पाय घसरल्यामुळे पाण्यात पूर्ण उताणा पडलोय. महेशचा हात हातातून सुटलाय. तोंडाच्या वर किमान दोन अडीच फूट तरी पाणी आहे.पडल्यामुळे पाण्याचा तळ डहुळलाय. तसाही अंधार आहे. डोळ्यासमोर काहीच दिसत नाहिय्ये.अंधारलेलं... , गढुळलेलं... हिरवट शेवाळंलेलं ....असं सगळं अस्पष्ट दिसतंय.
मागील दुवा ध्रांगध्रा - ८ http://misalpav.com/node/49751
मी चाचपडत तोल सांभाळायचा प्रयत्न करतोय. इकडे यिकडे हात करताना मला महेशचा हात हाताला लागतो. मी कसाबसा उभा रहातो. डोळ्यासमोर अजूनही अस्पष्ट पण मघापेक्षा नक्कीच टळक उजेड जाणवतोय. मी डोळे हाताने चोळतो. डोळे उघडतो.वेल्डींग चालू असावं इतका लख्ख प्रकाश उजेड.अंधाराला सरावलेले डोळे या उजेडाने चांगलेच दिपलेत. ला पुढचे काही एक दिसत नाहिय्ये. महेशचा हात हातात घट्ट पकडून मी अंदाजाने पुढे चालतोय. त्याचीही अवस्था माझ्या पेक्षा वेगळी नसावी.
पकडलेल्या हाताला मधूनच ओढ बसतेय. तो ही अंदाजाने धडपडत चालत असावा.
पाण्यात खाचखळगे नाहीत हे नशीबच म्हणायचे. खंदक वाटला होता त्यापेक्षा बराच रुंद आहे. उजेडाने दिपल्यामुळे अजूनही डोळे मिटूनच चालतोय.पायाला कसलासा भिंतीसारखा भाग आड आलाय. पायानेच चापडतो. अरे ही तर पायरी आहे!
एक ... पुढे एक ... आणखी एक. ...पायर्या चढून वर आलो.आता पाण्याच्या पूर्ण बाहेर आहे. अंगाला वार्याचा स्पर्ष जाणवतोय. डोळे किलकिले करून पहायचा प्रयत्न करतो. जमतंय बहुतेक. थोडे थोडे करून उघडतो.. मघाशी वाटला होता तितका उजेड आता प्रखर वाटत नाही.समोर झाडं , हिरवा डोंगर दोसतोय. डोळे आता पूर्ण उघडले आहेत.
" मायला सकाळ झाली इतक्यात...? "समोर क्षितिजावर हातभर वर आलेला सूर्य पाहून माझ्या आणि महेशच्या दोघांच्याही तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं.
" पण कसं शक्य आहे?" आमच्या दोघांतलं कोण कोणाला विचारतंय हेच कळंत नाहिय्ये.
मघाशी पाच मिनीटाम्पूर्वी पहाटेचे साडेचार वाजले होते.आता जावळजवळ साडे दहा वाजले असावेत. इतका उजेड.मघाशी आकाशात चंद्र चांदण्या होत्या. रात्र होती.अंधार होता. आता डोळ्यात भसक्कान घुसावा इतका उजेड आहे. डोकं विचार करायला विसरले आहे. "नो न्यूज; इज अ गुड न्यूज" च्या चालीवर " नो लॉजिक इज अ गुड लॉजिक" असे म्हणता आले तर बरे होईल.
स्वप्न असावे ... म्हणजे असेल तर बरे होईल.पण नसावे. कारण एक तर स्वप्नात इतका प्रखर उजेड दिसणार नाही. आणि दुसरे म्हणजे मी जे स्वप्न पहात आहे तेच स्वप्न महेशही पाहातोय. स्वप्न म्हणजे काही एस एस सी बोर्डाचा प्रश्नपत्रिका नाही की प्रत्येकाला सारखीच यायला. अहो अगदी एकाच वेळेस दोन जणांना पडलेल्या स्वप्नात दिसलेली माधुरी दीक्षित वेगवेगळ्या ड्रेसमधे दिसत असेल. हा असा डेटा कुणीतरी गोळा करून पब्लीश करायला हवा.हा विचार मनात आला आणि बरं वाटलं. निदान विचार करण्याइतकं डोकम चालतय हे काय कमी आहे?
एक पायरी वर चढुन आलो. आजूबाजुला नजर फिरवली. डावी कडे रस्ता वळण घेऊन पुढे कुठेतरी जातोय.उजवीकडे हिरव्या गार रंगाच्या शेवाळी काळपट हिरवा, गर्द हिरवा, पेरूसारखा पोपटी हिरवा , पिवलसर हिरवा, फिक्कट पांढुरका हिरवा , अशा हिरव्या च्या असंख्य छाटा मिरवणार्या गवतानी नटलेला डोंगर उभा आहे. समोर लुसलुशीत गवतावर वार्यामुळे उठणार्या लाटा दिसताहेत. मधूनच चमकणारे पावसाचे / दवाचे थेंब समुद्राच्या लाटांची आठवण करून देताहेत.माग एतो ओहळ , खंदक आहेच. सूर्याची किरणे पडल्यामुळे त्यातलं पाणी चमकतय. आम्ही त्यातून बाहेर आल्याची एकमेव खूण म्हणजे आमचे ओले कपडे आणि बूट.
आपण या पाण्यात पाऊल टाकले होते तेंव्हा उत्तर रात्र होती , आत्ता साडेदहा झाले आहेत...... या एका विचाराने ,अंगावर काटा उभा राहिला.
हुडहुडी वाजावी तशी थंडी अचानक जाणवायला लागली. अर्थात हे त्या अनामीक भितीमुळे की वारा आणि ओले कपडे यांचा एकत्रीत परिणाम हे कळायला मार्ग नाही. पाठीच्या कण्याला गारवा जाणवतोय. पण कपाळावर घामाचे थेंब जमा झाले आहेत. एकाच वेळेस दोन्ही अनुभवतोय.
मी महेशकडे पहातो. तो माझ्याकडेच पहातोय.
महेशच्या चेहेर्यावर घाबरल्याचे भाव आहेत. कपाळावर नुकताच पाऊस पडून गेला असावा इतके घामाचे थेंब , नाक फेंदारलंय. डोळे वटारालेत, तोंड अर्धवट उघडे आहे
त्याच्या चेहेरा अगदी घाईची लागल्यासारखा दिसतोय. त्याही अवस्थेत मला एकदम हसु फुटलय त्या कल्पनेनंच. महेशला दम धरवत नाहिय्ये इतकी घाईची लागलीये, आणि संडासात कुणीतरी ऑलरेडी जाऊन बसलंय कुठल्याही क्षणी घात होईल , असा चेहेरा झालाय त्याचा.
माझ्याही चेहेर्यावर तसेच भाव असावेत. महेशच्या चेहेर्यावर हसू फुटलंय. पुढच्याच क्षणी आम्ही धरण फुटल्यासारखे हसतोय येड्यागत. आपण कोणत्या परिस्थीत आहोत हे विसरून आम्ही हसत सुटलोय डोळ्यातून पाणी येईपर्यंत.
हसल्यामुळे एक बरे झालेय. फुफुसाला व्यायाम झाला. छातीत भरपुर ऑक्सीजन आला. एकदम फ्रेश वाटले.मघापासून वातावरणात दाटलेले ते कसलेसे मळभ दूर झाले.
"आता पुढे काय ?" हा विचार करावासाच वाटला नाहिय्ये. आम्ही दोघेही पायवाटेवरून चालायला लागलोय पांढरीच्या दिशेने.
समोरून एकजण सायकलवर येताना दिसतोय. खाकी शाळकरी चड्डी, सदरा. जरा जवळ आल्यावर चेहेरा दिसायला लागलाय.
" अरे हे तर ते चहावाले झेले आण्णा! .... अगदी तेच.! नाही नाही ! झेले आण्णा नाहीत. हा कोणी शाळकरी पोरगा दिसतोय. चेहेरा हुबेहूब झेले आण्णा आजोबांसारखाच"
"ते म्हातारे झेले आण्णा.... डोंगरात वाटेत भेटलेला तो तरूण माणूस ...., आणि आता हा शाळकरी मुलगा...... सगळ्यांचे चेहेरे एकसारखे. कालयंत्रात बसून आपण मागेमागे प्रवास करत निघालो तर असेच दिसेल. आपल्या बाबतीतही. गण्याच्या बाबांनी केले होते तसे. त्यांनी गण्याचे लहानपणापासूनचे फोटो अगदी क्रमाने लावून अल्बम बनवला होता. तो पहाताना काळ भराभरा पुढे सरकल्याची भावना व्हायची.हे इथे तसेच फक्त अल्बम उलट्या क्रमाने , म्हणजे मागून पुढे पहातोय असं वाटतय रे शिवा." मला म्हणाचंय तेच महेश बोलतोय.
" मायला खरेच की रे. या सगळ्यांचे चेहरे किती सारखे आहेत. जगात म्हणे एकसारखी दिसणारे सात माणसे असतात. हे ऐकलंय. ... हा सर्वे कोणी केला असेल रे"?"
" तू ना शिवा .... प्रत्येक गोष्टीत स्टॅटेस्टीक्स, सर्वे असलं काहीतरी आणतोस आपण इथे आलो आहोत ते देऊळ पहाण्यासाठी . ते अगोदर पाहूया. इतर सर्व्हे नंतर करूया" महेशचा निश्चय ठाम आहे.
इथे पायवाटेवर फारशी माणसेही नाहीत. मघाचा तो सायकलवाला मुलगाही निघून गेलाय. थोडे पुढे चालओ तर गावातला एखादा चौक आल्गेल. तिथे विचारता येईल कोणालातरी.
पायवाट आता मोठी होत गाडी रस्ता म्हणावा इतकी मोठी झाली आहे. अर्थात इथे एखादी दणकट मिल्ट्री जीपच येऊ शकेल. गावातली घरे एकजात बैठी. घाटावर गावाकडे असतात तशी कौलारू नाहीत की कोकणात शाकारलेली असतात तशी पण नाहीत. पण सगळी घरे उतरत्या छपराची.लाईटचे नुसते खांब उभे आहेत. कधी काळी केले असावेत. त्यावर तारा बल्ब असले काही नाहीच. प्रत्येक घरासमोर छोटेसे अंगण.बाजूने कुंपणाला धोत्र्यासारख्या फुलांची झाडे. कुठे पांढरी कुठे पिवळी ,लाल. अंगणात काही झाडे कडूनींब बेलफळासारखी. एखाद्या चित्रात दाखवावे तसे चित्रात असतात त्या प्रमाणे आभाळात मराठी चार अंकाने दाखवलेले पक्षी नाहीत
इतकेच.
कुठल्याच घरात काही हालचाल दिसत नाहीये.
थोडे पुढे आलोय. समोर एक माणूस , एक बाई आणि त्यांचा हात धरून चालत जाणारे एक लहान मूल पुढे जाताना दिसतय.चला निदान कोणीतरी दिसलं तरी. चला यांना विचारूया.
आम्ही भरभर चालत त्या कुटुंबाला गाठतो.
नमस्कार दादा.....
क्रमशः
प्रतिक्रिया
10 Jan 2022 - 11:06 am | गवि
ओह. आता लक्षात आलं काय घडलं ते.
वाह.. मजा येतेय. पुभालटा.
10 Jan 2022 - 12:34 pm | Nitin Palkar
खरोखरच मजा येतेय, फक्त एक ते आठ भाग काल वाचले, आज नववा त्या ऐवजी आणखी काही दिवस थांबून सर्वच एकत्र वाचले असते तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे..
11 Jan 2022 - 10:10 am | विजुभाऊ
बरोबर आहे तुमचे.
पण इथे जर काहीच प्रतिक्रीया नसतील तर तुम्ही लोकानी कथेचा भाग वाचला की नाही / कसा झालाय ते समजणार नाही.
त्यामुळे कदाचित आपण लिहीतोय ते आवडले नाही असा समज होऊन माझा लिहीण्यचा उत्साह मावळेल.
तुमचे प्रतिसाद हा माझ्यासाठी एक ट्रिगर असतो.
चांगला वाईट कसेही असो. प्रतिसाद नोंदवत चला. तुमच्या प्रतिसादामुळॅ कथेलाही वळणे मिळतात
10 Jan 2022 - 12:53 pm | चौथा कोनाडा
वर्णने भन्नाट आहेत !
वाह, विजूभाऊ, कथेत पार खेचून घेतलंत की आम्हाला !
पुभाप्र _/\_
10 Jan 2022 - 7:16 pm | टर्मीनेटर
विजुभाऊ मजा येत आहे वाचायला 👍
दीर्घ लेखन वाचायला आवडत असल्याने २ ते ९ हे भाग सलग वाचले, आता पुढचे चार-पाच भाग आल्यावर तेही सलग वाचणार!
11 Jan 2022 - 11:59 am | शित्रेउमेश
मस्त... खूप भारी...
11 Jan 2022 - 2:48 pm | श्वेता२४
आज एकदमच सगळे वाचून काढले भाग. मस्तच. पु.भा.प्र.
11 Jan 2022 - 5:25 pm | Bhakti
आजचा दहावा भाग?
11 Jan 2022 - 11:17 pm | विजुभाऊ
पुढील भाग
ध्रांगध्रा - १० http://misalpav.com/node/49772
31 Jan 2022 - 12:23 pm | सुखी
झकास