कोविड- अनुभव वगैरे..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
12 Apr 2021 - 11:19 am

माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो.

मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो‌ त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. काहीही लक्षणं नव्हती तरीही सल्ल्यानुसार प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नसलेली व्यवस्था बघून मला अजिबात धक्का बसला नाही. कारण 'अपेक्षा हे सगळ्या दु:खांचं मूळ कारण आहे', हे तत्व डोक्यात फार पूर्वीच फिट्ट बसवून घेतलेलं आहे.

फॉर्म भरुन लाईनमध्ये लागल्यानंतर बऱ्याच वेळाने माझा नंबर आला आणि आत गेल्यावर कुठलासा अज्ञात निकष लावून तिथल्या मनुष्याने ठरवले की माझ्यासाठी रॅपिड अॅंटीजेन टेस्ट योग्य राहील.

शिवाय लोकांची लांबलचक लाईन आणि हे स्वॅब घेणे म्हणजे त्या मनुष्यासाठी रोजचेच काम!! त्यामुळे 'फटाफट उरकणे' हेच उपयुक्त धोरण..!

त्यामुळे स्वॅब घेण्यासाठीची कांडी माझ्या नाकात घुसवून फिरवताना त्याच्या हालचालींमध्ये तीव्र घाई आणि चपळाई होती... त्यामुळे पुढची दहा पंधरा मिनिटे नाकाच्या आत एक अद्भुत, अणकुचीदार आणि अनाकलनीय असे हुळहुळीचे फिलींग अनुभवण्याची संधी त्याने मला विनामूल्य उपलब्ध करून दिली!! नसतो एखाद्याच्या हाताला नाजूकपणा, त्याला आपण तरी काय करणार.!!

मग नंतर मला असंच एका काल्पनिक दिशेकडे हातवारे करून 'तिकडं रिझल्टची वाट बघा', असं सांगितलं गेलं. मी तिकडं जाऊन बसलो. मग अर्ध्या तासाने एकजणाने काही नावं पुकारली, ज्यात माझंही नाव होतं, आणि मग आम्हाला एका घोळक्याकडे बोट दाखवून सांगितले की 'तिथं बसा. तुम्ही सगळे पॉझिटिव्ह आहात...!'

म्हणजे एवढा वेळ पॉझिटिव्ह पेशंट्स आणि रिझल्टची वाट पाहत बसलेले भावी पेशंट्स, इकडं तिकडं लाईन शोधत फिरणारे लोक, ह्यांच्यामध्ये फक्त एक काल्पनिक सीमारेषा होती. त्यामुळे सर्वांना आपापसांत मिसळत फिरण्याचे, एकमेकांना कोविडचा प्रसाद देण्या-घेण्याचे मुक्त स्वातंत्र्य बहाल केले गेले होते.

तर मग नंतर त्यांनी मला आणि माझ्यासारख्या इतर पॉझिटिव्ह पेशंट्सना एकेकाला जवळ बोलावले आणि होम आयसोलेशन किंवा अॅडमिट होणे, असे दोन पर्याय दिले.

मी अर्थातच होम आयसोलेशनचा पर्याय निवडला.

ह्या पर्यायामध्ये, छापील फॉरमॅटमधील एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागले की मी डॉक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध माझ्या जबाबदारीवर हा होम आयसोलेशनचा निर्णय घेतोय, आणि माझ्या जीवास धोका निर्माण झाल्यास मनपा जबाबदार राहणार नाही वगैरे वगैरे, तंतोतंत शासकीय छापाची भाषा वाचूनच मी येड्यासारखं हसत बसलो होतो थोडावेळ, हे एक आठवतं... शिवाय एका डॉक्टरचे प्रीस्क्रिप्शनही सबमिट करावे लागले की अमुक पेशंटला मी कन्सल्ट करेन वगैरे.. ते मी व्हॉट्सॲपवर मागवून घेतले एका ओळखीच्या डॉक्टरकडून..

हे प्रीस्क्रिप्शनची प्रिंट,अॅड्रेस प्रूफची प्रिंट आणि प्रतिज्ञापत्र, फॉर्म वगैरे सबमिट केल्याशिवाय तिथून हलता येणार नाही, असे सांगण्यात आले. मग हे डॉक्युमेंट्स त्यांना दिल्यानंतर माझ्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला गेला आणि मला तिथून 'थेट घरी' जाण्यास सांगितले गेले. ह्या सगळ्या प्रक्रियेला जवळपास चार तास लागले.

मग मी बाईक वरून 'थेट घरी' पोहचलो. डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या मागवून घेतल्या, टिफीनची सोय एके ठिकाणी लावून दिली आणि प्रायव्हेट लॅबवाल्याला RT-PCR टेस्टसाठी बोलावून स्वॅबचे नमुने दिले. कारण कागदाच्या एका चतकोर तुकड्यावर लिहून दिलेल्या त्या अॅंटीजेन टेस्टचं काही खऱ्याचं वाटत नव्हतं.

त्यामुळे विचार केला की कदाचित आपण पॉझिटिव्ह नसायचो आणि मूर्खासारखे उगाचच १४ दिवस क्वारंटाईन होऊन शेवटी सगळ्यांच्याच नजरेत हास्यास्पद ठरायचो...!

पण तसं काही झालं नाही. RT-PCR चाही रिपोर्ट पॉझिटिव्हच होता, जो मला दुसऱ्या दिवशी ई-मेलवर मिळाला. तो मी ताबडतोब कामाच्या ठिकाणी ई-मेलवर पाठवून दिला आणि तो विषय बंद केला.

इथून पुढे खाणे, झोपणे, सर्वकाळ लोळत लोळत आलटून पालटून वाचन आणि नेटफ्लिक्स, हा सिलसिला सुरू झाला.

पुस्तकांचा स्टॉक आपल्याकडे कायमच असतो. सिमॉन द बोव्हारचं 'मेमॉयर्स ऑफ द ड्युटीफुल डॉटर' आणि जीएंच्या पत्रसंग्रहांचे नितांत सुंदर असे खंड, बरेच दिवसांपासून पेंडींग होते, ते संपवून टाकले.

शिवाय अजून एक सांगायचं म्हणजे, हल्ली सगळेच कोविड ह्या विषयातले तज्ञ झाले आहेत, त्यामुळे प्रत्येकाकडं काही ना काही सल्ला हा असतोच..! त्यामुळे बातमी कळल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच सहकारी, मित्र वगैरेंचे फोन यायला लागले.. त्यांचे वेगवेगळे सल्ले कम् अनुभव ऐकून डोकं बधिर होण्याच्या आतच मी फोन उचलायचे बंद करून टाकले.

मग दोन दिवसांनी महानगरपालिकेचे लोक माझ्या अॅड्रेसवर चौकशीसाठी आले, त्यांनी काही सूचना दिल्या, ज्यांचा मतितार्थ असा होता की तुम्ही बाहेर पडू नका, चार भिंतींच्या आत तुम्हाला स्वतःचा जो काही खेळ खंडोबा करून घ्यायचा आहे किंवा नाही, त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी तुम्ही मुक्त आहात आणि इथून पुढची सगळी जबाबदारी आम्ही आनंदाने तुमच्यावरच सोपवत आहोत..! आणि शेवटी जाताना दरवाजाबाहेर नोटिस चिकटवून गेले की ह्या फ्लॅटमध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंट राहत असून अमुक डेटपर्यंत कुणीही आत प्रवेश करू नये, वगैरे वगैरे.

शिवाय 'फॉलोअप' ह्या व्याख्येत बसेल, अशा कामासाठी नेमून दिलेल्या महानगरपालिकेच्या लोकांचा एकदा फोनही आला होता. (कदाचित मी कुठेतरी बाहेर बोंबलत फिरत तर बसलो नाहीये ना, किंवा नजीकच्या भविष्यात माझा तसा काही भयंकर इरादा तर नाहीये ना, हे चेक करून बघत असावेत !)

तर मुद्द्याचं सांगायचं झालं तर मला सुरुवातीला अजिबात लक्षणं नव्हती पण टेस्ट केल्यानंतरच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी जबरदस्त वीकनेस आणि अंगदुखी जाणवली. त्रास म्हणाल तर हा एवढाच आणि दोनच दिवस..! बाकी आठवडाभर तोंडाची चव जाणे आणि कसलाही वास न येणे, हे होतेच. पण त्याचा त्रास असा काही वाटला नाही. सर्दी, खोकला, ताप वगैरे असलं काही नव्हतं..

दोन दिवसांचा वीकनेस अचानकच संपला आणि एकदम नॉर्मल झालो. पण तोंडाची चव गेलेली असल्यामुळे टिफीन बंद करून स्विगी, झोमॅटोवरून चमचमीत ऑर्डर्स करण्यावर विशेष भर दिला... मला सोडून गेलेल्या चव आणि वास या दोन्ही संवेदना ४-५ एप्रिलच्या आसपास पुन्हा व्यवस्थित जाग्यावर आल्या. ७ एप्रिलला दुसऱ्यांदा टेस्ट केली असता निगेटिव्ह आली.. सध्या एकदम ठणठणीत..!

'कोविड' साठी मला आलेला खर्च-

दोन टेस्टचे मिळून १८५० रूपये

आणि इतर ६०० रूपये.

असे टोटल- २४५० रुपये.

(मी टेंपरेचर गन वापरली नाही. गळ्यावरती उलटी चार बोटं ठेवून ताप कधी येतोय ते बघत होतो पण तो काही फिरकला नाही...आणि दिवसातून दहा वेळा ऑक्सिजन लेवल कधी ड्रॉप होतेय, हे चेक करून बघायचं आणि नंतर त्यावर विचार करत बसायचं, हे मी मुळातच आळशी प्रवृत्तीचा असल्यामुळे, काही जमेल असं वाटलं नाही, त्यामुळे ऑक्सीमीटर वगैरे मागवला नाही. हे कदाचित थोडंसं कॅज्युअल वागणं असू शकेल, पण मी काही फारसा विचार केला नाही त्यावर.)

अर्थात, माझे चालू वय ३२ वर्षे आणि मेडिकल हिस्ट्री काहीही नाही. त्यामुळे मला विशेष काही त्रास झाला नसेल. आणि हा माझा अनुभव आहे. प्रत्येकाला हे लागू होईल, असं काही नाही.

पण तरीही प्रायव्हेट हॉस्पिटलवाले दीड-दोन लाखांचे चंदन लावल्याशिवाय सोडतच नाहीत, असं जेव्हा वाचतोय, ऐकतोय वर्षभरापासून.. तेव्हा मला त्यांच्या तावडीत स्वतःला सोपवण्याची वेळ सुदैवानं आली नाही, ह्याचं फार म्हणजे फारच बरं वाटतंय.

लोकांच्या मनातली भीती ओळखून, त्या भीतीचा एक मोठ्ठा बाजार उभा करून, प्रत्येक टप्प्यावर पेशंटला लुटून, आयुष्यभराची चांदी करण्याचा सुवर्णकाळ रोज रोज थोडीच येतो!! चालू द्या.!!

पण तरीही शेवटी सगळ्यांना जे माहिती आहे तेच सांगून थांबतो की कोविड हा प्रकार लाईटली घेण्यासारखा नाहीये.. थोडा बहुत त्रास ह्याच्यामध्ये होतोच.. आणि सध्या ज्या वेगाने हे सगळं वाढतंय ते पाहता, प्रीकॉशन घेणं, लक्षणं असतील किंवा पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल, तर ताबडतोब टेस्ट करून घेणं, स्वतःला आयसोलेट करणं, प्रोटोकॉलचे पालन करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं, हे सगळ्यांच्याच भल्याचे आहे..!

मांडणीप्रकटनअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

12 Apr 2021 - 1:14 pm | चौकटराजा

लेखाचा प्रत्येक शब्द खोल शिरणारा आहे ! याला म्हणतात माहिती देणे ! खरोखरीच धन्यवाद ! नियती ना करो पण वेळआलीच तर एखाद्या मिपाकरांचा रुगणालयातील अनुभव वाचायला आवडेल तो अधिक प्रबोधक असेल !

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 1:21 pm | मुक्त विहारि

हे वाचून मनापासून आनंद झाला ....

करोना हा विचित्र आजार आहे, माझी सौ. आई वाचली, पण माझ्याच वयाचा मित्र, देवाघरी गेला.

घरीच रहा, सुरक्षित रहा...

चौकटराजा's picture

13 Apr 2021 - 11:13 am | चौकटराजा

काही जणाचे म्हणणे हा एक फ्लू चा प्रकार आहे बाकी काही नाही ! पण असे ठामपणे कसे कोणी म्हणू शकतो ? जगात २८ लाख माणसे मेली आहेत ते काय फ्लू होऊन ? पण समजा जरी हा एक फ्लू आहे असे क्षणभर धरले तरी त्याची वर्तणूक प्रत्येक देहात वेगवेगळी आहे ! प्रतीकार शक्ती व व्हायराल डोस हे जितके एकमेकापासून दूर तितका रोगाचा भयानक परिणाम अधिक पण या दोन्ही गोष्टी मोजण्याचे यंत्र नाही . परिणामा वरूनच त्याचा फक्त अंदाज बांधत बांधत ट्रीटमेंट चे प्रयोग करीत बसावे लागते .डोंबिवली इथे राहणारे एक परिचिताचा भाऊ १७ रेमडेसिवीर घेतल्यावर देखील व्हेंटिलेटर वर आहे !

मराठी_माणूस's picture

13 Apr 2021 - 2:01 pm | मराठी_माणूस

एरवीची सामान्य परिस्थिती आणि आता ह्यात एक फरक आहे तो असा, या वेळेस सगळ्या गोष्टींची जागतीक पातळीवर नोंद ठेवली गेली आहे, एरवी कोण केंव्हा कशाने जातो हे माहीत होत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2021 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. अनुभवकथन प्रामाणिक असल्यामुळे, थेट भिडला.
आपण ठीक झालात हे वाचून आनंद वाटला.

बाकी, या करोनाचं निश्चित असं काहीच सांगू शकत नाही.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

12 Apr 2021 - 4:50 pm | Bhakti

वाह .. धीरोदात्त उदाहरण.
सकाळपासून बातम्यांनी नकारात्मक उच्छाद मांडलाय (आता बातम्या पूर्णपणे बंद करते)
हे वाचल्यावर बर वाटल.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

भिडणारे अनुभव कथन. सही सलामत बाहेर आलात त्याबद्दल अभिनंदन आणि देवाचे आभार.
काळजी सर्वांनी घेतलीच पाहिजे.

प्रमोद देर्देकर's picture

13 Apr 2021 - 9:15 am | प्रमोद देर्देकर

+1
अभिनंदन तुमचं.

तुमची कथन करण्याची विनोदी लेखन शैली जबरा हसवून गेली.

पाटिल's picture

12 Apr 2021 - 9:58 pm | पाटिल

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार..!

CT severity index वर ठरते, तूमचा स्कोर काय होता ¿

चलत मुसाफिर's picture

13 Apr 2021 - 10:04 am | चलत मुसाफिर

अनुभवकथन प्रामाणिक आहे. सरकारी इस्पितळाला मारलेले टोमणे टाळता आले असते. कोविडचे संकट अतिशय बिकट व धोकादायक आहे. पण तरीही जोखीम घेऊन सर्व इस्पितळांचे कर्मचारी आपले कर्तव्य करत आहेत. असो.

मला व पत्नीला डिसेंबरमध्ये कोविड होऊन गेला. आमचाही अनुभव जवळजवळ वरीलप्रमाणेच होता. फरक इतकाच की तापमापक आणि प्राणवायुमापक दोहोंचा वापर आम्ही नियमितपणे करत होतो. मला असह्य व सतत असा खोकला येत होता, इतका की वैतागून मी बोलणेच बंद करून टाकले. कफ सिरप वगळता कोणतेही औषध मी घेतले नाही. पत्नीने काही वेळा वेदनाशामक व तापहारक गोळ्या घेतल्या. 14 दिवसांच्या गृह विलगीकरणानंतर सुदैवाने सर्व लक्षणे कमी कमी होत नाहीशी झाली.