'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातला हा प्रसंग आज अचानक यूट्यूबवर भटकताना सापडला. 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला श्याम' ही दोन्ही सुरेख गाणी या प्रसंगात आहेत. त्यापैकी 'थकले रे नंदलाला'आशाच्या आवाजात आपण अनेकदा ऐकलं असेल; परंतु या चित्रफीतीत हे गाणं राजाभाऊ परांजपे (बाबूजींच्या आवाजात) सीमाला (आशा) शिकवत आहेत, असा एक सुरेल प्रसंग आहे - तो यापूर्वी कधी पाहण्यात आला नव्हता.
'थकले रे नंदलाला' वर जाणारी बाबूजींची 'वाहवा' अशी दाद, 'निलाजरेपण कटीस नेसले' ही ओळ दुसर्यांदा आशाने बरोबर उचलल्यावर येणारं 'बहोत अच्छे', या आणि पुढच्या ओळींत 'सूर जुळणं' म्हणजे काय असतं याचं मिळणारं प्रात्यक्षिक, सूरदासांच्या 'अब मैं बहुत नाचों गोपाल' चे गदिमांनी केलेलं अप्रतिम मराठीकरण आणि मग धुमाळच्या थोड्या खटकेदार संवादांनंतर येणारं 'बाई मी विकत घेतला श्याम' -- एवढं सारं या चित्रफीतीत आहे. अर्थात हे सारं ढोबळ वर्णन. खरा आनंद घेण्यासाठी ही चित्रफीत पहा. नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.
प्रतिक्रिया
31 Dec 2007 - 8:26 am | ऋषिकेश
काय जबरदस्त होती ही क्लिप. नंदन, या क्लीपबद्दल धन्यवाद
आणि नूतन वर्षाभिनंदन
-ऋषिकेश
1 Jan 2008 - 12:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय जबरदस्त होती ही क्लिप. नंदन, या क्लीपबद्दल धन्यवाद
आणि नूतन वर्षाभिनंदन
हेच म्हणतो !!!
31 Dec 2007 - 8:54 am | प्रमोद देव
नंदन धन्यवाद!
हा प्रसंग सिनेमात पाहिलेला होताच. पण इथे दाखवून तू त्या स्मृती सकाळी सकाळी सुगंधित केल्याबद्दल शतशः धन्यवाद!
दोन्ही गाणी अप्रतिम आणि अवीट गोडीची आहेतच. त्यातही बाबुजी आणि आशाताईंच्या बरोबरीने शामराव कांबळे ह्यांनी ह्यात वाजवलेल्या सुरेल पेटीवादनाची धुंदी आजवर उतरलेली नाहीये.
31 Dec 2007 - 9:22 am | विसोबा खेचर
प्रमोदकाका म्हणतात त्याप्रमाणे सकाळ सुगंधित केलीस! २००७ च्या अखेरीअखेरीस कान अगदी तृप्त केलेस...
बाकी 'जगाच्या पाठीवर' हा चित्रपट संगीत, अभिनय इत्यादी सर्वच बाबतीत सुंदर होता. राजाभाऊंनी तर फार झकास काम केले आहे. 'जगाच्या पाठीवर', 'सुवासिनी' हे चित्रपट म्हणजे तर बाबुजीं-राजाभाऊ-गदिमा या त्रयीचे अगदी महत्वाचे चित्रपट ठरावेत!
असो, तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा!
अवांतर - मुंबईत केव्हा येतो आहेस? समर्थ भोजनालयात जायचंय ना?! :)
तुझा,
तात्या.
31 Dec 2007 - 9:04 pm | प्राजु
नंदन,
मी जगाच्या पाठीवर पाहिलेला नाहिये. कदाचित माझ्या या वक्तव्याने तुम्ही सगळे हसाल.. पण खरंच मी नाही पाहीलेला. आता या तुमच्या क्लिपमुळे नक्की पाहिन.. कुठूनहि मिळवेन आणि पाहिन.
धन्यवाद. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- प्राजु.
31 Dec 2007 - 10:37 pm | प्रकाश घाटपांडे
खरच नंदन नुतन वर्षासाठी छान सुगंधित आठवण दिली. खुप बरं वाटलं. अगदी सात्विक आनंद झाला.
प्रकाश घाटपांडे
31 Dec 2007 - 11:07 pm | स्वाती राजेश
सर्वांना,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 Jan 2008 - 12:49 am | बिपिन कार्यकर्ते
नंदन, फारच मस्त.... नविन वर्षाचे स्वागत या पेक्षा अजून चांगले कसे झाले असते? मजा आली.
बिपिन.
1 Jan 2008 - 5:22 am | चतुरंग
काय जादू आहे शब्द-सुरांची!
हे गाणं ऐकताना दर वेळी माझ्या डोळ्यातून पाणी येतंच.
हे गाणं मी पहिल्यांदा रेडियोवर सकाळी ११ ते ११.३० च्या गाण्यात पुणे केंद्रावर ऐकलं होतं.
वय असेल ८ एक वर्षांचे, तेव्हा माझ्या बाबांच्या डोळ्यात का पाणी आले ते समजले नव्हते, ते आत्ता समजते. चिरंतन गाण्यांपैकी एक. शतशः धन्यवाद नंदन!
चतुरंग
1 Jan 2008 - 2:59 pm | देवदत्त
ह्या सिनेमातील गाणी खूप छान आहेत. अर्थात सिनेमाही चांगलाच आहे.
३/४ वर्षांपुर्वी ई टीव्ही मराठीवर रात्री हा सिनेमा दाखवला होता तेव्हा पहिल्यांदा मी हा सिनेमा पाहिला. त्या आधी ही सर्व गाणी फक्त ऐकून माहीत होती. सिनेमा बघताना त्यांचे संदर्भ पाहून (आणि सिनेमा पाहूनही) खरोखरच गहिवरून आले.
1 Jan 2008 - 3:13 pm | स्वाती दिनेश
नंदन,धन्यवाद!सुरुवात मस्तच झाली ह्या वर्षाची!
स्वाती
3 Jan 2008 - 2:18 am | नंदन
आपणा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
29 Jul 2018 - 11:18 am | नाखु
चित्रफित दुवा दिसत नाही का मी भ्रमणध्वनीवर बघत असल्याने हा "आजार"आहे.
जाणकारांनी विजेरी झोत टाकला तर बरं होईल.
अज्ञ बालक नाखु
29 Jul 2018 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संगणकावरुनही दिसत नै ये.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2018 - 4:05 pm | सतिश गावडे
थोडी तांत्रिक चिकित्सा केली तेव्हा हे कारण सापडले:
This video is no longer available because the YouTube account associated with this video has been terminated.