ही सत्य घटना आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका असं म्हणत नाही. विश्वास ठेवाच.
त्यावेळी मी एका निमशहरात नोकरी करत होते. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण रोज पहाटे चांगलं चार, पाच किलोमीटर फिरुन यायचो. व्यायाम म्हणून. पहाटे पाच वाजता जायचो आणि सव्वासहा साडेसहा वाजता परत यायचो. दोघींची वयं पस्तिशीची. घरात नवरा, मुलं.
एकदा अशीच मी रात्री झोपले. गाढ झोप लागली. नेहमीप्रमाणे अलार्मशिवाय जाग आली. सवयच पडलेली. बाथरुमला जाऊन आले. एक चुकार कावळा ओरडत होता. परत जरा लोळावं वाटलं, पण निग्रहाने मोह टाळला. म्हटलं, उगीच थोडक्या आळसापायी फिरण्याचा नेम मोडायला नको. पटकन उठून फिरुन येऊया. उठले. दात घासले. केस नीट केले. नॅपकिन घेतला. पाण्याची छोटी बाटली भरून घेतली. पायांत चपला सरकवल्या. अजिबात आवाज न करता दार हलकेच उघडून बाहेर पडले. दार पुन्हा लावलं. मैत्रीण शेजारच्या कंपाऊंडमध्ये राहात होती. तिच्या दारावर टकटक केलं. ती झोपेतून उठली. मला बघून म्हणाली,"आलेच दात घासून."ती तीन, चार मिनिटात बाहेर आली. म्हणाली,"अगबाई, एवढ्यात पाच वाजले?कळलंच नाही."
"चल पटकन", मी म्हणाले.
मग आम्ही दोघीही बाहेर पडलो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. कुठंही,कसलेही आवाज येत नव्हते. माझं ऑफिस वाटेत लागलं. तिथंही सामसूम होती. दूरवर वाॅचमन हातात काठी घेऊन पाठमोरा दिसला, किंवा तसा भास झाला.
आम्ही झपाझप पावलं टाकत पुढं चालायला लागलो. चालताना आम्ही एकमेकींशी शक्यतो बोलायचो नाही. त्यामुळे चूपचाप चालत होतो. सगळीकडे अंधार होता आणि चिडीचूप शांतता पसरली होती. मग डावीकडे वळलो. रस्त्याला उतार लागला. उतारावरून आमची पावलं आणखी वेगानं पडायला लागली. वाटेत मेंटल हॉस्पिटल लागलं. तिथं आत कुणी पेशंट भेसूर ओरडत, रडत होता. तिथल्या गेटला भलं मोठ्ठं कुलूप लटकत होतं. आत आवारात गूढ अंधार पसरला होता. तुरळक दिवे अंधाराला अधिकच भीषण बनवत होते.
मग आणखी थोडं पुढे गेलो. पाय थोडे जास्तच दुखत होते. पण म्हटलं, नेहमीच्या टप्प्यापर्यंत जायचंच. एस टी स्टॅंडवर गेलो. तिथं सगळा अंधार होता. एका एसटीतले दिवे मंद जळत होते. ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच दिसत नव्हतं. स्टॅंडवरुन आम्ही परत फिरलो. दोघींनी नॅपकिनने घाम पुसला. थोडं पाणी प्यायलो. तिथल्या रस्त्याकडेच्या आमच्या नेहमीच्या बाकावर पाच मिनिटे बसलो. अजून माणसांची वर्दळ सुरू झाली नव्हती. इतक्यात एक सायकलवाला आमच्या समोरुन गेला. पण जाताना घाबरलेल्या चेहऱ्याने घाम पुसत पुसत गेला. खरं तर थंडीचे दिवस होते. त्याला काय आम्ही हडळी वाटलो की काय! आमच्या अंगावर पांढऱ्या साड्या, मोकळे केस, कुंकवाचा मळवट असा हडळीचा खास ड्रेसकोड ही नव्हता. का घाबरला आणि चमत्कारिक नजरेनं पाहात होता कुणास ठाऊक!
बाकावरुन उठून परत घरी जायला निघालो. वाटेत पुन्हा एकदा मेंटल हॉस्पिटल लागले. अजूनही तिथे अंधार होता. त्याच्यासमोरचा चढ चढताना रोज येतात तसे पायांत गोळे आले. म्हटलं,येऊ देत. त्याशिवाय पिंढऱ्यांना व्यायाम कसा होणार?
तो चढ चढताना रोजच्यासारखा श्वास फुलला. फुप्फुसं भरुन प्राणवायू आणि हो.. ओझोन सुद्धा आत घेतला. एकमेकींकडे बघत ,समाधानानं हसत तो चढ चढलो. पुन्हा ऑफिसजवळ आलो. तिथं अजूनही सामसूम होती. गेटला कुलूप होतं. वाॅचमन आता दिसत नव्हता. ऑफिसात गेल्यावर त्याला जाब विचारु असं ठरवलं. मग डावीकडे वळलो आणि घरी परत आलो. ती तिच्या घरी गेली. मी माझ्या. त्यावेळी लॅचच्या कुलुपांची पद्धत नव्हती. गाव सेफ होतं. त्यामुळे दार नुसतं पुढं करुनच आम्ही फिरायला जात असू. मी आत घरात गेले. चपला काढल्या. वाॅक करताना घालायचे स्पेशल बूट असली फॅडं तेव्हा नव्हती.
जरा वेळ बसले. मग म्हटलं,भाजी चिरायला घेऊया का? तिघांचे डबे व्हायचेत. पण आज एकदम जास्तच थकवा जाणवत होता. किती वाजले असतील? मी कपाटावरच्या घड्याळात पाहिलं तर पहाटेचे दोन वाजले होते. ओँ??!
ओ माय गाॅड! म्हणजे मी रात्री एक वाजताच उठून फिरायला बाहेर पडले होते. नेहमीप्रमाणे उठलो समजून घड्याळात न बघताच! मैत्रीणीला सव्वा वाजताच उठवलं. तीही नेहमीप्रमाणे घड्याळात न बघता सवयीने चुपचाप उठून आली. आम्ही तीनेक किलोमीटर माॅर्निंग वाॅक केला आणि पहाटे दोन वाजता परत आलो. रात्री दीड पावणेदोनला स्टॅंडजवळ बाकावर बसलो. तरीच तो सायकलवाला आमच्याकडं असा बघत होता. ऑफिसच्या आणि मेंटल हॉस्पिटलच्या आवारातील अंधार आणि मंद दिव्यांबद्दल आश्चर्य करत होतो. थंडीचे दिवस असल्याने पहाटे पाच वाजताचा अंधार आणि मध्यरात्रीचा अंधार यात फरकच वाटला नव्हता. अंगावर काटा उभा राहिला. हे कसलं माॅर्निंग वाॅक? हे तर पिशाच्च वाॅक! उठवल्यानंतर हे मी नवऱ्याला सांगितलं. माझ्या डोक्यात टपली मारत तो म्हणाला,"यडपट आहेस!"
आणि ते वाक्य नेहमीप्रमाणे रिटर्न न करता मी निमूटपणे ऐकून घेतलं.
मात्र यानंतर ताबडतोब आमच्या घरात दर्शनी भिंतीवर पहिल्यांदाच एक मोठ्ठं वॉल क्लॉक आलं..!!
प्रतिक्रिया
22 Mar 2021 - 1:10 pm | तुषार काळभोर
आजींची भयगथा!
रात्री दोन वाजता दोन मध्यमवर्गीय (आणि मध्यमवयीन!) हडळी ;) ते पण मेंटल हॉस्पिटलशेजारी दिसल्यावर सायकलवाला घाम पुसणारच!
नशीब काहीतरी फेकून नाही मारलं :D :D
22 Mar 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा
बाबौ ! थर्रारकच आहे वॉक !
म्हणून घड्याळवेळ न पाहता पहाट समजून फिरायला जाणं विचित्र वाटलं !
मैत्रीण पण घड्याळात वेळ पहायची नाही का ?
बाकी कथा नेहमीप्रमाणे सराईतच +१
22 Mar 2021 - 1:12 pm | वामन देशमुख
खरंच यडपट आहेस, आज्जीबाई!
ह घ्या हे वे सां न ल !
बाकी, तुमच्या किश्श्यांची निवेदनशैली खरंच आवडते हं.
22 Mar 2021 - 1:22 pm | Rajesh188
. त्यावेळी लॅचच्या कुलुपांची पद्धत नव्हती. गाव सेफ होतं. त्यामुळे दार नुसतं पुढं करुनच आम्ही फिरायला जात असू
अशी वाक्य टाकून कथा कधी सत्य आहे कल्पना नाही हे दाखवले आहे.
खरोखर लोक दरवाजा ला कडी कुलूप लावत नसत. त्या काळात.
22 Mar 2021 - 1:22 pm | ॲबसेंट माइंडेड ...
किस्सा थरारक आहे.
घरी परत येताना तुम्ही लास्टला उजवीकडे वळण्या ऐवजी परत डावीकडे म्हंजे घराच्या विरूद्ध डायरेक्शनला जाउनही घरीच पोचलात हे चमत्कारिक वाटल्याने भुताटकीवर विश्वास बसला.
22 Mar 2021 - 1:31 pm | शाम भागवत
😀
22 Mar 2021 - 2:10 pm | चांदणे संदीप
माईंड अॅबसेंट असून तुम्ही भारी पकडलय की ओ!
सं - दी - प
23 Mar 2021 - 11:33 am | आंबट गोड
मायन्यूट ऑबझर्व्हेशन, अॅब्सेंट माईंडेड! :-)
खरंय...येताना लास्टला उजवीकडे वळलो व घरी आलो असे हवे होते.
तुमचा आयडी तुम्हाला शोभत नाही! बदला बघू...!!!
22 Mar 2021 - 1:37 pm | बापूसाहेब
हाहाहा.. . मजेशीर किस्सा..
22 Mar 2021 - 1:53 pm | मुक्त विहारि
आवडला
22 Mar 2021 - 2:11 pm | चांदणे संदीप
आजी, नेहमीप्रमाणे मस्त किस्सा आणि मस्त लेखन! आवडले!
सं - दी - प
22 Mar 2021 - 2:16 pm | टवाळ कार्टा
ख्याक
22 Mar 2021 - 3:01 pm | गोंधळी
ओझोन? तो तर वातावरणाच्या वरील (upper) भागात असतो ना?
बाकी किस्सा भारी आहे.
22 Mar 2021 - 3:14 pm | गवि
ओझोन पहाटे जमिनीलगत जास्त प्रमाणात असतो आणि तो आरोग्यास उपकारक असतो अशा दोन समजुती अनेकदा ऐकल्या आहेत. अगदी पुलंच्या लेखनात कुठेतरी पहाटे फिरायला जाणारी मंडळी ओझोन खाऊन परतत होती, असे काहीसे वाक्य आठवते.
ओझोन वातावरणाच्या निम्न स्तरामधेही काही प्रमाणात असतो हे नक्की. त्याचे कोन्सेन्ट्रेशन दिवसाच्या कोणत्या वेळेत कोणत्या थरात वाढते ते शोधावे लागेल.
ओझोन आरोग्याला उपकारक मात्र नक्की नाही. झालाच तर अपायच होत असावा.
यावरुन कदाचित पहाटे ओझोन पातळी उलट दुपारपेक्षा कमी असल्याने ती वेळ अधिक चांगली, असेही असू शकेल.
24 Mar 2021 - 11:24 am | गोंधळी
ओझोन पहाटे जमिनीलगत जास्त प्रमाणात असतो हे नव्हते माहित.
24 Mar 2021 - 11:50 am | गवि
नाही नाही. तशी "समजूत" अनेक ठिकाणी ऐकली वाचली आहे. वास्तव वेगळे असू शकेल असे वरील प्रतिसादात म्हटले आहे.
25 Mar 2021 - 9:19 am | आनन्दा
https://www.epa.gov/indoor-air-quality-iaq/ozone-generators-are-sold-air....
24 Mar 2021 - 11:58 am | शाम भागवत
मला वाटते, आजी चढ चढत होत्या. त्यामुळे आणखी वर वर चढत असताना ओझोनचं प्रमाणही थोडे तरी वाढत गेलं असावं.
😉
22 Mar 2021 - 3:34 pm | योगी९००
किस्सा खतरनाक व छान शब्दात मांडला आहे.
पण ह्या टाईपचे बरेचसे किस्से वाचलेत. प्रत्येक अशा भुताटकीच्या किश्श्यात कथेतला नायक्/नायिका किंवा लेखक्/लेखिका असे दोन एक तास लवकरच उठतात व घड्याळ न बघता बाहेर पडतात असेच वाचले आहे. हे कसे काय? अर्थात तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवतो कारण असाच सेम किस्सा माझ्या चुलत आजोबांनी सांगितला होता. ते ही असेच पहाटे पाच ऐवजी तीनला ऊठून फिरून व वाटेत कोठेतरी भूत पाहुन आले होते. घरी आल्यावर त्यांना समजले होते की ते दोन तास लवकर निघाले होते.
22 Mar 2021 - 5:36 pm | कंजूस
मामाच्या गावी सांगली जिल्ह्यात जात असू मेच्या सुटीत. तेव्हा वाळलेल्या ( पाणी आटलेल्या) ओढ्यातून पाणी आणावे लागे. प्रत्येकाने जमेल तेवढे पाणी आणायचेच हा नियम. ओढ्यातच खड्डे खणलेले आणि त्यात उतरायला एक उतार. आत पाचसहा फुटी गोलाकार आणि मध्यभागी तांब्या बुडेल एवढाच खळगा. एक तांब्या पाणी काढायचे आणि जवळच्या कळशी/घागरीत ओतायचे. मग नवे पाणी पाझरून आत जमा झाले की दुसरा भरायचा. पहाटे हे पटापट होत असे पण सकाळ सातपर्यंत वेग मंद व्हायचा. त्यामुळे लवकर जाणे हिताचे. तर एक बाई अशीच लवकर म्हणजे दोनला गेली असेल. परतताना खरं म्हणजे पाणी भरायला येणाऱ्या बायका माणसे दिसणे अपेक्षित. पण तसे न दिसल्याने ती समजली की आपण पहाटे आलो नाही तर अगोदरच आलोय. मग धावत सुटली घाबरून आणि पडली. नंतरच्या लोकांनी पाहून घरी आणली. घाबरून ताप भरला होता तिला.
23 Mar 2021 - 11:32 am | मराठी_माणूस
ही खरेतर आपल्या कडील स्त्रियांची शोकंतिका आहे.
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/21032021/0/0/
कोणीही सत्तेवर आले तरी ही समस्या सुटत नाही.
22 Mar 2021 - 6:13 pm | गणेशा
मस्तच .. आवडला वॉक
22 Mar 2021 - 6:27 pm | Bhakti
भारी किस्सा!!
22 Mar 2021 - 10:12 pm | nanaba
Lai bhari.style.
Kaay honar kalalele tarihi fiss kan hasale
23 Mar 2021 - 4:23 pm | ज्योति अळवणी
मस्त अनुभव हं
23 Mar 2021 - 4:23 pm | ज्योति अळवणी
मस्त अनुभव हं
24 Mar 2021 - 9:52 am | चौकटराजा
सर्वानी " भूताचा जन्म " ही द मा मिरासदार लिखित गोष्ट वाचावी किंवा पहावी . यु ट्यूब वर आहे .. भूमिका भाऊ कदम !!
24 Mar 2021 - 11:04 am | रंगीला रतन
बघितली आत्ता. चांगली आहे :)
https://youtu.be/AhtGak2psBM
24 Mar 2021 - 5:01 pm | उन्मेष दिक्षीत
एक चा वॉक आणि वाटेत मेंटल हॉस्पिटल लागले वाचून मजा वाटली ! आजी भारीच लिहितात!
पिशाच्च वॉक चांगली प्रँक आयडिया आहे.
30 Mar 2021 - 4:17 pm | आजी
तुषार काळभोर- तुमचा अभिप्राय गमतीदार. वाचताना मलाही हसू फुटलं.
चौथा कोनाडा- "वाॅक थरारक आहे "हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले.
वामन देशमुख-तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार. माझी निवेदन शैली आवडली हे वाचून बरं वाटलं.
राजेश188-तुमचं म्हणणं पटलं. खरंच कड्याकुलुपं लावत नसत त्याकाळी.
ॲबसेंट माइंडेड-अहो, तीक्ष्ण निरीक्षणशक्ती. चूकभूल देणेघेणे. किस्सा थरारक वाटला ना?
शाम भागवत-आभारी आहे.
आंबटगोड आणि चांदणे संदीप आपापसात बोललेत. त्यात मी पडत नाही.
बापूसाहेब-थॅंक्यू.
मुक्तविहारी-धन्यवाद.
चांदणे संदीप-आभारी आहे.
टवाळ कार्टा-गंमतीदार!
गोंधळी-ओझोन हवेच्या कोणत्या थरात असतो यावर गोंधळींनी शंका विचारली आहे. आणि गविंनी त्याला उत्तर दिलंय. या चर्चेत आनंदा,शाम भागवतही सहभागी झाले आहेत. मला असं सांगितलं गेलंय की पहाटेच्या हवेत ओझोन असतो. मी त्यावर तूर्त विश्वास ठेवते.
योगी९००-तुमच्या चुलत आजोबांबाबत घंडलेला किस्साही गंमतीदार आहे.
कंजूस-तुम्हीही एका पाणी भरायला गेलेल्या बाईचा किस्सा सांगितला आहे. शक्य आहे.
मराठी माणूस-खरंच! पाण्यासाठी काय ही वणवण.
शोकांतिकाच आहे.
गणेशा-धन्यवाद.
Bhakti-थॅंक्स.
Nanaba-बरं वाटलं.
ज्योती अळवणी-समाधान वाटलं.
चौकट राजा-"भुताचा जन्म"मी प्रत्यक्ष मिरासदारांच्या तोंडून ऐकली आहे.
उन्मेष दिक्षीत-माझा किस्सा आवडला? आभार मानते.