ध्रांगध्रा - ८

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Jan 2022 - 7:43 am

गावाच्या अगदी सीमेवर खंदक असावा तसा एक छोटासा नाला ,ओढा दिसतोय. वात तिथे संपतेय. आणि तो ओढा ओलांडल्यावर नवीन वाट दिसतेय.ओढ्याच्या काठाशी वाट संपतेय तिथे महेश उभा आहे.. दिसला बाबा एकदाचा. मी झपझप पावले उचलत महेशपर्यंत पोहोचतो.
मागील दुवा ध्रांगध्रा - ७ http://misalpav.com/node/49747
बरं झालं बाबा. इथे थांबलास.तुला थाम्ब थांब म्हणत होतो. पण तू आपला बुंगाट." महेश दिसल्यामुळे माझी काळजी कमी झाली पण मघाची नाराजी पुन्हा वर आली.
" तू हाक मारलीस? मला काहीच ऐकू आले नाही! उलट मलाच काळजी वाटत होती की तू त्या धुक्यात वाट चुकतोस की काय म्हणून. मी निघालो पण आपण बरोबर यायला पाहिजे होतं." महेशचं एक आहे. तो आपली चूक झाली हे लगेच कबूल करुन टाकतो. " अरे पाण काय करू त्या डावीकडच्या वाटेने आलो. उतारामुळे थांबताच येईना. नशीब आपलं ! वाटेत कुठे वळनं नव्हती.नाहीतर कुठेतरी परत धडपडलो असतो." महेश म्हणतोय तेही खरंच होतं म्हणा.
" हेच ते पांढरी गाव" महेश इतक्या खात्रीने म्हणतो की कुणालाही पटावं. एका अर्थाने ते खरेही असावे. कारण ती वाट दुसरीकडे कुठेच जात नाहीय्ये. "आता आपण इथवर आलोच आहोत तर..."
काय येडाबिडा झाला कारे.....? घड्याळात बघ, वाजले किती ते? इतक्या रात्री कुठे जाणार?" आणि आपल्याला नाशीकला जायचंय सकाळपर्यंत"
"सकाळपर्यंत? .... घड्याळात तूच बघ. सकाळ ऑलरेडी झाली आहे." महेश मला हसतोय.
मी चमकून घडाळ्यात पहतो."साडे चार....पहाटेचे साडे चार! " मी अक्षरशः किंचाळतो. " अरे आपण फक्त अर्धातास चाललो असू त्या पायवाटेवर. तेंव्हा चंद्रोदय होत होता.साडे आठ नऊ वाजले असतील फारतर. म्हणजे आता फारतर दहा वाजायला हवेत. इतका वेळ चाललो आपण त्या वाटवर.जवळजवळ सहा साडेसहा तास! " घड्याळ तर चालू आहे. काटा फिरतोय.कस्म शक्य आहे हे. फास्ट चालतय म्हणावं तर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होतं.नीट चालत होतं. मग असे अचानक मांडीला चिमटा काढल्यासारखं पळायला का लागलं? बरं माझं बिघडलं ते ठीक पण महेशच्म ही बिघडावं? ते अगदी त्याच वेगात पळावं? काहीतरी चुकतय. पण काय ते समजत नाहिय्ये.
का कोण जाणे . मी वर पहातो. माझा डोळ्यांवर विश्वास बसत नाही.डोक्यावर शुक्र चमकतोय.चांदण्या दिसताहेत. मागच्या बाजूला डोंगराचा माथा दिसतोय. मघाशी ज्याच्यातून आलो त्या पिठल्यासारख्या घट्ट धुक्याचा कुठे मागमूसही दिसत नाहिय्ये. सगळ्ं कसं लख्ख!
" चल रे जाऊन तर येवूया. गाव तसं लहानच दिसतय. फार तर तासभ लागेल त्या मंदीरापर्यंत जाऊन यायला."
"अरे पण इतक्या पहाटे कोण असणार आहे तिथे? " माझा कसनुसा विरोध. आता तर तोही मावळत चाललाय. एखादी गोष्ट इतक्या जवळ असताना ती न पहायला जाण्याइतका करंटा मी नक्कीच नाही.
" आत्ता साडे चार वाजलेत. त्या तिथे पोहोचेपर्यंत अगदी गावच्या दुसर्‍या टोकाला असेल तरी आपल्याला फारतर पंधरावीस मिनीटे लागतील. मंदीर वापरात असेल तर तिथे गुरव आलेला असेलच साफसफाई करायला" महेशच्या लॉजिकला आता नाकारू शकत नाही.
" अरे आपल्याला रस्ता माहीत नाही. आणि इतक्या पहाटे रस्ता विचारायला कोणी भेटायला तर हवं! आपण जरा थांबूया आणि मग जाऊया" माझा पांढरी गावात जायचा विरोध पूर्ण मावळलाय.
" ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसं" म्हणत महेश ने बाजूच्या एका बर्‍या पैकी दगडावर बसकण मारली.
माझं लक्ष्य आता जरा आजूबाजूला जातं. आमच्या मागे पिंपळा आडून आलेला वाट. पुढे डोंगरातून वहात येणारा ओहळ. ओहळाच्या काठाने ओळीत लावलेली बुचाच्या फुलांची झाडे. गावात टिमटिमणारे दिवे. डावीकडे पुढे उतार सुऊ होतोय. त्या उतारावर लाम्बवर दिसणारे शेतांचे शंकरपाळ्यासारखे तुकडे. भात असावा. कुठे कुठे एखाद्या कारळा झेंडू असावा.उजवीकडे पुन्हा चढण सुरू होतेय.डोंगरावरून वहात येणार्‍या ओहळामुळे गावाच्या आणि आमच्या मधे एक सीमारेषा थरवून दिलेली आहे. मी सीमारेषा म्हणतोय. माझं मलाच हसू येतय. सीमारेषा या शब्दाचं पण ते तसंच असाव इतकं तसं दिसतय. ओहळाच्या या बाजूला अस्ताव्यस्त जंगली झुडपे आणि त्या बाजूला आखीव रेखीव शेतांचे आकार. या बाजूला ओबडधोबड जमीन आणि त्या बाजूला अगदी सपाट पठारासारखी जमीन. कागदावर रेषेने दुभागून एका बाजूला "त्याकाळी" आणि दुसर्‍या बाजूला "आत्ता " अशी चित्रे छापतात ना अगदी तसं दिसतय.हा डोंगर जर कॅनव्हास मानला तर ओहळ म्हणजे कागदावरची ती दुभागणारी रेषा आहे. एका बाजूला अदीम अस्ताव्यस्तपणा तर दुसर्‍या बाजूला आखीव नागरी शिस्त.
निसर्ग असा तटस्थ राहून पहायचा नसतो. आपण जेंव्हा जिथे असतो तेंव्हा त्याचा भाग झालेलो असतो. कुथेतरी वाचलेले एक वाक्य आठवलं ' पडत्या पावसाला पाहून तुम्ही आतून भिजला नसाल तर स्वतःच्या कोरडेपणाची तरीफ करू नका.तर हे मान्य करा की आयुष्यात असे आतून भिजवणारे क्षण आलेच नाहीत."
हे वाक्य आठवल आणि इथे काहितरी वेगळं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. काय वेगळं आहे ते मात्र अजून समजत नाहिय्ये.
खरं तर मस्त डोंगर, चांदणं , पहाटवारा , हवेतला ताजेपणा.....
पहाटवारा...... ! अरे .हां.... इथे वारा अजिबात नाहिय्ये.त्यामुळे की काय झाडांची पाने सोडा साधं गवत सुद्धा हलत नाहिय्ये. समोरचा निसर्ग एखाद्या चित्रात बंदिस्त केल्यासारखा तिथेच थबकलाय. वार्‍याचं ठीक आहे एकवेळ. डोंगरामुळे अडला असेल. पण इथे कसला आवाज सुद्धा ऐकू येत नाहिय्ये.एरवी भर दुपारीसुद्धा ऐकू येणारा रातकिड्यांचा आवाज गायब आहे. पुढे ओहोळ असूनही बेडकांचा आवाज नाही. अगदी चित्रात असावी तशी शांतता आहे.मी आजूबाजूला बघतो. कसलीच हालचाल नाही. साडेचार पाच वाजता पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो.पण तेही आवाज इथे नाहीत.काहितरी वेगळं आहे. काहितरी खटकतय.पण काय ते समजत नाही. मी महेशकडे पहातो. तो माझ्याकडेच पहातोय." चल निघुया. तास झाला का आपल्याला इथे येवून" आमची नजरानजर झाल्यावर महेश विचारतो.
मी घडाळ्यात बघतो. साडे चार...... मी पुन्हा एकदा बघतो. काही चुकत तर नाही ना! इथे अर्धा तसा तरी बसलोय . घड्याळाचा काटा अजून तिथेच? घड्याळ बंद तर नाही पडलं ना? सेकंद काटा फिरतोय म्हणजे घड्याळ चालू आहे. मग वेळ का नाही पुढे सरकला.मी महेशकडे पहातो किती वाजले रे.
झाले असतील की पाच साडे पाच. मघाशी साडेचार वाजले होते. अर्धा एक तास झाला असेल आपण इथे आल्याला. का रे?" महेशला कदाचित काय होतय ते समजत नाहिय्ये.
बघ बघ घड्याळ बघ जरा.
"मी नाही वापरत घड्याळ. मोबाईल असल्यावर घड्याळ कशाला." महेश अजूनही त्याच मनस्थितीत आहे. " का काय झालं?"
" अरे आत्ता साडेचार वाजताहेत. मघाशी पण तितकेच वाजले होते"
" शक्य आहे कदाचित मघाशी नीटपाहिले नसेल. अंधारात नीत दिसले नसेल" महेशचे लॉजिक बरोबर असावं. " काय करायचं मग?"
आपण त्या देवळात जाऊया. या इथे असे बसण्यापेक्षा देवळात बसू. देऊळ बंद असेल देवळाबाहेर बसू. आणि देऊळ उघडलं की पाहून परत जाऊया.
अरे पण रस्ता कुठे माहीत आहे आपल्याला" माझं तुटपुंजा बचाव.
" गाव ते केवढं हे.... देवळाचा कळस कुठूनतरी दिसेलच की . तो शोधून जाता येईल. चल निघुया" एवढे बोलून थांबला तर तो महेश कसला. तो थेट ओहोळाच्या काठावर पोहोचलाय. माझाही विरोध आता पूर्ण सम्पलाय.
ओहोळ तसा काही फार रुंद नाही.पण एका ढांगेत उडी मारून ओलांडता येईल इतकाही लहान नाही. पलीकडच्या बाजूला काही पायर्‍या आहेत . एक कठडाही दिसतोय लाकडी. त्या पुढे एक छोटासा चौथरा दिसतोय. नदीवरचा लहान घाट असावा तसा. गावातले लोक इथे कपडे धुवायला येत असावेत.
इकडून पलीकडे जायला वाट दिसतेय का ते पहातो. ओहोळाने गावाच्या भोवती जुन्या किल्ल्याला असते तशी खंदकाची लक्ष्मणरेषा आखली होती.पहाटेच्या त्या अर्धवट उजेडात नीट कळत नाही पण पाणी असावं.पाणी वहात असल्याचा आवाज येत नाहिय्ये. पण चकाकतय.
"डुब्बूक" महेशने दगड मारुन पाण्याचा अंदाज घेतला. आवाज अगदी जवळून आला. म्हणजे पाणी फारसे खोल नसावे.
महेश त्या ओहोळाच्या काठाशी गेलाय.वाकून पहातोय , ओणवा होऊन. हा पडलाबिडला तर.... एक क्षण मनाचा थरकाप उडतो. पण महेश तेवढा सावध आहे.त्याने खाली ओहळाच्या काठाला उतरायची एक वाट शोधलीये. वाट कसली. दगडाच्या कपार्‍या आणि खांचा मधे पाय रोवत बोटे रोवत तो खाली उतरतोय.
त्याच्या मागोमाग मी ही. खाली उतरलो तर जवळजवळ गुडघा भर पाणी. नशीब पायाला खाली तळ लागतोय.असल्या पाण्यात खेकडे असतात म्हणे.
महेशला हे कळायला हवं त्याच्यापेक्षा मला कळायला हवं. पण आता काय! आता उतरलोय खाली.
मी हात पुढे करतो. महेशने माझा हात पकडलाय.आम्ही पँट शक्य तेवढी वर करत पलीकडच्या दिशेने आम्ही चालायला लागलोय. हा ओहळ नाहिय्ये. बांधलेला खंदक दिसतोय. पायाला दगडी फरसबंदीचा बांधीव तळ लागतोय. सपाटीही एकसारखी. मध्यावर थोडा उतार आहे पण पाणी गुडघ्याच्या वर तीन बोटे . त्या वर जात नाहीय्ये.
वरून दिसत होता तितका खंदक अरुंद नाहिय्ये. वरून बघताना पलीकडचा काठ आठदहा पावलात गाठता येईल असे वाटत होते.पण तो तितका जवळ नाहिय्ये.किमान पंचवीस तीस पावले तरी असेल.
आम्ही दोघेही एकमेकाम्च्या आधाराने एक एक पाऊल टाकत पुढे चाललोय.पाण्याला प्रवाह नाहिय्ये. त्यामुळे ओढही नाहिय्ये. त्यामुळेच तर भिती वाटते. असल्या संथ पाण्यात दगडावर शेवाळ धरते.
"जपुन रे ....एक तर अंधार आहे आणि त्यात हे पाणी. पायाखाली काय येईल ते सांगता येत नाही." माझी महेशला सावधगिरीचा इशारा.
हे बोलतोय न बोलतोय तोच बोलाफुलाला गाठ पडावी तसा पायाखाली एक बुळबुळीत दगड आला.
शिवा... शिवा...... मी आणि महेश दोघेही पाण्यात पाय घसरून आपटलोय.त्याने माझा हात ओढला की मी त्याचा माहीत नाही. पण दोघेही आपटलोय. माझं डोकं पूर्ण पाण्याखाली गेलंय. पाण्याचा तो गार हबका जाणवतो त्यापेक्षाही जाणवते ती पाण्याची शेवाळलेली चव. जोडीला अंधार्‍या गुहेत यावा तसा जुनात वास. दुर्गंधी नाही पण अगदी हवाहवासा नी असा... कुबट्ट.
पाय घसरल्यामुळे पाण्यात पूर्ण उताणा पडलोय. महेशचा हात हातातून सुटलाय. तोंडाच्या वर किमान दोन अडीच फूट तरी पाणी आहे.पडल्यामुळे पाण्याचा तळ डहुळलाय. तसाही अंधार आहे. डोळ्यासमोर काहीच दिसत नाहिय्ये.अंधारलेलं... , गढुळलेलं... हिरवट शेवाळंलेलं ....असं सगळं अस्पष्ट दिसतयं
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वाचतोय. पण अजूनही हे दोघे, विशेषत: महेश,काहीही झालं तरी ते हलकेच घेतो आहे असं दिसतं. "असेल, त्यात काय, नीट बघितलं नसेल" टाईप.

उल्लेखिलेले अनुभव/ जाणिवा झाल्यावर अगदी धाडसी मनुष्यही सावध होईल. भले घाबरणार नाही, थ्रिल्ड होईल, पण इतके कॅज्युअली घेईल का.. शंका वाटते.

मुक्त विहारि's picture

8 Jan 2022 - 9:41 am | मुक्त विहारि

उत्कंठा वाढत आहे

चौथा कोनाडा's picture

9 Jan 2022 - 5:58 pm | चौथा कोनाडा

बाप रे, कुठे पोहोचले दोघे ही ! थरारकच आहे सगळ प्रकरण !
विजुभाऊ, वेगळ्याच जगात नेलेत आम्हाला !

पुढील भाग .. ???

Nitin Palkar's picture

9 Jan 2022 - 6:55 pm | Nitin Palkar

भाग १ पासून आजच्या भागापर्यन्तचे सर्व भाग एका बैठकीत वाचले. खूप आवडले. एक विनंती करावीशी वाटते. उत्कंठा जास्त ताणू नका .. पुलेशु. पुभाप्र.

विजुभाऊ's picture

11 Jan 2022 - 10:11 am | विजुभाऊ

ही एक दीर्घ कथा आहे.
बरोबर आहे तुमचे.
पण इथे जर काहीच प्रतिक्रीया नसतील तर तुम्ही लोकानी कथेचा भाग वाचला की नाही / कसा झालाय ते समजणार नाही.
त्यामुळे कदाचित आपण लिहीतोय ते आवडले नाही असा समज होऊन माझा लिहीण्यचा उत्साह मावळेल.
तुमचे प्रतिसाद हा माझ्यासाठी एक ट्रिगर असतो.
चांगला वाईट कसेही असो. प्रतिसाद नोंदवत चला. तुमच्या प्रतिसादामुळॅ कथेलाही वळणे मिळतात

श्रीगणेशा's picture

10 Jan 2022 - 12:11 am | श्रीगणेशा

खूप छान. सर्व भाग वाचले.
पहिला भाग सोडून सर्व भल्या पहाटे/सकाळी विचार करून लिहिले आहेत, लेखाचा वेळ पाहून असं वाटतंय.

अजून शेवटाचा अंदाज येत नाहीये. पण खिळवून ठेवणारं वर्णन आहे.

एकच गोष्ट थोडी खटकली, इतर कुठलाही आवाज येत नसताना पाण्याचा मात्र आवाज आला:

"डुब्बूक" महेशने दगड मारुन पाण्याचा अंदाज घेतला. आवाज अगदी जवळून आला. म्हणजे पाणी फारसे खोल नसावे.

शित्रेउमेश's picture

10 Jan 2022 - 9:38 am | शित्रेउमेश

थरारक ..... गूढ... पण तरीही भारी.... पुढचा भाग येवुदे लवकर....

विजुभाऊ's picture

10 Jan 2022 - 10:33 am | विजुभाऊ

पुढील भाग
ध्रांगध्रा - ९ http://misalpav.com/node/49763

सुखी's picture

31 Jan 2022 - 10:00 am | सुखी

भारी चाललीये कथा