विहीर

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
6 Feb 2023 - 8:19 am

"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे."

मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे.

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल.

माझ्या ओळखीचं एक जोडपं. दिलीप आणि प्रतिमा. प्रतिमा माझी मैत्रीण. दिलीपही ओळखीचा. दोघांचं लव्ह मॅरेज. दोघंही दिसायला देखणे, गोरेपान. एकमेकांना अनुरूप. प्रतिमा एम् ए झालेली. आवड म्हणून एका माॅंटेसरीत नोकरी करणारी. दिलीप ग्रॅज्युएट. एका शाळेत शिक्षक. त्यांना दोन मुलं. एक मुलगा.एक मुलगी. आदर्श संसार. दोघंही संसारापुरतं कमवायचे. संसार भागायचा.थोडी शिल्लकही पडायची. ते आधी पुण्यात राहात होते पण भाड्याने. त्यांचं एक स्वप्न होतं. स्वतःच्या मालकीचं घर असावं.

त्या मगाशी सांगितलेल्या खेड्यात, ग्रामपंचायतीच्या हद्दीत त्यांनी लहानसा प्लाॅट घेतला. थोडी शिल्लक. थोडं लोन. तिथं एक बेडरूम,हाॅल, किचन असं लहानसं घर बांधलं.पण तिथं मोठी अडचण होती ती म्हणजे पाण्याची. परिसरात काही जणांकडे मोठ्या विहिरी होत्या. कुणाकुणाकडं क्वचित बोअरवेल्स होत्या.

तरीही त्यांनी तिथे राहायला जायचे ठरवले. शेजारी ज्यांच्या घरी विहीर होती. त्यांच्याशी बोलणी केली. व्यवहाराचं ठरवलं. महिन्याला विशिष्ट पैसे देऊन, त्यांच्या विहिरीचं पाणी घ्यायचं असं ठरवलं.

प्रतिमा आणि दिलीप रोज पहाटे उठायचे. शेजारच्या विहिरीचं पाणी आणायचे. त्यानंतर घरकाम उरकून,मुलांचे डबे तयार करून, त्यांना शाळेत पाठवून दोघंही नोकरीवर जायचे. दोघांनाही दगदग व्हायची.

मग दोघांनाही एके दिवशी विचार केला. असं लोकांकडून रोज रोज पाणी किती दिवस आणायचं? त्यापेक्षा आपणच आपल्या आवारात विहीर खोदून घेतली तर!?

दोघांचं एकमत झालं. त्यांनी एका कंत्राटदाराला बोलावलं. तो म्हणाला इतकी लहान विहीर खणणं मला परवडत नाही. त्यातून खणेन पण इतका इतका खर्च येईल.

तो खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जात होता. नुकत्याच बांधलेल्या घराचं कर्ज ते फेडत होते.

मग दोघांनी 'तो'महत्त्वाचा निर्णय घेतला. अशक्यप्राय, अविश्वसनीय वाटणारा!खोटा ,असत्य वाटणारा!

आपण दोघांनीच विहीर खणायची.

दोघंही पांढरपेशे, कमावलेलं शरीर नाही. इतक्या कष्टांची दोघांनाही सवय नाही. पण निश्चय दृढ होता. विहीर खणायची. तीही आपण दोघांनी!

दोघांनी रजा टाकली. तिची बिनपगारी,त्याची पगारी. शेजारून दोन कुदळी, दोन फावडी, दोन घमेली उसनी आणली. शेजाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांचाही विश्वास बसला नाही. ठरलं तर मग! कामाला सुरुवात केली. अडीच फूट त्रिज्येचं एक वर्तुळ दोरीनं आखलं. पाच फूट व्यास झाला. विहीर फार मोठ्या परिघाची नकोच होती. कारण घराभोवतीची जागा लहान होती. राख आणि चुना एकत्र करून वर्तुळाच्या परिघात भरून विहिरीची मर्यादा निश्चित केली.
......आणि .... खणायला सुरुवात केली. दोघंही खणत होते. मधे येणारी झाडांची मुळं,दगड,माती,फावड्यानं घमेल्यात भरून बागेत फेकत होते. दोघंही दमून जायचे. घामानं कपडे चिप्प भिजायचे. दोघांचीही गोरी त्वचा काळवंडून गेली. हाताला फोड आले. अंग,खांदे,मान,पाठ,कंबर दुखायचे. एकदा, दोनदा तर अतिश्रमानं तिला चक्कर आली.

पण काम थांबलं नाही.

हळुहळू विहीर खोल खोल जायला लागली. विहिरीला आकार येऊ लागला. ती विहिरीसारखी दिसायला लागली. आता विहिरीत उतरण्यासाठी शिडी आणावी लागली. शिडीवरून आत उतरून दोघं खणायला लागले. ते खणलेला राडारोडा बादलीत ठेवून, कासऱ्याने वर ओढून बागेत नेऊन टाकू लागले.

त्यांच्या हातांना जखमा व्हायच्या. त्यांची नखं तुटली. बोटांना चिरा पडल्या. पायांनाही जखमा झाल्या. पण दोघांनीही जिद्द सोडली नाही. ते खणतच राहिले, खोदतच राहिले. एकदा, दोनदा दगड वर चढवत असताना दिलीपचा शिडीवरून पायच निसटला. तो खाली खोल पडला. त्याला सपाटून मार लागला. रक्त आलं. त्यानं चार दिवस काम थांबवले. पण प्रतिमा एकटीच खणत राहिली. माती , दगड काढून वर पोहोचवत होती. तिची मुलं तिला मदत करत होती. दिलीप बरा झाला.मदतीला आला.

अखेरीस चिखल लागला. दोघांनाही परमानंद झाला. पोरं आनंदानं नाचायला लागली.

मग चिखलात पाय रुतवत दोघेही फावड्यानं चिखल घमेल्यात भरायला लागले. दोघंही खणतच होते. त्यांची एकूण तीस फूट विहीर खोदून झाली. त्या तेवढ्या खोलीवरच आता ढप्पळभर पाणी लागलं. थोडे थोडके दिवस नाही तब्बल दीड महिना दोघे खणत होते. तीस फूट! पाणी लागलं तसे सगळे आनंदाने रडायला लागले. एकमेकांना मिठ्या मारुन ओरडायला लागले.

त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्या सर्वांना पेढे वाटले. मग गवंडी बोलावले. विहीर आतून दगडांनी बांधून घेतली. त्यासाठी सिमेंट, चुना आणला. पाणी ओढायला व्यवस्थित रहाट बसवला. विहिरीची,कळशीभर पाण्याची पाच सवाष्णींच्या हस्ते पूजा केली. विहिरीची पूजा झाल्यावर विहिरीची ओटी भरली. नारळ,विडा, पाच फळं, उदबत्ती, चोळीचा खण, विहिरीला अर्पण केला. फुलांची परडी पाण्यात सोडली. मग प्रतिमानं कळशीची पूजा करून, कळशीभर पाणी डोक्यावरून घरात आणलं. स्वयंपाकघरातील ओट्यावर ती कळशी ठेवून प्रतिमानं ते पाणी प्यायला दिले.

सगळे म्हणाले की "पाणी थंड आणि गोड आहे."

त्यांच्या हकिकतीचा शेवटही शीतल आणि मधुर आहे..

अनेक दशके लोटली, प्रतिमा, दिलीप यांनी हे जग सोडून गेल्यालाही खूप काळ लोटला. पुढच्या पिढीशी संपर्क राहिला नाही. आता ती विहीरदेखील कोण्या नवीन बिल्डिंग प्रोजेक्टच्या खाली गाडली गेली आहे. आता कोणी शहरी पांढरपेशे लोक अशी विहीर खणू जातील का? शंकाच आहे.

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

त्या जोडप्याच्या चिकाटीला दाद दिली पाहिजे. आणि फिटनेसलाही. अशी जिद्दी जोडपी क्वचित आसपास दिसतात. विहीर खणणे नसेल पण काही उद्योग, प्रकल्प चिकाटीने उभा करणारे लोक हे याच प्रकारातले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2023 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिद्द काय असते ते दाखविणारा प्रेरणादायी लेख. एकदा ठरवलं तर कितीही अशक्यप्राय गोष्ट पूर्ण करता येते. The Mountain Man म्हणून मागे एक सिनेमा आला होता. त्यातही तो एकटा व्यक्ती डोंगर फोडून रस्ता करतो अशा त्या सिनेमा गोष्टीची आठवण झाली.

आजी लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सरिता बांदेकर's picture

6 Feb 2023 - 12:12 pm | सरिता बांदेकर

।आता कोणी शहरी पांढरपेशे लोक अशी विहीर खणू जातील का? ।

आहेत काही लोक असे मेहनती त्यांना लोक वेडं ठरवतात.
तुम्ही छान लिहीलं आहे.
असं लिहीत रहा ज्याने तरुणांना प्रेरणा मिळेल.
आम्ही अगदी विहीर नाही खणली पण बरेच ऊद्योग केले आहेत.
आम्हाला सगळे ‘ यडपट ‘ म्हणतात.



mayu4u's picture

6 Feb 2023 - 2:28 pm | mayu4u

अशीच एक विहिर आपल्या मिपाकर अन्या बुद्धे च्या मित्राने खणली आहे.

बापरे ! नमस्कार या पतिपत्नीला.
त्याकाळी लोक खरंच मेहनती होते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 Feb 2023 - 5:30 pm | हणमंतअण्णा शंकर...

मी माझ्या परीने या कथेचा विस्तार करायचा प्रयत्न करतो आजी. धन्यवाद!

श्वेता व्यास's picture

6 Feb 2023 - 5:33 pm | श्वेता व्यास

वाह, छान वाटलं वाचून, आता विहीर गाडली गेली असली तरी काही पिढयांना तिच्या पाण्याचा गोडवा चाखता आला असेल याचा आनंद आहे.

चांदणे संदीप's picture

6 Feb 2023 - 5:55 pm | चांदणे संदीप

आजींचे लेख वाचनीय असतात. आजही वाचून वाचनानंद मिळाला.
शेवटचा वृत्तांत जरा निराशा आणणारा होता खरा, पण that's life!

सं - दी - प

टर्मीनेटर's picture

7 Feb 2023 - 8:46 am | टर्मीनेटर

आजींचे लेख वाचनीय असतात. आजही वाचून वाचनानंद मिळाला.

+१

चित्रगुप्त's picture

6 Feb 2023 - 10:08 pm | चित्रगुप्त

खूपच प्रेरणादायक हकीगत आहे. सांगितली पण खूप बहारीची आहे. साधारणपणे कोणत्या काळातली/दशकातली घटना आहे ही ?

नचिकेत जवखेडकर's picture

7 Feb 2023 - 11:49 am | नचिकेत जवखेडकर

कमाल आहे जोडप्याची. तुमचं लिखाण देखील नेहमीप्रमाणेच छान !

सालदार's picture

7 Feb 2023 - 3:33 pm | सालदार

"दोघंही दिसायला देखणे, गोरेपान"

अनावश्यक वाक्य!

'दोघेही दिसायला अगदी सामान्य, सावळे' असते तर चालले असते का ?
धाग्याकर्त्याने सांगितल्याप्रमाणे ही प्रत्यक्षात होऊन गेलेल्या लोकांबद्दलची खरीखुरी घटना असल्याने त्या व्यक्तींचे केलेले वस्तुनिष्ठ वर्णन 'अनावश्यक' का ठरावे ?

कथेचा गाभा, मतितार्थ पाहिला तर नक्कीच ते वाक्य अनावश्यक आहे.
दोघे दिसायला देखणे असो वा सामान्य, त्यांच्या कर्तुत्वात त्याने काहिच फरक पडत नाही.

माझा उलट प्रश्नः ते दोघेही दिसायला सामान्य असते तर ते त्यांनी केलेले कार्य वाखाणले गेले नसते काय?

तुषार काळभोर's picture

10 Feb 2023 - 8:49 am | तुषार काळभोर

जर लेखन खर्‍या घटना व व्यक्तींवर आधारित असेल, आणि त्या व्यक्ती 'देखण्या व गोर्‍यापान' असतील, तर त्यांना उगाच 'सामान्य' का करायचे?
एखादं व्यक्तीमत्व उभं करताना, त्या व्यक्तीविषयी काही गुणदोष, काही शारिरीक वैशिष्ट्ये यांचे वर्णन येणे स्वाभाविक आहे.

श्री चित्रगुप्त, तुमच्या मताशी सहमत.
सदर वाक्ये भारतीय समाजात असलेल्या रंगद्वेषाबद्दल सांगतात.
गोर्या आणि काळ्या माणसांनी केलेल्या कामाबद्दल दुजाभाव नसावा.

एखादं व्यक्तीमत्व उभं करताना, त्या व्यक्तीविषयी काही गुणदोष, काही शारिरीक वैशिष्ट्ये यांचे वर्णन येणे स्वाभाविक आहे.

------- सहमत.

दोघांचं लव्ह मॅरेज. दोघंही दिसायला देखणे, गोरेपान. एकमेकांना अनुरूप. प्रतिमा एम् ए झालेली. आवड म्हणून एका माॅंटेसरीत नोकरी करणारी. दिलीप ग्रॅज्युएट. एका शाळेत शिक्षक. त्यांना दोन मुलं. एक मुलगा.एक मुलगी. आदर्श संसार. दोघंही संसारापुरतं कमवायचे. संसार भागायचा.थोडी शिल्लकही पडायची. ते आधी पुण्यात राहात होते पण भाड्याने.

----- या सर्वांपैकी फक्त त्यांचं 'देखणेपण आणि गोरेपणच' का 'अनावश्यक' हे अनाकलनीय आहे. कृपया उलगडा करावा.
समजा, वाचकांपैकी कुणाला 'लव्ह-मॅरेज', दुसर्‍या कुणाला 'अनुरूप', आणखी कुणाला 'ग्रॅजुएट', एकाद्याला 'शिक्षक', तर कुणाला 'दोन मुलं' इत्यादि 'अनावश्यक' वाटत असेल, तर त्या त्या व्यक्तीला तसे वाटण्याबद्दल काही मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असावे का, असल्यास कोणते, याविषयी कुणी खुलासा करू शकेल तर या मुद्द्याला एक नवा आयाम मिळेल आणि ज्ञानवर्धन होइल असे वाटते.
(-- यात व्यक्तिगत असे काही नसून ही एक सर्वसामान्य जिज्ञासा आहे हे कृपया लक्षात घ्यावे)

इतर विशेषणे त्यांनी कमावली आहेत आणि कथा/लेख मुळतः कमावलेल्या विशेषणांसाठीच लिहिला आहे असे वाटले म्हणून ते अनावश्यक आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Feb 2023 - 10:44 am | राजेंद्र मेहेंदळे

"जसा आहे तसा" अनुभव मांडला आहे त्यामुळे हा वादच अनावश्यक आहे. ह्यातुन तुमचा " कावीळ झालेला अ‍ॅट्रॉसिटी" दृष्टीकोन मात्र दिसौन येतोय. आवरा!!

सालदार's picture

13 Feb 2023 - 10:54 am | सालदार

मी माझा दृष्टीकोन मांडला, तुम्ही तुमचा मांडा. उगाच इतरांना सर्टीफिकेट वाटून काही साध्य होणार नाही. तुम्हाला बराच त्रास झालेला दिसतो म्हणुन क्षमस्वः

आणखी एक, जसा आहे तसा असं काही नसतं, लेखकाचा दृष्टीकोन त्यात आलेला असतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Feb 2023 - 11:35 am | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही तुमचा दृष्टीकोन मांडला, मी माझे मत मांडले, बास ईतकेच.

बाकी सर्टीफिकेट वगैरे देणारा मी कोण? व्यक्तीस्वातंत्र्य घेउन कोणीही इथे विरुद्ध मत मांडु शकतोच.

या सर्वांपैकी फक्त त्यांचं 'देखणेपण आणि गोरेपणच' का 'अनावश्यक' हे अनाकलनीय आहे. कृपया उलगडा करावा.
>> कारण हि विशेषणे जन्मतः मिळतात. त्यामुळे ह्यावर आधारीत कौतुक, स्तुती आणि लेख अशाघ्य ठरतो. त्यात त्या जोडप्याचे कोणते ही कर्तुत्व दिसत नाही.

सर टोबी's picture

13 Feb 2023 - 6:37 pm | सर टोबी

अतिशय निर्मळ मनाचा आणि निरागस स्वभावाचा आहे. त्यांच्या निरागसतेमुळे त्या अतिशय अवघड वाटणाऱ्या विषयांवर लिलया आणि लोभसपणे लिहू शकतात. त्यांचे लेख वाचणे हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो.

प्रस्तुत लेखात कथा पात्रांची त्यांनी ज्या प्रकारे ओळख करून दिली आहे ती लेखकांच्या एका पिढीत रुळलेली अशी पद्धत होती, जसे कि “अवि सावळा असला तरी तरतरीत आणि बांधेसूद होता आणि तरुणी त्याच्या कपाळावर रुळणाऱ्या झुलपांवर फिदा होत असत.” किंवा “ती सावळी असली तरी तरतरीत आणि चार चौघीत उठून दिसणारी होती” वगैरे. कालौघात असे लिखाण नवीन जाणिवांच्या आधारावर बुरसटलेले किंवा दुही निर्माण करणारे वाटू शकते परंतु एक वाचक म्हणून आपणही एक प्रगल्भता दाखवावी आणि आजी नाउमेद होणार नाहीत अशी दक्षता घ्यावी या अपेक्षेने हा प्रतिसाद देत आहे. प्रतिसादातील विचार पटले नाही तरी माझ्याकडून यावर काही प्रतिक्रिया असणार नाही.

गोरे असणे याबद्दल काहीसे रेसिस्ट भासणे यात अगदी चूक काही नसावे. पण या कथेबाबत माझे मत असे झाले की गोरेपान किंवा तत्सम विशिष्ट वर्णन हे तथाकथित पांढरपेशे, सुखवस्तू, अगदी ब्राम्हणच म्हणा ना असे.. म्हणजे प्रचलित प्रतिमेनुसार जे लोक सहसा कष्टाची कामे करत नाहीत अशी समजूत आहे अशापैकी ते वाटत असावेत. म्हणून त्यांनी असे सश्रम सकारात्मक काही केले हे अधिक अनपेक्षित आणि उठून दिसणारे झाले. इतरही अनेक विशेषणे ही त्यांना साधारणतः शारीरिक कष्ट न करू जाणाऱ्या वर्गाची आहेत. अनपेक्षितपणा दाखवण्याचा उद्देश मला तरी वाटला.

उन्हात ऑलरेडी रापलेल्या, रफ टफ जोडप्याने असं काम केलं असतं तर कदाचित हा अनपेक्षित फॅक्टर वाटलाच नसता. In fact ते गोरेपान जोडपे या विहीर खणण्याच्या प्रक्रियेत खरेच नैसर्गिक काळवंडले असावेत. :-) असो. इट वॉज ऑन अ लायटर नोट.

गोरे असणे याबद्दल काहीसे रेसिस्ट भासणे यात अगदी चूक काही नसावे. पण या कथेबाबत माझे मत असे झाले की गोरेपान किंवा तत्सम विशिष्ट वर्णन हे तथाकथित पांढरपेशे, सुखवस्तू, अगदी ब्राम्हणच म्हणा ना असे..

कृपया ब्राम्हण हा शब्द वापरुन चर्चा मुळ मुद्द्यावरुन घसरवु नका. आधीच ब्राम्हण म्हटले की काही लोकांना पोट्शुळ होतो.

स्मिताके's picture

14 Feb 2023 - 9:15 pm | स्मिताके

प्रेरणादायी अनुभव. नेहमीप्रमाणे छान ओघवतं लिहिलंत आजी. आणखी लिहा.

>>लेखकांच्या एका पिढीत रुळलेली अशी पद्धत
सर टोबी यांच्या प्रतिसादाशी सहमत.

धर्मराजमुटके's picture

14 Feb 2023 - 9:28 pm | धर्मराजमुटके

इथे विहिरीऐवजी गोरेपणा, देखणेपणावरील चर्चा विहिर खोदलेल्या जोडप्याने वाचली तर नक्कीच त्यांनी ती परत बुजवायला घेतली असती.
यानिमित्ताने "झक मारली विहीर खोदली" असा वाक्रप्रचार देखील मराठी भाषेत लाँच करावा अशी मागणी मी या ठिकाणी करीत आहे.

दांपत्याच्या जिद्दीला सलाम.
असे झपाटलेले लोक आता कमी होत चालले आहेत की काय असे वाटते.
बाकी कथा लिहिण्यासाठी जे काही पात्रवर्णन असेल त्यात लेखकाचे पूर्ण स्वातंत्र्य असावेच.
शिव्या, शारीरीक गुणदोष, जातिवाचक वैशिष्ट्ये गरजेप्रमाणे असावेच.

सौन्दर्य's picture

15 Feb 2023 - 5:21 am | सौन्दर्य

आजींचे लिखाण नेहेमीच वाचण्याजोगे असते, त्यामुळे ह्या लेखात देखील तोच अनुभव आला.

त्या जोडप्याच्या निश्चयाचे, निष्ठेचे, अथक परिश्रमाचे अगदी कौतुक वाटले. ती विहीर खोदताना आसपासच्या लोकांनी नक्कीच त्यांचा अनेकवेळा हिरमोड केला असणार. त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला असणार. परिश्रमापेक्षा ते जोडपे अश्या नकारात्मक टीकेला पुरून उरले हे देखील कौतुकास्पदच.

सौन्दर्य's picture

15 Feb 2023 - 5:21 am | सौन्दर्य

आजींचे लिखाण नेहेमीच वाचण्याजोगे असते, त्यामुळे ह्या लेखात देखील तोच अनुभव आला.

त्या जोडप्याच्या निश्चयाचे, निष्ठेचे, अथक परिश्रमाचे अगदी कौतुक वाटले. ती विहीर खोदताना आसपासच्या लोकांनी नक्कीच त्यांचा अनेकवेळा हिरमोड केला असणार. त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला असणार. परिश्रमापेक्षा ते जोडपे अश्या नकारात्मक टीकेला पुरून उरले हे देखील कौतुकास्पदच.

सौन्दर्य's picture

15 Feb 2023 - 5:21 am | सौन्दर्य

आजींचे लिखाण नेहेमीच वाचण्याजोगे असते, त्यामुळे ह्या लेखात देखील तोच अनुभव आला.

त्या जोडप्याच्या निश्चयाचे, निष्ठेचे, अथक परिश्रमाचे अगदी कौतुक वाटले. ती विहीर खोदताना आसपासच्या लोकांनी नक्कीच त्यांचा अनेकवेळा हिरमोड केला असणार. त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला असणार. परिश्रमापेक्षा ते जोडपे अश्या नकारात्मक टीकेला पुरून उरले हे देखील कौतुकास्पदच.

स्वधर्म's picture

15 Feb 2023 - 1:14 pm | स्वधर्म

गोष्ट आवडली. आजीचें लेखन वाचनीय आणि निरागस असतं. मला एक मुद्दा जाणवला, तो असा:
आजकाल स्वतः काम करण्याला प्रतिष्ठा राहिली नाही. काही वेळा तर तर ते प्रॅक्टीकलही नसतं. म्हणून कथेचा आशय भावला.
मी पण काही कामं स्वत: करायचा प्रयत्न करतो, त्यात खूप वेळ जातो, मनस्तापही होतो. तरी स्वत: करावंसं वाटतंच. कधी कधी तर असं वाटतं की हा मूर्खपणाच आहे आपला. पण शेवटी समाधान मिळतं आणि मुख्य म्हणजे काहीतरी शिकायला मिळतं. उदा. आपला आयकर आपणच भरणे, वाहन परवाना स्वत: दोन तीन हेलपाटे मारून काढणे, घरातली छोटी मोठी दुरूस्ती. आजकाल सोसायटीत लोक दररोज गाडी पुसायला माणूस लावतात. मला हे पूर्णपणे अनावश्यक वाटतं. पैशाचा हिशोब केला तर कधी कधी काम करून घेणं स्वस्तच पडतं.

गवि- त्या जोडप्याच्या फिटनेसला आणि चिकाटीला दाद दिली पाहिजे "हे तुमचं म्हणणं खरं.

प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे -" प्रेरणादायी लेख "हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले. धन्यवाद.

सरिता बांदेकर -तुम्हीही अशा टाईपचे उद्योग केलेले आहेत? शाबास. त्याविषयी तुम्हीही लेख लिहावे अशी विनंती.

Mayu4u-तुमच्या मित्राचं अभिनंदन.

सस्नेह -तुमच्या अभिप्राय वाचून समाधान वाटले.

हणमंत अण्णा शंकर -यावर तुम्हांला कथा लिहावीशी वाटते?जरुर लिहा. धन्यवाद.

चांदणे संदीप -विहीर गाडली गेली हे कळल्यावर मलाही वाईट वाटलं होतं.

टर्मीनेटर-अभिप्रायासाठी आभार.

चित्रगुप्त -ही साधारण पन्नास वर्षांपूर्वीची घटना आहे.

नचिकेत जवखेडकर-अभिप्रायासाठी धन्यवाद.

सालदार -"देखणे गोरेपान हे वाक्य अनावश्यक"असं तुम्ही म्हटलं आहे. तुमच्या मताचा आदर आहेच. पण ही सत्यकथा आहे. ते दोघे प्रत्यक्षात तसेच होते. मी तसेच वर्णन केले आहे. त्यात इतर काही उद्देश नाही. त्यातून देखणे हा शब्द अनावश्यक वाटेल मान्य पण गोरेपान म्हणण्यामागं ते कष्टकरी, रापलेल्या रंगाचे, श्रमजीवी नव्हते,हे सांगण्याचा उद्देश आहे. तरीही त्यांनी हे केलं, जे लोकांना अनपेक्षित वाटलं.

चित्रगुप्त -तुम्ही माझंच उत्तर दिले आहेत

तुषार काळभोर, ट्रम्प -सहमत.

राजेंद्र मेहेंदळे - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

या सगळ्या चर्चेवरून, मीच लिहिताना माझं म्हणणं तुमच्यापर्यंत नीट पोचवू शकले Communication gap राहिली असावी असे वाटते.

सर टोबी -आजी निर्मळ, निरागस मनाची आहे. हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले.

स्मिता के-तुम्ही सर टोबींशी सहमत.धन्यवाद.

धर्मराज -वेगळी आणि गंमतीदार प्रतिक्रिया.धन्यवाद.

सौंदाळा-जिद्दीला सलाम.. हो. पटलं.

सौंदर्य -निश्चयाचे, निष्ठेचे,परिश्रमाचे कौतुक."खरंय.

स्वधर्म -तुम्ही देखील घरासाठीची बाहेरची कामं स्वतः करता , हे कौतुकास्पद.

सर्वांचेच पुन्हा एकदा आभार.