वेडा वेडा पाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..
छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!
भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!
बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं?
कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं?
घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं!
म्हणून बिलगले,
नको हो भलता अर्थ लावूस!
तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!.
प्रतिक्रिया
24 Sep 2022 - 8:54 am | प्रचेतस
अहाहा, अतीव सुंदर शब्दयोजना.
24 Sep 2022 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, तुमच्याकडे पण यायचा का पाऊस असा भिजत भिजत ?
-दिलीप बिरुटे
24 Sep 2022 - 9:56 am | प्रचेतस
हो हो, अगदी असेच
26 Sep 2022 - 10:49 am | प्राची अश्विनी
:))))
24 Sep 2022 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!.
क्लास...! मजा आगया.
-दिलीप बिरुटे
24 Sep 2022 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार
झकास... आवडली, लैच आवडली
पैजारबुवा,
26 Sep 2022 - 10:49 am | प्राची अश्विनी
अजून विडंबन कसं नाही आलं??
24 Sep 2022 - 10:44 am | कर्नलतपस्वी
"एक तरी ओवी अनुभवावी".
असाच काहीसा अनुभव पावसात भिजण्याचा आणी अचानक कुणी तरी भेटण्याचा.
चिंब चिबं निथळत जाताना
अचानक कुणीतरी दिसावे
दामिनी कडाडताना
ओळखीचे सुर कानी पडावे
अन्यथा
दातावर दात वाजवीत
कुडकुडत घरी यावे
पडश्याने बेजार होताना
मनातले मांडे मनातच खावे
मस्तच कवीता आहे.
26 Sep 2022 - 10:48 am | प्राची अश्विनी
खरंय. असा एकतरी पाऊस अनुभवावा.
26 Sep 2022 - 10:50 am | प्राची अश्विनी
धन्यवाद सर्वांना. तुमच्या प्रोत्साहनामुळे लिहावसं वाटतं. _/\_
26 Sep 2022 - 11:20 am | प्रसाद गोडबोले
मस्त !
सुंदर !
मुक्तछंद / मुक्तक वगैरे प्रकार फारसे आवडत नाहीत पण वरील कवितेतील रोमॅन्टीक टच एकदम आवडुन गेला!
लिहित रहा.
26 Sep 2022 - 11:24 am | चांदणे संदीप
आवडलीच.
सं - दी - प
30 Sep 2022 - 2:04 am | विंजिनेर
तुमच्या सगळ्या कविता छान असतात. ही खूप आवडली म्हणून आवर्जून लॉगीन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला.
1 Oct 2022 - 6:15 am | प्राची अश्विनी
:)_/\_
30 Sep 2022 - 4:25 pm | श्रीगणेशा
मनात पाऊस असला की शब्दातही छान उतरतो!
30 Sep 2022 - 5:15 pm | श्वेता२४
अनुभव देणारी कविता.... अतीशय आवडली.
1 Oct 2022 - 6:15 am | प्राची अश्विनी
मा.ऑ, चांदणे संदीप, विंजिनेर, श्रीगणेशा, श्वैता ... खूप खूप धन्यवाद!