विसरले नाही !

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
23 Aug 2021 - 3:49 pm

"हॅलो,मॅम, अरविंद बोलतोय."
"बोल."
"उद्या सहा वाजता मैफील आहे."
"ह्यावेळी कोणाचं आहे गायन?.. की वादन?"
"सरप्राइज."
"ओके.उद्या कळेलच."
"येस."

अरविंदचं आणि माझं संभाषण दर मैफिलीच्या वेळी ठरलेलं. गायन किंवा वादन कुणाचं हे तो कधीच आधी सांगायचा नाही. ते ऐनवेळी कळायचं.
त्याच्याकडच्या सगळ्या गानमैफिली माझ्या लक्षात आहेत. विसरण्याजोग्या नाहीतच त्या.
अरविंदचं घर म्हणजे टुमदार बंगला. भोवती बाग. दृष्ट लागावी अशी देखणी. मुद्दाम आखून केलेली. डिझायनर. अरविंद आणि त्याची बायको सविता. दोघेही हसतमुख. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्याचं दुःख त्यांना नक्कीच वाटत असणार. पण ते त्यांनी कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही. बोलण्यात तर नाहीच नाही. दोघेही चांगलं आयुष्य घालवत होते. मित्रपरिवार मोठा. नातेवाईक भरपूर. सगळ्यांचं घरी येणं जाणं. दोघंही खूप प्रवास करायचे. अरविंद चित्रकार होता. त्याला जुन्या, पुरातन वस्तू जमविण्याचा छंद होता. सविता चांगलं गायची.

असं ते रसिक जोडपं. त्यांच्या बंगल्याच्या हाॅलमधे ही मैफिल रंगायची. संध्याकाळी सहाला सुरू व्हायची आणि रात्री आठला संपायची. श्रोते मोजकेच असायचे. वीस, तीस. गायला कुणी गायक यायचा नाही,तर जुन्या टेक्नोलॉजीच्या स्पूलवाल्या रेकाॅर्डरवर त्या गोल टेपवर किंवा कॅसेट प्लेयरवर गाणं ऐकायचं. मोबाईलवर गाणी हा प्रकार अजून खूपच दूर होता. स्पूल टेप हा प्रकार त्याही वेळी कालबाह्य झाला होता. पण त्यावर रेकॉर्ड झालेला दुर्मिळ गाण्याचा संग्रह अरविंदकडे होता. त्याच्या टेप्सची आणि कॅसेट्स ची नीट लायब्ररी केली होती त्यानं. पण एक जोशी (वाटल्यास कुलकर्णी किंवा देशपांडे म्हणू) नावाचे गृहस्थ होते त्यांच्याकडेही अशा स्पूल टेप्स असायच्या. त्याही टेप्स आम्ही ऐकायचो. ह्या जोशींच्या निष्काळजीपणाची आणि आळशीपणाची एक गंमत ऐकण्याजोगी आहे.

कोणत्याही ठिकाणी शास्त्रीय संगीताची मैफल असो. हे जोशी त्या हाॅलवर, नाट्यगृहात जायचेच. आणि टेपवर मैफिल रेकॉर्ड करायचे. खूप दुर्मीळ संगीत रेकाॅर्डेड होतं त्यांच्याकडे. पण रेकॉर्डिंग संपल्यावर त्यांचा उत्साह संपे. ते ती टेप साधी रिवाइंड सुद्धा करायचे नाहीत. फ्लॅग लावायचे नाहीत. टेपमधे क्यूशीट नसायचं. कुणाचं गाणं,कोणता राग,अवधि किती मिनिटं हे लिहिलेला कागद नसायचा. मला नुसतीच नाणी गोळा करणाऱ्या,स्वाक्षऱ्या गोळा करणाऱ्या आणि मग अडगळीत टाकणारया हौशी पोरांची आठवण व्हायची. मी जोशींना म्हणायची ,"काका,मी तुमच्या सगळ्या टेप्सची नीट लायब्ररी करुन देते." तर ते हात झटकून म्हणायचे,"कुठं ते करत बसायचं? जाऊ दे."

एवढा दुर्मिळ गानसंग्रह असा अस्ताव्यस्त असलेला पाहून मला खूप वाईट वाटायचं. तर अशा ह्या जोशींकडच्या टेप्सही आम्ही ऐकायचो.

अरविंद, सवितानं हाॅल नीटनेटका ठेवलेला असायचा. उगीच जास्त डेकोरेट केलेला नसायचा. शानदार बैठक अंथरलेली असायची. लोड, तक्के असायचे. खुर्च्या,बिर्च्या काही नाही. सगळ्यांनी गालिच्यावर बसायचं. हाॅलमधले दिवे मालवलेले. आणि......आणि.. सगळीकडे समया लावलेल्या. शांत तेवणाऱ्या. अरविंदकडे अनेक वेगवेगळ्या आकाराच्या जुन्या समया आणि लामणदिव्यापासून असंख्य आकाराचे दिवे होते. सविता हे दिवे लखलखीत करायची. ते चमकायचे. त्यांत तेलवात करायची. त्या मैफिलीत अरविंद ते दिवे लावायचा. मेणबत्त्या नाहीत. विजेचे दिवे नाहीत. फक्त समया! फक्त तेलाचे दिवे. आणि दोन नक्षीदार झुंबरं! तीही तेलवातीची. काय सुरेख वातावरणनिर्मिती व्हायची. वाटायचं स्वर्गात आहोत आपण!
मग टेप लोड व्हायची. टेप्सची,प्लेयरची अरविंदनं नीट निगा राखलेली असायची. आवाजाची तांत्रिक सफाई उच्च दर्जाची. स्पष्ट, काळजात आरपार घुसणारा सूर!... गाणं सुरू व्हायचं. स्वरांच्या बरसातीत आम्ही सचैल भिजायचो. सगळीकडे नीरवता. सगळे मूक.निःशब्द. फक्त गाणं ऐकताहेत. कान तृप्त व्हायचेच नाहीत. कितीतरी जणांना ऐकलं. भीमसेन जोशी,प्रभा अत्रे,अंजनीबाई मालपेकर,शोभा गुर्टू,बडे गुलाम अली खाँ,बेगम अख्तर, झाकीर हुसेन,अब्दुल करीम खान, गंगूबाई हंगल,किशोरी आमोणकर,मोगुबाई कुर्डीकर, असे कितीतरी!
मध्यंतर व्हायचं. कुणीच भानावर नसायचं. तृप्तीनं भरलेली एक मंद कुजबूज ऐकू यायची. कुणीही मोठ्यांदा बोलून त्या भारलेपणाला बाधा आणायचं नाही. मध्यंतरात काॅफी व्हायची. सविताने केलेल्या त्या काॅफीसारखी काॅफी मी नंतर कधीही प्यायले नाही. मग मध्यंतर संपायचं. पुन्हा मैफिल रंगायची. सगळे बेभान व्हायचे.

प्रत्येक चांगल्या गोष्टीलाही शेवट असतो,तसाच त्या मैफिलीलाही असायचा. वाईट वाटायचं तो सूरमहाल सोडताना. जातानाही कुणी बोलायचं नाही. प्रत्येकजण नजरेनंच अरविंद,सविताचा निरोप घ्यायचा.

नंतर माझी तिथून बदली झाली. अनेक गावांत असे माझे अनेक ग्रुप्स होते. पुलंच्या "रावसाहेब"मधे त्यांच्या बेळगावच्या मित्रगटाचा उल्लेख आहे तसे. कवींचा, लेखकांचा, जुनं सिनेसंगीत ऐकणाऱ्यांचा ग्रुप. त्या सगळ्यांनाच सोडताना मला वेळोवेळी वाईट वाटलं. त्या सर्वांचीच आठवण अचानक कधीही येते.

पण सर्वांत जास्त मला काय आठवत असेल तर अरविंद सविताच्या त्या गानमैफिली! त्या आठवणी मला उदास करत नाहीत. नवी टवटवी देतात..

तुमच्याही अशा काही मैफिलींच्या आठवणी असतीलच..

...
(व्यक्तींची सर्व नावे काल्पनिक)

जीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Aug 2021 - 4:55 pm | तुषार काळभोर

असे रसिक सोबती मिळायला भाग्य असावं लागतं.
अतिशय छान लेख.खूप मनापासून लिहिलंय तुम्ही. अगदी त्या मैफिलीचा भाग असल्यासारखं वाटलं.

सौंदाळा's picture

23 Aug 2021 - 5:46 pm | सौंदाळा

अगदी हेच्च लिहायचे होते.
मस्तच लेख आजी
कधी कधी रात्री अल्फा मराठीवरुन प्रक्षेपित झालेल्या 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमाची सीडी लावतो. खूपच मजा येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2021 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे रसिक सोबती मिळायला भाग्य असावं लागतं, या वाक्याशी अगदी सहमत आहे. आपल्या लेखन शैलीमुळे आम्हीही त्या मैफिलीत आहोत असे वाटले. अतिशय सुंदर. अरविंद आणि सविता, आणि ती मैफिल डोळ्यासमोर आली. आपण आपली पिढी खरंच भाग्यवान. तुमचे सर्व अनुभव वाचतो तेव्हा हेवा वाटतो तुमचा. आजी असंच लिहिते राहा.

आता आमच्या मैफिलीचं म्हणाल तर आपल्या सारखी आमची मैफिल नव्हती. एका आध्यात्मिक परिवाराशी जोडल्या गेलेलो होतो. तेव्हा आठदिवसातून प्रत्येकाच्या घरी तासभर गप्पा मारायला जात असायचो. भेटीगाठी व्हाव्यात आणि तो त्या परिवाराशी कायम जोडल्या जावा, काम करीत राहावे. वगैरे अशा हेतूने अशा मैफिली व्हायच्या. कोणीतरी हौशी युवक - युवती वेगवेगळे मराठी हिंदी गाणी म्हणत. कोणी तरी हौशी तबलावादकाच्याच घरी मैफिल असेल तेव्हा त्याच्या घरी त्याच्या तबल्यासहित त्याचं गाणं सहन करावे लागत असायचे. म्हणजे तो तबला छान वाजवायचा पण गाण्याचा सूर असा-तसाच असायचा. इतरवेळी बीना म्युझीकचं गाणं चालायचं. आम्ही गाणा-याचं भलतं कौतुक करीत असायचो. त्यातली एक युवती नेहमी चांगलं गाणं म्हणायची आणि वेगवेगळी मराठी गाणी म्हणायची. फारच गोड गळा. तीचं गाणं आवडायचं आणि तीही थोडी थोडी. (असं वाटतं) 'दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे' 'एक धागा सुखाचा' शामच्या आई चित्रपटातलं 'भरजरी गं पितांबर, दिला फाडून, द्रौपदीस बंधु शोभे नारायण' अहाहा ! हे तर खुप सुंदर म्हणायची. मला तर कित्तीतरी दिवस ती मलाच माझ्यासाठीच गाणं म्हणते,असे वाटायचे. आपले एका विशिष्ट वयात काहीही समज-गैरसमज होत असतात आणि तेही लवकरच दूरही होतात... असो, अशा त्या आठवणी.

आजी असेच छान लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2021 - 5:08 pm | चौथा कोनाडा

सुरेख !
अश्या मैफिलीचा भाग असणं म्हणजे स्वर्गसुख !

गाण्याच्या मैफिलीच नव्हे तर कोणत्याही आवडत्या गोष्टीसाठी एकत्र येणारा समान आवडींचा गट फार आनंद देतो.

अनेक गावी असे अनेक (चांगल्या अर्थाने) शौकिन लोक पदरमोड करुन नियमित मैफिली जमवतात, अगत्याने चहा कॉफी सोय करतात. अशा अनेक अनामिक लोकांच्या एकत्र परिणामामुळे ती गावेच एक छान ओळख कमावतात.

एखादी कॉमन आवड नसूनही केवळ गप्पांना एकत्र येणारेही ग्रुप बनतात. हे सर्व तीसेक वर्षापूर्वी जास्त होतं असं वाटतं. आता लोक "उगीचच" एकत्र येणं कमी झालं आहे. वाढती अंतरे, व्यवस्थापन (व्याप) आणि खर्च कोण करणार वगैरे हाही भाग असू शकेल. नुसत्या मध्यंतरातील कॉफीवर कदाचित आता लोक समाधानी नसतील राहात. ;-)

त्याला मिसळपाव कट्टा म्हणतात ;)

गॉडजिला's picture

23 Aug 2021 - 6:25 pm | गॉडजिला

आताही आहेत फक्त एकत्र येण्याची माध्यमे बदलली आहेत

सिरुसेरि's picture

23 Aug 2021 - 7:08 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी .

खुपचं सुंदर लिहिलंय आजी..हो अशा मैफिल मी गावाकडे अनुभवली आहे.पण तोच प्रश्न सध्या व्याप इतके वाढले आहेत की तो चार्म हरवत आहे, मागच्या वर्षी गणपतीमध्ये अचानक माईक घेत ओंकार प्रधान गायले होते मस्त वाटलं होतं.
आठवणी मला उदास करत नाहीत. नवी टवटवी देतात.. सुरेख.

सुबोध खरे's picture

23 Aug 2021 - 8:11 pm | सुबोध खरे

एके काळी अशा मैफिली माझ्या खोलीत होत असत.

माझे काही डॉक्टर मित्र कुलाब्याला नौदलाच्या मेसमध्ये येत असत ( जिथे मी राहत होतो) तेथे संध्याकाळी माफक मद्य आणि जेवण झाल्यावर माझ्या खोलीत येत असू.

माझ्याकडे फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम होती त्याचे दोन फूट उंच लाकडी स्पीकर होते त्याचा आवाज अतिशय सुदर होता. त्यावर गाणी लावून आम्ही बसत होतो
कोपऱ्यात एक १५ वॉटचा पिवळा दिवा मंद पणे तेवत असे आणि आम्ही शांतपणे रात्री तलत मेहमूदची गाणी ऐकत गप्पा मारत बसत होतो. हे मित्र के इ एमचे होते त्यापॆकी अगोदर एकाचे प्रेम जमले त्यानंतर दुसऱ्याचे.

ते कसे जमले/ जमवले याबद्दल सविस्तर कहाण्या ऐकत किंवा आपल्या भविष्याबद्दल किंवा वैद्यकीय सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकत/ ऐकवत रात्री उशिरापर्यंत आनंदात मैफल जमवत होतो.

पुढे सर्वांची लग्न झाली आणि प्रत्येक जण व्यवसायाच्या आणि प्रपंचाच्या लिगाडात अडकला आणि केवळ आठवणी बाकी राहिल्या आहेत.

आपल्या लेखामुळे त्या आठवणींना परत उजाळा मिळाला

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2021 - 9:06 pm | चौथा कोनाडा

संध्याकाळी माफक मद्य, फिलिप्सची सुंदर म्युझिक सिस्टीम, १५ वॉटचा पिवळा दिवा मंद पणे तेवत, शांतपणे रात्री तलत मेहमूदची गाणी ऐकत, रात्री उशिरापर्यंत आनंदमैफल

वाह, क्या बात हैं ! वर्णन वाचूनच हुळहुळायला झालं !
- लॉकडाऊन्स आणि कोविड कल्लोळामुळे अशा क्षणांपासुन वंचित राहिलेला चौको.

अनिंद्य's picture

24 Aug 2021 - 3:05 pm | अनिंद्य

टवटवीत, मन प्रसन्न करणारी आठवण !
लेखन आवडले.

सौन्दर्य's picture

24 Aug 2021 - 11:31 pm | सौन्दर्य

आजी, तुम्ही लिहिलेला लेख अप्रतिम आहेच आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे.

पहिली आठवण १९६६ची आहे. मालाड पूर्वेला स्टेशनला लागूनच एक 'जनता वेफर्स' नावाचे एक वेफर्स विकणारे दुकान होते व लागूनच एक उडुपी हॉटेल होते. वेफर्स दुकानातच बनवले जात त्यामुळे तेथून जाताना देखील वेफर्सचा खमंग वास पसरलेला असायचा. मी त्यावेळी दुसरीत होतो व आमच्या शाळेतील बाई मला तेथून वडा सांबार, मसाला डोसा वगैरे आणायला पाठवीत असत. मी देखील आनंदाने ते काम करीत असे कारण ह्या हॉटेलमध्ये टीव्ही सारखे एक यंत्र होते. त्यात पैसे टाकून आपल्याला हवे ते गाणे 'ऐकता व पाहता' यायचे. जसे काही दूरदर्शनवरील 'छायागीत'. मुंबईत पहिला टीव्ही १९६८-१९६९मध्ये आला त्यामुळे हे यंत्र एक अप्रूपच होते. मी ह्या गाण्याच्या आणि चलचित्रांच्या प्रेमामुळे ह्या हॉटेलात जायला नेहेमीच एका पायावर तयार असायचो.

दुसरी आठवण कॉलेज जीवनातील आहे. कॉलेजमध्ये असताना आमचा आठ मित्रांचा एक ग्रुप होता, (अजूनही आहे) आम्हा सगळयांना गाणी ऐकायला फार आवडायचे. मालाडला उत्कर्ष मंदीर शाळेच्या कोपऱ्यावर एक सर्वोदय नावाचे हॉटेल होते. त्यात एक ज्यूक बॉक्स सारखे यंत्र होते. त्यात पन्नास पैसे टाकून तुम्ही कोणतेही एक गाणे ऐकू शकत होतात. त्या मशीनमध्ये काचेच्या आवरणा खाली जवळ जवळ दोनशे लॉन्ग प्ले रेकॉर्ड्स रचलेल्या असायच्या. त्या काचेवर गाण्यांची लिस्ट व त्या प्रत्येक गाण्या समोर एक नंबर असायचा. स्लॉट मध्ये आठ आण्याचे नाणे टाकून हवा तो नंबर दाबला की ते गाणं असलेली रेकॉर्ड हळूच तिच्या स्लॉटमधून बाहेर यायची, एका सपाट गोल तबकडीवर आडवी व्ह्यायची, मग एक पिन असलेला आर्म त्यावर हळुवार टेकायचा व गाणे सुरु व्हायचे. हॉटेलात कितीही गोंगाट असला तरी आम्ही मित्र पंधरा-वीस गाणी ऐकल्याशिवाय तेथून बाहेर पडत नसू.

गेले ते दिन गेले.

अनिंद्य's picture

27 Aug 2021 - 6:51 pm | अनिंद्य

@ सौन्दर्य, +१

सुंदर आठवणी.

ज्यूकबॉक्स अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत दक्षिण मुंबईच्या मोजक्या रेस्तराँमध्ये होते. एक चहा किंवा बियर मागवून तासनतास बसणे :-)

मराठी_माणूस's picture

27 Aug 2021 - 7:51 pm | मराठी_माणूस

एक कुतुहलः

त्यात पैसे टाकून आपल्याला हवे ते गाणे 'ऐकता व पाहता' यायचे

त्या यंत्राला काय म्हणायचे ते आठवते का ?

तुमचं हे सुंदर स्मरणरंजन, डॉ. सुबोध खरेंच्या आणि इतरांच्याही आठवणी वाचल्यावर जाग्या झालेल्या या आठवणी.
१९८०च्या थोडंसं अलीकडे पलीकडे असेल. मुंबईत शिवाजीपार्क स्वीमिंग पूलला खेटून एक इराणी रेस्टॉरों होतं. ‘गुलशने इराण’ किंवा ‘कॅफे गुलीस्तान’ असं काहीतरी त्याचं नाव होतं पण ते स्विमिंग पूल कॅफे या नावाने ओळखलं जात असे. इथे एक मोठ्या भागात उघड्यावर टेबले ठेऊन बसण्याची व्यवस्था होती. बाजूच्या समुद्राची गाज ऐकत, समुद्राचा वारा खात तिथे बसणे ही एक मौज असे.
आपण बाहेरून मद्य घेऊन जाऊन तिथे बसून त्याच आस्वाद घेऊ शकत होतो. सोडा, बर्फ, गरमागरम बटाटेवडे आणि मसाला सिंग व तत्सम मद्यप्रेमी लोकांना लागणारे पदार्थ तिथे मिळत असत.

तिथे एक ज्युकबॉक्स होता. १९६० ते ८० या काळातली सुंदर हिन्दी फिल्मी गाणी तिथे २५ पैशांचं(पावली) नाणं टाकून ऐकायला मिळत. काही सुंदर संध्याकाळी यारदोस्तांबरोबर तिथे व्यतीत केल्या आहेत.

गेले ते दिन गेले...

तुषार काळभोर-मी मनापासून लिहिलं आहे हे तुम्हाला जाणवलं. त्या मैफिलीचा भाग असल्यासारखे वाटले."हा तुमचा अभिप्राय वाचून माझ्या लेखाचं सार्थक झाल्यासारखे वाटले.

सौदाळा-तुम्हीही नक्षत्राचे देणे ची सीडी लावून ऐकत बसता! गुड.

प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे- तुम्ही सविस्तर अभिप्राय दिलाय."गोड गळ्याच्या गायिकेचं गुपित"तुम्ही शेयर केलंत! बरं वाटलं. लिहित राहेन. प्राॅमिस.

चौथा कोनाडा-धन्यवाद.
गवि-तुम्ही फारच प्रॅक्टिकल आहात बुवा!

तुषार काळभोर दुसरा प्रतिसाद- मी त्या कट्ट्याबद्दल ऐकून आहे.
गाॅडजिला-खरंच!
सिरुसेरी-थॅंक्स.
Bhakti-आभारी आहे.तुम्ही गाता वाटतं! खूप छान.

सुबोध खरे-तुमच्याकडेही मैफिल जमत होती तर! मजा वाटते ना? वेगळ्याच विश्वात रमतो ऐकणारा!

अनिंद्य-आभारी आहे.
सौंदर्य-तुम्हांलाही गाणी ऐकायची आवड आहे तर! लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या.गुड.

Nitin Palkar-तुमच्याकडेही एक रम्य आठवण आहे! गुड.
प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार. नमस्कार.