माझे काही आवडते कम्प्युटर गेम

कॉमी's picture
कॉमी in जनातलं, मनातलं
16 May 2022 - 6:39 pm

खेळ अनेक कारणांसाठी भारी असतात. काही गेम खेळायच्या पद्धतीसाठी भारी वाटतात- उदा मॉरधाऊ हा तलवारी/धनुष्य/भाले यांचा द्वंद्व खेळ त्याच्या स्वतःच्या अश्या द्वंद्व पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे.

काही गेम्स अवर्णनीय ग्राफिक्स आणि भलीमोठी अद्भुतरम्य कथा असल्यामुळे भारी वाटतात. उदा.- प्रिन्स ऑफ पर्शिया मालिका, गॉड ऑफ वॉर मालिका इत्यादी. हे गेम्स हेवी ड्युटी असतात, संगणकांवर बहुदा चालत नाहीत. चालले तरी भारीतलं ग्राफिक कार्ड असेल तरच.

काही खेळ त्यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेसाठी प्रसिद्ध असतात. उदाहरणार्थ माझा एक खूप आवडता गेम- पेपर्स प्लिज. ह्यात आपण अरतोत्झका नावाच्या देशात बॉर्डरवरच्या एका चेकपॉइंटवर काम करत असतो- आणि येणाऱ्या लोकांची कागदपत्रे तपासून त्यांना आत सोडणे किंवा न सोडणे हे निर्णय घेत असतो. योग्य निर्णय घेतला तरच पैसे मिळतात, नाहीतर आपला परिवार एक एक करून मरतो आणि आपण स्वतः आत्महत्या करतो. योग्य निर्णय घेतले तरच पैसे मिळणार- मग नवऱ्याला एण्ट्री देऊन बायकोला अडवून ठेवणे, "प्लिज, माझी मुलं देशात आहेत" अश्या विनंत्यांना दुर्लक्षित करणे- हे सगळे करावे लागते. आणि काम सुद्धा वाटते तितके सोपे नसते. पुढे पुढे वेगवेगळ्या देशांशी आरतोत्झकाचे संबंध जसे जसे बदलत जातात तसतसे कागदोपत्री नियम वाढत आपले काम खडतर आणि खडतर होत जाते.

पैसे मिळवण्याचा प्रामाणिकपणा हा एकच मार्ग नसतो- देशविरोधी कारवाया करणारा एक बंडखोर ग्रुप असतो त्यांनी सांगितले तसे केले, काही अपात्र लोकांना देशात सोडले तर ते भरभक्कम पैसे देण्यास तयार असतात. पण अर्थात- पुढे मागे आपण पकडले जाण्याची शक्यता असतेच.

तीस दिवस (गेममधले) बॉर्डर वर काम करायचे असते- आणि तुम्ही वेगवेगळ्या दिवशी जे निर्णय घ्याल, त्यावर तिसाव्या दिवशी २० वेगवेगळे एंडींग असू शकतात. मी स्वतः २-३ शेवट इतकेच पाहिलेत.

हा झाला भन्नाट संकल्पना असणारा खेळ.

त्यानंतर माझा अतिशय आवडणारा गेम- जो खेळताना अजूनसुद्धा उत्कंठा आणि भीती दाटून येते असा गेम- इनसाईड. हा उत्कंठावर्धक कथा आणि ह्रदयाची गती वाढवेल अश्या गेमप्ले साठी आवडतो.

खेळाबाबत हा सर्वसाधारण साईड स्क्रोलर खेळ आहे. (साईड स्क्रोलर म्हणजे तुमचे खेळातले पात्र केवळ डावीकडे आणि उजवीकडे तुम्ही हलवू शकता. ३६०° भ्रमण करू शकत नाही. मारिओ सुद्धा साईड स्क्रोलरच आहे.) डावीकडे जाणे, उजवीकडे जाणे, उडी मारणे आणि वस्तू वापरणे- चारच क्रिया करता येतात. गुंतागुंत नाही.

इशारा- इथून पुढे इन्साईडच्या कथेचा संपूर्ण रहस्यभंग होण्याची शक्यता आहे- यू हॅव्ह बिन वॉर्नड !

आपण एक १०-११ वर्षांचा मुलगा असतो. खेळाच्या सुरुवातीला आणि शेवटपर्यंत कसलेही निर्देश येत नाहीत, कथा कुठेही लिहून येत नाही. जे काय दिसते तेच.

सुरुवातीलाच तो मुलगा एका उंच भिंतीवरून आत पडतो- आता पुन्हा त्या पल्याड जाणे शक्य नसते. मुलगा घाबरलेला दिसतो. काही पर्याय नसल्याने आपण पुढे पुढे जाऊ लागतो. पुढे गेल्यावर रखवालदार असतात, त्यांना आपण दिसलो तर ते पकडण्याचा प्रयत्न करतात. ते पकडल्यावर आपल्यासोबत काय होते हे आपल्याला समजत नाही- गेम ओव्हर होतो. पण एका प्रसंगात रखवालदारांची एक गाडी चालली असते- त्या गाडीतून टाकलेल्या फ्लॅश लाईट मध्ये आपण आल्यास ते गोळी घालून मुलाला ठार करतात. थोडक्यात- जिथे कुठे तो मुलगा आलाय ते गंभीर प्रकरण आहे- आणि पुढे पुढे जात राहणं हा भीतीदायक असला तरी एकुलता एक पर्याय आहे.

काही अंतरानंतर रखवालदारांसोबत कुत्रे सुद्धा येतात. ते अर्थात जास्त वेगाने पळतात- आणि सरळ मान धरतात. कुत्रे आणि रखवालदारांना चुकवत, काही वेळेस पाठी मागे लागलेल्या कुत्र्यांना चकवा देऊन मुलगा पुढे पुढे जात राहतो. प्रत्येक ठिकाणी मुलाच्या (म्हणजेच तुमच्या) बुद्धीचातुर्याची कसोटी आहे. अध्येमध्ये पाण्यात उतरून पोहावे लागते.

जसं जसं आत जाऊ तसं तसं एक निर्जन शहर लागतं- साधं चिटपाखरु पण नाहीये. रात्रीचा एव्हाना दिवस झाला असतो. काही विचित्र आणि किळसवाण्या गोष्टी सुद्धा घडतात- एका गटारीपाशी दोन तीन डुकरांची प्रेतं (?) पडली असतात- त्यातल्या एकाच्या पार्श्वभागातून एक पॅरासाइट वळवळत असतो आणि आपण बाजूने गेल्यावर ते डुक्कर अचानक जागे होऊन वेदनेने किंकाळत आपल्यावर हल्ला करू लागते- त्याला चुकवत आणि त्याच्या भिंत तोडण्याची ताकद असलेल्या धडकेचा वापर करत शहरात पुढे पुढे जावं लागतं. शहरात माणसे नसतात- पण कुत्री असतात. त्यांना चुकवत जावे लागते.
शहर निर्जन का आहे हे काही समजत नाही.

पुढे मुलगा वैज्ञानिक प्रयोग होत असलेल्या इमारतीत पोहोचतो. पुढे बराचसा गेम या इमारतीत पुढे पुढे प्रवास होतो. इथे, ह्या प्रोगशाळेसाठी शहर मोकळे केले आहे असा अंदाज खेळणारा बांधतो. इथे भरपूर गोष्टी आहेत- एका टोपी असलेल्या मशीनला मुलगा कनेक्ट होतो आणि अचानक माणसांची निपचित शरीरं उठून मुलाच्या हालचालींप्रमाणे हालचाली करतात- त्यांचा वापर करून आपली वाट मोकळी करावी लागते.

पुढे लॅब मध्ये लक्ष ठेवणारे प्रकाशझोत असतात त्यांना चुकवत जावे लागते. पुढे एक मोठ्ठी गॅलरी असते- आणि गॅलरीच्या पुढे मोठ्ठे सॉनिक बूम करणारे मशीन असते- त्या बूमला चुकवत जावे लागते. एका ठिकाणी लाकडी पृष्ठभागावरून चालताना सडके लाकूड तुटून मुलगा थेट खाली पडतो- तो आज्ञापालक झोंबी माणसांच्या असेम्बली लाईन मध्ये- रांगेत इतर माणस जे करतात तेच आपल्याला करावे लागते, नाहीतर निरीक्षक रोबो आपल्याला फॉल्टी म्हणून संपवून टाकतो! एकूण संपूर्ण खेळ अतिशय तणावपूर्ण आणि गंभीर वातावरणात आहे. आजूबाजूच्या दृश्यांबद्दल आपल्याला शिसारी येते- मुलाच्या हालचालींमध्ये भीती दिसते.

यापुढील लॅबचा भाग अनपेक्षितपणे बराचसा पाण्यात असतो. हे पाणी पुराचे असल्यासारखे वाटत असते- कारण पाण्याखाली पोचल्यावर गढूळ पाण्यात त्या खोल्यांमधले फर्निचर आहे तसे तळाशी असते.
मुलगा पोहत/चालत पुढे पुढे जात राहतो. इथे फारसा धोका दिसत नाही, आणि काही किरकोळ समस्या/अडथळे पार करत मुलगा जात राहतो.

खेळातला सर्वात थरारक भाग माझ्या मते आता येतो- एके ठिकाणी आपण एका काचेच्या टॅंक समोर येतो-त्यात एक निश्चल लहानसे शरीर दिसते- पांढरेफटक आणि साधारण मुलाच्या आकाराचेच अनावृत्त शरीर. डोक्यावर लांबसडक, कमरेखाली येतील इतके पाण्यात पसरलेले केस. पाहता क्षणी चर्र व्हावे असे. आणि चेकोव्हच्या बंदुकीच्या नियमानुसार- अर्थात पुढे जाण्यासाठी टॅंक मध्ये उतरणे भाग पडते. पाण्याखाली आपण त्या शरीराला पोहत मागे टाकतो आणि अचानक ती (मी तिला जलपरी म्हणतो) जागी होऊन आपल्यापेक्षा कितीतरी जोरात पोहत मागे येऊ लागते- आणि आपण अगदी थोडक्यात जमिनीवर जातो.यापुढे पाण्यात उतरायचे झाले तर जलपरी हमखास आपल्या साठी दबा धरून असते. आपण जर थेट पाण्यात उतरलो तर ती हमखास आपल्याला धरते आणि खेळ संपतो. तिला विरुद्ध दिशेला जाण्यासाठी चकवूनच पाण्यात उतरावे लागते!

पुढे मुलाला एक लहानशी सबमरीन मिळते आणि खूप खोल पाण्यातून लांब प्रवास करावा लागतो. जलपरी मागावर असतेच- आणि जर वेळोवेळी सबमरीनच्या प्रकाशाचा झोत तिच्यावर टाकून तिला स्तब्ध केले नाही तर ती सबमरीन चक्क फोडून आपल्याला बाहेर ओढते.

यापुढे कथेत मोठी कलाटणी!

काही वेळानंतर जमिनीवर प्रवास चालू होतो, आणि आपण एका दोरीला लोंबकळून एका रेलिंगला पकडून चढत असतो आणि रेलिंग तुटते आणि...

आपण पाण्यात पडतो आणि जलपरी आपल्याला ताबडतोब धरते. पण गेम ओव्हर होत नाही, खेळ चालूच राहतो ! ती आपल्याला आत आत ओढून घेत जाते, मुलगा तिच्या पकडीत धडपडत असतो, त्याच्या तोंडातून हवेचे बुडबुडे निघत असतात, आणि थोड्या वेळात तो निपचित होतो आणि जलपरी त्याला सोडून देते. तो निःसंशय पणे मेला असतो, आणि तळाशी जाऊन पडतो.

तळात मासे त्याच्या शरीराभोवती गोळा होतात. मी स्क्रीनकडे काहीतरी होईल म्हणून पाहत राहिलेलो, पण काहीच झाले नाही. म्हणून बटन दाबले तर- मुलगा हलू लागतो !

तो मेलेला आपण पाहिला आहे- तरी तो पोहत बाहेर पडतो. आता त्याला पाण्याखाली श्वास लागत नाही, कितीही वेळ पोहू शकतो. मी बावचळून गेलो पण खेळत राहिलो.

मुलगा (?) आता आणखी ताकदवान आहे. आता त्याला झोंबी लोकांना आज्ञा देण्यासाठी मशीन लागत नाही, ते तसेच आज्ञापालन करतात. आपण खेळत खेळत आणखी पुढे जातो- आणि इमारतीतून बाहेर पडून शहराच्या मध्यभागी येतो. इथे लॅब कोट मधली बरीच माणसं आहेत, दुकानं आहेत, आणि आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. सगळ्यांची लगबग एका भल्यामोठ्या काचेच्या अर्धगोलाकडे असते. सगळे आत वाकून कशाकडे तरी पाहत असतात- ते आपल्याला दिसत नाही.

आणखी बरेच खेळल्यावर आपण पाण्यात पडतो, आणि पाण्याच्या मधोमध एक मांसाचा भलामोठ्ठा गोळा असतो- बरेच हात पाय दिसत असतात, काही शरीर घेऊन एकत्र फ्यूज केल्यासारखी. आणि बाहेरून सगळे याकडेच बघत असतात. आणि मुलगा पाण्यात पडल्यावर सगळे आश्चर्याने उद्गारतात. तो गोळा बांधला असतो, मुलगा (म्हणजे आपण) जाऊन ते बंध सोडवतो- आणि काही कळायच्या आत मुलगा सुद्धा त्या गोळ्यामध्ये फ्यूज होतो, आणि आपण आता त्या गोळ्याला नियंत्रित करत असतो.

यापुढील खेळात तो गोळा लॅब फोडून बाहेरच्या जगात जातो- असे आहे. आपल्या मार्गात काही लॅब मधले शास्त्रद्न्य तुडवले जातात- आपल्या हातून.

कथेचे मी केलेलं आकलन म्हणजे जलपरी जेव्हा मुलाला खाली खेचते तेव्हा मुलगा मरतो, आणि एक "हाईव्ह माईंड" (सामूहिक मन) मुलाचा ताबा घेते. आणि आपण आता मुलगा म्हणून खेळत नसतो तर हाईव्ह माईंड म्हणून खेळत असतो.

खेळाचे ग्राफिक्स साधेच असले तरी अत्यंत प्रभावकारक आहेत. अध्येमध्ये बरेच पझल्स आहेत. अतिशय भीतीदायक आणि थरारक अनुभव आहे.

पेपर्स प्लिज आणि इन्साईड हे दोन्ही खेळ प्रौढांसाठी आहेत. मला वाटतं- संगणक खेळांकडे प्रौढजगताकडून फार दुर्लक्ष होते. खरेतर- जशी पुस्तकं आणि सिनेमे कहाणीत बुडवून टाकणारे अनुभव देतात- त्याच्या एक पाऊल पुढे संगणक खेळातून अनुभव मिळतो- तुम्ही स्वतः कथेशी मर्यादित का होईना, संवाद साधत असता. अजून खेळाडूंच्या निवडीप्रमाणे बदलणाऱ्या कथा असणारे खेळ तितके प्रगत नाही झाले- पण पुढे नक्की होतील अशी आशा आहे. नुकताच जॉर्ज आर आर मार्टिन- म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स पुस्तकांचा लेखक- त्याने एल्डन रिंग ह्या गेमसाठी बरेच लिखाण केले आहे- आणि आजतागायत बनवलेला सर्वात इमर्सिव्ह गेम म्हणून तो खेळ प्रसिद्ध झाला आहे.

तंत्रमौजमजाआस्वादमाध्यमवेध

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

16 May 2022 - 7:15 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही खफवर सांगीतल्या नंतर ईनसीईड डाऊनलोड केला होता. फ्री ट्रायल घेतली आयफोनवर. ५९० रूपयात विकत आहे एपस्टोर वर. माझ्याकड् लॅपटाॅप नसल्याने बाकी पास.

तुषार काळभोर's picture

16 May 2022 - 9:21 pm | तुषार काळभोर

माझा गेम प्रवास १९९६ मध्ये सुरू झाला ब्रिक गेम पासून. त्यावर ब्रिकगेम, स्नेक आणि रेस अशा 3 गेम होत्या.

नंतर १९९७-९८ मध्ये शाळेजवळ व्हिडिओ गेम ची दुकाने उघडली. एक रुपयाचा एक कॉइन घेऊन खेळायचं. खूप मुले 'त्यावेळी' दहा-वीस रुपये एकावेळी घालवायची. आमची मजल कधी दोन रुपयांपुढे गेली नाही. पण खेळण्या इतकीच मजा दुसऱ्यांना खेळताना पाहण्यात यायची. त्यातले सर्वात लोकप्रिय अर्थात मारिओ आणि काँट्रा. त्याशिवाय १९४२, बॉम्बरमॅन, कार रेस (ज्यात जाता जाता पेट्रोल चं कॅन उचलावं लागायचं).

१९९९ च्या उन्हाळी सुट्टीत कॉम्प्युटरशी ओळख झाली. त्याबरोबरच कॉम्प्युटर गेमशी. सगळ्यात पहिल्यांदा खेळलेला गेम प्रिन्स ऑफ पर्शिया. विंडोज९५ वर. सोबत रोड रॅश!

पुढे २००२ मध्ये एक्सपी वर ग्राफिक्स कार्ड असलेल्या कॉम्प्युटरवर खेळलो Return to the Castle of Wolfestein. मी खेळलेली पहिली FPS. मग या प्रकाराचं वेड लागलं!
IGI, IGI2, Max Payne, Max Payne 2. त्यावेळी कार शर्यतीच्या नव्या रुपाशी ओळख झाली. नीड फॉर स्पीड!!
NFS2. त्यात सर्वात आवडत्या गाड्या Ferrari F50 आणि Mclaren F1. पुढे NFS चं वेड वाढतच राहिलं.
गाड्या पळवणं आणि सोबत हाणामारी, गोळीबार, पाठलाग.... आयुष्यात आली ग्रँड थेफ्ट ऑटो व्हाइस सिटी! तरुण वयातील मुलांना गेमकडून आणखी काय हवं असतं!!
या पूर्ण काळात AOE2 आणि Sims या थोड्या जास्त डोकं वापरावं लागणाऱ्या Strategy गेम्स ची सोबत पूर्ण वेळ होती. पुढे बरीच वर्षे क्रिकेट २००७ हेदेखील आवडीचा प्रकार होता. त्याच्या पुढच्या भागाची वाट बघत बघत माझं लग्न झालं! तेव्हा दरवर्षी फिफाच्या गेम्स चं नवं व्हर्जन यायचं!

मध्ये मेडल ऑफ ऑनर आणि कॉल ऑफ ड्युटी खेळलो. पण ग्राफिक्स कार्ड त्यावेळी पुरेसं नसल्याने या गेम खेळण्यावर मर्यादा यायच्या.
काही गेम्स खेळण्याचं स्वप्न पूर्ण नाही झालं. जसं की फ्लाईट सिम्युलेटर.

जेम्स वांड's picture

19 May 2022 - 7:38 am | जेम्स वांड

मध्ये क्रीम्सन स्काईज नावाचा एक सिम्युलेटर होता, त्याकाळच्या मनाने डिसेंट ग्राफिक्स आणि वर्ल्ड वॉर टू मधील प्रोपेलर बेस्ड ऐरोप्लेनचे सिम्युलेशन, असा लैच खास प्रकार तो. खरंतर सिम्युलेटर पेक्षा जास्त फर्स्ट पर्सन गेम होता त्यामुळे प्रॉपर कॉकपिट बेस्ड फ्लाईंगचा फील असे, म्हणून सिम्युलेटर म्हणायचं आपलं.

.

प्रचेतस's picture

19 May 2022 - 7:10 am | प्रचेतस

मी खेळलो ते पीसी गेमच.
त्यामध्ये सर्वात अवघड होता तो कमांडो. चिटकोड शिवाय खेळताच येत नव्हता.
स्पायडरमॅन आणि द ममी फारच भारी होते. द ममीचे साउंड इफेक्टस, ग्राफिक्स वगैरे जबरदस्त होते.
मास्टर्स टेनिस खेळलोय तो तर अतिशय भारी होता, टेनिसचे सर्व शॉट्स खेळता यायचे. अजूनही ती ओरिजिनल डिस्क आहे मजकडे. बाकी ea स्पोर्ट्स चे क्रिकेट 97, 2004, 07 ही सर्व व्हर्जन्स खेळलोय.