"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी

अहिरावण's picture
अहिरावण in जनातलं, मनातलं
19 Aug 2023 - 7:11 pm

माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले. रमामाधव यांच्यातील काही हलके फुलके नर्मविनोदी प्रणय प्रसंग त्याकाळातील माझ्या वयाला मोहवणारे वाटले आणि अखेरची ताटातुट गळ्यात आवंढा आणणारी होती. काकापुतण्यातील ताणतणावाचे प्रसंग बरी अद्दल मोडली अशा पुटपुटीत बदलुन हाणला मस्त अशा मांडीवर थाप मारत दाद देण्यापर्यंत प्रसंगी जात असे. हे सर्व दहावी पर्यंत येईपर्यंत तीन चार वेळेस नक्की झालं असेल. अर्थात त्याकाळात अशीच दाद वीरधवल, कालिकामुर्ती इत्यादी कादंबरींना सुद्धा दिली जात असे. खरी गोष्ट ही होती की माझ्या मनात इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्‍या विवेकाचा अभाव होता.

आजही मी जेव्हा अशा विवेकाबद्दल बोलतो तेव्हा तसा विवेक माझ्या ठायी आहे असा माझा अजिबात दावा नाही. परंतु असा विवेक असावा अशा पद्धतीचे भान मला आज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामताबद्दल विरोध असु शकतो परंतु असा विरोध नोंदवण्याआधी माझे मत समजुन घेतले जावे अशी माझी माफक अपेक्षा आहे. इतिहासकालिन कादंबरी आणि काल्पनिक कादंबरी यामधे प्रमुख भेद हा असतो की दोन्ही मधील व्यक्तिरेखा पुर्णपणे भिन्न असतात. इतिहासकालीन कादंबरीमधील व्यक्ती प्रत्यक्षात जीवन जगलेल्या असतात. त्यांच्या संबंधी, त्यांच्या गुणावगुणांविषयीचे उल्लेख कुठे न कुठेतरी नोंदले गेलेले असतात. अशा व्यक्तिंचे चित्रण करतांना त्यांच्या या उल्लेखांना बाजुला सारता येणे अवघड असते. काल्पनिक व्यक्तिरेखा आपण हव्या तशा गुणांची बनवु शकतो. प्रसंगी त्यांच्यातील मनुष्याला बाजुला सारत सुपरहिरो बनवु शकतो. मात्र ऐतिहासिक कादंबरीमधे हे घडणे अवघड असते. पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात. भारतासारख्या इतिहासाबद्दल अक्षम्य बेपर्वाई असलेल्या पण इतिहासाबद्दल अत्यंत उर्मट अहंभाव असलेल्या देशामधे ऐतिहासिक कादंबरीच्या नावाखाली वाटेल ते दडपणे गेल्या काही वर्षांमधे सुरु झाले आणि तशा कथानकांमधुन पुढे आलेला इतिहास हाच खरा इतिहास आहे अशी भ्रामक समजुत विशेषत: महाराष्ट्रात पसरली. अशा कथानकांमधले अग्रेसर नाव स्वामी कादंबरी आहे. आज मला स्वामी कादंबरी अजिबात आवडत नाही. मी आजही तिचे वाचन करेन परंतु काही वर्षांपुर्वी ज्या भावुकतेने मला ती कादंबरी आवडली होती तशी आज आवडत नाही.

स्वामी कादंबरी ज्या काळात आली त्या काळात साहित्य हे ब्राह्मणांचे ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले अशा एका परिघात अडकलेले होते. नाही म्हणायला इतर लेखक होते, परंतु त्यांचा आवाका मर्यादीत होता आणि त्यांची मजल पुणे वा दादर मधुन शाबासकी मिळावी इतकाच होता. त्यापलिकडे वाचकवर्गच नव्हता आणि प्रकाशन व्यवसाय मक्तेदारी असल्याने वेगळे काही लिहिलेले छापले जाण्याचा संभव नव्हता. अहो रुपम अहो ध्वनी करुन पाठखाजवणी करुन पैसे कमवणे आणि जमल्यास नाव कमवणे हे उद्देश असल्यावर जशी साहित्यनिर्मिती होईल ती तशी त्या काळात झाली. बहुधा हे पुरातन काळापासुन आहे. मुद्दा हा आहे की अशा काळात एखादी कादंबरी जी ब्राह्मणांची अहंता जोपासेल, त्यांच्या गतकालीन वैभवाची (!) जाण करुन देईल, त्यांच्या अक्षम्य चुकांवर पांघरुण घालेल नव्हे त्यांचा उल्लेख सुद्धा टाळेल, देव देश आणि धर्माच्या पेल्यातील अमृत प्यायला देऊन निवांत झोप आणेल, वर्तमानातील समस्यांना क्षणभर अंधारकोठडीत टाकून कर्तृत्वाचे धगधगते पलिते ह्या हातातुन त्या हातात झेलत भुतकाळातील तथाकथित संग्राम सावल्यांच्या खेळाच्या रुपात मांडून जागरणाने डोळे विस्फारत अभिमानाने डोलवायला लावेल अशा कथानकाची गरजच त्या काळात निर्माण झालेली होती. ती गरज स्वामीने पूर्ण केली.

४८ च्या गांधीहत्येनंतर ब्राह्मणांचे सामाजिक आयूष्य संपले. राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले. ५२ चा कुळकायदा ब्राह्मणांचे आर्थिक आयुष्य संपवणारा ठरला. अशा प्रकारे २० ते ५२ अशा सुमारे ३०-३५ वर्षांच्या आत गेली दोन ते तीन हजार वर्षे भारतात आणि महाराष्ट्रात समाजाच्या जडणघडणीवर ब्राह्मणांचा पगडा होता तो संपून गेला. तसा तो सातव्या आठव्या शतकात मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासुन संपू लागलाच होता. आणि सुरु झाला होता एक काळा कालखंड ज्यामधे अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल ते करण्याचे उरफाटे धंदे. इस १००० च्या पुर्वीचा ब्राह्मण आणि इस १००० नंतरचा ब्राह्मण यामधे प्रचंड फरक आहे. अगदी जसा वैदिक कालखंडातील सर्वशक्तीमान, दयाळु राजा इंद्र आणि पुराणकथांमधुन समोर आलेला लंपट, लबाड इंद्र यांच्या सारखा. याचा अर्थ इस १००० नंतरचे सगळेच ब्राह्मण वाईट असा अर्थ नाही. समाजातील इतरही घटक साथीला असतांना जे घडू शकते तेच ह्या कालखंडात झाले. समाजातील योग्य घटकांनी अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले की समाजाचे पतन निश्चित होत असते. ब्राह्मणांचे तेच झाले. वैयक्तिक लाभ अन हिशेब यांच्या नादात पेशवाई पतन पावली. नव्या साम्राज्यात कारकुनीशिवाय काही करता आले नाही. थोडेफार बरे निपजले ते फासावर गेले किंवा समाजाकडून धिक्कारले गेले. टिळकांच्या अस्ताबरोबर ब्राह्मणांची राजकीय घुसमट झाली. ६० च्या दशकात ब्राह्मण समाज म्हणून संपलेला होता.

अशा वेळेस स्वामी कादंबरी समोर आली. ब्राह्मणांची थोडीफार जमीन उरली होती तिचे वाटणीवरुन कज्जे चालु होते. नोकरी करुन आपण बरे आपली बायको बरी अशी विचारसरणी दृढ होत होती. एकत्र कुटुंब भांडणात तुटत होते किंवा सकाळ संध्याकाळ भांडे आदळत दात ओठ आवळत होते. तिन्ही लोकी भ्रष्ट पण आम्हीच श्रेष्ट असा फुकाचा अहंभाव वाढत होता. हा आपला तो त्यांचा असे वर्गीकरण मनात सुरु झाले होते. गाव सोडून शहरात आल्यामुळे गावची बलुतेदारी आणि जातीव्यवस्था सुटली होती. पण त्यामुळे इतर जातीच्या लोकांशी मिसळून वागण्याची गरज संपली होती. सोसायटीत आजुबाजुला ब्राह्मणच असावे असा आग्रह आणि कटाक्ष पाळला जात होता. त्यामुळे गावाकडुन शहरात विशिष्ट उपनगरातच घर घेतले जात होते. या सर्व घडामोडीत आपण ब्राह्मण असून धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार पैसे गाठीला नाहीत ह्याचा विचार न करता जुनी कर्मकांडे मात्र अगदी व्यवस्थित पुन्हा सुरु केली होती. प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता. मानपान देणे घेणे यातच पुरुषार्थ शोधत होता. अशा ब्राह्मण मनाला स्वामी कादंबरीची भुरळ पडली.

काका पुतण्याच्या भांडणात, माधवरावाच्या देवभक्तीत, लांबुन लांबुन केल्या जाणार्‍या प्रेमकुजनात, संतापुन चाबकाचे फटके देऊन शासन करणार्‍या माधवरावात, हताश गोपिकाबाईत, राघोबादादात, नानात प्रत्येकात ब्राह्मण समाज स्वत:ला शोधत होता. स्वत:ला रमवत होता. गतकाळाच्या स्मृतीमधे आजचा वर्तमान विसरत होता. ब्राह्मणसमाजाने स्वामीला डोक्यावर घेतले. त्या कादंबरीत खरे किती खोटे किती हा संशोधनाचा विषय आहे. कादंबरी आवडलेल्यांना त्याची फिकीर नाही. हीच गोष्ट संपूर्ण पेशवाई बद्दल आहे. हीच गोष्ट इतिहासातील कुठल्याही कालखंडाबद्दल आहे. इतिहास कसाही असो कादंबरी आम्हाला हवी तशीच हवी ही वाचकांची मागणी आहे. ही मागणी स्वामी पूर्ण करते. ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्‍याचदा आढळले आहे. त्याचमुळे नंतर इतर समाजातील लोकांना सुद्धा स्वामी कादंबरी आवडु लागली. कारण समस्या सर्वच समाजात असतात. आणि वर्तमान विसरुन भुतकाळात रमायला अनेकांना आवडते.

स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही. पटावी असा माझा आग्रह नाही. माझ्या कारण मीमांसेमधे काही चुका असण्याची शक्यता मी नाकारत नाही. कालानुरुप माझी मते बदलत असतात त्यात मला कमीपणा वाटत नाही. स्वामी मला का आवडत नाही याची कारणे तुम्ही शांतपणे वाचलीत याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि हे आभार नोंदवणे मला माझे कर्तव्य वाटते.

मुक्तकमत

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

19 Aug 2023 - 8:25 pm | अथांग आकाश

परखड मुक्तक आवडले!
0

चित्रगुप्त's picture

19 Aug 2023 - 8:36 pm | चित्रगुप्त

प्रांजळ लिखाण एकंदरित आवडले. वाचनाबद्दलच्या लोकांच्या आवडीनिवडी, दृष्टीकोण वगैरे कालानुसार कसे बदलत जातात याच्यावर उत्तम प्रकाश टाकला गेला आहे असे वाटले.
माझे शिक्षण मध्यप्रदेशातील इंदूरात नववी पर्‍यंत मराठी शाळेत झाले. नववीत साने गुरुजींची 'क्रांती' कादंबरी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून होती. त्याच सुमारास लायब्ररीतून आणून अर्नाळकरांच्या रहस्यकथा वगैरे वाचायचो तेंव्हा (१९६७ -७० चे सुमारास) 'स्वामी' वाचल्याचे आठवते. परंतु मी भारून वगैरे गेलो नव्हतो. त्याकाळात लोकप्रिय असलेले 'गीतरामायण' तर मला अजिबात आवडायचे नाही. माझी आवड जरा अजबच होती. तेंव्हाच वाचलेले जे. कृष्णमूर्ती यांचे 'मुक्त जीवन' वाचून मी अगदी झपाटून गेलो होतो, आणि माझे आयुष्य बदलून टाकण्याचे (दोन वर्षे इंजिनियरिंग कॉलेजात शिकून मग ते सोडून चित्रकलेला वाहून घेणे) श्रेय मुख्यतः 'मुक्त जीवन' पुस्तकालाच द्यावे लागेल. त्याच काळात 'व्यायाम ज्ञानकोष, डॉ. गणपुले यांचा मानसशास्त्रावरील 'मानसोन्नती' हा अद्भुत ग्रंथ, 'जगात वागावे कसे' 'मुंबईचे वर्णन' रमेश मंत्री, जयवंत दळवी, आचार्य रजनीश वगैरेंची पुस्तके आणि मुख्यतः दासबोध वगैरे वाचायचो. वाचनाची नोंद ठेवायचो.
--- महाराष्ट्राबाहेरच वास्तव्य घडल्याने ब्राम्हण-ब्राम्हणेतर वगैरे बाबींशी संबंध आला नाही. होळकरांमुळे तात्कालीन इंदुरात 'धनगर' समाजाला मानाचे स्थान असले, तरी होळकरांच्या राज्यात एकंदरित ब्राम्हणांना चांगले स्थान होते असे आठवते. असो.
--- इथे 'स्वामी' बद्दल वाचून हे सगळे आठवले, आणि त्याकाळी लिहीत असलेल्या रोजनिश्या आता वाचायला हव्यात हे नव्याने जाणवले.

> राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले.

ब्राह्मणांचे राजकीय आयुष्य संपले ते १९९० च्या मंडल-कमंडल ध्रुवीकरणाच्या नंतर. अगदी पुण्यात म्हणाल तर टिळकांच्या नंतर गाडगीळ, कलमाडी यांनी दीर्घ काळ पुण्याचे राजकारण चालवले, काल-परवापर्यंत गिरीश बापट होतेच की. १९९०-२००० पर्यन्त ब्राह्मणांनी अनेक सर्वोच्च पदे भूषविली आहेत, नुसते देशाचे पंतप्रधानपद पाहिले तर त्यात कित्येक ब्राह्मण आहेत.

अहिरावण's picture

21 Aug 2023 - 2:16 pm | अहिरावण

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी जेव्हा ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व संपले असे म्हणतो तेव्हा ब्राह्मणांचे समाज म्हणून असलेला दबाव, त्यांच्या हिताला साधक ठरतील अशा कृती शासन्/प्रशासन स्तरावर करुन घेणे, हितास बाधक ठरणार्या कृती बासनात बांधायला लावणे अशा प्रकारे गट म्हणून काम करणे अपेक्षित आहे. जे इतर समाज सहज करत असल्याचे दिसते. आपण दिलेली उदाहरणे ब्राह्मण व्यक्तिंची आहेत, आणि अशी शेकड्याने आढळतील.

जैन मारवाडी समाजाचा एकही पंतप्रधान झाला नाही पण त्यांचा राजकारणातील प्रभाव (कमी लोकसंख्या असूनही) लक्षणीय आहे.

चुभुद्याघ्या

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 4:59 am | चौकस२१२

अहिरावण आपण म्हणता तसे ३.५% चा राजकीय दबाव / अस्तित्व संपले .. हे खरे असले तर चांगलेच आहे ( आणि सहमत आहे कि तसे ते संपले आहे, ज्या व्यक्ती ब्राह्माण असून पुढे येत आहेत आहे ते केवळ वयक्तिक कर्तृत्व , जात म्हणून न्हाई आणि झालाच तर जातीचा त्रासच ) )

पण साहेब हळू आवाजात बोला, कारण असे कि हे आपले विधान जर व्हायरल झाले ना तर काही राजकीय गटांचा "झोडप शेंडी मिळावं मते " हा धंदा राज्यात चालू आहे त्याला खीळ बसेल....

तेव्हा असले काही बोलू नका . नॅरेटिव्ह एकच पाहिजे "पगडी नको पागोटे ... हाणत ऱ्हायचंच

आंद्रे वडापाव's picture

25 Aug 2023 - 11:09 am | आंद्रे वडापाव

माझ्या मते .. गुप्त काळापासून ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व प्रभुत्व (ब्राह्मणांचे समाज म्हणून असलेला दबाव, त्यांच्या हिताला साधक ठरतील अशा कृती शासन्/प्रशासन स्तरावर करुन घेणे, हितास बाधक ठरणार्या कृती बासनात बांधायला लावणे अशा प्रकारे गट म्हणून काम करणे ) शिखर स्थानाला पोहोचले ...
ते उत्तरोत्तर शिखरावरच राहिले ते आजतागायत...

त्यामुळे " ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व संपले " अश्याप्रकारे कोणी नॅरेटिव्ह सेट करत असेल ... तर ते " ब्राह्मणांचे राजकीय प्रभुत्व वाढावे" याचं अंतर्यामी अजेंड्याने काम करत असणाऱ्या एका संघटनेचे , स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर चा एक भाग असावा, असे मला वाटते ..

बाकी लोकसंख्येतील प्रमाणाबाबत काही जण गळे काढताना आढळतात ..
पण याच डेटा पॉईंटच्या बाजूला, आजपासून मागील १०० वर्ष्यातील

"लोक संख्येतील % टक्के " आणि "प्रशासनातील %" असा आलेख मिळाला असता तर बरं झालं असतं ... असे वाटते ..

म्हणजे दलित, ओबीसी यांचे सुद्धा आलेख , अभ्यासता आले असते ...

मागील १०० वर्ष्यातील, विविध समाज जातीचा जीडीपी पर ईअर , यांचे आलेख मिळाले असते तर बरं झालं असतं ... असे वाटते ..

तेव्हाच निश्चितपणे आपल्या सर्वांना यावर भाष्य करता येईल ...

टर्मीनेटर's picture

19 Aug 2023 - 9:31 pm | टर्मीनेटर

पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात.

+१०००
तेवढ्यावरच ते लोकं आणि नाटककार थांबत नाहीत, अनेक ऐतिहासीक व्यक्तीमत्वांना व्हीलन/बदफैली म्हणुन पेश करण्यातही ते मागे नाहित! साक्षात छत्रपती संभाजी महाराज तसेच आनंदीबाई (ध चा मा वरून कुठल्याही सबळ पुराव्याविना बदनाम केल्या गेलेल्या) आदी मंडळी सुद्धा त्यांच्या तावडीतून सुटली नाहीत.
अजुन एक पात्र आहे, ‘समशेर बहाद्दर’ ह्याचे मला वाटतं विश्वास पाटलांच्या पानिपत मध्ये असं काही वर्णन केलंय की मी त्यावेळी ‘बाजीराव का बेटा’ असलेल्या ह्या पात्राच्या गरीमेने भारावुनच गेलो होतो 😀
ते पात्र खरेच तसे पराक्रमी वगैरे होते की विश्वास पाटलांनी ते ग्लोरीफाय केले हे मी पुढे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही कारण त्या दारूण पराभवाच्या इतिहासांत मला तरी अजिबात स्वारस्य नाही, मात्र कोणा जाणकाराने त्यावर प्रकाश टाकल्यास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल!

> ते पात्र खरेच तसे पराक्रमी वगैरे होते की विश्वास पाटलांनी ते ग्लोरीफाय
केले

त्यांच्याबद्दल पुरेशी महितीच इतिहासात मिळत नाही, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची असा तो प्रकार आहे. कादंबरीकार इतिहासातील असेच भाग निवडतात कारण कल्पनेच्या घोड्याला इथे फुल्ल मैदान मोकळे असते.

टर्मीनेटर's picture

19 Aug 2023 - 11:42 pm | टर्मीनेटर

अच्छा, म्हणजे जंगल मे मोर नाचा किसने देखा टाईप प्रकार आहे तो…
तुमच्या सारख्या अधिकारी व्यक्ती कडुन माहिती मिळाली ह्यासाठी धन्यवाद मनो…

Bhakti's picture

19 Aug 2023 - 10:20 pm | Bhakti

स्वामी कादंबरी वाचून मीही भारावून गेले होते,मैत्रिणींना घेऊन थेऊरची समाधी पहायला गेले होते, भरभरून त्यांना सांगत होते बहुतेक रडले होते (हा हा)!

स्वामी कादंबरी वाचून मीही भारावून गेले होते,मैत्रिणींना घेऊन थेऊरची समाधी पहायला गेले होते, भरभरून त्यांना सांगत होते बहुतेक रडले होते (हा हा)!

... लहानपणी बाहुल्यांशी खेळणे, आई-बाबांचा हात धरून चालणे, बागुलबुवाला घाबरणे ... त्यानंतरच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर त्या त्या काळी जे जे खरे वा खोटे वाटले, आवडले वा नावडले, करावेसे वा न करावेसे वाटले, ... त्या गोष्टी आणखी पुढील आयुष्यात हास्यास्पद वाटणे, वा त्याबद्दल खंत/अपराधीपणाची भावना/पश्चात्ताप वाटणे, हे तितकेसे योग्य नाही. अशा पश्चात्तापाबद्दलही आणखी पुढे कधीतरी पश्चात्ताप वाटू शकतो. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. जे काल होते ते आज नाही आणि आजचे उद्या नाही .... हे असेच चालत रहाणार.. कश्याला अपराधी वाटून घ्यायचे...वगैरे.

आपल्या मतांचा आदर आहेच.
तेव्हाच्या आणि आताच्या दोन्ही भावनांशी प्रामाणिक आहे त्यामुळे पश्चात्ताप,अपराधी वगैरे काही नाही वाटत.

भागो's picture

20 Aug 2023 - 10:07 am | भागो

लेख आवडला हे प्रथम नमूद करतो. ब्राह्मण समाजाची घालमेल, ना इधारका ना उधारका, फुका राष्ट्राभिमान पण अमेरिकेची ओढ सोडवत नाही, कॉलेजात वैज्ञानिक दृष्टीकोनाशी परिचय झाला, तो बराचसा पटला पण रूढी सोडवत नाहीत, मग धर्म आणि विज्ञान ह्यांचे सुंदर "फ्युजन" करण्याचा केविलवाणा प्रयत्न, लतादीदी -पुल-जीए ह्यांच्या पलीकडे जग आहे ह्याची जाणीव नाही, अशी ही कुतरओढ! आम्ही जेव्हा कोलेजात होतो तेव्हा वाटायचे कि हे सगळे बदलेल पण आज जेव्हा शाळेतले सवंगडी पत्रिका मागताना दिसले ते बघून धक्का बसतो
. महाराष्ट्र हा इंग्लंड, फ्रांस. जर्मनी, जपान एव्हढाच मोठा देश आहे/असावा. पण त्या प्रत्येक देशाला स्वतःची प्रगत भाषा आहे. इंग्लिश शब्दांना मराठी/संस्कृत शब्द शोधायची गरज पडत नाहीये. अग्निरथगमनागमनदर्शकताम्रलोहपट्टीका! माझा मित्र हिंदू-हिताची शिष्यवृत्ती घेऊन जपानला इलेक्ट्रॉनिक्सच्या उच्च शिक्षणासाठी गेला होता. त्याला प्रथम जपानी भाषा शिकावी लागली.
आता राहिल्या मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या. मी त्यांच्याकडे "हासिक" कादंबऱ्या म्हणून बघतो. उगाच भारून जायचे काम नाही. उद्या छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, सवाई माधवराव ह्यांनी बाय चान्स ह्या कादंबऱ्या वाचल्या तर ते लेखकांना हत्तीच्या पायाखाली...
जाऊ देत झाल.
अर्थात अपवाद आहेत, असणारच! त्या शिवाय का आपण इथपोत्तर आलो?

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2023 - 11:13 am | कर्नलतपस्वी

यावर बरेच काही अवलंबून असते.

इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्‍या विवेकाचा अभाव होता.

देसाई, पाटलांची कादंबरी मनोरंजन म्हणून वाचली जाते. राजवाडे,बलकवडे यांचे ग्रंथ संदर्भ म्हणून आभ्यासले जातात. मनोरंजक साहित्य निर्मीती मधे लेखकास मर्यादित बंधने तर काही प्रमाणात कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य असते. याची निर्मीती वाचक वर्ग, व्यावसायिक उद्देश इ. लक्षात ठेवून होते.
या विरुद्ध संशोधनात्मक साहित्य केवळ इतिहासाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन सत्य उजेडात आणणे असल्यामुळे ते रुक्ष वाटते व सर्वसामान्य वाचक विरंगुळा म्हणून वाचत नाही.

वाचकाचे वय असते त्या प्रमाणेच पुस्तकांचेही वय असते. गुलबकावली,रेपोनझील मधे रमणारा बालक वय वाढले की सिदंबादच्या सफरी व नारायण धारपांकडे वळतो. नंतर काकोडकर त्याला रिझवतात,असो याला काही अपवाद असतातच.

कधीकाळी आवडलेली 'स्वामी',वयाच्या दुसर्‍या टप्प्यात इररिलीव्हंट आणी अतिरंजित वाटू शकते.

प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता.

व्हॅलेंटाइन मरून किती वर्ष झाली,बहिण भावापेक्षा मोठी ,सक्षम असली तरीही राखी बांधते. मुंजीचे औचित्य संपले तरीही दुरदूरर्चे नातेवाईक, मित्र जमा होता. संपलेल्या,संपत आलेल्या नात्यांचे पुनरूज्जीवन होते. प्रत्येक गोष्टीत औचित्य शोधत बसलो तर सर्व काही फाफटपसारा वाटू शकेल. प्रसाद वाटणारा बुंदीचे लाडू कुणाला बेसनाचा गोड पदार्थ वाटू शकतो.

सदर लेख, स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही.
यावर समारोपीत केल्यामुळे,ब्राह्मण, पेशवाई आणी इतर गोष्टींची दखल घेतली नाही.

भागो's picture

20 Aug 2023 - 11:51 am | भागो

देसाई, पाटलांची कादंबरी मनोरंजन म्हणून वाचली जाते>>> कर्नल साहेब, आपण विचारी विचक्षण वाचक आहात. म्हणून ठीक आहे. इतरांचे तसे नसते. उदा.
-- शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव ह्यांचे काय काय संबंध होते? इतिहास कुठे संपतो आणि कल्पना विलास कुठे सुरु होतो?
-- रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे? राम सेतू या मागचे सत्य काय आहे ?
हे असले प्रश्न निर्माण होतात. त्याचे काय करायचे?

कर्नलतपस्वी's picture

20 Aug 2023 - 12:23 pm | कर्नलतपस्वी

शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव ह्यांचे काय काय संबंध होते? इतिहास कुठे संपतो आणि कल्पना विलास कुठे सुरु होतो?

जिथे इतिहासाचा वापर स्वार्था साठी होतो, मग तो व्यवसायिक अथवा राजकिय असो आणी सारासार विवेकबुद्धी आढ्याला टांगणीवर टाकतात तिथे.

रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे? राम सेतू या मागचे सत्य काय आहे ?
हे अधिकारीक पणे सांगण्या इतके मला ज्ञान नाही. एवढेच सांगू शकतो हजारो वर्षानंतरही आय्योध्या आहे,रामेश्वरम् आहे,श्रीलंका आहे ,कुरुक्षेत्र आहे त्या अर्थी या गोष्टी घडल्या असाव्यात. काळाच्या ओघात त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मी अभ्यासक नाही त्यामुळे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत,
ते ते माझे.....

भागो's picture

20 Aug 2023 - 2:09 pm | भागो

कर्नल साहेब
भावना पोचल्या. आपल्या मतांचा आदर आहे.

अहिरावण's picture

21 Aug 2023 - 2:19 pm | अहिरावण

आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल आभारी आहे. किमान लेखाची दखल घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली मते वाचण्यास आणि (जमल्यास) खोडून काढण्यात अथवा मान्य करण्यात बैद्धिक आनंद मिळाला असता, तो राहीला. हरकत नाही.

ऐतिहासिक गाजलेल्या कादंबऱ्या मी वाचल्या नाहीत.

अहिरावण's picture

21 Aug 2023 - 2:19 pm | अहिरावण

एका महान करमणुकीला आपण मुकला आहात.

चित्रगुप्त's picture

21 Aug 2023 - 4:49 pm | चित्रगुप्त

एका महान करमणुकीला आपण मुकला आहात.

--- हे बरीक खरे. कंजूस यांच्याप्रमाणे मी फार गवगवा झालेले सिनेमे बघत नाही. उदा. शोले, बॉबी, मुगले आझम, जोधा अकबर, वगैरे. मात्र दुर्दैवाने परवा 'गदर २' बघायला घरच्यांबरोबर गेलो, पण 'करमणूक' सुद्धा न होता वैतागच आला. असो.

हा प्रकार इतका कृत्रिम असतो कि काही काळानंतर त्याचा उबग येतो. याची सर्वसाधारण उदाहरणं बघू यात.

टीप: उदाहरणं काल्पनिक आहेत आणि मुद्दा विशद करण्यासाठी कदाचित माझ्याकडून अतिशयोक्ती होऊ शकते.

चित्रदर्शी लेखन: 'म्हणजे?', महाराज उद्गारले. त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्मशी आठी उमटली आणि आवाजात आपोआप करारीपणा आला आणि जिरेटोपावरील मोत्यांची माळ थरथरली.

चित्रदर्शी निवेदन: तृषार्त धरणीने पहिल्या पावसाचा आवेग आपल्यात सामावून घ्यावा तशी xxxx. यात जमेल तशी वाचकांनी भर घालावी. अशी वाक्य उच्चारतांना आवाजात कातरता, हळवेपणा जितका जास्त तितका प्रेक्षकांचं भारावलेपण जास्त.

चित्रदर्शी चित्रीकरण: खास दिवाणखान्यातील प्रेक्षकांसाठी असलेल्या मालिकांमधील एक प्रसंग. 'अगं बाई वन्स अचानक इकडे?' इथे बोलणारी स्त्री व्यवस्थित पदर ओठांपाशी नेऊन आश्चर्य व्यक्त करणार, मग क्रमाने वन्संच्या चेहेऱ्यावरील अवघडले भाव, इतरांचे गोरे मोरे झालेले चेहरे, आणि कुणाच्यातरी चेहऱ्यावरील करारी भाव.

सरजी प्रतिसाद एकदम पातला.
मी जेव्हा वर लिहिले कि ऐतिहासिक नाही तर "हासिक" म्हणजे हास्य निर्माण करणारे. ते गरकन, सरकन सोडून दिले तरी पात्रांची खासगीतील संभाषणे म्हणजे अगदी कहर!

सरजी प्रतिसाद एकदम पटला.
मी जेव्हा वर लिहिले कि ऐतिहासिक नाही तर "हासिक" म्हणजे हास्य निर्माण करणारे. ते गरकन, सरकन सोडून दिले तरी पात्रांची खासगीतील संभाषणे म्हणजे अगदी कहर!
पटला!
हा हा हा हासिक झाला.
चूक सुधारली.

अहिरावण's picture

21 Aug 2023 - 2:24 pm | अहिरावण

लय भारी !

सौन्दर्य's picture

21 Aug 2023 - 8:54 am | सौन्दर्य

मी देखील स्वामी कादंबरी वयाच्या तेरा-चौदा ह्या वयात वाचली व तिचा जबरदस्त पगडा मनावर बसला. दुसर्यांदा ती अंदाजे बावीस -तेविसाव्या वर्षी वाचली. अर्थात पहिल्यांदा वाचली तेव्हढी ती उत्कट किंवा भारावून टाकणारी वाटली नाही. त्याची अनेक कारणे आहेत, असू शकतील. वयाच्या प्रत्येक वयात अमुक एक प्रकारचे साहित्य आवडून जाते पण ते कायम आवडत राहील असे नाही, वयाप्रमाणे येणारी परिपक्वता किंवा वाचनाचा जो परीघ वाढत जातो त्यामुळे असे होत असते. असेच आपण पाहिलेल्या व आवडलेल्या सिनेमांविषयी देखील होते असे मला वाटते. अपवादात्मक सिनेमे आहेत अगदी नाहीतच असे नाही.

लेखकाने स्वामी कादंबरीचा आधार घेऊन ब्राह्मण समाजाचा जो उपमर्द करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अजिबात आवडला नाही. त्यामागचे कारण मी ब्राह्मण आहे म्हणून ते मला आवडले नाही असे नसून असा कोणत्याही एखाद्या जातीचा अपमान करणे हे सुसंस्कृतपणात बसत नाही असे मला वाटते. वेगवेगळ्या जातींच्या लेखकांनी त्यांच्या अनुभवाप्रमाणे लिखाण केले, त्यातील एखादा भाग किंवा वर्णन समोर घेऊन त्यावर वाटेल तेव्हढी टीका करता येते व ज्यांना ती करायचा अधिकार आहे त्यांनी ती करावी किंवा त्यांनी ती केली देखील पण त्यात लेखकाच्या जातीवर टीका करणे हे अनुचित आहे.

आता ब्राह्मणांनी काय केले किंवा आपले अस्तित्व कसे टिकवून धरले ह्या विषयावर लिहायला घेतले तर मुद्दा भलतीकडेच भरकटत जाईल म्हणून आवरते घेतो.

नमस्कार.

इतर कोणालाही जाणवला नाही पण आपणांस माझ्या लेखात ब्राह्मणांचा उपमर्द जाणवला याबद्दल मी दिलगीर आहे. आपण माझ्या कृतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून उदार मनाने दुर्लक्ष करावे आणि मुद्दा तेवढा घ्यावा असे सुचवतो.

बाकी मुद्देसुद अशा तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे, ती लवकर पूर्ण व्हावी ही अपेक्षा !

ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्‍याचदा आढळले आहे.
खरं आहे. प्रत्येकाला मनातून ब्राह्मण व्हायचे असते पण तसे बनायला बर्‍याच मर्यादा आड येतात.
मग ब्राह्मणांच्या बोलण्याची नक्कल करणे, मुद्दाम नाकात बोलणे असे काहीबाही उपद्व्याप केले जातात. शेवटी ब्राह्मण बनता नाही आले की शिव्या घालायचा असा बहुतेकांचा प्रवास असतो.

मी देखील स्वामी कादंबरी तुम्ही वाचली त्याच वयात वाचली पण मला काही भारावून गेल्यासारखे झाले नाही. कदाचित मी त्याच बरोबर दलित लेखकांचे देखील लिखाण वाचत असल्यामुळे तेवढा प्रभाव जाणवला नसेल. किंबहूना जास्त अलंकारिक भाषेमुळे मला ती भावली नाही. दलित साहित्य देखील सुरुवातीला चांगले वाटले. त्यांचे गावकुसाबाहेरचे जीवन, त्यांच्या हालाअपेष्टा वाचून मला स्वतःची चीड येत असे मात्र नंतर त्या लिखाणाचा कंटाळा यायला लागला. कोणत्याही दलित लेखकाची कादंबरी वाचली की तेच ते रडगाणे असायचे त्यामुळे कंटाळून वाचणे सोडून दिले.

अहिरावण's picture

21 Aug 2023 - 2:27 pm | अहिरावण

सहमत आहे. सध्याचे दलित, ग्रामीण, विद्रोही, सामाजिक किंवा लेटेस्ट फ्याशनचे असलेले समलैगिक, स्त्रीवादी, तृतीयपंथी लोकांचे जीवन रंगवणारे लेखन एकसुरी, बटबटीत, प्रसंगी शिराताण शिवीगाळ असे आढळते. सन्माननीय अपवाद नियम सिद्ध करणारे

सर्व वाचक, प्रतिसादकांचे आभार !

स्वधर्म's picture

21 Aug 2023 - 4:40 pm | स्वधर्म

इतिहास कादंबरीपेक्षा महत्वाचा हे पटतं. पण त्यातही जाम घोऴ आहे. उदा. पानसरे यांचे ‘शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज’ हे भाषण व गजानन मेहेंदळे किंवा निनाद बेडेकर या इतिहासकारांची भाषणे ऐकून शिवाजी महाराजांचा मुस्लिमांविषयीचा अगदी परस्परविरोधी दृष्टीकोन समोर येतो. पानसरे हे आवर्जून शिवाजी महाराजांची मूळ पत्रे वाचा असे सांगतात. मेहेंदळे व बेडेकर यांच्या भाषणात इतर इतिहासकार हेतूपूर्वक कसे चुकीचे लिहित आहेत आणि महाराजांचा लढा हिंदूहितासाठी व यावनी सत्ता उलथून टाकण्यासाठीच होता, असा सूर आढळला. ही सगळी भाषणे यूट्यूबर सहज सापडतील.

अहिरावण's picture

21 Aug 2023 - 6:59 pm | अहिरावण

हिंदवी स्वराज्य या नावामुळे अनेकांचा घोळ होतो की हे हिंदूंचे राज्य व्हावे अशी इच्छा आहे की काय ! परंतु (माझ्या मते) शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी म्हणजे येथे जन्म झालेला, या भुमीला आपला मानणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे असे स्थानदर्शक मत असावे. कारण, मुघल, तुर्क हे परक्या देशातील अशी त्याकाळात स्पष्ट भावना होती. त्यामुळे यावनी किंवा यवन याचा अर्थ पुराणकाळापासुन (आयोनियन) ग्रीक देशांपलीकडला प्रदेशातुन आलेले असा असावा. मुस्लिमांसाठी अनेकदा म्लेंच्छ असा शब्द वापरल्याचे दिसते.

पानसरे यांच्याबद्दल आदर बाळगुन सुद्धा अनेकदा त्यांची मते डाव्यांची (अनेकदा चुकीची असलेली) धारणा मांडणारी दिसतात. जी तरतम भावाने सहज दिसतात आणि दुर्लक्ष करता येतात.

अर्थात , आपण उल्लेख केलेली सर्व मंडळी महान आहेत. आपण त्यांच्या खिजगणतीत नाही.

सुबोध खरे's picture

22 Aug 2023 - 10:39 am | सुबोध खरे

शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी म्हणजे येथे जन्म झालेला, या भुमीला आपला मानणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे असे स्थानदर्शक मत असावे.

ही अत्यंत बुळबुळीत विचारसरणी आहे.

हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिँदूंचे स्वराज्य जेथे हिंदू धर्मियांना आपल्या आयाबहिणींना नासवण्याची/ बाटवण्याची भीती नसेल.

शिवाजी महाराजांच्यानंतर गेल्या ३०० वर्षाचा पाकिस्तान अफगाणिस्तान इराण बांगला देश या देशांचा इतिहास पाहिला तर या सर्व देशातून हिंदू आया बहिणींना जबरदस्तीने नासवले बाटवले जात आहे

असे असून आपण डोळेझाक करून हिंदू आणि हिंदवी मध्ये घोळ घालत बसलात तर निष्पन्न काहीही होणार नाही.

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवि स्वराज्यामुळे भारताचे संपूर्ण इस्लामीकरण थांबले आणि दक्षिणेतील बहुसंख्य सुंदर मंदिरे ध्वस्त होण्यापासून वाचली हि वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा.

अहिरावण's picture

22 Aug 2023 - 1:04 pm | अहिरावण

मालक ! जरा शांततेत घ्या ! एकदम हातघाईवर येऊ नका !
>>>ही अत्यंत बुळबुळीत विचारसरणी आहे.
असेलही. विनायक दामोदर सावरकर यांची विचारसरणी सुद्धा अशीच काही होती. आता आम्ही पण त्यांच्या पंक्तीत बसलो याचा अभिमान बाळगायचा की खेद ते नंतर पाहू.

>>हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिँदूंचे स्वराज्य जेथे हिंदू धर्मियांना आपल्या आयाबहिणींना नासवण्याची/ बाटवण्याची भीती नसेल.

असेलही. पण कुतुबशाहाशी आपल्या दख्खनीयांचे एकदिल एकमत झाल्यास तुर्क मोंगलांना सहजी परस्त करु अशी बोलणी काय गंमत म्हणुन झाली होती की काय?

>>>शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवि स्वराज्यामुळे भारताचे संपूर्ण इस्लामीकरण थांबले आणि दक्षिणेतील बहुसंख्य सुंदर मंदिरे ध्वस्त होण्यापासून वाचली हि वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा.

दख्खन वाचला ह्यात शंका नाही. आणि आम्ही ते कधीही नाकारणार नाही.

पण शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते आणि ते विश्वासु होते ह्याचे काय?
असो.

दख्खन वाचला ह्यात शंका नाही. आणि आम्ही ते कधीही नाकारणार नाही.
हे मान्य करताय हे हि नसे थोडके आणि उत्तर हि बहुल हिंदूच राहिला सुरवातीला तरी ...

पण शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते आणि ते विश्वासु होते ह्याचे काय?
आली गाडी मूळ रस्त्यावर !

अहो हेच तर जाणत्या राजाचे वैशिष्ट्य .. शिवाजी महाराजांचं काळात आधीच मुगल सत्तेत आणि धर्मांतर झालेलं हिंदू होते हे त्यांनाही मान्य करावेच लागले होते ,, त्यांना जाग आली कि ह्याला विरोध केला नाही तर कायमचे अंकित होऊ आणि स्वतःची ओळख ( धर्म / चालीरीती / परंपरा) हे सगळंच जाईल ...
म्हणून त्यांनी सुरवंट केली ( पॉसिटीव्ह ऍक्शन आजच्या भाषेत )
आता याचा अर्थ ना टोकाचं हिंदुत्ववाद्यांनी असा लावून नये कि छत्रपती अगदी "चला धर्म प्रसार करूयात म्हणून बाहेर पडले " तसेच तुमच्या विचारसरणी ने याचा गैरवापर करून "बघा महाराजांना हिंदू धर्माची फिकीर नव्हती आणि म्हणून ते कसे सर्वधर्मसमभावी "

महाराज सर्वधर्मसमभावी होतेच पण ते आजचं हुकलेलय व्याख्येप्रमाणे नाही

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 7:16 am | चौकस२१२

"सुरुवात केली" असे वाचावे

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 7:28 am | चौकस२१२

विनायक दामोदर सावरकर यांची विचारसरणी सुद्धा अशीच काही होती
सरळ काय ते बोला,,, पण त्याआधी तू नळीवरील लेखक विक्रम संपत यांच्या अनेक मुलाखती आहेत त्या पाहून घ्या

रजपुतांचे तसे मत नसावे. उदा जोधाबाई, मिर्झा राजे, उदयभानू इत्यादि. अजूनही असतील. शिवाजी महाराजांचे पिताश्री. जाऊ दे.

वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा.
हुकलेली डावी विचारसरणी एवढी "शातीर " आहे कि कळत असून सुद्धा ढोंग करायचे

स्वधर्म's picture

21 Aug 2023 - 9:18 pm | स्वधर्म

हे पटण्यासारखे आहेच. बाकी पानसरे मूळ कागदपत्रे बघून ठरवा, नुसते मी म्हणतोय म्हणून नव्हे; असे म्हणतात. त्यामुळे ते डावे किंवा कुठलेही असले तरी, हा खुलेपणा दखलपात्र. बाकीचे मात्र अधिकारवाणीने बोलतात, हा ठळक फरक स्पष्ट दिसतो.

हिंदवी स्वराज्य या नावामुळे अनेकांचा घोळ होतो की हे हिंदूंचे राज्य व्हावे अशी इच्छा आहे की काय !
जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते

सध्या जे "काही करा" पण शिवाजी महाराजांना हिंदू वैगरे पासून दूर करा हे जे टूल किट मधील हत्यार आहे त्याचा हा भाग
अर्थात माझे म्हणेन हे हि नाही कि सध्याच्या व्याख्येप्रमाणे त्या काली काही शिवाजी महाराज हिंदुत्व वैग्रे ( हा शब्द फार नंतर आला असावा नाही का ) पुरस्कारीत करीत फिरत होते .

गोष्ट सोपी आहे
१) बहुतेक समाज हिंदू होता
२) आक्रमणकारी जे होते ते त्यांचा धर्म स्थानिक समाजावर लाडात होते ) ( मुसलमानांनी आक्रमकपणे केला , ईस्ट इंडिया कंपनी ने पुढे धार्मिक प्रचार अप्रत्यक्ष रित्या केला पण इंग्रज सरकारने सत्ता आणि संपत्ती यावर भर आणि धर्माला जरा तरी बाजूला सारले )
३) सर्वांनां साथीला घेऊन राजय करणाऱ्या शिवाजी महाराजांना जसे अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे महत्वाचे होते तसेच बहुसंख्यांक समाजचे पण रक्षण करणे आवश्यक होते तर त्या अर्थाने "हिंदू धर्माचे संरक्षण करणारे होते " असे म्हणले तर का कोणाचं पोटात दुखते ?
४) धर्म बाजूला ठेवून स्वराज आधी मिळवणे हा मूळच हेतू होता

त्यांनी त्यांचे कर्म केले ...

सुबोध खरे's picture

22 Aug 2023 - 10:33 am | सुबोध खरे

शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवण्याच्या नादात त्यांना हिंदुपदपातशाही निर्माण करणारा किंवा धर्माचे रक्षण करणारा या पदापासून दूर नेले जात आहे.

केवळ स्वराज्य स्थापन करायचे असते तर त्यांच्यात आणि इतर सरदार मनसबदार यांच्यात काय फरक राहिल? धर्मावर अत्याचार होत असताना हे अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या विरोधात जीवावर उदार होऊन लढण्याचे काय कारण होते?

वडिलोपार्जित सरंजाम होताच कि

हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे.

मंदिरांचे उच्छेद आणि प्रजेला बाटवणे हे थांबवण्यासाठी धर्मरक्षक राजा असणेच आवश्यक होते.

आपल्या धर्माचे रक्षण करताना परधर्मावर आक्रमण केले नाही हा महाराजांचा मोठेपणा होता म्हणून त्यांना सेक्युलर म्हणण्याचा दळभद्रीपणा करण्याची अजिबात गरज नाही

शिवाजी महाराजांनी केवळ इस्लामी राज्यकर्त्यांना थोपवले असे नव्हे तर सर्वात पहिली घरवापसी सुद्धा केली ( नेताजी पालकर याना परत हिंदू धर्मात घेऊन).
तेंव्हा शिवाजी महाराज हे धर्मरक्षक हिंदू राजेच होते उगाच त्यांना सेक्युलर करण्याची राजकीय गरज असण्याचे सामान्य माणसांना अजिबात कारण नाही.

मुसलमानांची मते मिळवण्याची गरज असलेल्या राजकारण्यांना फाटा मारा आणि सत्य काय आहे ते समजून घ्या.

अहिरावण's picture

22 Aug 2023 - 1:07 pm | अहिरावण

तुमचा संदर्भरहीत अस्थानी प्रतिसाद आहे हे नमुद करतो आणि थोडं शांततेत घ्यायला शिका असे सुचवतो. मानाच असा आग्रह नाही.

डावे माझ्या डोक्यात जातात तसे उजवे सुद्धा जातात.

मी मध्यम मार्गी बुद्धाचा अनुयायी.

सुबोध खरे's picture

22 Aug 2023 - 7:30 pm | सुबोध खरे

या भूमंडळाचे ठायी

धर्मरक्षी ऐसा नाही

महाराष्ट्रधर्म राहिला काही

तुम्हा कारणे!

कित्येक दुष्ट संहारिला

कित्येकासी धाक सुटला

कित्येकासी आश्रयो जाहला

शिवकल्याण राजा!

हे समर्थ रामदास स्वामी नि सोळाव्या शतकात लिहून ठेवले आहे

अहिरावण's picture

22 Aug 2023 - 7:41 pm | अहिरावण

महाराष्ट्र धर्म म्हणजे काय यावर एक विस्तृत लेख लिहा.
कोणा कोणास संहारले? कोणा कोणास धाक लावला? कोणा कोणास आश्रय झाला?
कल्याण नेमके कसे आणि काय केले?
जरा शिवरायांच्या कार्याचा परिचय करुन द्या.
म्हणजे आमच्या सारख्या अजाण अडाणी मनुष्यांना जरा अक्कल येईल. कसे?

बाकी एखादे वाक्य मुळ लेखावर आले असते तर बरे झाले असते असे आम्हास वाटते. पण ते वाटणेच आहे. असो.

सुबोध खरे's picture

22 Aug 2023 - 7:57 pm | सुबोध खरे

ब्वॉर्र

सुरिया's picture

22 Aug 2023 - 2:44 pm | सुरिया

शिवाजी महाराजांनी केवळ इस्लामी राज्यकर्त्यांना थोपवले असे नव्हे तर सर्वात पहिली घरवापसी सुद्धा केली ( नेताजी पालकर याना परत हिंदू धर्मात घेऊन).
तेंव्हा शिवाजी महाराज हे धर्मरक्षक हिंदू राजेच होते उगाच त्यांना सेक्युलर करण्याची राजकीय गरज असण्याचे सामान्य माणसांना अजिबात कारण नाही.

हे असे नॅरेटिव्ह पसरवयाचे धंदेच घात करत आहेत.
नेतोजी पालकर ह्यांना हिंदू धर्मात घेण्याचे कार्य अप्रतिम असे राष्ट्रकार्य म्हणता येईल. किंबहुना त्यात आपणास एक संवेदीनशील नेता, काळाची आणि वेळेची गरज ओऴखणारा राजा दिसेल.
नेतोजी पालकर हे शूर योध्दे म्हणून ओळखले जात.अगदी त्यांना प्रतिशिवाजी असेही म्हणले जाते. अशा माणसांचे मोल राजे ओळखून होते. ज्यावेळी त्यांना परत स्वराज्यात येऊ वाटले तेंव्हा ते धर्म बदलून किंवा धर्मासाठी राजांकडे आले नाहीत. ते स्वराज्यासाठी आल्यानंतर नंतर त्यांचे मन खाऊ लागले. नातेवाईकात मान मिळेनासा होत असे. नेतोजीनी कितीही ठरवले असते तरी तत्कालीन धर्म व्यवस्था त्यांना पुन्हा हिंदू करत नव्हतीच. अवघड प्रायश्चित्ते आणि बहिष्कार स्वीकारण्यापेक्षा त्यांना परत हिंदू धर्मात घेणे गरजेचे होते तेंव्हा राजांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना हिंदू धर्मात आणवले. तत्कालीन धर्मधुरंधराचा हा जाच खुद्द राजांना पण राज्याभिषेकावेळी जाणवलेला आहे. अशा प्र्त्येक राष्ट्र की धर्म अशा कसोटीच्या वेळी राजांनी राष्ट्रकार्यास प्राधान्य देऊन मधला मार्ग काढलेला आहे.

सुबोध खरे's picture

22 Aug 2023 - 7:25 pm | सुबोध खरे

आरशाच्या पलीकडे गेल्यास आपला चेहरा (सत्य) तर दिसत नाहीच पण केवळ अंधारच दिसतो ( म्हणजे खरं तर काहीच दिसत नाही).

तुमचं चालू द्या

सुरिया's picture

23 Aug 2023 - 4:51 pm | सुरिया

sb
जय हो सुभाषित बाबा की. सत्यवचन

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 4:26 am | चौकस२१२

राजांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना हिंदू धर्मात आणवले.

केवळ गेलेला मोहरा परत मिळावा ( राजकीय चाल)
आणि धर्मधुरंधराचा जाच कमी करण्यासाठी
केवळ या दोन कारणांसाठी छत्रपतींनी नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेण्यात पुढाकार घेतलं असा तुमचं म्हणण्याचा सूर दिसतोय हे तर ठरविक टूल किट मधले "काहीही करा पण छत्रपतींच्या जीवनात हिंदूतला हासुद्धा येऊन द्यायचा नाही " हा नॅरेटिव्ह दिसतोय ...

छत्रपतींनी आपला धर्म (राजकीय खेळी म्हणून का होईना) टिकवण्यासाठी आणि परकी आक्रमण जे धार्मिक आक्रमण हि होते ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले हे दिसत असून सुद्धा हि खोटी डावी विचारसरणी असा अप्रचार का करते ...
राजाचे कर्तव्य सगळ्यांचे रक्षण करणे असते ना मग त्यात हिंदू पण आले का नाही? मग का त्रास होतोय मेनी करायला ?

सुरिया's picture

23 Aug 2023 - 4:50 pm | सुरिया

ठरविक एक विचार सोडुन सगळे कसे टूलकिट असते हो तुमच्या मते. जिंदगी एक टूलकीट केलीय नुसती.
आणि कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये. राष्ट्रासाठी केले तर ते हिंदू राष्ट्रासाठी केलेय म्हणायचे. घरवापसी धर्मासाठी केली म्हणायची. ही घरवापसी राष्ट्रासाठी केले म्हणले की पापड मोडतो लगेच. धर्मासाठीच करायचे म्हणले तर कितीतरी सैनिक मुस्लीम असुन राजांच्या पदरी होते. अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते. पण बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर दोन नावे सोडता केलीय का कुठली घरवापसी? उलट राजांनी प्रत्येक धर्माचा आदरच केलेला दिसतो. हे खरे राष्ट्रकारण. आणि धर्मकारण म्हणले तर अगदी पार पेशवाईपर्यंत खुद्द राऊपुत्राला मनात असताना घरवापसी करता आली नाही तेंव्हा धर्माचे राज्य हा विषयच सोडा.
काय मान्य करायचे आणि काय टूलकीट ठरवायचे ते तुमचे तुम्ही बघा.

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 8:14 pm | चौकस२१२

कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये.?

सतत महाराजांचा आणि धर्मरक्षणाचा ( हिंदू ) काही हे संबंध नाही हे दाखवणे

अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते.

पण असा कुठंही दावा केलेला नाहीये,,, उलट माझे विधान वाचा "टोकाच्या हिंद्त्ववाद्यांनी महाराजांचे हिंदू धर्म रक्षणाचे काम हे हिंदुत्व वैगरे म्हणून उगाच उर बडवू नये आणि इतरांनी उगाचच त्यांचा धर्म रक्षणाशी संबंध नव्हतं असा अप्रचार करू नये ते म्हणले आहे मी ..
महाराजांचा हेतू तसा नसावा,, रयतेचा आणि स्वतःचा जो मूळ धर्म आहे त्यावर जो अन्याय चौ होता आणि परवलंबित्व आलाय ते झुगारून द्यायचे हे " स्वराज्य "ध्येय मग असे असताना त्यांनी जे केलं ते हिंदू धर्म टिकवनयसाठी केला असे म्हणले तर का जळफळाट होतो?

तान्हाजी या हिंदी चित्रपटत एक प्रसंग दाखयलाय .. तान्हाजी जेवहा गावकऱ्यांना शिवबा ला साथ द्या असे सांगायला जातो तेव्हा कशाला अंहित्य शिवबा ला साथ देऊ असे विचारल्यावर तो म्हणतो कि हे जे तुतुमचे हे जर सण वार आहेत / प्रथा आहेत त्या टिकण्यासाठी ( नक्की सवांद आठवत नाही पण मतितार्थ हा कि जे आहे ते टिकवण्यासाठी )

येवध सरळ असताना मुददमून शिवाजी महाराजांनच्या या कृतीचा वापर स्वताच्या भंजाळलेलय सर्वधर्मसमभावाशी जोडायच हे जे सत्र ते एका ठराविक साच्यातून आलेलं दिसत ते पाहून ... म्हणून टूल किट म्हणले ...

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 4:33 am | चौकस२१२

हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे.
अगदी योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत तुम्ही डॉ.
मी (माझ्या देशात) डाव्यान्न मत देणारा असून सुद्धा तुमच्याशी १००% सहमत
पण काय आहे एक तर तुम्ही "खरे" त्यातून तुम्ही महाराजांना हिंदूतलं ह चिकटवला म्हणजे नक्कीच संघी हालफ चड्डी वैगरे त्यामुळे तुमच्या या विचारणकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाईल ... ( ते मुद्दे किती हा तर्काला धरून असले तरी )

आणि गंमत बघा हा आज एक "खरे " मानतो कोणाला तर "भोसलेंना" जर "अजेंडा" जातीचा असता तर सतत पेशवाई चा उदो उदो केला असता "एखाद्या खरे" ने

असो ...

दुरदैवाने यात "न जाणारी जात" आणावी लागली त्यामुळे कदाचित हा प्रतिसाद उडवलं हि जाईल

कर्नलतपस्वी's picture

22 Aug 2023 - 8:19 pm | कर्नलतपस्वी

फक्त एका वयात स्वामी आवडली पुढच्या वाढलेल्या वयात आवडली नाही. हे सर्वां बरोबरच होते. पण लेखकाने पेशवाई, ब्राह्मण, हिंदवी स्वराज्य आणी इतर वादग्रस्त मुद्दे घेऊन बराच धुराळा ऊडवून घेतला.

इथून पुढे आपला पास.

जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते

डाव्या उजव्या राजकीय ऐजंडा असू शकेल पण मिपाकर कशाला चालवतात. स्वामी होणे फार कठीण कमीत कमी विचाराने भिकारी तरी बनू नये.

चौकस भौ याच्या म्हणण्याशी सहमत.
ते आपले कर्म करून गेले

स्वामी होणे फार कठीण कमीत कमी विचाराने भिकारी तरी बनू नये.
शॉलिड

प्रचेतस's picture

22 Aug 2023 - 10:32 pm | प्रचेतस

स्वामी, श्रीमान योगी ह्या रणजित देसाईंच्या कादंबऱ्या अगदी रटाळ वाटल्या. किंबहुना देसाईंनी बरेचदा कादंबरी लिहिताना स्वैर स्वातंत्र्य घेतलेले जाणवते. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वगळता (कर्णाचे उदात्तीकरण सोडून द्या) युगंधर, छावा या अतिलालित्यपूर्ण वर्णनामुळे अतिरटाळ झालेल्या कादंबऱ्या आहेत. त्यामुळे शक्यतो उत्तम चरित्र संदर्भ पुस्तके वाचावीत अशा मताचा मी आहे.
पेशव्यांच्या बाबतीत श्रीराम साठे यांचे 'पेशवे' आणि प्रमोद ओकांचे 'पेशवे घराण्याचा इतिहास' ही दोन उत्तम संदर्भ पुस्तके आहेत.

आपला हा लेख परत वाचला
.. मूळ स्वामी कादंबरी तील त्रुटी किंवा त्यातील ओढून आणलेले अलंकारिक पणा वैगरे हा हेतू होता असे वाटले सुरवातीला आणि त्यादृष्टीने तसे विश्लेषण अधिक असते तर बरे झाले असते उलट त्याचे रूपांतर "एका जातीवर आग पाखड करणे हा दिसला .. मिपावर हे चालते?

हे म्हणजे मध्यन्तरी एक सिने दिग्दरक्षकाने " मराठी चित्रपट एकाच जातीचे लोक का घेतात " असे विधान केलं होते तसेच आहे
असो यावर सचिन पाटील ने छान वक्तवय केलं आहे
पहा https://www.youtube.com/watch?v=uVuMsV4MfYI
https://www.youtube.com/watch?v=zbV0LfIPDQk

कर्नलतपस्वी's picture

23 Aug 2023 - 7:47 am | कर्नलतपस्वी

या आय डी ची कुंडली व प्रगल्भ विचार सरणी बघता कोणीतरी पुनर्जन्म घेऊन आलेला दिसतोय.

वय दोन महीने तीन दिवसात ऐव्हढे ज्ञान,अद्भुत बाळक दिसतोय.

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 9:53 am | चौकस२१२

कर्नल साहेब आपण नक्की कोणाबद्द्दल बोलत आहात ? म्या तो गुन्हेगार नाही ?

कर्नलतपस्वी's picture

23 Aug 2023 - 10:52 am | कर्नलतपस्वी

........

अहिरावण's picture

23 Aug 2023 - 9:52 am | अहिरावण

सर्व वाचक प्रतिसादकांचे पुनश्च अभिनंदन आणि आभार !
काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा. गंमतीशीर आहे एकंदरीत त्यामुळे मजा वाटते.

आता मते मांडली की धुरळा उडणारच, मतमतांतरामुळेच भारतातील लोकशाही जिवंत आहे आणि ती अशीच रहावी.

माणसाने व्यक्त होणे सोडू नये. भांडण मताशी असावे माणसाशी नको अशी भुमिका सर्वांची असली तर आनंद अधिक असतो.

आपणा सर्वांना आरोग्यपुर्ण दिर्घायुष्य लाभावे ही मनोकामना.

ही चर्चा आपण इथे थांबवु, परत केव्हातरी असेच व्यक्त होऊ !

धन्यवाद.

चौकस२१२'s picture

23 Aug 2023 - 9:59 am | चौकस२१२

असेच व्यक्त होऊ ! डाव्यांना मी उजवा वाटतो ...
अहिरावण
डावे वा उजवे प्रश्न नाही .. काय आणि कसे मांडले आहे ... त्यामागे काही "अजेंडा" आहे का हे महत्वाचे
तुमची दोन वाक्येच काय ते सांगून जातात "सावरकर बुळबुळीत विचारसरणीचे" आणि " छत्रपतींचं सैन्यात मुस्लिम नवहते का !
अजेंड्याच्या भरभक्कम भावना पोचल्या
विषयांप्रमाणे दावे उजवे असते ... उदा पाश्चिमात्य लोकशाहीत बहुतेकदा डाव्यानां मत देणार असलो तरी काही बाबतीत उजवा आहे

अहिरावण's picture

23 Aug 2023 - 2:44 pm | अहिरावण

शोध पत्रकारीता अशी असते हे माहित नव्हते. तुमच्या भावना पोचल्या.
तुमच्याबद्दल नितांत आदर आहेच आणि तो अजुन वाढवाल याची खात्री आहे.

शुभेच्छा !

सुबोध खरे's picture

23 Aug 2023 - 7:05 pm | सुबोध खरे

काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा.

मी पोलिसांना हात भट्टी वाला वाटतो

आणि

हात भट्टी वालयाला मी पोलीस वाटतो.

माझा चेहराच असा आहे

-- श्री राम नगरकर

अर्धवटराव's picture

24 Aug 2023 - 3:11 am | अर्धवटराव

स्वामी वाचल्याचा काय परिणाम झाला होता हे आठवत नाहि. नसेलच झाला बहुतेक :)
पण कादंबरीच्या प्रस्तावनेत एका इंग्रज अधिकार्‍याचं टिपण दिल्याचं आठवतय... माधवराव पेशव्याच्या अकाली निधनामुळे पेशवाईचं आणि पर्यायाने मराठेशाहीचं प्रचंड नुकसान झालं असं काहिसं मत दिलं होतं साहेबाने. माधवराव काहि एक कर्तुत्ववान होता, व तदनुषंगाने देसाईंनी त्याला कादंबरीचा हिरो बनवलं असल्यास, आणि ललित साहित्य कलाकृती निर्माण केली असल्यास काहि गैर नाहि.

बाकि मला स्वामी काहि विशेष आवडल्याचं आठवत नाहि. श्रीमान योगी मात्र आवडली होती.

सावंतांचं मृत्युंजय थोडं रटाळ वाटलं होतं. युगांधर आणि छावा तर अजीबात आवडलं नव्हतं.

राहिला मुद्दा ब्राह्मणांच्या मानसीकतेचा. ओसाड गावची पाटिलकी करण्याचं नशीबात आलं तर आणखी काय होणार. ज्या ब्राह्मणेतरांच्या हातुन सत्ता, संपत्ती वगैरे मटेरीयल गोष्टी निघुन गेल्या तरिही स्वभावतला पीळ गेला नाहि, त्यांची मानसीकता समजणं सोपं आहे. पण विद्वत्ता, धर्मदर्शन वगैरे अमूर्त बाबतीत हा पीळ किती खरा किती खोटा हे कळणं कठीण असतं.. स्वतःचं स्वतःला देखील. अनेकांची यात खुप ओढाताण झाली. जे सावरले त्यातल्या बर्‍याच जणांनी या ब्राह्मण्याला कायमचा रामराम ठोकला. काहिंनी त्यातल्या उदात्ततेवर आलेली काजळी साफ करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. उर्वरीत भट आपापला गोंधळ आपापल्या परिने निस्तरण्याचा प्रयत्न करत असतात. मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्‍या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच. त्यामुळे सरमिसळी मानसीकतेचा एक वेगळाच ब्रह्मवृंद आकाराला येतोय असं दिसतं.

मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्‍या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच.
हेच किती एकांगी आहे आणि हास्यस्पद आहे , महाराष्ट्रात तर असा कांगावा केला जातो कि बघ ते ३.५% कसे सगळे बळकावून बसले आहेत? हायला मग उरलेलले ९६.५% अशी गुलामगिरी काय सहन करतात असे काबुल केल्यासारखेच आहे !

कदाचित नाट्य कला क्षेत्र सोडलं आणि काही थोडे खाजगी वयसाय आणि लष्करच्या भाकऱ्या असे सामाजिक उद्योग या ठिकाणी काय ते ब्राह्मणांचे थोडे फार प्रभुत्व शिल्लक असेल ( एखांदा गडकरी किंवा फडणवीस म्हणजे काही अख्या ब्राह्मणांनी गिळंकृत केलाय असे होत नाही- संघ ब्राह्मणाचा म्हणणारे हे विसरतात कि ना मोदी ना योगी ना शहा ब्राह्माण ,, )

आणि flogging horse mhnun मारायला सोपे
पानिपतात लाखो मराठे ( जात आणि समाज दोन्ही ) गेले पण त्यात भोसले राजे का नव्हेत पुढे हा प्रश्न विचारला तर? 2 पेव्श्वे मेले / शिन्दे मेले पन भोस्ले जख्मि झले असे कहि ऐक्लेले नाहि?

या राजकीय आगलावू पनामुळेच जे काही उरले सुरले ब्राह्माण भारतात आहेत ते कारण नसताना कडवे बनत चालले आहेत... लै झाले,,, लै ऐकून घेतले " गेले बा......" म्हणतात

सौन्दर्य's picture

25 Aug 2023 - 3:20 am | सौन्दर्य

लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत. आता त्यात भर म्हणून शिवाजी महाराज, सावरकर ह्यांच्या विचारसरणीवर धुराळा उडवत आहे. स्वतःचे विचार मांडणे ह्यात गैर काहीच नाही तरी देखील इतिहासाला सोडून वाटेल ती विधाने करणे अत्यंत गैर आहे.

अहिरावण's picture

25 Aug 2023 - 7:29 am | अहिरावण

आपल्या आकलन क्षमतेचे मला नेहमी कौतुक वाटत आले आहे.

चौकस२१२'s picture

25 Aug 2023 - 5:32 am | चौकस२१२

लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत
नक्किच
मिपाचं संपादकांना राजकीय घडामोडी वरील चर्चा थांबव्यावयश्या वाटल्या पण अश्या जातीवाद वाढवणाऱ्या लेख लिहिलेले चालतो !

अहिरावण's picture

25 Aug 2023 - 7:29 am | अहिरावण

आपली शोध पत्रकारीता वंदनीय आहे