नमस्कार मंडळी!!
माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही). काही दिवस रडत काढल्यावर मात्र तिने कंबर कसली आणि पुन्हा शाळेत नाव घालुन मुलींच्या बरोबरीने शिकायला सुरुवात केली. त्याकाळी सातवी पास झाल्यावर (व्हर्नाक्युलर फायनल) नोकरी मिळत असे. त्याप्रमाणे तिला सरकारी शाळेत शिक्षिका म्हणुन नोकरी मिळाली. त्याचे उल्लेख माझ्या आधीच्या लेखनात आले आहेतच.
जाहीरात
स्मृतींची चाळता पाने
अशा रितीने लहान वयातच तिला खूप अनुभव आले असतील. मदत करणारे, त्रास देणारे, ओरबाडणारे,सावरणारे, डोळे पुसणारे, रडवणारे लोक भेटले असतील. त्यातुन तिच्यापुरते तिने एक जीवनाचे तत्वज्ञान बनवले होते. आणि ते तिच्या तोंडुन वेळोवेळी म्हणींच्या रुपाने बाहेर पडे. मी तेव्हा बराच लहान होतो(१ ली ते ७वी), त्यामुळे त्याचे महत्व तेव्हा फार कळले नाही. केवळ गंमतशीर म्हणी म्हणुन ऐकुन हसायला यायचे, पण आज आमचे ते संवाद आठवताना त्यामागचे तत्वज्ञान लक्षात येते.
वैधानिक ईशारा--आजी कोकणी होती त्यामुळे पुढील लेखात काही आक्षेपार्ह शब्द येऊ शकतात. त्यामुळे लेख पुढे वाचावा की नाही तुम्ही ठरवा. संमं ना विनंती की तसेच वाटल्यास धागा उडवुन टाकावा.
तर आजीला फिरायची जबरदस्त आवड होती. रोज सकाळी ती तलावपाळीला फेरी मारायचीच, पण आमच्याकडेही राहायला आली की सकाळफेरी चुकवायची नाही. "चरैवेती चरैवेती " हा तिचा मंत्र होता. ईतरवेळी कुणाही नातेवाईकाकडे लग्न कार्य असेल, तर सगळ्यात अनुभवी म्हणुन आजीला पहीले बोलावणे असेच आणि ती सुद्धा घर साफ करण्यापासुन ते रुखवताची तयारी करण्यापर्यंत सगळीकडे हजर असे. तू सगळ्या दुरच्या /जवळच्या नातेवाईकांकडे बिन धास्त कशी राहतेस १५-१५ दिवस? यावर "कामावे तो सामावे" हे तिचे उत्तर असे.
जेवताना हावरटपणा केला की "आधाशी मेला आणि गांडीवाटे जीव गेला" ही म्हण ऐकायला मिळे. आता लक्षात येत की शास्त्रीय द्र्ष्ट्या ही म्हण किती चपखल आहे. अन्न कमी पडले की "भुके राखे चौथा कोन" असे म्हणुन ताक,आमटी किवा पाणी प्यायला देई. तिन्हीसांजेला जेवायच्या तासभर आधी भूक भूक केले की "तिन्हीसांजेला कावळासुद्धा खात नाही" असे म्हणुन वाट बघायला लावे.
बाहेर जायला निघाले की हे कपडे घालु की ते असे होई. हा शर्ट जुनाच आहे, ती पँट फाटलीच आहे, असे नखरे तिच्यापुढे कोणी केले की "सतरा साडे तरी भागुबाईचे कुल्ले उघडे" ही म्हण ठरलेली. पुढे आमच्यावेळी असे नव्हते, "एक कपडा दांडीला आणि एक गांडीला" एव्हढेच कपडे मिळत असेही सांगे. लोकांकडे नीटनेटके जावे हे सांगताना "लोकाकडे गेली ताका, नी शेंबुड तिच्या नाका" असे म्हटले की आम्ही पळालोच नाक शिंकरायला.
आजी काही सूचना देत असेल आणि ते न ऐकता हे काय? आणि ते कशाला? असे विचारत बसले की "धू म्हणलं की धुवायचं, काय लोंबतय ते विचारायचं नाही" हा संवाद ठरलेला. घरात तान्हे मूल असेल आणि त्याने अंगावर शी शू केल्याबद्दल कोणी तक्रार केली तर "चहाडाच्या तोंडाचा नी लहानाच्या गांडीचा भरवसा धरु नये" असे ऐकवे.
आणि सगळ्यात शेवटी, काही कारणावरुन रुसुन बसल्यास त्या नातवंडाचा रुसवा घालवताना "रुसुबाई रुसली, कोपर्यात बसली, तिकडुन आली बायको नी खुदकन हसली" असे म्हटल्यावर जे हसायला येई त्यात रुसवा कुठच्या कुठे पळुन जाई.
असो. जेव्हढे लक्षात आहे तेव्हढे लिहिले. कदाचित अजुन बरेच काळाच्या ओघात गडप झाले असेल. आहेत का तुमच्याही घरात असे सोप्या भाषेत जीवनाचे सार सांगणारे लोक?
प्रतिक्रिया
31 Jan 2023 - 6:33 pm | शेर भाई
|कदाचित अजुन बरेच काळाच्या ओघात गडप झाले असेल.
आमची आजीबरोबर जंगल फिरणे हा एक अनुभव असायचा. चालता चालता कुठल्या तरी झाडाचा पालाच काढ किंवा एखादी मुळीच उचकट असे प्रकार करताना त्याचा वापर कसा आणि कोणत्यावेळी करावा याचे मंथन चालू असे. अजूनही तिने पाठवलेल्या औषधाचा खजिना वापरात आहे.
तीच गोष्ट मसाल्यांची, पण या वेळी थोडा जाणता असल्याने त्याच्या नोंदी करून ठेवल्या होत्या त्यामुळे आमची Secret Recipe जपू शकलो.
औषधाचा खजिना रिता झाल्यावर कसा भरायचा हे सांगणारी ती मात्र काळाच्या ओघात गडप झाली. Secret Recipe वाचवू शकलो.
वेळेत जाणत्या लोकांकडून अशा गोष्टींचे दस्तावैजीकरण होणे अगत्याचे आहे.
31 Jan 2023 - 7:45 pm | कुमार१
आजीची वाक्य चपखल आहेत.
हे घ्या एक खास एकत्र कुटुंबातील :
" आईचं दूध नाई गोड लागत पण बायकोचं मूत फार गोड !"
31 Jan 2023 - 8:52 pm | Bhakti
अय्यो!
वेगळ्या सात्विक आशेने धागा उघडला होता.पहिल्यांदाच एव्हढं सेन्सॉर वाचतेय ;)पण हहपुवा!
31 Jan 2023 - 9:28 pm | कंजूस
कोकणातले दापोली आणि गुजरातमधले सूरत.
(इथे लिहिण्याइतक्या सौम्य नाहीत पण अस्सल गावरान)
31 Jan 2023 - 9:51 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखात फुल्या फुल्या टाकाव्यात का असा विचार येत होता. पण मग त्याची जान हरवली असती, त्यामुळे आहे तसे लिहिले आहे.
कंजुसकाका--त्या म्हणी व्यनि करा. :)
1 Feb 2023 - 5:21 am | कंजूस
अगदी 'अंगात नाही जोर आणि . . . ' यासाठीही बॉम्बे श्टाईल बोली म्हण आहे. टपोरींच्या घोळक्यात ऐकायला मिळते.
(कट्ट्याला कधी भेटू तेव्हा हा पाठ ठेवूया)
1 Feb 2023 - 3:03 am | चित्रगुप्त
अंगात नाही जोर अन नाचतोय थुई थुई मोर. ('महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून साभार)
1 Feb 2023 - 5:58 am | कर्नलतपस्वी
पण आमची मावशी खुप म्हणी वापरायची.
म्हातारपणी केला पती अन् त्याला झाली रगतपिती
थोडी जखम झाली व कुणी जास्त कांगावा करत असला तर म्हणायची,
हुळहूळ्याला दुखणं झालं आणी चोळून चोळून लाल केलं
बोलीभाषेतील म्हणीं संकलीत करून एक लेख लिहीलाय. मिपावर आहे.
आगं आगं म्हशी..
https://www.misalpav.com/node/48535/backlinks
1 Feb 2023 - 12:18 pm | चित्रगुप्त
दुवा नॉट उघडिंग.
1 Feb 2023 - 8:38 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://www.misalpav.com/node/48535
1 Feb 2023 - 11:11 am | श्वेता व्यास
माझी पणजी आजी खूप म्हणी वापरायची.
हे काय? आणि ते कशाला? असे विचारत बसले की म्हणे "पाय धू म्हटलं तर साखळ्या केव्हढ्याच्या"
बिनकामाच्या चौकशा केल्या किंवा नको ते उद्योग केले कि म्हणे "रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी"
माणसाने घडाघडा बोलावं हे सांगताना म्हणे "बोलणाऱ्याची माती खपते गपबशाचं सोनं खपत नाही"
"आपण हसे लोकाला अन शेम्बुड आपल्या नाकाला",
"खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा" या पण तिच्या आवडत्या म्हणी होत्या.
घरगुती कामांबद्दल, कोथिंबीर आणल्या आणल्याच निवडून ठेवावी नाहीतर खराब होते यासाठी उखाणा घाली.
"आई आई माझं लगीन कर, केलं तर आजच कर, उद्या केलं तर मी रुसेन मग मला कोण पुसेल"
अजून खूप म्हणी आणि उखाणे आहेत आत्ता इतक्याच आठवत आहेत. जुन्या आठवणींमध्ये नेलंत. मजा यायची.
1 Feb 2023 - 1:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
वा वा!!या निमित्ताने जुन्या म्हणींचा एक संग्रह होऊ शकेल. चला बरे!! आपापल्या म्हणी टाका ईथे.
1 Feb 2023 - 3:51 pm | सिरुसेरि
सुरेख आठवणी . शहाण्याला शब्दाचा मार असे म्हणतात त्याप्रमाणे या जुन्या काळातील म्हणी परीणाम करत असणार .
2 Feb 2023 - 7:55 am | सौन्दर्य
आमची आजीकडे म्हणींचा संग्रहच होता म्हणा ना. पूर्वीच्या म्हणी अगदी रोखठोक असायच्या त्यामुळे त्या सहजच मनात जाऊन रुतायच्या. हल्लीच्या लेखन संस्कृतीत त्या बसत नाहीत तरी परिणामाच्या दृष्टीने त्या जास्त चपखल होत्या. आमच्या आजीच्या ठेवणीतील काही म्हणी.
१. लाडका लेक देवळी हागे अन ढुंगण पुसायला महादेव मागे.
२. अति खाणे अन मसणात जाणे
३. अति घट्ट असले की फाटते.
४. हात गोड की हंजण (मसाला) गोड ? - ही म्हण ती दोन्ही प्रकारे वापरायची, तिच्या जेवणाची स्तुती केली की हात गोड पण तेच नाही आवडले तर "मी काय करणार मसालाच तसा होता' म्हणून सगळं दोष मसाल्यावर ढकलून द्यायची.
५. दिवस गेला रेटारेटी, चांदण्या रात्री कापूस वेची.
ह्या तिच्या काही आवडीच्या म्हणी.
2 Feb 2023 - 7:59 pm | सस्नेह
दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्यात कापूस पेटी
अशी आहे ती म्हण.
:)
3 Feb 2023 - 10:43 am | श्वेता व्यास
माझी आजी "दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्या राती कापूस काती" म्हणायची :D
2 Feb 2023 - 8:11 am | गवि
माझ्या आजीची काही वाक्ये (म्हणी, शब्दप्रयोग, पद्धती)
दोरीपासून जोडावं आणि सरीपासून मोडावं.
याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. पण तरी.. किराणा सामान त्यावेळी रद्दीच्या कागदांच्या पुड्यात येत असे. त्याला बांधलेला दोराही संसारात कामाला येईल म्हणून जपून ठेवावा. आणि वेळ पडली की, संकट समयी सोन्याचे कोणतेही का असेनात, सर्व दागिनेही मोह सोडून मोडावेत.
नातवंडे अगदी लहान असताना
शाळेला जाताना
मुलांनी वाटेत
तमाशा पहात
थांबू नये
ही आणि इतर अशी प्रचलित काव्ये ती उद्धृत करीत असे. पूर्ण पाठ असतं.
तिची आणखी एक पद्धत, जी त्यावेळी सर्वत्र मान्य नव्हती किंवा चुकीची देखील मानली जात असू शकेल, ती म्हणजे, पदार्थ बनत असताना योग्य स्टेजला किंवा बनला की सर्वांना वाढण्यापूर्वी थेंबभर, घासभर, तुकडा सरळ चाखून बघावा. काही कमीजास्त असेल तर ते काही प्रमाणात सुधारता येते. एरवी काही तिखट मीठ कमीजास्त असेल, कच्चे असेल तर थेट ताटात वाढल्यावर खाणाऱ्याला तो वाईट अनुभव शक्यतो येऊ नये अशी इच्छा.
पदार्थाला लागू शकेल एका कोणत्या तरी अनिष्ट वासाला "शोपा" असे म्हणत असे. शेपूशी संबंध असावा काय? पण शेपूची भाजी आमच्याकडे प्रिय होतीच. कदाचित तत्सम वास इतर कोणत्या पदार्थाला येणे हे चुकीचे असेल.
2 Feb 2023 - 6:38 pm | रामचंद्र
आपलं घर आणि हागून भर
शेंबडात माशी घोटाळते (त्याच त्याच कामांत गुंतून पडणे)
मागून पुढून बाप नवरा
3 Feb 2023 - 2:27 pm | सस्नेह
का गं बाई रोड तर हिला सासरची ओढ
सासरी जाच असतो पण एखादी माहेरवाशीण माहेरच्या सुखात सुद्धा सासरच्या ओढीने रोड व्हायची .
छप्पन लुगडी आणि भागाबाई उघडी
3 Feb 2023 - 5:40 pm | टर्मीनेटर
मस्त लेख! मला आजीचा (वडीलांच्या आईचा) सहवास लाभला नाही पण आईच्या आईचा मात्र भरपुर लाभला! ही आजी कोकणातली. त्यामूळे तिच्या बोलण्यात वारेमाप म्हणी असत. तिच्याकडून ऐकलेल्या तर काही वाचलेल्या अशा १०१ म्हणी २०११ साली मी एका फेसबुक ग्रुपवर शेअर केल्या होत्या (तुम्ही लिहिल्याप्रमाणे "आजी कोकणी होती त्यामुळे पुढील लेखात काही आक्षेपार्ह शब्द येऊ शकतात" त्याच प्रमाणे अनेक टाळल्या देखील होत्या.) त्या इथे शेअर करतो.
१०१ निवडक म्हणी.
१) आधी गुंतू नये , मग कुंथू नये.
२) आली सर तर गंगेत भर.
३) उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
४) एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.
५) एक मांसा अन खंडीभर रस्सा.
६) एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
७) एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी.
८) एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवे बिडी.
९) कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
१०) करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती.
११) करून गेला गाव, आणि दाढी वाल्यावर नाव.
१२) काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव ?
१३) काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही.
१४) काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.
१५) कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
१६) कुडास कान ठेवी ध्यान.
१७) केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
१८) केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
१९) कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
२०) खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं.
२१) खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
२२) खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे.
२३) खायची बोंब अन हगायचा तरफडा.
२४) खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी?
२५) खावून खग्रास हागुन सत्यानाश.
२६) खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
२७) गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.
२८) गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे.
२९) गावंढ्या गावात गाढवी सवाशीण.
३०) गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.
३१) गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.
३२) गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
३३) घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.
३४) घरात घरघर चर्चा गावभर.
३५) घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.
३६) घाईत घाई अन म्हातारीला न्हाणं येई.
३७) घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.
३८) घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.
३९) घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.
४०) घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
४१) चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
४२) चांदणे चोराला, उन घुबडाला.
४३) चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती.
४४) चिता जाळी मढयाला, नि चिंता जाळी जीत्याला.
४५) चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
४६) चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना.
४७) डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा.
४८) डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव.
४९) ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.
५०) तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.
५१) तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
५२) तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे.
५३) तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
५४) तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
५५) तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
५६) तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
५७) तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
५८) थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे.
५९) थोरांचे दुखणे आणि मणभर कुंथणे.
६०) दानवाच्या घरी रावण देव.
६१) दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा.
६२) दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं.
६३) देह देवळात चित्त पायतणात.
६४) धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंड्या.
६५) नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
६६) नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
६७) पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे?
६८) पारध्याच गोड गाणं, हरिणीसाठी जीवघेण.
६९) फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
७०) बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
७१) बाज बघुन बाळंतीण व्हावे.
७२) बापा परी बाप गेला बोंबलताना हात गेला.
७३) बारा झाली लुगडी तरी भागुबाई उघडी.
७४) बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती.
७५) बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
७६) भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.
७७) भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत.
७८) भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते.
७९) भुरक्यावाचून जेवण नाही अन मुरक्यावाचून बाई नाही.
८०) भिकेत कावळा हागला.
८१) मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी.
८२) माळावर बोंबलायला पाटलाला काय विचारायचं?
८३) म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
८४) येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
८५) रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
८६) रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
८७) रंग गोरापान आनी घरात गु घान.
८८) रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
८९) लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
९०) लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
९१) विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
९२) वीतभर गजरा गावभर नजरा.
९३) शेळीचे शेपुट न माशा हाकालणारे न अब्रु झाकनारे.
९४) सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.
९५) सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
९६) सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये.
९७) हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.
९८) हाती नाही अडका, बाजारात धडका.
९९) आपण सांगे लोका , शेंबूड आपल्या नका.
१००) अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
१०१) अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
मूळ फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट
अवांतर: मला लेखनात म्हणींचा वापर करायला आवडते 😀
3 Feb 2023 - 7:40 pm | टर्मीनेटर
२०११ ची ह्याच विषयावरची आणखीन एक पोस्ट....
3 Feb 2023 - 8:14 pm | सस्नेह
संग्रह आहे म्हणींचा !
तुमचा व्यासंगही थोर __/\__
6 Feb 2023 - 3:57 pm | श्वेता व्यास
वा, म्हणींची रेलचेल आहे अगदी.
6 Feb 2023 - 4:22 am | nutanm
1) घरात नाही दाणा अन् हवालदार म्हणा, २) शेंदाड शिपाई चुलीपुढे हागूबाई ३) आलागेला गोसावी दाढेला दिला ४)छडी लागे छमछम विद्या येई घमघम 5) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय ६) आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर____ संत बहिणबाईंची ही ओळ खूपच प्रसिध्द आहे.7) गरजवंताली अक्कल नसते 8) रिकामा न्हावी अन् तुंबड्या लावी. अर्थ नीटसा माहित नाही कुणाला माहित असल्यास स्पष्ट करावा. ९) विद्येनेच येते स्रेष्ठत्व ्जगामाजी १०) एकादशीच्या घरी शिवरात्र(पाहुणी)~~आधीच घरात खायला दाणा सुद्धा नाही आणि त्यात भुकेले कुणीतरी येणे.११) दुसर्याने सरी घातली म्हणून आपण दोरी का घालायची? अन् फास लागून जीव द्यायचा का? म्हणजे आपली ऐपत नसताना दुसर्यासारखे वागणे महागड्या , न परवडणार्या गोष्टी करणे.12) स्वयंपाक येईना ओली लाकडे, नाचता येईना अंगण वाकडे. 13) जातीच्या सुंदरा काहीही शोभे .14) मेरीने घातलय काळ काजळ मेरी दिसतेय काळे मांजर 15) रूप तर असे तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही .16)सदान् कदा मुरकुटलेले (पडलेले) तोंड १७)
6 Feb 2023 - 4:23 pm | सस्नेह
रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी
अशी म्हण आहे ती.
पूर्वी न्हावी इतरांच्या जखमांतील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी तुंबड्या (जळवा) बाळगीत असत.
काही काम नसलेला न्हावी रिकामटेकडे उद्योग म्हणून या जळवा माणसाऐवजी भिंतीलाच लावे. हा म्हणीचा अर्थ.
6 Feb 2023 - 4:22 am | nutanm
1) घरात नाही दाणा अन् हवालदार म्हणा, २) शेंदाड शिपाई चुलीपुढे हागूबाई ३) आलागेला गोसावी दाढेला दिला ४)छडी लागे छमछम विद्या येई घमघम 5) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय ६) आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर____ संत बहिणबाईंची ही ओळ खूपच प्रसिध्द आहे.7) गरजवंताली अक्कल नसते 8) रिकामा न्हावी अन् तुंबड्या लावी. अर्थ नीटसा माहित नाही कुणाला माहित असल्यास स्पष्ट करावा. ९) विद्येनेच येते स्रेष्ठत्व ्जगामाजी १०) एकादशीच्या घरी शिवरात्र(पाहुणी)~~आधीच घरात खायला दाणा सुद्धा नाही आणि त्यात भुकेले कुणीतरी येणे.११) दुसर्याने सरी घातली म्हणून आपण दोरी का घालायची? अन् फास लागून जीव द्यायचा का? म्हणजे आपली ऐपत नसताना दुसर्यासारखे वागणे महागड्या , न परवडणार्या गोष्टी करणे.12) स्वयंपाक येईना ओली लाकडे, नाचता येईना अंगण वाकडे. 13) जातीच्या सुंदरा काहीही शोभे .14) मेरीने घातलय काळ काजळ मेरी दिसतेय काळे मांजर 15) रूप तर असे तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही .16)सदान् कदा मुरकुटलेले (पडलेले) तोंड १७)
6 Feb 2023 - 4:49 am | nutanm
एक बुडवेपणा कर्जबाजारीपणाचे गाणेही प्रसिद्ध आहे, माझ्या पुण्याच्या सख्खया नसलेल्या बहिणी हे म्हणायच्या तुम्ही धीर धरा भावजी मी खीर करते साबुदाण्याची, लाकूड नाही ढलपी काढा तिसर्या मजल्याची ।तुम्ही धीर धरा । धृपद साखर नाही गहाण ठेवा पाटली सोन्याची तुम्ही धीर धरा ।।१।। पुढचे कुणाला माहित असल्यस पुरे करावे, आम्ही अश्या गाण्यांना बुडवी गाणी म्हणायचो लहान मुले आमच्या आमच्यात .
6 Feb 2023 - 5:30 am | nutanm
भकतीताई, आम्ही पुण्याच्या नातेवाईकडे गेलो की नेहमी अशी गाणी बोलणे ऐकून आम्हाला अशी बोलणी व गाण्यांचे महणंचे काहीच वाटत नाही ऊलटे खूप वर्षांनी असे काही ऐकल्यास नोकरीत रजा घेऊन घर enjoy करतोय असे वाटते. सवयच अशी बोलणी खाणे व नातेवाईकांतच फक्त बोलण्याची ते पण ठराविक नातेवाईकांत परतफेड करण्याची.