पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम
लागेल काय सांगता येत नाय..!
म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन वगैरेंचं राज्य होतं..
त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची.
अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना
ती आवडत असणार हे साहजिकच आहे..
आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच म्हणावे लागेल.!
नॉर्मली ते तसेच असते..!
तर असंच एकदा दोन-तीन बुधल्या सोमरस पोटात
गेल्यानंतर माझं धाडस नेहमीप्रमाणेच वाढलं..
आणि मी राजवाड्यापुढे जाऊन माझ्या पवित्र वगैरे
प्रेमाचा इंजहार करायला लागलो...
परंतु राजवाड्याचे रक्षक मंदबुद्धी असल्यामुळे
त्यांना प्रेम वगैरे गोष्टींची काही कल्पना नव्हती..!
त्यामुळे त्या दुष्टांनी ताबडतोब माझा भुगा केला...!
नंतर मग अडचण अशी झाली की कावळा घास
शिवेना..!
कसा शिवणार..?
नैवेद्य पुरणपोळीचा ठेवलेला..!
कारण की सगळ्या म्हराटी लोकांना पुरणपोळी
आवडते, अशी एक अफवा त्याकाळी कुणीतरी
पसरवून ठेवलेली.
तर लोकं सगळी ताटकळलेली.
काय करावं कुणाला कळेना.
मग वाट बघून बघून मग एका दर्दी जोडीदारानं
त्यावेळची चोरटी अवैध टंपास एका द्रोणात
ओतून ठेवली.
ते बघताच दूर आकाशातून एक कावळा झेपावत
आला. एका झाडाच्या फांदीवर स्थिरावला.
मग तिथून खाली सूर मारत त्याने अचूकपणे त्या द्रोणात चोच बुडवली.
आणि मग मान झिंझाडत, लोकांकडे बघत पसंतीची
पावती दिली.. आणि भज्याचा एक तुकडा उचलून लगेच भुर्रss..!
डोळ्यांदेखत घडलेलं ते आश्चर्य बघून, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी मातांनी आणि भगिनींनी, त्या दर्दी जोडीदारास संतोषदर्शक दाद दिली.
जोडीदाराने विनम्रपणे मान झुकवून दाद स्वीकारली
आणि वरती बघत अभिवादन केले..! सेंच्युरीनंतर
तेंडुलकर आभाळाकडे जसं बघायचा, त्या टाईपमधी..!
त्यानंतर मोजून सात दिवसांनी मला दुसरं शरीर मिळालं होतं..!
बाकी मुक्तीचा खडतर मार्ग पार करायला पुरणपोळी हा पदार्थ तसा निरूपयोगीच होय.
एवढा ब्रह्मांडाचा प्रवास करायचा म्हटल्यावर इंधनही
तसेच ऊर्जादायी, अतिस्फोटक किंवा समजा सुसाट रॉकेटसारखे ऊर्ध्वगामी नको काय?
त्यानंतर मग पुढच्या टायमाला जरा वेटिंग होतं..!
म्हणजे तो साधारण दुसऱ्या महायुद्धाचा वगैरे
स्पॅन होता आणि जगभरामधी सगळीकडंच
हजारांनी माणसं, पोरी-बाळी, म्हातारी-कोतारी हकनाक मरत होती रोज.!
त्यामुळं सगळ्या सिस्टीमवर लोड आला होता..!
शिवाय आता माणसं पण नवीन शरीर निवडायला
लय नाटकं करायला लागलेली..!
मला अमकंच लिंग पायजेल, तमकाच कलर
पायजेल, ढमकाच धर्म पायजेल, फलाणीच भाषा पायजेल..अशी अशी मातृभू पितृभू किंवा तत्सम
पुण्यभू पायजेल वगैरे वगैरे...!
त्येच्यामुळं मग तिथं लांबच्या लांब लाईन लागलेली..!
साधारण ४२० दिवस येका पिपर्णीच्या झाडाला उलटा लटकून होतो... !
म्हणून मग मी अर्ज दिला त्यांना, की बाबा आता किमान ह्या झाडाला तरी माझं नाव द्या म्हणून...!
तर त्या टेबलवरची क्लार्क बोलली की तुमचा
प्रस्ताव उपसचिव महोदय यांचे दरबारी प्रलंबित होता.
तो आता परत आलाय. त्यात बक्कळ त्रुटी आहेत.
त्यामुळे तुम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात यायचं आहे..!
पण माझ्याकडे नाही यायचं आहे..!
दुसऱ्या कुणाकडे तरी जायचं आहे..!
कुणाकडे जायचं आहे ते मला कसं माहित असणार..?
ते त्या त्या वेळी बघता येईल..!
आणि ते तुमचं तुम्हालाच बघायचं आहे..!
हे असं तोंड आंबट करून का बघताय तुम्ही ?
सामान्य प्रक्रिया आहे ही..!
आणि भारतातून आलाय ना तुम्ही? मग तुम्हाला हे
सगळं अंगवळणी पडलेलंच असेल ना..?
शिवाय अडचण अशीय की एक अतिशय सुंदर झिपऱ्या असणारी हडळ, त्या झाडाखालच्या विहिरीत मुक्कामाला आलीय..!
त्यामुळे संबंधित झाडावर तुमच्याखेरीज आणखी पाच जणांनी दावा केला आहे..!
त्यामुळे तुम्ही सर्व संबंधित दावेदारांनी मिळून यायचं आहे..! किंवा त्यांची एनओसी आणायची आहे..!
आणि शिवाय हे असं आज आत्ता ताबडतोब नाही
यायचं..! इथे लगेलगे काही होत नसते..!
विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच
यायचं आहे..! आणि आता इथून फुटायचं आहे..!
कारण आत्ता आम्हाला सगळ्यांना टाईमपास करायचा आहे..!
मी तिला बोल्लो की, मरू द्या झाडाला नाव-बिव..!
अजून किती दिवस मी लटकत राह्यचं..?
आता लहान पोरं बी घाबरायची बंद झाली मला..!
माझी पुनर्जन्माची फाईल तेवढी लवकर सरकवा म्याडम..!
त्या करन-अर्जुनमधी तर सल्मान-शारूकला विक्रमी
वेळेत नवीन शरीर ॲलॉट झालं होतं..!
म्हणजे हिकडं आंब्रीश पुरीनं त्यांचा काटा काढला..
आणि तिकडं लगेच राखी प्रार्थना कराय लागली..
सात्विक संतापानं थरथराय लागली..!
तळतळाट वगैरे द्याय लागली..
त्यामुळं देवळातल्या घंटा बिंटा आपोआप जोरजोरात वाजाय लागल्या.. कालीमातेची मूर्ती वाकडी तिकडी व्हाय लागली.. आकाशात वीजा बिजा कडकडाय लागल्या आणि ताबडतोब तिकडं शारूख सल्माननं पुन्हा जन्माला आले..!
मग माझ्याबाबतीत ही दिरंगाई का करता?
असा प्रशासकीय अन्याय का ?
हा पंगती प्रपंच का?
हे डिसक्रिमिनेशन कशासाठी ?
निषेधार्ह आहे हे..!
भयंकराय हे सगळं..!
ह्यावर म्याडमचं म्हणणं पडलं की, उगाच पिरपिर करू नका.
राखीच्या प्रार्थनेत तेवढी जबरदस्त ताकदच होती..!
तुमच्यासाठी तेवढ्या उत्कटतेने कुणी प्रार्थना
करत असेल, असं काही मला वाटत नाही..
किंवा कुठलीही काजोल घोड्यांच्या
तबेल्यात तुमच्यासाठी जीव टांगणीला लावून खोळंबलेली नाहीये..!
आणि शिवाय तुम्हाला कुठल्या दुर्जनसिंग ठाकूराचा
सूडही घ्यायचा नाहीये..!
बाकी तुम्ही काय सूड-बिड घेणार म्हणा..!
तुमचं सगळं रेकॉर्ड आहे इथं..! हे बघाss..!
एकदा डास मारण्यासाठी कुणीतरी टाळी वाजवली आणि तेवढ्यानंही दचकून तुम्ही गचकलात, असं लिहिलंय इथं..!
मग आता परत जाऊन तरी वेगळं काय करणार आहात ?
आणि कशासाठी उगाच एवढी घाई करता ?
शिवाय मूळ प्रश्न जसाच्या तसाच उरतो की परत तिथे जाण्याचे प्रयोजनच काय?
बाकी, तुकाराम वगैरे वाचलायत की नाही तुम्ही?
तुमच्यासारख्यांसाठी तोच बेस्ट आहे..!
शेजारी म्हणती / मरेना का मेला /
आणिला कंटाळा / याणें आम्हा //
अर्थात, लोकांना कंटाळा येण्याआधीच माणसानं
मुक्काम आवरता घ्यावा, असं मला एक वाटतं बाई..!
असो. तुम्ही जा आता परत तुमच्या ड्युटीवर..!
नेमून दिलेलं काम करा..!
आणि काय हो?
तुम्हाला काही लाज लज्जा शरम आब्रू ?
असले कसले पिशाच्च तुम्ही ?
सरळ सांगता की लहान मुलं घाबरत नाहीत म्हणून..!
अहो, काही नवनवीन प्रयोग वगैरे करा जरा..
एवढी सगळी टेक्नॉलॉजी आलीय आता..!
जरा अपडेट करा स्वतःला..!
कॉंन्जुरिंग, रॉंग टर्न किंवा समजा द ग्रज वगैरे बघा जरा..!
'आहट'मधली भुतं गेल्या शतकातच लंपास झाली..!
आता तुम्ही तोंडावर प्लॅस्टिकची पिशवी बांधून पाचोळा तुडवत चालल्यामुळे आजची पोरं घाबरणार आहेत का..?
कळायला पाहिजे तुम्हाला..!
सगळं मीच सांगायचं का ?
कठीणाय बाई..!
प्रतिक्रिया
7 Jun 2022 - 12:43 pm | नगरी
पतीलबुवा भन्नाट
7 Jun 2022 - 1:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
आम्ही गेली पाच हजार वर्षे तुमच्या शेजारच्या फांदीला लटकून आहोत. आमचा नंबर आधी मग तुम्ही.
पैजारबुवा,
7 Jun 2022 - 4:49 pm | स्वधर्म
लय भारी पाटिलबुवा. अजून येऊद्या.
7 Jun 2022 - 11:22 pm | बाजीगर
खूप आवडलंं .
हा हाहा....मझा आ गया.
7 Jun 2022 - 11:27 pm | सौन्दर्य
एकदम मस्त ! लै आवडला. संकल्पना आणि प्रस्तुतीकरणाला शंभरापैकी शंभर मार्क.
8 Jun 2022 - 10:59 am | कर्नलतपस्वी
पाटिलबुवा आवडली, जेंव्हा डोक्याचा गोएंदा होतो तेव्हाच असे मुक्तक प्रसवते.
धन्यवाद
9 Jun 2022 - 6:46 am | सुखी
खुसखुशीत लेख
9 Jun 2022 - 12:44 pm | अनिंद्य
सुंदर झिपऱ्या असलेली हडळ :-)))
लेख आधी वाचला होताच, पुनर्जन्मावर आताही तेवढेच हसायला आले.
9 Jun 2022 - 7:01 pm | सस्नेह
मस्ताय पुढल्या जन्मासाठी शुभेच्छा ! :D
10 Jun 2022 - 11:40 am | शशिकांत ओक
सामान्य माणसाला पुनर्जन्म घेण्याची हौस भारी...