प्रमादाच्या पथावर

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
5 Sep 2021 - 8:42 pm

वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या. निस्तेज चेहरा घेऊन उभ्या असलेल्या. उजळणारा दिवस कफल्लकपण घेऊन येणारा अन् मावळणारा पदरी कंगालपण पेरून जाणारा. भार पेलून पेलून खोडाचा थकलेला खांदा. तोही विसर्जनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला.

कंगाल होऊन गेल्यावर गतकाळातील ऐश्वर्य आठवणाऱ्या अगतिक माणसाला बहराचे अर्थ विचारा. केविलवाणे ऋतू त्याच्या डोळ्यात जमा होतात. त्यांचे हरवलेले अर्थ डबडबलेल्या पाण्यात शोधू पाहतो. पण आसपास अभावाचा अंधार अधिक गहिरा होत राहतो. बहराच्या मोसमाने कधीच निरोप घेतलेला असतो. एक उजाडपण नांदते असते तेथे. परिस्थितीने परिवर्तनाचे सगळे संदर्भ पध्दतशीरपणे पालटलेले असतात. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात.

यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो. परिस्थितीच असं काही जाळं विणते की, कोणत्याही कोपऱ्यातून कुठलीही पायवाट दिसत नाही, ना कोणती पळवाट. ना कुठला कवडसा दिसतो आसपास असलेल्या अंधाराला छेदत प्रवासाची वाट दाखवणारा. काहींपासून पलायनाचा पर्याय असला तरी प्रत्येकवेळी तो पर्याप्त असेलच असंही नाही.

पुढ्यात पडलेल्या परिस्थितीसोबत पळता येईलच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसांची अशी काही कोंडी करते की, कुंपणांच्या पलीकडे आणखी एक जग आहे आणि तेथे अनेक शक्यता आहेत हेच आठवत नाही. आठवलं तरी अवलंब करायला मन धजत नाही. कच खाणे वगैरे असं काही म्हणतात, ते हेच. कुणी याला परिस्थितीशरण अगतिकता वगैरे म्हणतील. असेलही तसं, पण माणसांची खरी पारख होते पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांशी दोन हात करण्यात. मग माणूस म्हणून माणसाने माणसांच्या केलेल्या व्याख्या काही असूद्या.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी.

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो?

काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. ना कोणाचा सोयरा. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्या पावलांशी जुळवून घेता येतं त्यांना गतीच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा नाही समजून सांगायला लागत. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. खरं हेच आहे की, विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

समाजविचारलेख

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

5 Sep 2021 - 9:22 pm | गॉडजिला

फक्त वर्तमान अस्तित्वात आहे भूतकाळ स्मृती आहे भविष्यकाळ अपेक्षा...

तूम्ही वर्तमानातच जगता आणि तुमचा मृत्यू देखील वर्तमानात होतो

रावसाहेब चिंगभूतकर's picture

6 Sep 2021 - 11:24 am | रावसाहेब चिंगभूतकर

भूतकाळ ही आहे आणि भविष्यकाळ ही. You can go to the slice of time in the past or in the future. गणित त्यासाठी प्रतिबंध करत नाही. आपल्याला काळ जाणवतो कारण या काळाच्या नळी मधून "आपण" प्रवास करतो. पण या सगळ्या घटना ज्या आपण जगतो त्या काळाच्या पटलावर मांडलेल्या आहेत. भविष्य आता सुद्धा आहे फक्त "आपल्यासाठी" ते अजून realize झालेलं नाही. एखाद्या तटस्थ observer ला हे जाणवेल.

गॉडजिला's picture

6 Sep 2021 - 12:36 pm | गॉडजिला

आपंण एखादा विस्त्रुत लेख का लिहित नाहि यावर ? विशायही समजेल आणि वाचायलाहि आवडेल.

(काळाच्या नळी मधून प्रवास करणारा)-गॉडजिला.

गॉडजिला's picture

6 Sep 2021 - 12:36 pm | गॉडजिला

आपंण एखादा विस्त्रुत लेख का लिहित नाहि यावर ? विशायही समजेल आणि वाचायलाहि आवडेल.

(काळाच्या नळी मधून प्रवास करणारा)-गॉडजिला.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

6 Sep 2021 - 11:27 am | रावसाहेब चिंगभूतकर

तुमच्या शब्दसंग्रहाचं मला आश्चर्य वाटतं. खरं सांगायचं तर माझं डोकं गरगरतं इतके शब्द वाचून.

गॉडजिला's picture

6 Sep 2021 - 1:27 pm | गॉडजिला

You can go to the slice of time in the past or in the future. गणित त्यासाठी प्रतिबंध करत नाही.

जरा गणित मांडुन सांगा बरे काळाच्या टनेलमधे मि कुठे आहे आणि तुम्हि कुठे आहात…(थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटि मला माहित आहे). मुळात गणिताने प्रतिबंध न होण्याजोगा काळच जर बिग बँग नंतर अस्तित्वात आला तर बिग बँग कोणत्या काळि झाला ?

गॉडजिला's picture

7 Sep 2021 - 5:45 am | गॉडजिला

मुळात गणिताने प्रतिबंध न होण्याजोगा काळच जर बिग बँग नंतर अस्तित्वात आला तर बिग बँग कोणत्या काळि झाला ?

काय म्हणते तुमचे प्रतिबंधीत न होणारे काळाचे गणीत ?

उत्तर सोपं आहे फक्त आणी फक्त वर्तमान काळ :)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

7 Sep 2021 - 10:09 am | रावसाहेब चिंगभूतकर

लिहायचा कंटाळा आलाय गोजि साहेब. यावर एक मोठ्ठ उत्तर मी कोरा वर लिहिलं. पण ते छापलं तर मी कोण ते तुम्हाला कळणार. जाऊ दे. तुम्ही म्हणता तसं.

गॉडजिला's picture

7 Sep 2021 - 10:38 am | गॉडजिला

ठीक आहे...

कोराचे उत्तर इंग्रजीत असेल तर इथे मराठी लिहा तिकडे मराठी असेल तर इकडे इंग्रजीत लिहा मुळात कोरा वाले तुम्हीच हे गोपनीय ठेवूनही तूम्ही उत्तर देऊ शकला असता पणं असो...

तूर्तास तूम्ही उत्तर देऊ शकत नाही ही बाब मी मान्य करतो

प्रमादाच्या पथावर मार्गक्रमिताना घूर्णी समरूपतेशी तादात्म्य पावलो, महत्प्रयासाने वाचलेल्या या प्रबंधाचा साक्षेपी अर्थ समजण्यात मी कितपत यशस्वी झालो ते समजत नाहिये कारण अंतगाठेपर्यंत माझी शिरोवेदना उचंबळून उठली आणि नयनदृष्टि समिप चिलमिलिका विहार करु लागल्या. प्रमथित होउन मी धिरोदत्तपणे मी अंतार्यंत पोचलो खरा पण त्यावेळेपर्यंत जाणिवांनी उच्चस्थितिं प्राप्त केली होती. निव्वळ पठ्यमात्र राहून, मुग गिलन करणे शक्य झाले नाही. शेवटी मानसीची वमनेच्छा प्रबळ झाली आणि आम्ही हा प्रतिसादप्रपंच करण्यास उद्युक्त जाहलो.

पैजारबुवा,

७ उतार्यात लिहिलेला काळ आणि आपले प्रमाद !!! मस्तच की ओ!
योगायोगाने Thorndike चा प्रयत्न-प्रमाद सिद्धांत वाचत होते, त्यांच्यानुसार प्रमादाच विशाल तळ प्रयत्नाच्या अनेक गोष्टीनी भरलय..त्यातला अचूक प्रयत्न हेरायचा आणि वर्तनात आणून बदल घडवायचा... :) :)