केल्याने होत आहे रे--मोफत वाचनालयवाले दामलेकाका

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
19 May 2023 - 12:11 pm

रोज सकाळी फिरायला जाताना महात्मा सोसायटीजवळ मला एका पाराजवळ अल्टो गाडी उभी दिसायची . गाडीत आणि आजूबाजूला १-२ टेबले मांडून त्यावर पुस्तके ठेवलेली दिसायची. कधी कधी एक वयस्कर काका तिथे दिसायचे तर कधी कधी लोकच पुस्तके चाळताना आणि घेताना दिसायचे. हा काय प्रकार असावा? या उत्सुकतेने एका दिवस मी तिकडे वळलो आणि काकांना गाठलेच.

b

दामलेकाका एक वल्ली आहेत. त्यांचा मोटार वाइंडिंगचा व्यवसाय होता. १५ कर्मचारी होते. पण मुलांनी वेगळा मार्ग निवडल्याने व्यवसाय बंद केला.मग नर्मदा परिक्रमेचा योग आला आणि त्यांचे जीवन बदलून गेले. तिथे भेटलेली साधी माणसे, त्यांचे निरपेक्ष मदत करणे या सर्वांचा परिणाम म्हणून की काय परिक्रमेहून आल्यावर त्यांनी समाजासाठी काहीतरी करायचे ठरवले.

b

प्रथम मास्क वाटप सुरु केले. रोज सुमारे १०० या प्रमाणे ३५,००० मास्क त्यांनी फुकट वाटले. यामुळे लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही हे का करताय ? तुमचा काय फायदा? मग नर्मदा परिक्रमेबद्दल बोलणे व्हायचे. मग काकांनी नर्मदा परिक्रमेवरची काही पुस्तके विकत आणली आणि लोकांना वाटली. परत देताना लोक आणखी पुस्तके देऊ लागले. असे करत करत आता त्यांच्याकडे ५००० पुस्तके जमा झाली. त्यातून मोफत वाचनालय चालू करायची कल्पना सुचली.

b

आता ह्या वाचनालयाचे १५० च्या वर सदस्य आहेत. साधारण ३ वर्षे झाली, कोथरूड कुमार परिसर भागात त्यांचे हे मोफत वाचनालय रोज सकाळी ७ ते ९ चालू असते. अट फक्त एकच, पुस्तक नेताना तिथल्या वहीत आपले नाव,नंबर लिहायचे आणि पुस्तक वेळेत परत आणून द्यायचे.

अवघे पाऊणशे वयोमान असलेल्या दामलेकाकांना मनोमन नमस्कार करून आणि २ पुस्तके काखोटीला मारून मी निघालो.(समाप्त)

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

19 May 2023 - 12:30 pm | तुषार काळभोर

छोट्याशा गोष्टीतून मोठी चळवळ उभी राहते, ती अशी!

दामलेकाकांना आदरपूर्वक प्रणाम आणि शुभेच्छा!

कुमार१'s picture

19 May 2023 - 12:34 pm | कुमार१

सुंदर उपक्रम.

कर्नलतपस्वी's picture

19 May 2023 - 1:05 pm | कर्नलतपस्वी

राजाराम पुलाच्या दुसर्‍या टोकाला,मातोश्री वृद्धाश्रमा जवळच एक असाच उपक्रम चालू आहे.

काहीतरी केले पाहिजे पण केल्याने होत आहे रे.....

धन्यवाद. हे बघायला हवे. कळवतो.

या माध्यमातून समाजसेवा होते.

वाह! स्तुत्य उपक्रम!
खरंच Age is just number! दामले काकांना प्रणाम!
केल्याने होत आहे रे!

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2023 - 1:24 pm | प्रकाश घाटपांडे

मी रोज फिरायला तिथे जात असल्याने दामलेकाकांशी भरपूर गप्पा होतात. मी माझे यंदा कर्तव्य आहे या विवाह व ज्योतिष या विषयावरील पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या आहेत. त्यांना मी चोरलेले पुस्तक या माझ्या लेखातील किस्सेही सांगितले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 May 2023 - 12:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

भेटुया एकदा दामलेकाकांच्या वाचनालयात :)

पुढचा कट्टा दामलेकाकांच्या वाचनालयात होणार असल्यास मी येण्यास उत्सुक आहे! :-)

MipaPremiYogesh's picture

2 Jun 2023 - 7:15 pm | MipaPremiYogesh

वाह मस्त कल्पना , करूयात कट्टा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jun 2023 - 9:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

कधीही शनिवार्/रविवार सकाळी ७.३०-८.३०

प्रचेतस's picture

23 May 2023 - 1:54 pm | प्रचेतस

एकदम मस्त आणि समाजापयोगी.

मुक्त विहारि's picture

28 May 2023 - 7:10 pm | मुक्त विहारि

आवडला

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jun 2023 - 9:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हाळगी प्रतिष्ठान मुंबई(भाईंदर) तर्फे सामाजिक कार्य करणार्‍या लोकांचा सत्कार करतात. तसा दामलेकाकांचा सत्कार १७-१८ जून ला होणार आहे. त्यांचे अभिनंदन!!

डोंगरवाडी, ताम्हिणी,विंझाईदेवी मंदिरच्या भक्त निवासाचे बुकिंग भाईंदरलाच होते.