POWDER (पावडर) - शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
17 Oct 2022 - 7:35 pm

कटाक्ष-

गुन्हेगारी नाट्य.
२०१० मध्ये सोनी टीव्हीवर प्रदर्शित.
प्रत्येकी ४० मिनिटांचे २६ भाग.
भाषा- हिंदी.

ओळख-

गोष्ट ओळखीची आहे- पोलीस विरूद्ध अमली पदार्थांचा तस्कर (अन्सारी - पंकज त्रिपाठी). अगदी पहिल्याच भागाच्या शेवटी ही मालिका नेहमीचा चोर-पोलीस खेळ नाही याची खात्री पटते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), अँटी नर्कोटिक्स सेल (ANC) मुंबई पोलीस आणि डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) अशा तीन सरकारी यंत्रणा अन्सारीला सर्वात आधी पकडण्यासाठी आपापले डाव टाकत राहतात. कल्पना करा की एका बंदिस्त मैदानात एक वर्तुळाकार धावपट्टी आहे. त्यावर अन्सारी धावतोय आणि त्याला पकडण्यासाठी NCB, ANC, DRI त्याच्यामागे धावत आहेत. मात्र अन्सारीच्या जवळ जाणारा प्रत्येक टप्प्यावर बदलत जातो. या तीनही सरकारी यंत्रणा असल्याने त्यांना धावायचे नियम पाळावे लागतात. अन्सारी मात्र कधी कधी अचानक मैदान सोडून या संस्थांच्या मागे धावू लागतो. शर्यतीत अनोळखी वळणे आणि थरारक खाच खळगे यांची रेलचेल आहे. या यंत्रणांचा भार केवळ अन्सारीला अटक करणे नसून त्याचे साम्राज्य उध्वस्त करणे असल्याने मालिकेत वारंवार कायद्यातील बारीक सारीक तपशीलांचा समावेश केला आहे. समर्पक ठिकाणी भूतकाळातील घटनांचे धागे जोडल्याने कथेची सुसंगती टिकून राहते. अमली पदार्थांच्या व्यवसायचे‌ अगदी इंग्रज काळातील तपशील सुद्धा दिल्याने मालिका वास्तवाच्या जवळ राहते. एक उत्सुकता ठराविक काळापर्यंत ताणून मग प्रेक्षकाच्या पदरात नकळत दुसरी उत्सुकता टाकण्यात पटकथा कमालीची यशस्वी झाली आहे. फिल्मी वाटाव्यात अशा खूप कमी गोष्टी मालिकेत आहेत. अमली पदार्थ व्यवसाय विस्ताराच्या योजना अन्सारीला कुठे घेऊन जातात? त्याचे पूर्वीचे शत्रू या खेळात उतरून काय उलथापालथ घडवतात? यशाची चव चाखायला मिळावी म्हणून प्रामाणिकपणा आणि अहंकार कोणत्या थराला जाऊ शकतो? मनुष्याने बाहेरील लढाया आधी लढवाव्यात की आतील? या प्रश्नांची उत्तरे आणि ज्यांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील असे खूप सारे प्रश्न समजून घेण्यासाठी पाहा -पावडर.

शिल्लक-

४४ तासांच्या या मालिकेत एकही शिवी नाही! अश्लील दृश्य नाही! पोलीस अधिकारी मानव आहेत, अमानवी शक्ती नाही. पात्रांच्या भावना त्यांच्या अभिनयाद्वारे आपल्यापर्यंत प्रवाहित होतात असा दर्जेदार अभिनय. व्यवस्थेवर थंड रक्ताने केलेल्या धारदार टिपण्या. सगळ्या आघाड्यांवर ठोकर खाऊन शिल्लक राहिलेले माणूसपण. उच्च कोटीचे दिग्दर्शन- उदा. चांगले (पोलिस) आणि वाईट (तस्कर) यांच्यात एकाचवेळी चालू असणारे स्वतःच्या क्षेत्रातील द्वंद्व आणि साम्य दर्शवणारा प्रसंग ज्या पद्धतीने दाखवला आहे त्याला तोड नाही. संपूर्ण मालिका पाहताना हॉलीवूडच्या टोळीयुद्धांवर आधारित चित्रपटांची सतत आठवण येत राहते. जेव्हा 'वेब सिरीज' हा शब्दही प्रचलित नव्हता तेव्हा २०१० मध्ये प्रदर्शित ही मालिका निश्चितपणे आपल्या काळाच्या पुढे होती. उत्तम पटकथा, ताकदीचे दिग्दर्शन आणि त्याच दर्जाचा अभिनय या सांप्रतकाळी दुर्मिळ त्रिसूत्रीने 'पावडर' ही प्रत्येकाने अनुभवावी अशी नशा झाली आहे.

चित्रपटआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Oct 2022 - 7:53 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद ...

शेर भाई's picture

17 Oct 2022 - 9:34 pm | शेर भाई

आता पाहायला कुठे मिळेल. सोनी लिव्ह वर नाही आहे.

अनुस्वार's picture

17 Oct 2022 - 9:55 pm | अनुस्वार

असे गुगल करा. जो पहिला दुवा येईल त्या संकेतस्थळावर मिळेल.

अनुस्वार's picture

17 Oct 2022 - 9:55 pm | अनुस्वार

असे गुगल करा. जो पहिला दुवा येईल त्या संकेतस्थळावर मिळेल.