खेळीया शब्दांचा

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
5 Aug 2023 - 9:19 am

कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती
त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती

शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले
उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले

गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी
तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी

‐------------------------------------------------

भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो
कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो

कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या
घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या

इवल्याशा पावलांनी कृष्ण दुडूदुडू धावतो
क्रदंनी सावळ्याच्या सुर बांसूरीचा घावतो

शिशिर तोच,तोच वसंत,कालचक्र धावते
सृजन,विजन नित्य तरीही, रोज नवे भासते

मुक्त छंदी मी असा अन शब्द माझे तोकडे
शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण घाली मज साकडे.

प्रेरणात्मकभावकविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Aug 2023 - 4:06 pm | प्रचेतस

व्वा...! सुरेख काव्य कर्नलसाहेब.

शिशिर तोच,तोच वसंत,कालचक्र धावते
सृजन,विजन नित्य तरीही, रोज नवे भासते

हे खूप आवडले.

चित्रगुप्त's picture

5 Aug 2023 - 4:48 pm | चित्रगुप्त

'नित्य कविता बांधणारे' कवी त्याच त्याच विषयांवर 'नित्य वेगळे कवन' कसे रचू शकतात, या आदरयुक्त कौतुकात किंचित शालजोडीतीलही दिल्यासारखे वाटले. तेही मस्त.

सागरसाथी's picture

5 Aug 2023 - 7:38 pm | सागरसाथी

मुक्त छंदी मी असा अन शब्द माझे तोकडे
शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण घाली मज साकडे

माझं पण असंच असते....

इवली माझी झोळी आणि शब्द माझे तोकडे,
सुगरणीच्या कौशल्याने कोंड्याचा मांडा घडे.

विवेकपटाईत's picture

5 Aug 2023 - 9:12 pm | विवेकपटाईत

मस्त कविता.

कर्नलतपस्वी's picture

7 Aug 2023 - 8:23 am | कर्नलतपस्वी

ना धो महानोर यांच्या शब्दात.

https://youtu.be/6XmUaYiy3Xk

कर्नलतपस्वी's picture

7 Aug 2023 - 8:26 am | कर्नलतपस्वी

शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण घाली मज साकडे.

पुन्हा वाचताना असंबद्ध आहे असे वाटल्याने खालील बदल केलाय.

शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण कोड्यात मजला टाकते

.

शांताबाई शेळके यांचे शब्द.

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप
तीच तूहि कामिनी तीच तूहि कामिनी !

सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
-

ग दि मा चें शब्द

नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
.....
अनादि चंद्र अंबरी अनादि धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी
घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी
बैस ये सुहासिनी
नवीन आज चंद्रमा

अद्भुत आहे ना.

म्हणून शब्दांचा खेळीया.

चित्रगुप्त's picture

7 Aug 2023 - 2:09 pm | चित्रगुप्त

आता एकदम आठवत नाहीयेत पण हिंदी चित्रपटातली सुद्धा अशी पुष्कळ गाणी असतील. विषय रोचक आहे.
मागे कोणत्यातरी लेखात मी 'दिल' हा शब्द असलेली अनेक गाणी सांगितली होती ते आठवले.

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2023 - 9:32 pm | चौथा कोनाडा

व्वा, कर्नलसाहेब, सुंदर सुरेख रचना !

&#128150 ;

एक शंका कुणी सोडवू शकतील का ? बदाम स्मायली ही चिन्हे का येत नाहीत ? पुर्वी ते वापरत वापरत मी फॅन झालो होतो !

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:29 am | रंगीला रतन

आवडली!