लोकभ्रम- गूढचिकित्सामंडळ

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
5 Apr 2023 - 1:40 pm

मला माझ्या ज्योतिषछंद जोपासताना एक वाईट सवय आहे. एखाद्या संदर्भ वा माहिती साठी त्याच्या मागे हात धूवुन लागण्याची. तसे ही अनुत्तरीत प्रश्न मला अस्वस्थ करतात त्यामुळॆ मी त्या प्रश्नांच्या मागे लागतो. . तेव्हा मी मुंबईला नोकरीला होतो. मी पॅंटच्या मागच्या खिशात एक छोटी डायरी ठेवत असे. त्यात मी माहिती, संदर्भ असे संकीर्ण टिप्पण ठेवत असे.ग्रंथालयात गेलो वा एखाद्या भाषणाला गेलो व तिथे काही दुर्मिळ माहिती मिळाली की मी ती डायरीत लिहित असे. अगदी आता आता पर्यंत ती सवय होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जुने ग्रंथ चाळताना एकदा मला रा.ज. गोखले यांच्या फलज्योतिष चिकित्सा या पुस्तकाची जाहीरात एका जुन्या पुस्तकात मिळाली. त्यांच्या लोकभ्रम नावाच्या पुस्तकाची ही माहिती त्यात होती. मी ते टिपण डायरीत लिहिले. नंतर मुंबईहून पुण्याला माझी बदली झाली. चंबूगबाळ म्हणजे माझी पुस्तकांची एक ट्रंक व स्वत:ची कपड्याची व किरकोळ सामानाची बॅग एवढेच होते. विनंती बदली असल्याने मला एकाच दिवसात पुण्यात रुजू व्हायचे होते. ते साल 1988 शेवटी शेवटी होते. बॅचलर असल्याने मित्राकडेच राहत असे. फलज्योतिषाचा छंद तर चालूच होता. पुस्तकांच्या आवराआवरीत माझे टिपण प्रवासात गायब झाल्याचे लक्षात आले. रा.ज.गोखले व फलज्योतिष असे दोनच कीवर्डस माझ्या लक्षात होते. नंतर एकदा विश्रामबाग वाड्याच्या शासकीय ग्रंथालयात गेलो असताना तिथे या माहिती आधारे मी पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला.ग्रंथपाल व शिपाई यांच्याशी गोड बोलून जरा काही लग्गा लागतोय का? याची चाचपणी केली. सुदैवाने शिपाई जरा बरा निघाला. त्याने शोधायला मदत केली व धूळ खात पडलेल्या एका रॅकवर फलज्योतिष चिकित्सा रा.ज.गोखले असे पुस्तक सापडले. हुश्श्य मला एकदम हायसं वाटले. मी काही त्या ग्रंथालायचा सभासद नव्हतो. दुर्मिळ पुस्तक असल्याने ते मिळण्याचा संभव नव्हता. ग्रंथपालाला जरा आर्जव करुन पाहिले. मी पुस्तक झेरॉक्स करुन घेतो. त्याला माझी दया आली मग अर्ज वगैरे या फॉमॅलिटीत न पडता त्यांने मला शिपाई सोबत घेउन ते बाहेरच्या दुकानातून झेरॉक्स करण्याची परवानगी दिली. मी शिपाया बरोबर जाउन मग पुस्तक झेरॉक्स केले. पैसे वाचवण्यासाठी मुखपृष्ठ व इतर माहितीचे पान वगळून फक्त पुस्तकाच्या प्रकरणांची झेरॉक्स केली. त्यांचे आभार मानून सटकलो. सटकताना तो शिपाई चिरीमिरी मागेल की काय ही धास्ती होतीच. दोन प्रती झेरॉक्स केल्याने माझ्याकडचे पैसे संपले होते.चिरीमिरी बद्दल सात्विक संताप होताच. सुदैवाने त्याने काही चिरीमिरी मागितली नाही. नंतर पुस्तकाचे बाईंडिंग करुन घेतले. आता रा.ज.गोखल्यांचे लोकभ्रम हे पुस्तक मिळवण्याची मोहिम होती. मधल्या काळात माझा वरदा बुक्स चे प्र्काशक ह.अ.भावे यांचा परिचय झाला. त्यालाही निमित्त त्यांनी प्रकाशित केलेले शं.बा. दिक्षितांचे भारतीय ज्योतिषशास्त्र हे दुर्मिळ पुस्तक हे होते. त्यांच्याकडे माझी ज्योतिषचिकित्सेची नेहमी चर्चा व्हायची. एकदा त्यांनी मला सांगितले की रा.ज. गोखल्यांचे लोकभ्रम हे पुस्तक त्यांनाही हव होत. मिळाल तर ते त्याचे पैसे द्यायला तयार आहेत. एकदा मला स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मधे रसिक साहित्यचे प्रदर्शन भरल्याची माहिती मिळाली. मी तिथे गेलो तिथे दुर्मिळ पुस्तकांचे एक वेगळे दालन केले होते. तिथे मला हे पुस्तक दिसले. पुस्तकावरील सन 1935 छापील किंमत 1 रुपया होती. पण हे पुस्तक दुर्मिळ पुस्तकांच्या दालनात होते म्हणून त्याची किंमत तीनशे रुपये होती. मी ते पुस्तक ताबडतोब उचलले.काही कमी नाही का? असा चिंधीपणा न करता लागलीच पैसे दिले व पुस्तक उचलले . नाहीतरी भावे मला त्याचे पैसे देणार होते कशाला चिंधीपणा करा ना! . मी पुस्तक झेरॉक्स करुन घेतले. दोन प्रती बाईंडिंग केल्या. भाव्यांनी मला लगेच पैसे दिले. मला झेरॉक्सच्या किंमतीत पुस्तक मिळाले. नंतर मी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना रा.ज.गोखल्यांनी स्थापलेल्या गूढचिकित्सामंडळ या त्यावेळच्या संस्थेची माहिती दिली आज चमत्कार सिद्ध करण्यासाठी भारतात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटनांचे वा अमेरिकेतल्या CSICOP (Commitee for scientific investigations for claims of paranormal सारख्या संघटनांचे आव्हान आज मोठ्या रक्कमांच्या बक्षीसांसह(आमिष म्हणा हवं तर) कायमस्वरुपी खुले आहे. पण यापुर्वी देखिल पुण्यात १९३० साली गूढचिकित्सामंडळ नावाने एक संस्था स्थापन झाली होती. संस्थेचा उद्देश हा कि कसलाहि चमत्कार ऐकला कि तो ख्रराच मानायचा असा जो भोळसटपणा अथवा फाजील श्रद्धाळूपणा लोकात आहे तो कमी करुन लोकांमध्ये चिकित्साबुद्धी व सावधगिरी वाढवणे. तशी माहिती १३.११.१९३० च्या केसरी मध्ये दिली होती.
पुण्यातील गूढचिकित्सामंडळ
"आजपर्यंत ज्ञानवृद्धीचा इतिहास पाहिला तर असे आढळून कि, ज्ञानाची उपपत्ती फार सावकाश होते.ज्याप्रमांणे शुद्ध धातु इतर अनेक पदार्थांबरोबर मिसळलेली असते व ती मोठ्या प्रयासाने अशुद्ध पदार्थापासून वेगळी करवी लागते त्या प्रमाणे ज्ञान अज्ञानाशी मिसळलेले असते, व ते मोठ्या प्रयत्नाने अज्ञानापासून वेगळे करावे लागते. ज्ञानाच्या या शुद्धीकरणास हजारो वर्षाचा कालावधी जावा लागतो.'कावळ्यास एक डोळा असतो.' कुंभारणीने भक्षणार्थ धरुन आणलेली आळी कुंभारणीच्या ध्यासाने कुंभारीण बनते.' 'ढगावर ढग आपटल्याने वीज निर्माण होते.' 'अध्यात्मिक किंवा मंत्राच्या सामर्थ्याने सत्पुरुष अग्नीची दाहकता नाहीशी करतात, तेव्हाच चरातील निखा-यावरुन मनुष्यास चालता येते नाहीतर चालता येत नाही.' इत्यादि शेकडो मिथ्या समज सुशिक्षित समाजामध्ये हजारो वर्षे प्रचलीत आहेत. अज्ञान हे हानीस कारणीभूत होते. भोंदू लोक इतरांस कसे फसवतात याचे गोष्टी वर्तमानपत्रात वारंवार येतात.' ताईत' , 'कवच' इत्यादिकांचा जाहिरातींचा वर्तमानपत्रात एवढा सुळसुळाट आहे कि १९२०-२१ साली पुण्यात 'जर्मन बायांची' अथवा देवीची साथ होती, त्यावेळी बाया बोळवण्याच्या थोतांडापायी पुण्यातील मागासलेल्या लोकांचे निदान दहा वीस हजार रुपये खर्च झाले. यावरुन अज्ञानामुळे किती होते याची कल्पना होण्याजागी आहे.........."
चमत्कार सिद्ध करणा-यास त्यावेळी ५० रुपये बक्षीस हे मंडळाने ठेवले होते. मात्र ते दोन्ही बाजूने पैज या स्वरुपात होते व उभयमान्य संस्थेला देणगी या स्वरुपात होते. तशीच मंडळाची कार्यपद्धती व चमत्कारसंशोधनाच्या अटी या देखील केसरीत जाहीरपणे दिल्या होत्या. रा.ज.गोखले हे स्वतः भूगोलाचे शिक्षक व मंडळाचे चिटणीस होते. त्या वेळेचे मान्यवर श्री.वा.म.जोशी, प्रो.वि.ब.नाईक,प्रो.व्ही.के.जोग, डॊ.दि.धो.कर्वे, श्री.कृ.म्हसकर, प्रो.जी,बी.कोल्हटकर इ. लोक मंडळाचे सन्माननीय सभासद होते.
पुस्तकात एकूण १४ प्रकरणे आहेत. पहिल्या चार प्रकरणात त्यांनी लोकभ्रम म्हणजे काय व त्याची सर्वसामान्य कारणे याचा उहापोह केला आहे. कल्पनाजन्य भ्रम, अवधानाभावजन्यभ्रम, विचार दोषजन्य अथवा अनुमानदोषजन्य भ्रम यांचे विवेचन केले आहे. अल्पानुभवामुळे उत्पन होणारे भ्रम यावर सोदाहरण टिप्प्ण्या केल्या आहेत. अनेक भौमितिक आकृत्याद्वारे दृष्टीभ्रमाचाही परिणामकारक उहापोह केला आहे. पौर्णिमा व अमावस्या यांचा मृत्यूसंख्येशी संबंध या बाबत त्यांनी श्री.दा.सातवळेकर यांच्या 'एकादशीचा उपवास' या पुस्तकात पुढील विधाने आहेत:- पान १० "मृत्यूंची संख्या द्वादशी पासून तृतीयेपर्यंत अधिक असते व याच तिथीला कृष्णपक्षात शुक्ल पक्षापेक्षा अधिक असते." मोठमोठ्या शहरातील मृत्युसंख्या चतुर्थीपासून एकादशीपर्यंत कमी व द्वादशी ते तृतीयेपर्यंत अधिक असते." हा लेख १९२८ सालातील होता. यावर लेखकाने १९२७ सालचे पुणे व मुंबई म्युन्सिपालटीचे रजिस्टर बघून वर्षभरातील या तिथींच्या मृत्युसंख्येचे संपूर्ण कोष्टकच छापले आहे.(खरं तर तोंडावर फेकले आहे) त्याची संख्याशास्त्रीय दृष्ट्या सरासरी काढून या भ्रमाचे निराकरण केले आहे लेखक स्वतः शिक्षक असल्याने अशा प्रकारचे अनेक भ्रम त्यांनी 'हा सूर्य हा जयद्रथ' अशा प्रकारे फोड करुन दाखवले आहेत. भावनेचे परिणाम म्हणून निर्माण झालेले भ्रम, औषधोपयांविषयीचे भ्रम असे अनेक प्रकारचे भ्रम मानसशास्त्रीय पद्धतीने मांडले आहेत. ही सर्व मांडणी असंख्य मनोरंजक किस्से व चर्चा याद्वारे केली असल्याने वाचताना आपण एखाद्या गप्पांच्या मैफीलीतच बसलो आहोत कि काय? असे वाटते. अगदी खुर्द बुद्रुक पासून ते इंग्लंड अमेरिके पर्यंत, प्राचीन संस्कृत ग्रंथांपासून ते अर्वाचीन आंग्ल ग्रंथापर्यंत उदंड संदर्भासहित जागोजगी अवतरणे दिली आहेत हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य. भूत पिशाच्च इत्यादिकांचे अस्तित्व व त्यासंबंधी चमत्कार, भानामती,भूतांचे अंगात येणे, अंगात आलेल्या माणसाची अद्भुत कृत्ये,मृतात्म्यांचे फोटो,मृतात्म्याशी संभाषण, लिंगदेहाचे अस्तित्व, (प.वि.वर्तकांची आठवण येते) परामानसशास्त्र, इत्यादि गोष्टींचा उहापोह केला आहे. लबाडी व हातचलाखी वापरुन केले जाणारे चमत्कार, चिट्ठीतील प्रश्न ओळखणे, पोटात शाळिग्राम ठेवणारे साधू, ताईत, कवच, मंतरलेला दोरा, अंगारा, त्रिकालदर्शी आरसा, स्फटिक अंगठी, विविध प्रकारची यंत्रे, अदभूत तेले. अंजन, भूत भविष्य जाणणारे, स्वप्न, सर्पविषयक समजुती, या सर्व बाबींचा भंडाफोड माहिती द्वारे केला आहे.लबाडांचा अथवा अंधश्रद्धांचा आधार संदिग्धता हाच असतो.ज्या भोंदूने संधी साधून हातचलाखीने सोने दुप्पट क्ररुन दाखवले आहे, तो चाणाक्ष माणसापुढे दंभस्फोट होण्याचा प्रसंग आला कि तो टाळण्यासाठी काय सबबी सांगेल.१) आज दिवस चांगला नाही.२) ती वनस्पती आज खात्रीची मिळाली नाही,३) आज तब्येत ठीक नाही,४) काल विटाळशीचा शब्द ऐकल्याने सिद्धी गेली; ५) हा चमत्कार पुर्वी विशेष कारणास्तव करुन दाखवला, पण ते कारण आता राहिले नाही म्हणून आम्ही तो करुन दाखवू इच्छित नाही. ६) तो करण्यास आमच्या गुरुची परवानगी नाही.इ...
मृतात्म्यांचे भूलोकी आगमन होते व ते प्लॆंचेट वगैरे साधनांनी आपले विचार प्रकट करतात असे जे प्रतिपादन करतात त्यांना लेखकाने मृतागमनवादी अशी संज्ञा वापरली आहे. त्या काळात लोकमान्य टिळकांचा आत्मा प्लॆंचेटवर येतो अशी वदंता होती. त्यावेळी मध्यस्थास जर खाल्डियन भाषा वा उच्च गणित येत नसेल, तर त्या भाषेसंबंधाने वा उच्चगणितासंबंधाने विचारलेल्या अवघड प्रश्नास उत्तर मिळत नाहीच पण अगदी साध्या प्रश्नासही यथार्थ उत्तर मिळत नाही. असे केसरी ऒफीसात श्री ऋषी यांनी केलेल्या प्रयोगात दिसून आल्याचा संदर्भ ( १०.७.१९३४ च्या केसरीतील श्री न.चिं.केळकर यांचा लेख) लेखक देतो.खुळचट समजुती, कालबाह्य परंपरा, चिकित्सक दृष्टीचा अभाव यांचा खरपूस समाचार घेणारे हे खरे अंधश्रद्धा निर्मूलनाचेच पुस्तक आहे. शेवटच्या प्रकरणातील भ्रमांचा संकीर्ण संग्रह पाहिला कि अद्याप कायद्याच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रातल्या जादूटोणा विरोधी विधेयकाची आठवण येते. १९३५ सालानंतर पुस्तकाची आवृत्ती कुणीच काढली नाही.त्या मुळे ते उपेक्षीत राहिले. असं हे दुर्मिळ पुस्तक काळाच्या पडद्याआड जाउ नये म्हणून या ग्रंथ परिचयाचा खटाटोप केला. रा.ज. गोखल्यांनी 'फलज्योतिषचिकित्सा` नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सविस्तर चिकित्सा केली आहे. फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी एक निर्णायक समितीची स्थापना केली. भविष्यज्ञान प्राप्त करुन घेण्याच्या पद्धतीच्या पुरस्कर्त्यांस व तज्ज्ञास एक विनंती केली, आपली वर्तवलेली भविष्ये त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी. त्यासाठी यथोचित पारितोषकही देण्याची तयारी ठेवली होती. पण त्यासाठी त्यांनी फलासंदर्भात अटी घातल्या.
१) ज्या गोष्टी करणे व्यक्तिच्या हातात आहे ( उदा. प्रवासास जाणे ) त्या संबंधी भविष्ये समिती विचारात घेत नाही.
२) भविष्य स्पष्ट म्हणजे निश्चितार्थक असले पाहिजे. अर्थात त्याचे स्वरुप व त्याचा काल नियमित पाहिजे.
३) भविष्य एका वर्षाचे आत व फार तर दोन वर्षाचे आत घडणारे असावे
४) कोणताही सिद्धांत अनेक उदाहरणांवरुनच सिद्ध होणे जरुरी आहे. यास्तव फले पुरेशी न मिळता बरीच मिळाल्यास, मिळालेल्या उदाहरणांवरुन होणारा निर्णय 'तात्पुरता खरा` असेच मानण्यात येईल.
५) भविष्य व्यक्तिस अनिष्ट ( उदा. आजार, मृत्यू, इ. स्वरुपाचे ) असल्यास ते गुप्त ठेवले पाहिजे.
६) भविष्य साधार म्हणजे नियमासह द्यावे.
या आवाहनात्मक प्रकाराचा फारसा परिणाम जनमानसावर झाला नाही.
पुढे काळाच्या ओघात मी 2007 मधे लवकर नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. एकदा मनात विचार आला की पुस्तकात असलेल्या या गूढचिकित्सामंडळाचा पत्ता 1935 सालात असलेला रा.ज.गोखल्यांचा पुण्यातील आहे. 17 डेक्कन जिमखाना कॉलनी पुणे 4. हा पत्ता आताच्या काळात कसा शोधायचा? डेक्कन जिमखाना एवढे मोठे, काही जुन्या बंगल्याबाहेर पत्त्याच्या टाईल्स वर काही सुगावा लागातोय का हे पहात फिरत राहिलो. काही टोटल लागेना मग डेक्कन जिमखाना पोस्ट ऑफिस मधे गेलो. तिथे कुणी काही माहिती देतय का? ते पहावे. एका पोस्टमनने सांगितले की सकाळी 9 वाजता या त्यावेळी सगळे पोस्टमन येतात त्यात काही जुने पोस्टमन भेटतील. मग दुसर्‍या दिवशी सकाळी हजर झालो. एका म्हातार्‍या पोस्टमनने सांगितले याच गल्लीत जुने बंगले रिडेव्हलप झाले आहे तिथे बहुतेक हा पत्त्ता सापडेल. त्यांचे वंशज कदाचित मिळतील. मग मी परत शोधमोहिम चालू केली तिथे 17 हा नंबर दिसला. नवीन इमारत झालेली होती. बिल्डिंगमधे वॉचमन दिसला नाही. मग गोखले अशी पाटी कुठे दिसतीये का? हे पहात गेलो. एका मजल्यावर मला गोखले पाटी दिसली. मी बेल दाबली. आता आतमधून कुणीतरी खेकसून बाहेर येईल व आपला किमान शब्दात कमाल अपमान करेल अशी मानसिक तयारी ठेवली. एका मध्यमवयीन माणसाने दार उघडले. मग मी स्वत:चा परिचय करुन दिला व येण्याचे प्र्योजन सांगितले. रा.ज.गोखले हे त्यांच्या आजोबांचे नांव असून हे गूढचिकित्सा मंडळ वगैरे काही माहित नाही असे सांगितले. मग मीच त्यांना त्यांच्या आजोबांवि्षयी माहिती दिली. त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. मला त्यांचा एखादा फोटो किंवा अन्य काही पुस्तके असल्यास ती मिळाली तर बरे होईल असे सांगितले. काही मिळाले तर तुम्हाला कळवतो असे सांगितले. नंतर मी अनेकदा संपर्क केला पण मला त्यांच्याकडून काही मिळाले नाहीत. नंतर नंतर मलाही कंटाळा आला व शेवटी मी नाद सोडून दिला.

ज्योतिषलेखमाहिती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

5 Apr 2023 - 4:25 pm | चित्रगुप्त

घाटपांडे साहेब, तुमचे क्वचितच येणारे लेख भारून टाकणारे असतात.

मला माझ्या ज्योतिषछंद जोपासताना एक वाईट सवय आहे. एखाद्या संदर्भ वा माहिती साठी त्याच्या मागे हात धूवुन लागण्याची. तसे ही अनुत्तरीत प्रश्न मला अस्वस्थ करतात त्यामुळॆ मी त्या प्रश्नांच्या मागे लागतो.

ही सवय वाईट कशी बरे ? ही तर खूप चांगली सवय आहे. अशा सवयीशिवाय कोणतेही मोठे काम, संशोधन, सृजन होणे शक्य नसते. 'छांदिष्ट' म्हणवले जाणारे लोकच काहीतरी भरीव काम करून गेलेले दिसतात. या लेखात सांगितलेले तुमचे काम खूप मूल्यवान आहे. सदर पुस्तक पीडीएफ स्वरूपात उपब्ध करून दिलेत तर फार चांगले होईल. हजारातल्या एकाद्यालाच त्यात रूची असली तरी ते उपलब्ध असले पाहिजे, असे म्हणण्यास प्रत्यावाय नसावा.

मलाही अश्या काही सवयी आहेत. गेल्या आठवड्यात मला लायब्ररीत एका फ्रेंच पुस्तकात दीड बाय दोन इंच आकाराचे एक जुने चित्र दिसले. त्याखाली फ्रेंच भाषेतच काही मजकूर होता. गूगल मधून त्याचा तर्जुमा वाचल्यावर ते चित्र पॅरिसबाहेरील एका जुन्या प्रासादात (इ.स. १६४० सालचा) असल्याचे कळले. त्याबद्दल माहिती काढली. प्रासाद उघडण्याची वेळ विचित्र, गैरसोयीची होती. दुसर्‍या दिवशी अडीच-तीन तास बस-मेट्रो प्रवास करून तिथे पोचलो, तर तो बंद होता, मग पुन्हा दुसर्‍या दिवशी वेळ साधून पोचलो. ते चित्र खूपच भव्य, सुमारे नऊ बाय बारा फुटाचे होते. प्रासादात अन्य कलाकृती, एका खोलीत जुनी वाद्ये, आणि त्या वाद्यांवर वाजवलेल्या सतराव्या शतकातील संगीताचे ध्वनिमुद्रण मंद आवाजात वाजत होते. शाळकरी मुलांच्या एका समूहाला त्यांचे शिक्षक आणि प्रासादातील एक महिला कर्मचारी त्या प्रासादातील भव्य स्वयंपाकघरात सतराव्या शतकातीलच भांडीकुंडी वापरून तेंव्हाचे पदार्थ कसे बनवले जात, वगैरे समजावून सांगत त्याचे प्रात्यक्षिक मुलांकडूनच करवून घेत होते. माझ्यासारखे प्रेक्षक बोटावर मोजण्याइतकेच असले तरी तिथली स्वच्छ्ता आणि सर्व व्यवस्था अगदी चोख होती. प्रासादाचे मूळ नकाशे, तिथे कोणकोण प्रसिद्ध व्यक्ती येऊन गेल्या (उदा. लूई चौदावा, नेपोलियन इत्यादि) त्याच्या नोंदी, चित्रे, वगैरे सर्व व्यवस्थितपणे प्रदर्शित केलेले होते. मुळात एका उमरावाने बांधलेला हा प्रासाद पुढे विकला जात जात सगळ्यात शेवटी एका चित्रकाराच्या मालकीचा होता ही सगळी माहिती माझ्यासाठी अद्भुत होती.
हे सगळे छांदिष्ट, नादिष्ट माणसांचेच कर्तृत्व. असे काही बघितले, अनुभवले की अगदी भारून जायला होते. तुमचा हा उद्योग त्यापैकीच एक. असेच कहीबाही करत रहा आणि जे जे काही पूर्वी केले, त्याबद्दलही लिहीत रहा. शुभेच्छा.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2023 - 7:04 pm | प्रकाश घाटपांडे

कधी कधी अति चिकित्सक वृत्तीमुळे इतरांची गैरसोय होते. समूह जीवनात काय कटकट आहे अशा भावाने देखील पाहिले जाते. चिकित्सकपणा ओसीडी प्रवृत्तीकडे झुकतो.अर्थात समाजात बदल व्हावा अशी इच्छा बाळगणार्‍य लोकांमधे असे काही मनोविकाराचे अंश असतातच. सातत्य चिकाटी यामुळॆ कामात काटेकोरपणा टोकदार होत जातो. समाज बदलत नाही हे वैफल्यही डोकावते व चिडचिड वाढते. त्याचा स्वत:लाच त्रास होतो. म्हणून मी वाईट सवय म्हणालो.

सुबोध खरे's picture

5 Apr 2023 - 7:46 pm | सुबोध खरे

समाज बदलत नाही हे वैफल्यही डोकावते व चिडचिड वाढते

२१ व्या शतकात सुद्धा ग्रहणाच्या दिवशी गरोदर स्त्रिया बाहेर पडत नाहीत.

ग्रहणातून किरण बाहेर पडतात आणि त्याचा गर्भावर परिणाम होतो यावरचा अंधविश्वास, गाय कुत्रा इ पाळीव किंवा वाघ सिंह हरीण या वन्यप्राण्यांवर पशूंवर कसा काय परिणाम होत नाही, असे कितीही सांगितले तरी काही दूर होत नाही.

दात काढल्यामुळे दृष्टी कमी होते, कोथिंबीरीचे पाणी पिऊन मुतखडा जातो पासून वांगं टोमॅटो इ खाल्ल्यामुळे मुतखडा होतो इ अनेक आरोग्यविषयक अंधश्रद्धा कितीही लोकप्रबोधन केले तरी दूर होत नाही.

आपण आपले काम निष्काम वृत्तीने करत राहायचे आणि आपल्या जीवाला त्रास करून घ्यायचा नाही एवढेच आपल्या हातात आहे.

इतर उपचार पद्धतींबद्दल मी टिप्पणी करत नाही. कारण तो पण एक श्रद्धेचाच भाग आहे.

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2023 - 4:37 pm | कर्नलतपस्वी

पुस्तक परिचय व त्या अनुषंगाने इतर माहिती छान लिहीली आहे.

सविस्तर प्रतिसाद नंतर डकवतो.

विवेकपटाईत's picture

5 Apr 2023 - 5:32 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. अधिकांश भविष्यवक्ता परिस्थितीचे आकलन करतात आणि भविष्य सांगतात.

तुषार काळभोर's picture

8 Apr 2023 - 12:08 pm | तुषार काळभोर

पान १० "मृत्यूंची संख्या द्वादशी पासून तृतीयेपर्यंत अधिक असते व याच तिथीला कृष्णपक्षात शुक्ल पक्षापेक्षा अधिक असते." मोठमोठ्या शहरातील मृत्युसंख्या चतुर्थीपासून एकादशीपर्यंत कमी व द्वादशी ते तृतीयेपर्यंत अधिक असते." हा लेख १९२८ सालातील होता. यावर लेखकाने १९२७ सालचे पुणे व मुंबई म्युन्सिपालटीचे रजिस्टर बघून वर्षभरातील या तिथींच्या मृत्युसंख्येचे संपूर्ण कोष्टकच छापले आहे.(खरं तर तोंडावर फेकले आहे) त्याची संख्याशास्त्रीय दृष्ट्या सरासरी काढून या भ्रमाचे निराकरण केले आहे लेखक स्वतः शिक्षक असल्याने अशा प्रकारचे अनेक भ्रम त्यांनी 'हा सूर्य हा जयद्रथ' अशा प्रकारे फोड करुन दाखवले आहेत.

हा तत्कालीन व्हाट्सअ‍ॅप्प ढकलपत्रे प्रकार दिसतोय. आजही असे मेसेज फिरत असतात. लोक चवीने वाचतात. विश्वास ठेवतात आणि प्रसारही करतात.