. माहिती संक्षिप्त स्वरुपात वाटली तरीही, डॉ. राऊतांची ओळख करुन देणारा हा लेख बेहद्द आवडला.
22 Mar 2024 - 6:26 pm | कर्नलतपस्वी
यांच्याबद्दल नवीन माहीती, अर्थात मला,या लेखात मिळाली.
धन्यवाद.
24 Mar 2024 - 11:28 am | भागो
डॉक्टर रखमाबाई हे नाव प्रथमच ऐकले. ही ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.
25 Mar 2024 - 6:58 pm | सुधीर कांदळकर
आणि लेखविषय आवडला. मुंबईतील माझ्या आणि माझ्याअगोदरच्या पिढीत रखमाबाईंचा गौरवाने उल्लेख केला जात असे आणि शाळाकॉलेजात शिकणार्या मुलींना त्यांचे उदाहरण देऊन असेच कर्तृत्त्व गाजवावे असा उपदेश केला जात असे.
कादंबिनी बोशू-गांगुली या आणखी एक रखमाबाईंच्या समकालीन स्त्री डॉक्टर. एका समाजसुधारणाविरोधक छापील नियतकालिकाच्या संपादकाने कादंबिनींचा एका लेखात 'वेश्या' असा उल्लेख केला होता. त्यांचे पती द्वारकानाथ हे ब्राह्मो समाजातील सुधारणावादी व्यक्ती असून ते वकील होते. त्यांनी त्या संपादकांवर या बदनामीविरुद्ध खटला भरून डॉक्टर पत्नीला नुकसानभरपाई देखील मिळवून दिली. अशी अनेक नावे इतिहासातून डिलीट झालेल्या महाराष्ट्राशी तुलना करतां हे वंगोत्पन्न समाजधुरीण अग्रेसर वाटतात.
छान लेखाबद्दल धन्यवाद.