माझे सारे जीवन देई मम बाळाला!

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
4 Dec 2008 - 1:01 am

सकाळ वर्तमानपत्रातील २ तारखेची बातमी.

आपणासर्वांना अशा घटनेबाबत आनंद आणि अभिमानच वाटेल. मॉ तुझे सलाम. सध्या भयंकर अशा अस्थिर वातावरणात आपल्या जीवाची पर्वा न करणारे भारतीय आहेत.

बातमी खाली देत आहे.

जेरुसलेम, ता. २ - मुंबईतील "नरिमन हाउस'मध्ये अतिरेकी घुसल्यानंतर भीतीने सॅंड्रा सॅम्युएल या "आजी' एका खोलीत घुसल्या. बाहेर मात्र बेछूट गोळीबार सुरू होता.
"नरिमन हाउस' हे ज्यू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या "छाबड'चे (धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र) मुख्यालय. त्याच अतिरेक्‍यांच्या गोळीबारातच "छाबड'चे धर्मगुरू (राब्बी) गॅव्हरील होल्ट्‌झबर्ग आणि त्यांची पत्नी रिव्हका या रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी मोठमोठ्याने रडत होता "मोशे.'

दोन वर्षांचा चिमुकला, गोंडस मोशे भेदरलेला होता. गतप्राण आई-वडिलांकडे पाहून तो त्याला सांभाळणाऱ्या, मायेचा जीव लावणाऱ्या सॅंड्रा यांच्या नावाने हाका मारत होता. जवळच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलेल्या सॅंड्रा यांनी तो आवाज ऐकला आणि त्यांचे काळीज कालवले. तोपर्यंत भयाने व्याकूळ असलेल्या त्या आजींना क्षणातच बळ मिळाले आणि त्यांनी धाडसाने, जिवावर उदार होऊन खोलीचे दार उघडले. डोकावून पाहतात तो धाय मोकलून रडणारा मोशे. त्या तशाच बाहेर आल्या. पाठीशी गोळीबाराचे आवाज येत होते. त्यांनी पटकन मोशेला उचलले आणि जिवाच्या आकांताने त्या बाहेर पळत आल्या. विशेष म्हणजे अतिरेक्‍यांनी व्यापून टाकलेल्या त्या पाच मजली इमारतीतून त्या सहीसलामत बाहेर येऊ शकल्या. केवळ स्वतःच नाही तर चिमुकल्या मोशेचाही जीव त्यांनी वाचविला.

मंगळवारी जेव्हा धर्मगुरू होल्ट्‌झबग यांच्यासह उर्वरित पाच इस्रायली नागरिकांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खास विमानाने आणण्यात आले, तेव्हा त्यांच्यासोबत मोशे होता आणि स्वाभाविकपणे तो आजीला घट्टपणे बिलगून बसला होता. सॅंड्रा यांच्या या धाडसाची इस्राईल सरकारने दखल घेतली असल्याचे समजते. म्हणून तर त्यांना "राईटस जेंटिल' या तेथील मानाच्या किताबाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. जगभरातील ज्यूंना कोणत्याही प्राणघातक संकटातून वाचविणाऱ्यांना हा खास किताब देण्यात येतो. "नरिमन हाउस'मध्ये पाच वर्षांपासून स्वयंपाकाचे काम करणाऱ्या सॅंड्रा यांनी मोशेला वाचवून तसेच काम केले आहे. कडव्या ज्यूंसाठी, "छाबड' चळवळीच्या समर्थकांसाठी त्या "हीरो' ठरल्या नसत्या, तरच नवल.

हा किताब दिला तर भारतीय असलेल्या सॅंड्रा यांना इस्राईलचा रहिवासी परवाना मिळू शकतो. त्यासाठी "छाबड'चे अध्यक्ष धर्मगुरू योसेफ यित्झॅक यांनी इस्राईल सरकारला साकडे घातले आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर निर्णय झाला, तर त्यांना याच भेटीत किताबाने सन्मानित केले जाऊ शकते

जीवनमानअभिनंदनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

4 Dec 2008 - 1:05 am | कपिल काळे

म.टा. मध्ये ही बातमी वाचली होती.
आजीची माया, दुसरं काय?

अवांतर : आज्यांना दुधावरची साय प्रिय असते असा स्वानुभव आहेत. माझ्या आजीचा आणि सध्या आईचासुद्धा ;) .

http://kalekapil.blogspot.com/

सँड्रा यांचे धैर्य जबरदस्त आहे पण एक गोष्ट चुकीची आहे. सँड्रा या 'नॅनी' म्हणजे गव्हर्नेस किंवा बाळाला सांभाळणार्‍या होत्या. भारतीय नागरिक आहेत हे तर स्पष्ट आहेच या बातमीमध्ये. टि व्ही वर थेट प्रक्षेपणात त्या जेव्हा छोट्या मोशेला घेउन बाहेर आल्या ते दाखवले त्यात त्यांचे वय 'आजीचे' नक्कीच नव्हते. हे सकाळच्या बातमी दाराने 'नॅनी' चे केलेले चुकीचे किंवा संदर्भ रहीत भाषांतर वाटते. अर्थात याने त्यांनी केलेले काम आणि धाडसाने त्या छोट्याला थेट बाहेर आणणे याचे महत्त्त्व यक्तिंचितही कमी होत नाही.