आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
मग सरले ते दिस
हरवले बालपण
शहरात पोटासाठी
सुरू झाली वणवण.
उलटले दिस मास
किती काळ गेला पुढं
तरी मना अजूनही
आहे गवाचीच ओढ.
सारं काही छान आहे
दिस सरती सुखात
जाई मन उडूनिया
तरी गावाच्या रानात.
प्रतिक्रिया
13 Apr 2022 - 10:56 pm | कर्नलतपस्वी
गाव जरी बदलला
तरी माती तीच आहे
परागंदा जरी झालो
तरी नाती तीच आहे
शहरलेल्या गावा मधे
कसे वावरावे
कोण आपले कोण परके
कसे समजावे
भिरभिरते मन शोधते
ते गाव आठवणीतले
भेटतील का पुन्हा ते
चेहरे साठवणीतले
सोडले जरी मी गाव
डोळ्या समोर चित्र आहे
आज ही तीथे माझा
एक जीवलग मीत्र आहे.
14 Apr 2022 - 5:53 pm | Deepak Pawar
तुमची कविता आवडली.