कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
14 Dec 2008 - 9:42 am

या महत्वाच्या विषयावर झालेली चर्चा वाचून चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या विजेसंबंधीच्या ज्ञानावरला गंज थोडा झटकला गेला. त्यातल्या क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची
माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.

आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो. विजेच्या ज्या दोन तारा आपल्या घरातल्या दिव्याला जोडलेल्या असतात त्यांचा उल्लेख 'फेज' व 'न्यूट्रल' असा करतांना आपण कदाचित इलेक्ट्रीशियनकडून ऐकले असेल. रेफ्रिजरेटरसारख्या यंत्रांना जोडलेल्या वायरीमध्ये तीन तारा असतात. त्या तिस-या तारेला 'ग्राउंड' असे म्हणतात. ती फक्त जमीनीशी जोडलेली असते आणि यंत्रात कांही बिघाड झाला तर त्याची तीव्रता कमी करण्याच्या उपयोगात ती येते. एरवी तिच्यातून विद्युतप्रवाह वहात नाही. 'फेज' व 'न्यूट्रल' या तारांमधून वाहणा-या विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. विजेचा दाब ज्या प्रमाणात वाढत किंवा कमी होत जातो त्याच प्रमाणात विजेचा प्रवाहसुध्दा कमी व जास्त होत असतो. पण ही आवर्तने इतक्या जलद गतीने होत असल्यामुळे मानवी संवेदनांना ती समजत नाहीत.

दिवा, गीजर व शेगडी यासारख्या उपकरणात विशिष्ट धातूंपासून तयार केलेली फिलॅमेंट किंवा कॉइल बसवलेली असते. विजेच्या प्रवाहाला तिच्यातून जातांना कसून विरोध होतो आणि त्या विरोधाला न जुमानता त्यातून वीज वहात राहते. विजेच्या प्रवाहाला होणा-या विरोधामुळे त्यात जो संघर्ष होतो त्यातून ऊष्णता निर्माण होते. कोणत्याही दिशेने वीज वहात असली तरी त्याला तितक्याच निकराने विरोध केला जातो आणि या विरोधावर मात करून विजेचा प्रवाह होत राहिला तरी त्या विरोधाची धार यत्किंचितही कमी होत नाही. त्यामुळे दिव्याचा प्रकाश आणि इस्त्रीतली धग टिकून राहते. या भाराला 'रेझिस्टिव्ह लोड' म्हणतात. यात दाब आणि प्रवाह हे दोन्ही साथसाथच कमी व जास्त होत असतात. त्यातून जेवढी ऊर्जा तयार होते तेवढी वीज 'खर्च' झाली असे आपण समजतो आणि त्याचे बिल भरतो. प्रत्यक्षात जेवढी वीज एका तारेमधून आपल्या घरात येते तेवढीच वीज आपले काम करून दुस-या तारेने परत गेलेली असते.

पंख्यासारख्या फिरणा-या यंत्रांमध्ये 'इंडक्शन मोटर' चा उपयोग केला जातो. त्यात एक 'स्टेटर' म्हणजे स्थिर भाग असतो आणि दुसरा 'रोटर' म्हणजे फिरणारा भाग असतो. विजेच्या दाबामुळे 'स्टेटर' मध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्याची तीव्रता दाबातल्या बदलाबरोबर कमी जास्त होत राहते. 'स्टेटर' ची रचना अशा प्रकारे केलेली असते की ते चुंबकीय क्षेत्र एक फिरत राहणारे क्षेत्र (रोटेटिंग) तयार होते. त्याच्या प्रभावाखाली 'रोटर' आकर्षित होतो आणि तो ही गोल फिरतो. ( समजण्यासाठी हे थोडे सोपे करून लिहिले आहे.) रोटरवरील विद्युतवाहक एकाद्या डायनॅमोप्रमाणे चुंबकीय क्षेत्रात वावरत असल्यामुळे त्यात विजेची निर्मिती होते आणि ती वीज सर्किटमध्ये येते. अशा प्रकारे 'इंडक्शन मोटर'ला फिरवण्यासाठी जेवढी वीज तिला दिली जाते त्यातला बराचसा भाग परत मिळतो. मात्र पंख्याच्या फिरणा-या पात्यांना हवेकडून विरोध होत असतो, चुंबकीय क्षेत्रात होत असलेल्या बदलांना अंतर्गत विरोध होत असतो आणि वाइंडिंगमधून जाणा-या विद्युतप्रवाहाला थोडा अवरोध होत असतो या सर्वांसाठी कांही ऊर्जा लागते तेवढी वीज 'खर्च' होते. या सर्व क्रियेत अगदी किंचित असा विलंब होतो. त्यामुळे विजेच्या प्रवाहात होणारा बदल तिच्या दाबात होणा-या बदलाच्या थोडा मागे पडतो. अशा भाराला 'इंडक्टिव्ह लोड' असे म्हणतात.

कपॅसिटरचे गुणधर्म वेगळ्या प्रकारचे असतात. त्यात विजेचा प्रवाह सोडला की त्याच्या अंतर्गत विजेचा दाब वाढत जातो. पुरेशा क्षमतेचा कपॅसिटर घेतल्यास त्याला जोडलेल्या तारेमधील विजेचा दाब जास्तीत जास्त जेवढा वाढेल तेवढा तो कपॅसिटर 'चार्ज' होतो. पण 'एसी' विजेचा दाब त्यानंतर लगेच कमी व्हायला लागतो. तसे झाल्यावर तो कपॅसिटर 'डिसचार्ज' होऊ लागतो आणि त्यातून उलट दिशेने विजेचा प्रवाह वाहू लागतो. अशा प्रकारे तोसुध्दा सेकंदाला पन्नास वेळा दोन्ही दिशांनी चार्ज व डिस्चार्ज होत राहतो. यामुळे त्या सर्किटमध्ये जे विजेचे चक्र निर्माण होते त्यात आधी विजेचा प्रवाह वाहतो आणि नंतर तिचा दाब वाढतो त्यामुळे विजेच्या प्रवाहात होणारा बदल तिच्या दाबात होणा-या बदलाच्या थोडा पुढे असतो. अशा भाराला 'रिएक्टिव्ह लोड' असे म्हणतात.

'इंडक्टिव्ह लोड' आणि 'रिएक्टिव्ह लोड' या दोन्हीमध्ये दिलेल्या विजेचा बराच मोठा भाग परत मिळत असला तरी त्या उपकरणांना चालवण्यासाठी जास्तीची वीज आधी देत रहावे लागते. मुबलक वीजपुरवठा उपलब्ध असला तर आवश्यक तेवढी वीज सहज पुरवता येते, पण जेंव्हा पुरेशा प्रमाणात वीज तयारच होत नसेल तर ती कोठून देणार? घरगुती वापरात मुख्यत्वे 'रेझिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड' असतात. त्यांचा उपयोग जो तो आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार करत असतो. त्यामुळे विजेची मागणी क्षणाक्षणाला बदलत असते. पण वीजकेंद्रांची क्षमता मर्यादित असते. एकंदर मागणी त्या क्षमतेपेक्षा जास्त झाली तर ती पुरवणे शक्य नसते यामुळे नाइलाजाने विजेचे भारनियमन करावेच लागते. पण हे नियमनसुध्दा उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फतच करता येणे शक्य असते. ते क्षणाक्षणानुसार करता येत नाही किंवा एकेकट्या वेगवेगळ्या लोडसाठी करता येत नाही. त्यासाठी कोणता ना कोणता संपूर्ण विभागच काही काळ बंद करावा लागतो. मागणी आणि पुरवठा यात सारखाच तुटवडा येत राहिला तर ते रोजचेच होऊन जाते. हे काम करणारी माणसेच असल्यामुळे त्यात घोटाळे होण्याची शक्यता असते.

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजले जाऊ शकतात. विजेच्या वापरात काटकसर करून जेवढी वीज उपलब्ध असेल तेवढ्यावरच भागवणे हा सर्वात सरळ उपाय आहे, पण तो सोयीचा नाही. कमी पडणारी वीज जनरेटर लावून स्वतःच निर्माण करणे हा दुसरा उपाय खर्चिक आहे आणि सर्वांना ते शक्य नसते. 'इंडक्टिव्ह लोड' च्या जोडीला 'रिएक्टिव्ह लोड' लावले तर ते एकमेकांना पूरक बनू शकतात. 'इंडक्टिव्ह लोड' मधून 'रिएक्टिव्ह लोड' ला आणि 'रिएक्टिव्ह लोड' कडून 'इंडक्टिव्ह लोड' ला जास्तीची वीज मिळू शकते. यामुळे उपलब्ध असलेल्या विजेचा अधिक चांगल्या प्रकाराने वापर करता येतो. पण हे काम एकट्या दुकट्याने करून विशेष फरक पडणार नाही. त्यासाठी सहकार्याने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यात कोणाचा प्रत्यक्ष फायदा होत आहे याचा संकुचित विचार बाजूला ठेवावा लागेल.

इन्व्हर्टरचा उपयोग करून विजेच्या टंचाईचा प्रश्न आपल्या घरापुरता सोडवता येतो. इन्व्हर्टर बरोबर येणारा आकाराने सर्वात मोठा आणि जड भाग म्हणजे मोटारीत बसवतात त्याच प्रकारची पण जास्त क्षमतेची एक बॅटरी असते. अशा बॅटरीमध्ये विजेचा संचय करून ठेवणे शक्य असते, पण ती एकाच दिशेने वाहणारी (डायरेक्ट करंट) 'डीसी' या प्रकारचीच असू शकते. घरातल्या एसी विजेचे रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी इन्व्हर्टरमध्ये एक रेक्टिफायरचे सर्किट असते. ज्या वेळी बाहेरून एसी वीज पुरवठा उपलब्ध असतो तेंव्हा हा रेक्टिफायर बॅटरीला चार्ज करून तिला सुसज्ज ठेवतो. जेंव्हा वीज 'जाते' तेंव्हा आपोआप बॅटरीमधून वीजपुरवठा सुरू होतो आणि ती डिसचार्ज होत जाते. या वेळी इन्व्हर्टरमधले दुसरे सर्किट डीसी विजेचे रूपांतर एसी मध्ये करून ती वीज आपल्या घरातील ठराविक उपकरणांना पुरवते. ही सारी उपकरणे एसी विजेवर चालत असल्याकारणाने हे आवश्यक आहे. बॅटरीमधून किती वेळ आणि किती प्रमाणात वीजपुरवठा करणे शक्य आहे हे तिच्या आकारावर अवलंबून असते. बँका, हॉस्पिटल्स वगैरेमध्ये अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय (यूपीएस) ची सोय ठेवतात. ती खूप वेळ चालू शकते. घरात तेवढी जागाही नसते आणि त्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अगदी अत्यावश्यक अशा मर्यादित उपयोगांसाठी बेताच्या आकाराचा इन्व्हर्टर बसवला जातो. पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवरितनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते.

तंत्रविज्ञानलेखमाहिती

प्रतिक्रिया

सुचेता's picture

15 Dec 2008 - 12:46 pm | सुचेता

चांगली माहीती आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2008 - 1:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अतिशय क्लिष्ट माहिती आपण खरंच खूप सोपी करुन सांगितली आहेत. वाचायला मजा आली (फर्स्ट इयर आठवलं).
धन्यवाद.

मदनबाण's picture

15 Dec 2008 - 2:25 pm | मदनबाण

अप्लाईड इलेट्रॉनिक्स आठवले !!! (सेकंड इयर) :)

(सर्किट डायग्राम नेहमी चुकीचेच काढणारा)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

विकेड बनी's picture

16 Dec 2008 - 2:42 am | विकेड बनी

अहो, सर्किट डायग्राम खुद्द देवबाप्पाने चुकीचा काढला. तुम्ही काही वाटून घेऊ नका.

-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

चतुरंग's picture

15 Dec 2008 - 10:24 pm | चतुरंग

तांत्रिक माहिती सोपी करुन सांगण्याची आपली हातोटी आवडली आनंद घारे साहेब. अजून असे लेखन येऊदेत.

चतुरंग

धनंजय's picture

15 Dec 2008 - 11:53 pm | धनंजय

या इंडक्शन ने बारावीत माझी विकेट घेतली होती :-(

हा कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, असे अपेक्षित आहे काय - म्हणजे विजेचे मापयंत्र (मीटर) ते न्यूट्रल? (डीसी विद्युतचक्रांत असा जोडावा असे वाटते... पण एसी साठी हा विचार ठीक वाटत नाही.) एसीसाठी कॅपॅसिटर विजेच्या मार्गात (सिरियल) जोडावा काय - म्हणजे मापयंत्राच्या आणि उपकरणांच्या मध्ये?

असेच आणखी लेखन येऊ द्या.

चतुरंग's picture

16 Dec 2008 - 2:17 am | चतुरंग

कपॅसिटर बँक संपूर्ण घराच्या वीज यंत्रणेला समांतर जोडणीत टाकावी. ही किती क्षमतेची असावी हे त्या पुढे किती लोड आहे त्यावर ठरते.
आदर्श अवस्थेत फक्त इंडक्टिव लोड निर्माण करणार्‍या उपकरणांनाच समांतर असणे जास्त अचूक राहील पण तसे करायचे झाल्यास तशा प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा छोटा कपॅसिटर जोडावा लागेल.

चतुरंग

आनंद's picture

16 Dec 2008 - 10:18 am | आनंद

होय, कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, कॅपॅसिटर एसी साठी च जोडावा लागतो. डिसी साठी फेज शिफ्ट ही काही भानगड नसल्यामुळे कॅपॅसिटर ची काही गरज नसते ( रिपल कमी करण्या साठी वापरला जाउ शकतो)

गुळांबा's picture

29 Jan 2009 - 9:24 pm | गुळांबा

पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवरितनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते.

उपकरणे महाग पडतात. कारण त्याचा छुपा खर्च खुपच येतो. पण माहिती ह्या दृष्टिकोनातुन आपला लेख चांगला आहे. कृपा करुन प्याडल मारुन विज कशी निर्माण करतात आणि ती घरच्या घरी निर्माण कशी करता येईल ते सांगा.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jan 2009 - 9:27 pm | llपुण्याचे पेशवेll

घरच्या घरी विज निर्माण केलीत तरी तुम्हाला विजेवर उत्पादन कर भरावाच लागेल. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984

गुळांबा's picture

29 Jan 2009 - 9:36 pm | गुळांबा

एकवेळ चालेल पण विज विकत घेतल्यामुळे आपल्याला जी असहायता येते विज कंपनीच्या लहरी पणावर अवलंबुन राहाण्याची आणि ते सांगतिल ते दर द्यायची ती नको. उत्पादन खर्चात विकत घेतलेली कुठलीही गोष्ट कर भरुन पण स्वस्तातच पडते.

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2009 - 12:29 am | पिवळा डांबिस

विशेषतः क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

झेल्या's picture

30 Jan 2009 - 12:37 pm | झेल्या

पंखा १ वर असताना जास्त वीज लागते (आणि जास्त बिल येते) की ५ वर असताना???

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

30 Jan 2009 - 12:46 pm | मधु मलुष्टे ज्य...

पंखा १ वर वा ५ वर असताना ते माहित नाही. पण पंखा चालु असताना विज लागते आणि बिल पण येते. :)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

आनंदयात्री's picture

30 Jan 2009 - 12:47 pm | आनंदयात्री

>>पंखा १ वर असताना जास्त वीज लागते (आणि जास्त बिल येते) की ५ वर असताना???

पंखा बंद असतांना :D

झेल्या's picture

30 Jan 2009 - 1:25 pm | झेल्या

नक्कीच तुम्ही पंखा बंद ठेवून ए.सी. वापरत असणार... :)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

30 Jan 2009 - 12:52 pm | मधु मलुष्टे ज्य...

पंख्यात म्हणजे त्या रेग्युलेटर कंट्रोल मध्ये रेजिस्टरचा वापर करतात. व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी. रेजिस्टरने काही फरक पडत नसावा. जाणकार अधिक माहिती देतील.

चु.क.भु.द्या.घ्या.

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jan 2009 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सॉलिड स्टेट रेग्युलेटर वापरलात तर पंखा कमी वेगात फिरवताना कमी वीज लागते. साधा रेग्युलेटर वापरला (रेझिस्टरवाला, जो बराच आकाराने मोठा असतो) तर जाणवण्याइतपत फरक पडत नाही.

रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

30 Jan 2009 - 12:59 pm | मधु मलुष्टे ज्य...

रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू!

मला रेझिस्टरच म्हणायचे होते. शुद्धलेखनाची चुक. :)

अंवातर : कलर कोड आठवायचा प्रयत्न करतोय. ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-...

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

दशानन's picture

30 Jan 2009 - 1:03 pm | दशानन

>> ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-...

मी ओहोम्स आठवण्याचा प्रयत्न करत आहे... ;)

कधी काळी टिव्ही रिपेरींग करत होतो तेव्हा ह्या रेझिस्टर आणी कॅपॅसिटरे डोक्याला शॉट लागत असे नेहमी ;) टिव्हीच्या इचटी चा कोणी शॉक खल्ला आहे का ? डिसी करंट... लै जबरा लागतो.... दहा मिनिटे कळतच नाय आपण कोठे आहोत , का आहोत व जिवंत आहोत ते :D

मला एकदाच बसला टिव्ही रिपेरिंगचा धंदाच सोडला !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2009 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या सारख्या 'लेमॅन'साठी (बायकांना 'लेवुमन' म्हणावे का?) बराच माहितीपुर्ण लेख आहे.
व्होल्टेज, वॉटेज आणि अँपिअर्स ह्यातील नातेसंबंध दर्शविणारा एक फॉर्म्युला आहे तो कोणी सांगेल का?

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

झेल्या's picture

30 Jan 2009 - 1:38 pm | झेल्या

V = IR
Wattage (in Watts) = Power dissipated = I * I * R = V*V/R

Where,
I = current in Amperes
V= Voltage in volts
R= Resistance in ohms

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2009 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

हा ओहम्स कुठुन आला? हा साऊंड्च्या संदर्भात येतो असे वाटते. (नक्की माहीत नाही).

मला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी माहिती हवी आहे.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

झेल्या's picture

30 Jan 2009 - 1:51 pm | झेल्या

साऊंड ची इन्टेन्सिटी मोजतात ती डेसिबल्स मध्ये आणि फ्रिक्वेन्सी (वारंवारता) (नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद) मोजण्यासाठी हर्ट्झ वापरतात.

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2009 - 2:07 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. झेल्या..

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

दिपोटी's picture

30 Jan 2009 - 2:21 pm | दिपोटी

पेठकर काका,

झेल्याकाकांच्या फॉर्म्युल्यात खाली थोडी भर घातली आहे, तेव्हा तुम्हाला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी जी माहिती हवी आहे ती मिळेल.

V = IR
Wattage (in Watts) = Power dissipated = I * I * R = V*V/R = I * V
Where,
I = current in Amperes
V= Voltage in volts
R= Resistance in ohms

रामराम !

- दिपोटी

झेल्या's picture

30 Jan 2009 - 2:29 pm | झेल्या

माझे वय 'काका' चे नसून 'पुतण्या' चे आहे हो... :)

फक्त 'झेल्या' किंवा 'हृषीकेश' म्हणा..प्लीज...

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

रोजच्या वापरात पुर्ण रेझिस्टिव्ह लोड फारसे नसते. इंड्क्टीव्ह लोड किंवा कॅपॅसिटिव्ह लोड असते. त्याचा फॉर्म्युला आठवत नाही आता (कॉस थिटा आहे बहुतेक त्यात), पण त्यात करंट त्याच फेज मधे नसतो, इंड्क्टीव्ह लोड ला तो मागे (लॅग) करतो तर कॅपॅसिटिव्ह लोडला पुढे (लीड).

सहज समजण्यासाठी VA हे युनिट वापरले जाते. साधा व्होल्टेज (व्होल्टस) आणि करंट (ऍम्पीअर) ह्याचा गुणाकार असतो.
Wattage = VA हे फक्त रेझिस्टिव्ह लोड साठी लागू होते.

- (कधी काळचा ईलेक्ट्रॉनिक्स सर्किट्सचा तज्ञ) मनिष

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2009 - 2:35 pm | प्रभाकर पेठकर

Wattage = VA
असेच कांहीसे असावे असे वाटते.

सर्वांना घाऊक धन्यवाद.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

नितिन थत्ते's picture

30 Jan 2009 - 3:20 pm | नितिन थत्ते

कॉस फाय म्हणतात. करंट हा व्होल्टेज पेक्षा जितक्या डिग्रीने मागे किंवा पुढे असतो त्या कोनाचा कोसाईन.
वॉट = व्होल्ट * करंट * कॉस फाय

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आनंद घारे's picture

30 Jan 2009 - 4:43 pm | आनंद घारे

तांत्रिक शिक्षण ज्यांनी घेतले नसेल त्यांना हे शब्द कदाचित कळणार नाहीत म्हणून सोप्या उदाहरणातून ते मांडत आहे.
एसी विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. असे मी लिहिलेले आहे.
याचा अर्थ या क्षणी जेवढा दाब असेल तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने असतो आणि या क्षणी जेवढा प्रवाह वहात असतो तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने वाहतो . मधल्या काळात तो कमी किंवा जास्त आणि उलट किंवा सुलट दिशेने असतो. दाब आणि प्रवाह जर एकाच क्षणी कमी किंवा जास्त झाले तर ते एका फेजमध्ये असतात. निव्वळ रेझिस्टिव्ह लोडमध्ये असे घडते. पण निव्वळ इंडक्टिव्ह आणि निव्वळ कपॅसिटिव्ह लोडमध्ये ज्या क्षणी दाब परमावधीवर असतो तेंव्हा प्रवाह शून्यावर असतो आणि ज्या क्षणी दाब शून्यावर येतो तेंव्हा प्रवाहाची परमावधी असते. असा फरक असल्यास ते वेगवेगळ्या फेजमध्ये आहेत असे म्हणतात.
बहुतेक वेळा संमिश्र लोड असतो त्यामुळे एक शून्यावर असतांना दुसरा मध्ये कोठे तरी असतो. या फरकाचे गणित मांडून फेजमधला फरक अंशांत काढला जातो. सूत्रांमध्ये ग्रीक भाषेतले फाय हे अ क्षर त्यासाठी वापरले जाते. कॉस फाय ही त्रिकोणमितीमधली संकल्पना आहे. ती विजेचा दाब आणि प्रवाह यावरून ऊर्जेची खपत काढण्यासाठी वापरण्यात येणा-या सूत्रात उपयोगाला येते. या लेखात सूत्रे आणायची नाहीत असे मी ठरवलेले आहे. खोलात न जाता असे सांगता येईल की रेझिस्टिव्ह लोडमध्ये प्रावाह आणि दाब एकाच वेळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांचा गुणाकार जास्त येतो आणि संमिश्र लोडमध्ये एक कमी तर दुसरा जास्त आणि एक एका दिशेने तर दुसरा विरुध्द दिशेने असे होत राहिल्यामुळे त्यांचा एकूण गुणाकार कमी भरतो. यामुळे विजेच्या दाबाचा संपूर्ण उपयोग तिच्यापासून काम करवून घेण्यात होत नाही आणि यासाठी कपॅसिटर व कन्व्हर्टरची गरज पडते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/