मुझको ठंड लग रही है..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
19 Dec 2023 - 3:58 pm

माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे थंडीचा. पावसाळा आणि उन्हाळा मला अजिबातच आवडत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लोकलनं कामावर जाणं म्हणजे अग्निपरीक्षाच! पावसाच्या तपकिरी रंगाच्या गढूळ पाण्यात काय काय गलिच्छ वस्तू वाहात येतील आणि आपल्या पायाला स्पर्श करतील सांगता येत नाही. कुठं खड्डा असेल, कुठं सरळ रस्ता असेल.रस्त्याची सीमारेषा संपून कुठं गटार लागेल सांगता येत नाही. वाहत्या पाण्यात रस्ता अजिबात दिसत नसताना त्याचा अंदाज घेत चालणं महाकर्मकठीण काम.

मला रस्त्यातल्या खड्याची एक महाभयानक आठवण आहे. काॅलेजात जात असताना पावसाळ्यात मी अशाच एका न दिसलेल्या खड्ड्यात पडून कमरेपर्यंत घाण पाण्यात बुडाले होते. एका भल्या माणसाने मला मदत केली आणि मी बाहेर आले. तेव्हापासून मला पावसाच्या पाण्यात लुप्त झालेल्या खड्ड्यांची भीतीच बसलीय.

उन्हाळ्यात उन्हानं आणि घामानं अंगाची काहिली,लाहीलाही होते. मग तो उन्हाळा विदर्भातला, खानदेशातला कोरडा, भाजून काढणारा उन्हाळा असो की समुद्रकिनारी वसलेल्या शहरातला घाम फोडणारा उन्हाळा असो. त्रासदायकच!

आपली लाडकी थंडी मस्तच. मग ती स्थानपरत्वे बोचरी थंडी असो की सौम्य थंडी असो. मी सर्व प्रकारच्या थंड्या अनुभवल्या आहेत असं मला वाटतं. लहानपणी थंडीत आम्ही शेकोटी पेटवायचो. शेकोटी भोवती हातपाय शेकत,अंग शेकत बसायला मजा यायची. आमचा काका, मामा, दादा भुताच्या गोष्टी सांगायचा. त्या भीतीमध्ये, घाबरण्यामध्ये एक सुखद थरार असायचा. एक मनभावन मनोरंजन असायचं.

माझ्या चार, पाच गावात बदल्या झाल्या. मी अनेक गावच्या थंड्या अनुभवल्या आहेत. खूप प्रवास केला. त्यामुळे पंजाबमधली, उत्तरप्रदेशामधली, मध्यप्रदेशमधली, काश्मीरमधली आणि दक्षिणेकडे तमीळनाडु,केरळ, लक्षद्वीप, अंदमान अशा राज्यातली थंडीही कधी आणि कशी असते ती अनुभवली. आणि पर्यटन करताना युरोपातली विशेषतः स्वित्झर्लंडमधली बर्फाळ, हाडापर्यंत पोहोचणारी, नाकं लाल करणारी, गोठविणारी थंडीही अनुभवली.

मी बर्फात खेळले आणि बर्फातली थंडी अनुभवली ती सर्वात प्रथम रोहतांग पासला. अंगात जाड स्वेटर, पायघोळ कोट, मफलर,कानटोप्या होत्या पण थंडी भागत नव्हती. आम्ही एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे उडवून मजा लुटत होतो. तेवढ्यात वरुन कापसासारखा बर्फ भुरभुरायला लागला. इतकी मज्जा वाटली. अविस्मरणीय अनुभव! मी स्तब्ध झाले. स्थळकाळाचं भान हरपवून टाकणारा लोकविलक्षण अनुभव मला त्यावेळी पहिल्यांदाच आला. स्वर्गीय अनुभव! मी बर्फाचे कण अंगावर झेलत,हात जोडून, डोळे टक्क उघडे ठेवून तो अनुभव मी पंचेद्रियांनी घेत होते. परमेश्वराच्या जवळ नेणारा अनुभव!!

नंतर स्वित्झर्लंडलाही बर्फात खूप खेळले. पण रोहतांग पासचं भारलेपण त्यात नव्हतं. तो अनुभव अलौकिक होता. कारण तो पहिला अनुभव होता. इंग्लंडमध्ये आम्ही हिंडलो ,तर तिथं कडाक्याच्या थंडीबरोबरच रिमझिम पाऊसही निनादत होता. अंगात स्वेटर आणि शाल आणि हातात छत्री अशा अवतारात लंडन पाहिलं.

थंडी जळगाव धुळे, एकूण खानदेशातली,पुण्याची,सांगलीची, नागपूरची, महाबळेश्वरची, लोणावळ्याची, माऊंट अबूची, नैनीतालची,सिमल्याची,इंदौरची, कन्याकुमारीची, अहमदाबादची, बडोद्याची, अगदी रत्नागिरी,मालवणची असो,ती एन्जॉयेबलच आहे.

थंडीत कोवळ्या उन्हात बसण्यात,सूर्याची किरणे अंगावर झेलण्यात पारलौकिक सुख आहे.

असेच आम्ही सर्व मित्रमंडळी सहकुटुंब म्हैसमाळला गेलो होतो. म्हैसमाळ हिलस्टेशन आहे. तिथल्या एका टेकडीवरच्या रेस्ट हाऊसला आम्ही गेलो. संध्याकाळ टळली होती. सगळे आत गप्पा मारत बसले होते. मी एकटीच उठले. रेस्ट हाऊसच्या बाहेर आले. तिथं एक व्ह्यू पॉइंट होता.त्याच्या कठड्याला लागूनच एक दगड होता. मी त्यावर बसले. नीरव शांतता होती. थंडी इतकी की नाकाडोळ्यांतून पाणी यावं आणि दात कडकडा वाजावेत. मी सहज खालच्या दिशेनं पाहिलं. खाली गाव होतं. तिथंही चिडीचूप होतं. थंडीमुळं गाव गारठलं होतं. मी निःशब्द होऊन गावाकडं, आसपासच्या झाडांकडं,आकाशाकडं पाहात होते. तिथली शांतता चाखत होते, डोळ्यांनी पित होते. आणि तेवढ्यात चंद्र उगवला. त्याच्या केशरी प्रकाशानं आसमंत उजळून निघाला. मी आजवर एकापेक्षा एक देखणे चंद्र पाहिले,पण इतका दिलतोड देखणा चंद्र मी पूर्वी आणि नंतर पाहिला नाही. अंगात भरलेल्या थडथडत्या थंडीत मी तो चंद्र अनिमिष नेत्रांनी,भान हरपून पाहत बसले.

गावातल्या घराघरात दिवे लागलेले होते. भोवती पसरलेल्या अंधारात ते मंदपणे लुकलुकणारे तारेच वाटत होते.वर एक ताऱ्यांनी भरलेलं आकाश आणि खाली पसरलेलं हे दिव्यांनी चमचमणारं आकाश.आणि मध्ये गोल ,वाटोळा चंद्राचा आकाशकंदील!ते दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही.

अशा हाडं भेदणाऱ्या थंडीत मी पहाटेच्या ड्युटीवर जायची. रस्त्यावर शुकशुकाट. भुंकणारी आणि माझ्या स्कूटरच्या मागे माझा पाठलाग करणारी कुत्री, क्वचित रोंरावत जाणारा एखादा ट्रक, नित्यनेमाने ऐकू येणारी, वातावरणाचा भेद करत जाणारी रेल्वेची शिट्टी! मस्त माहोल! पाय आणि हात थंडीनं लाकडाचे झालेले!मस्त मजा यायची. ही काही गुलाबी थंडी नव्हे. नाक चाॅकलेटी करणारी, गोठविणारी थंडी. इतक्या पहाटे तिथल्या कॅन्टीनमधला कटिंग चहा प्यायचा. अहाहाहा! अवर्णनीय आनंद!

थंडीत अंथरुणात गुरगुटून झोपण्यातही मजा असते. उठूच नयेसं वाटतं. माझ्याकडे आईच्या साड्यांची एक गोधडी आहे. ती मी जपून ठेवलीय. ती म ऊ म ऊ गोधडी पांघरून मी झोपते.
मुंबईची आणि एकूण कोंकणातली थंडी मला सर्वांत आवडते. थोडेच दिवस असते, पण स्वेटर नको,शाल नको,फॅन नको,एसी तर नकोच नको.

असो. आता मी रिटायर झाले. पंच्याहत्तरी आली. रात्रीची झोप कमी झाली. पहाटे तीन, चार लाच जाग येते. मग मी तोंडबिंड धुते. तोंडावरचं पाणी न पुसता , ओल्या तोंडानंच माझ्या आवडत्या झुलत्या खुर्चीवर, माझ्या आवडत्या खिडकीजवळ बसते. खिडकीची काच सरकवते. बाहेरून थंड वाऱ्याची झुळूक आत येते. तनुमनाला उल्हसित करणारी,शीतल,गार, ताजीतवानी, टवटवीत, आशादायक, सुखद झुळूक! सूर्य उगवायला अवकाश असतो. पण सूर्यदेवाची चाहूल लागलेले पक्षी किलबिलाट सुरू करतात. कितीतरी पक्षी.कितीतरी वेगवेगळे आवाज. जवळच असलेल्या गावातल्या देवळातून कार्तिक महिन्यातल्या काकड आरतीचे सूर ऐकू येत असतात. कानाला सुखावणारा तो सुस्वर. ती शीतलता!तो तजेला! हवंहवंसं सुख!वाटतं अशा वेळी "तो"जरी आला तरी थांबेल तोही पळभरी!

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Dec 2023 - 6:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त गुलाबी थंडी!!
जॅकेट कानटोपी वगैरे घालुन भल्या पहाटे वॉकायला रनायला बाहेर पडलेले लोक्स!!
बाईकला कॅन अडकवुन जाणारे दूधवाले, पेपरवाले
घराबाहेर शाळेच्या व्हॅनची वाट पहाणारी मुले
लांबवरुन ऐकायला येणारा काकड आरतीचा रेल्वेच्या शिट्टीचा आवाज आणि काय काय.....

लेख वाचुन सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

हिवाळा हा माझाही आवडता ऋतू असल्यामुळे की काय, या ऋतूचं वर्णन खूपच भावलं.

---

वाटतं अशा वेळी "तो"जरी आला तरी थांबेल तोही पळभरी!

हे आवडलं नाही, आजी. तुम्ही छान लिहिता. नेहमीच सगळेच वाचक प्रतिसाद देत नसले तरी ते वाचत राहतात. असं काही लिहून तुमच्या लिखाणात खंड पडण्याची भीती दाखवू नका ही विनंती.

---

सवांतर:

पाचवी-सातवीत असताना "माझा आवडता ऋतू" या विषयावरचा नवनीतचा निबंध वाचला होता, त्यात हिवाळा हा आवडता ऋतू असं वर्णन केलेलं होतं. कदाचित ते वाचल्यापासूनच की काय, "हिवाळा हा माझा आवडता ऋतू" ही जाणीव झाली असावी.

---

अवांतर:

३१ डिसेंबर २०१६ रोजी आम्ही चार मित्र दार्जिलिंगला होतो. शिमला येथील मॉल रोड सारखेच दार्जिलिंग येथेही एक ठिकाण आहे. आम्ही चारजण दिवसभर भटकंती करून रात्री आठ वाजता हॉटेलात परत आलो. फ्रेश होऊन बाहेर जाऊन गावात भटकावे, प्यावे-खावे, मॉल रोडवर नाचगाणे करावे, हिरवळ पहावी, थर्टी फर्स्टचा आनंद रात्री उशिरापर्यंत लुटावा असा बेत होता. रूमवर चार जणात मिळून जेमतेम २००-२५० मिली शिल्लक होती. ती गटकावून रात्री सव्वा नऊ ला बाहेर पडलो. जवळच्या वाईन शॉप वॉर जातो तर काय, तो शटर लावून घेत होता. इथला सगळा बाजार नऊ वाजताच बंद होतो असे समजले. त्या दुकानदाराला कसेबसे थांबवून सामान घेतले. कसचा मॉल रोड, हिरवळ, थर्टी फर्स्टची रात्र आणि कसचे काय? सगळेच बंद झाले होते. मौजमजा करण्याचा सगळं बेत पाण्यात गेला. निराशेने शेवटी दहा वाजता हॉटेलात परत आलो. हॉटेलचे रेस्टॉरंट होते तिच्या मालकीणबाईंना विनंती करून काहीतरी खायचे करून घेतले.

पिणे-खाणे करून मग जवळपास पाय मोकळे करायला बाहेर पडलो. बाहेर प्रचंड थंडी होती. जाडजूड स्वेटरं, टोप्या, हातमोजे स्पोर्ट्स सॉक्स आणि बूट्स असा जामानिमा असूनही अक्षरशः हाडे गोठविणारी थंडी वाजू लागली. पोटभर जेवल्यावर थंडी जास्त वाजते याची तिथे जाणीव झाली.

पण ओव्हरऑल नंतर ती रात्र आम्ही चार जणांनी खूपच एन्जॉय केली. म्हणजे, unplanned मौजमजा केली. बोचर्‍या थंडीचा मस्त अनुभव घेतला.

विजुभाऊ's picture

19 Dec 2023 - 7:06 pm | विजुभाऊ

खूपच सुंदर लेख आज्जी.
मजा आली वाचून.

Nitin Palkar's picture

19 Dec 2023 - 7:39 pm | Nitin Palkar

खूपच छान आठवणी लिहिल्या आहेत.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2023 - 2:55 pm | मुक्त विहारि

हे माझे आवडते ऋतू...

श्वेता व्यास's picture

20 Dec 2023 - 4:32 pm | श्वेता व्यास

हिवाळा खरंच आवडता ऋतू आहे.
त्याचा कंटाळा नाही येत कधी उन्हा-पावसासारखा!
मी आजवर एकापेक्षा एक देखणे चंद्र पाहिले,पण इतका दिलतोड देखणा चंद्र मी पूर्वी आणि नंतर पाहिला नाही.
तुम्ही वर्णन केलेलं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माघ पौंर्णिमेचा उगवता चंद्रदेखील असाच सुंदर दिसतो.

Bhakti's picture

22 Dec 2023 - 8:09 am | Bhakti

सुंदर लिहिलंय आजी!
मलापण बाई थंडीच आवडते.
मी बर्फाचे कण अंगावर झेलत,हात जोडून, डोळे टक्क उघडे ठेवून तो अनुभव मी पंचेद्रियांनी घेत होते. परमेश्वराच्या जवळ नेणारा अनुभव!!

सुंदर क्षण!
आपला हेमंत ऋतू

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Dec 2023 - 9:35 am | अमरेंद्र बाहुबली

लेखाचं शिर्षक हिंदी का?? मग हिंदीतच लेख लिहीयचा की.

धर्मराजमुटके's picture

22 Dec 2023 - 10:05 am | धर्मराजमुटके

खरे तर तुम्हाला भल्लाळ देव आयडी अधिक शोभून दिसला असता :)

गवि's picture

22 Dec 2023 - 10:21 am | गवि

:-)

नाही हो. अमरेंद्र बाहुबली हे मराठमोळे आयडी नाव जास्त छान आहे. ;-).

(ह.घ्या हो बाहुबली.. )

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Dec 2023 - 11:59 am | अमरेंद्र बाहुबली

हे सिनेमातील पात्र आहे. पण मला एक कळेना मराठीची मागणी म्हणजे इतर भाषांना विरोध हे समीकरण मराठी माणसात घट्ट का हसलंय??

अहो, गंमत केली. तुमचा मुद्दा रास्त असेलही. शीर्षक एका प्रसिद्ध गाण्यासारखे वाटते आहे. लेख तर मराठीत आहे ना. झाले मग.

बाकी थंडीवरून एखादे मराठी गाणेदेखील शीर्षकात चालून जावे. तूर्त असे गाणे पटकन आठवेना. गारवा हे गाणे पावसाळी आहे असे स्मरते. असो.

कर्नलतपस्वी's picture

22 Dec 2023 - 1:49 pm | कर्नलतपस्वी

गदिमा
बाबूजी
आशाताई
चित्रपट-नरविर तानाजी

माघाची रात
चांदण त्यात
कुशी बदलून भागेना
थंडीची झोप काही लागेना

-३० ते ५०+ आसे तापमान भोगलेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2023 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी गं मस्त लेखन. मस्त आठवणी. लेखन आवडलं. सगळ्या आठवणी भारी. सर्व वाचकांना लिहिते करणा-या. तर, ऋतु म्हणशील आजी तर, तरुणपणात पावसाळा आवडायचा. तिच्या गावाकडे पाऊस पडला की आपल्याही गावातही पाऊस व्हायचा. दोन-चार थेंब तर आठवणींचे येऊन जायचे. तेव्हा पाऊस आवडायचा. आता वयपरत्वे म्हणे तिकडे ब्लडप्रेशरच्या गोळ्या. इकडेही तसंच थोड्याफार प्रमाणात तर, पाऊस असा विविध आठवणी घेऊन येतोच येतो. बाय द वे, पाण्याची भिती म्हणजे वाहत्या पाण्यातील साचलेल्या पाण्यातील खड्ड्यात फोर व्हीलरचं तर एक चाक कायम अडकण्याची भिती वाटते. एवढं भितीदायक सोडलं तर पाऊस आवडतो. आजी प्रत्यक्षातला पाऊस आवडतो तसा सिनेमातला म्हणशील तर दीठीतला आवडला. सिनेमाभर पाऊस पडतो.

थंडी विशेष आवडावी इतकं तिचं कौतुक नाही. पण, नौकरीच्या गावी थंडीच्या दिवसात मंदिरात भजनं करणा-या वारक-यांबरोबर एक दोन भजनं ऐकण्यातली मजा भारी. गुळाचा चहा यायचा भारी वाटायचं. काही अभंग-ताल-नाद अहाहा. भारी एकदम ती थंडी मस्तच. लहानपणी शेकोटीत 'सासू' आणावी लागे. सासू म्हणजे पाचट, काड्या, कागदं जमा करुन आणायचं आणि मग शेकायला यायचं. ती थंडी शेकोटी भन्नाट. थंडीत लाड वाढतात शरीरास पौष्टीक सकस आहाराच्या गप्पा. आता काही मोठी मुलं थंडीचं उष्णमय द्रव्याबद्दल बोलत असतात. आपण दुर्लक्ष तर, अशी वेगवेगळी थंडी.

म्हैसमाळ म्हणजे आमच्या छ.संभाजीनगरातलं काय ? पूर्वी दूरदर्शनचा सेटप तिथे होता. मोठमोठ्या छत्र्या तिथे लावलेल्या. मोठा टॉवर खास बघायला शहरवासी तिथे जायचे. आताही लोक तिकडे गर्दी करतात. पण, मुलं मुली, महिला-पुरुष काही असे तसे त्यामुळे त्या छोट्याशा हीलष्टेशनला गर्दी वाढली आहे. इतकी की आता तिकडे नको असे म्हणायची वेळ आली आहे. असं सगळं.

आजी तुम्हाला खूप हजारो वर्षाचं दीर्घायूष्य लाभो. रावसाहेबांच्या एका लेखाची मला आठवण येते. ’मरणा तुझा काय तेगार’ ची आठवण झाली. जालावरील रावसाहेबांनी त्याबद्दल खूप वर्षापूर्वी इकडे मनोगतवर लिहिलं होतं मला कायम त्याची आठवण होते. रावसाहेबांच्या लेखनाची ओळख झाली ती याच लेखापासून.

आजी तुमचं लेखन गप्पांची मैफिल असते. घमील्यात फळ्या टाकून शेकत तुमच्या गप्पा आठवणी निवांत ऐकत राहावे असे आणि लेखाला दीर्घ प्रतिसाद उमटत जातो तो असा. तहे दिलसे शुक्रिया. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

नचिकेत जवखेडकर's picture

27 Dec 2023 - 8:42 am | नचिकेत जवखेडकर

खूप छान लेख आजी. एकेक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो तुमच्या लिखाणातून.

एकदा मी आमच्या कंपनीतल्या ग्रुपमध्ये बोलत असताना ठंड लग रही हैं च्या ऐवजी ठंड बज रही हैं असं म्हटलो होतो ,त्याची आठवण झाली शीर्षक बघून :D

विवेकपटाईत's picture

27 Dec 2023 - 11:47 am | विवेकपटाईत

मस्त लेख.आजकाल दिल्लीत थंडीचे दिवस कमी झाले आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Dec 2023 - 11:56 am | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही नोएडा जाणार होतात ना?? :)
दिल्ली काही सूटंना असं दिसतंय.