हॅपी होली - एक चिंतन

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
16 Apr 2021 - 7:11 pm

आज काल धुलीवंदनाच्या दिवशी मधूनच कोणीतरी अचानक समोर येतो आणि "हॅपी होली" असं काहीतरी म्हणत तोंडावर रंग फासतो. तेव्हा "अरे अरे .... हा तो दिवस नाही" असं म्हणण्याची संधी देखील मिळत नाही. रंग लावल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण आज धुळवड असते. रंग हा रंगपंचमीला लावतात - अशी आपली एक संकल्पना लहानपणापासून मनात फिट्ट बसलीये. हे म्हणजे नागपंचमीला कोणी "हॅपी राखीपौर्णिमा" असं म्हणून हातात राखी बांधली तर त्या भावाला किती विचित्र वाटेल, तसं धुलीवंदनाला कोणी रंग लावला कि वाटतं.

आपल्याकडे "होळी" म्हणजे कालचा, म्हणजे धुलीवंदनाच्या आधीचा दिवस. आपल्याकडे प्रत्येक सणाच्या निगडीत अनेक पुराणातल्या गोष्टी सांगितल्या जातात. प्रत्येक जण आपापली गोष्ट निवडतो आणि त्या प्रमाणे तो सण साजरा करतो. उत्तरेत वसंतोत्सव म्हणून रंग खेळतात, काही ठिकाणी पूतना राक्षसीच दहन करतात. काही जण होलिका नावाच्या राक्षसीच. एकाच सणाच्या बाबतीत अशा वेगवेगळ्या गोष्टी का असाव्यात!

माझ्या लहानपणची होळी आठवली. संध्याकाळच्या वेळेला आमच्या वाड्यात मधल्या मोकळ्या जागेत "होळी" रचली जायची. त्यात नक्की काय काय असायचं ते दिसायचं नाही, पण वर वर चिपाड आणि उसासारखा एक दांडा आणि बाजूनी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या दिसायच्या. ती रचत असतानाच तिच्या आकाराकडे पाहून गोटू दादा "ह्या वेळची होळी खूप मोठी पेटणार" हे वाक्य दर वर्षी म्हणायचा. मग आम्ही शाळेतून घरी आल्या आल्या जुन्या सामानात डोकं घालून मागच्या वर्षीचा चामड्याचा डफ हुडकून काढायचो. मागच्या वर्षी होळीवर तापवल्यावर त्याचा आवाज चांगला झाला होता म्हणे, पण गेल्या वर्षभरात त्याची सगळी जान गेलेली दिसते! ह्या वर्षी परत तापवून घ्यावा लागणार - हा अंदाज आम्ही तो डफ एका बोटाने वाजवून पाहून मग लावत असू. मग थोड्या वेळानी पूजा सुरु व्हायची. भिडे आजोबा काहीतरी मंत्र म्हणत होळी समोर पूजेचं साहित्य मांडून बसायचे आणि आम्ही सगळे बाजूला थांबून कधी एकदा होळी पेटते याची वाट बघत बसायचो. होळीवर आजोबा तुपाचे थेंब टाकायला लागले की आता तो क्षण जवळ आल्याची जाणीव व्हायची. पुजेपेक्षा आम्हाला ती भव्य पेटलेली होळी आणि आम्ही केलेला आरडा-ओरडा यातच जास्त आकर्षण असे. मग ते आरती करून होळी पेटवत असत. होळीसमोर नारळ फोडून तिच्या चारी बाजूनी ते नारळातल पाणी सांडत सांडत प्रदक्षिणा घातली जात असे. आणि मग आम्हाला संकेत मिळताच आम्ही लहान पोरे संपूर्ण वाड्यात "सगळ्यांनी होळीसाठी खाली यावे" अश्या आरोळ्या मारीत फिरत असू. मग कुणीतरी डफ वाजवायला सुरुवात करी आणि सगळ्यांनाच चेव येत असे. कधी कधी आम्ही ताटली-चमचे पण वाजवायचो. तो गोंधळ ऐकून काही मोठी माणसे खाली दर्शनासाठी येत असत आणि होळीपुढे नारळ वहात.

हळूहळू होळी चांगली पेटायला लागली कि मग गोटू दादा आणि त्याच्या वयाचे इतर दादा म्हणायचे 'अरे नुसतं वाजवत काय बसलाय, बोंबा मारा!!' मग त्या बोम्बांचा एकच आगडोंब उसळायचा. "अमुक-तमुकच्या बैलाला ......." असं म्हणून लाखोली व्हायली जायची. यातून कोणीही सुटत नसे. जो कुणी चिडेल, त्याच्या बैलाचा उल्लेख वारंवार करण्यात येई. परवा क्रिकेट खेळताना खोटा एल.बी.डब्ल्यू. दिल्याचा राग, लपाछपित राज्य आल्यावर घरी निघून गेल्याचा राग, काही कारण नसताना घरी चुगली केल्याचा राग, लंगडी खेळताना आउट न झाल्याचा राग - असे सगळे राग बाहेर काढण्यासाठी त्या त्या मुलाचा 'बैल' हे उत्तम माध्यम होतं आणि हा दिवस हि एक उत्तम संधी! अश्याप्रकारे एकमेकांचा उल्लेख केल्यामुळे बरेचसे राग असे अहिंसेमध्येच मिटत असत. अर्थात मोठ्या व्यक्तींचा उल्लेख करण्याची मात्र बंदी होती.

आता होळी चांगली पेटली कि आम्ही आमचे डफ तिच्यावर गरम करत असू. माझा डफ आतापर्यंत कधीच चांगला वाजला नाहीये, पण आपलं उगीच मनाचं समाधान म्हणून मी तो जोरजोरात वाजवून 'त्याचा आवाज तापवल्यामुळेच मोठा झाला' अशी समजूत करून घ्यायचो. होळीमध्ये सुरुवातीला वाहिलेला नारळ आता चांगला भाजला गेलेला असायचा. मंदार दादा तो एका काठीनी बाहेर काढून फोडायचा आणि त्याचं खरपूस भाजलं गेलेलं खोबरं आम्ही सगळे खायचो.

या होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. या दिवशी सुट्टी असायची. आज काल या दिवसालाच 'होली' म्हणतात, पण आम्ही मात्र तेव्हा धुळवड खेळायचो. आदल्या दिवशीच्या होळीची झालेली राख एकमेकांच्या अंगावर फेकणे - या प्रकारात कुठेच त्या धुळीचं वंदन केलं जात नाही, तरी त्याला धुलीवंदन का म्हणतात कुणास ठाऊक! ती धूळ संपत आली कि त्यात मातीचा चिखल मिक्स करून चीटिंग करायचो. पण ह्या खेळात साधनांची कमतरता असल्यामुळे रंगपंचमी एवढी मजा येत नसे आणि खेळ लगेच संपत असे.

मग रंगपंचमी येईपर्यंत पुढचे ५ दिवस चालू व्हायचं ते गनिमी काव्याचं युद्ध. घरी बादलीत पाण्याच्या फुग्यांचा भरलेला ढीग ठेवायचा. आणि नकळत बेसावध प्रसंगी आपल्या गॅलरीमधून लोकांवर ह्या पाण्याचा बॉम्बचा मारा केला जायचा. आता जाणवतं की हे करणं चूक होतं. या खेळाबाबत प्रत्येकाने स्वतःचं तंत्र विकसित केलेलं असे. अर्धी हवा - अर्ध पाणी, मधूनच पिच्कारीचा वर्षाव, फुग्याला मध्ये पीळ मारून जोड-फुगा बनवणे इत्यादी अनेक क्रिएटीव्ह गोष्टी केल्या जायच्या. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. आज धुलीवंदन आहे, म्हणून आठवण झाली बाकी काही नाही. अजूनही तिथे आणि बऱ्याच ठिकाणी अशी होळी होतही असेल, पण पुण्याबाहेर राहायला लागल्या पासून गेली ५-६ वर्ष हि होळी मी पाहिलीच नाही कुठे!

(लेख २०१३ मध्ये आंतरजालावर इतरत्र पूर्वप्रकाशित)

समाजमौजमजालेख

प्रतिक्रिया

पुष्कर's picture

18 Mar 2022 - 11:50 am | पुष्कर

होळी / धुलिवंदनानिमित्त माझाच जुना धागा वर काढत आहे. :)