नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

घर..

Primary tabs

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
22 Feb 2021 - 12:49 pm

माझे वडील डॉक्टर होते. सरकारी नोकरी होती. त्यांच्या दर दोन,तीन वर्षांनी बदल्या होत. प्रत्येक गावात राहायला सरकारी क्वार्टर्स असत. त्यामुळं वेगवेगळ्या खूप घरांतून राहायचा मला अनुभव मिळाला. घरे मोठी,ऐसपैस. वडील रिटायर झाले. तेव्हा मी पाचवीत होते. मी माझ्या आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी आहे. माझ्या भावंडांच्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर आहे.

वडील रिटायर झाल्यावर आम्ही भाड्याच्या घरातही राहिलो. मग लगेचच आम्ही थोडंसं गावाबाहेर स्वतःचं घर बांधलं. ते घर चौदा हजारांत बांधून झालं. त्यावेळी मी सहावीत शिकत होते. त्या घरात आम्ही राहायला आलो. घराला तीन मोठ्या, दोन लहान खोल्या आणि एक स्वयंपाकघर होते.

बाहेर बाग करायला जागा होती. माझी आई खूप हौशी होती. तिनं आणि आम्ही सगळ्यांनी खूप श्रम करून घराभोवती बाग केली. त्या बागेत गुलाब,जाई,जुई,मोगरा,शेवंती,अबोली,जास्वंद अशी खूप फुलझाडं आणि पेरु, सीताफळ, आवळा,आंबा अशी खूप फळझाडं होती. मी हौसैनं बागेला पाणी घालायची. पाण्यात खेळायची. पाणी पडलं की अबोलीच्या बिया फुटायच्या त्याचा चुट्,चुट् असा आवाज यायचा. तो ऐकायला मजा वाटायची. त्या बिया जमिनीवर पडायच्या आणि अबोलीची असंख्य रोपं यायची.अबोलीचे, कोरांटीचे गजरे घालून रोज मी शाळेत जायची.

बागेत कढीलिंबाची दोन झाडं होती. त्याचा कढीलिंब आम्ही एका भाजीवाल्याला विकायचो. त्याचे पैसे यायचे.
वडील रिटायर झाल्यावर त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरु केली. त्यांच्या दवाखान्यात गरीब पेशंटस् येत. कुणी पैसे द्यायचं,कुणी नाही द्यायचं. पैसे दिले नाहीत तरी वडील गरिबांवर उपचार करीत. त्या काळच्या पद्धतीनुसार माझी आई आठवी, नववी शिकली होती. पण तिचं वाचन खूपच होतं. रोजचा पेपर ती नीट वाचे. बातम्यांवर चर्चा करे. तीही घराला मदत म्हणून पैसे मिळवायची. घरात कोंबड्या होत्या. कोंबड्यांची अंडी विकून आईला पैसे मिळत. ती शिवणकाम करी. त्याचे पैसे मिळत. घरात बालकमंदिर होते. त्या मुलांचे फीचे पैसे मिळत. आई काॅलेजच्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे द्यायची. त्याचे पैसे मिळत. आईनं कुठलंच काम हलकं मानलं नाही. तिला जन्मभर इतक्या कष्टांची सवय नव्हती. पण तिनं ते आनंदाने केले आणि वडिलांना आर्थिक मदत केली. आमच्यावर ह्या सगळ्याचे उत्तम संस्कार झाले ,जे आयुष्यभर उपयोगी पडले.

घरात पोपट होता. मांजर होतं आणि कुत्राही होता. आम्ही शेळीच्या दुधाचा चहा प्यायचो.

मोठा भाऊ डाॅक्टर होता. त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगी होती. तोही मुंबईहून पैसे पाठवायचा. माझी ताई शिकवण्या करायची. आम्ही सगळ्यांनी मिळून ते घर तोलून धरले. उपासमार मुळीच झाली नाही, पण चैनही करायला मिळाली नाही. पाणी ,वीज सगळंच काटकसरीने वापरायचं. आजही मला पाणी वाया गेलं,दिवे उगीच जळले तर सहन होत नाही.

पण त्या घरात आम्ही सुखी होतो. आम्ही भावंडं जे मिळेल ते वाटून खायचो. खेळायचो, हसायचो. आई गरम गरम भाकऱ्या करुन वाढायची. भाकरीबरोबर खायला गरम आमटी असायची. गोडधोड सणावाराला व्हायचं. पण आमच्या तोंडातच अमृत होतं. जे पानात पडेल ते आम्ही आनंदाने, मजेने खायचो.

मी पौगंडावस्थेत होते. मनात जगाबद्दल खूप कुतूहल होतं. खूप शिकायचं होतं. घरातलं वातावरण शिक्षणाला अनुकूल होतं. मी मॅट्रीकला होते तेव्हा वडील मला अभ्यासासाठी उठवायचे आणि मला गरम गरम चहा करून द्यायचे. आईनंच मला गोष्टी सांगितल्या. वाचायला पुस्तकं उपलब्ध करून दिली. वाचनाची गोडी लावली. निबंध लिहायला शिकवले. ती कविता करायची. मी सहावीत शिकत असताना तिच्या मदतीने मी एक कविता केली. माझ्या त्याच घरावर. ती मला आजही आठवते.

"आहे माझे घर कसे
इवले इवले छान।
आहे येथे राघू मैना
रंभा(मांजरी) आणि टिपूनाना
गाय आणिक शेळी खाशी
पद्मा,श्यामा नावे त्यांची
गोजिरवाणे बालक धावे
दुडूदुडू सान।

ह्या घरात मी खूप वर्षं राहिले. सहावी ते बी.ए.! पुढे शिकायला पुण्याला गेले आणि..... वो किस्सा फिर कभी!!

साहित्यिकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 Feb 2021 - 2:44 pm | तुषार काळभोर

अशाच घराचं स्वप्न आहे. बांधकाम कमी असलं तरी चालेल, पण मोकळी जागा भरपूर हवी. अगदी लॅण्डस्केप करून नाही, पण घरात वापरात येतील अशी फळे, रोपे, फुले, भाज्या असाव्यात.

पाण्यात टाकल्यावर फुटणा-या बिया खूप दशकांनी आठवल्या.

आणखी ती एक फळे (बहुधा तेरड्याची असावीत, चुभूद्याघ्या) . ती थोडी बोटांनी चुरगळली की फट्ट करुन फुटून उघडायची आणि वळकटीचे रुप धारण करायची.

मुक्त विहारि's picture

22 Feb 2021 - 3:54 pm | मुक्त विहारि

आमचे बंदिस्त खोलीत ....

गवि's picture

22 Feb 2021 - 4:30 pm | गवि

का हो मुविशेठ?

कोंकणातले ना तुम्ही? मला तर कोंकणात बालपण अजिबात बंदिस्त वाटले नाही.

मुक्त विहारि's picture

22 Feb 2021 - 7:04 pm | मुक्त विहारि

सुट्टीत रत्नागिरी

आता जास्तीत जास्त वेळ, कोकणात....

सविता००१'s picture

22 Feb 2021 - 4:05 pm | सविता००१

घर खूप सुंदर

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Feb 2021 - 5:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझेही लहानपण (७वी पर्यंत) अशाच कौलारु घरात गेले. अंगणात थोडीफार फुलझाडे, मागे एक आंब्याचे झाड. मातीच्या भिंती, पावसाळ्यात येणारी ओल, फटाके वाजले तर माळ्यावरुन पडणारी माती, अंगणातील पागोळ्या,समोरासमोर वाडे, सगळीकडे अशीच घरे,चाळी,वाडेबिडे,नारळाची झाडे,शाळेचा वेळ सोडला तर कोणाच्याही वाड्यात पडीक असलेली खेळणारी मुले, थोडे मागे चालत गेले की घोडे,टांगेवाले, मग सायकल हाती आल्यावर मित्रांसोबत लांब लांबच्या फेर्‍या.

पण लवकरच बिल्डर नावाची कीड लागली आणि वाडे पाडुन बिल्डींग बांधायचा रोग साथीसारखा पसरला. काही काळ अर्धवट बांधलेल्या ईमारतींमध्येही आम्ही आनंदाने बागडलो, वाळूत खेळलो, सळयात फिरलो,विटांवर चढलो,सिमेंट्ने माखलो. पण ती मजा हळुहळु गेलीच. ते बालपणही संपले आणि पांगापांग झाली.

रमेश आठवले's picture

22 Feb 2021 - 10:21 pm | रमेश आठवले

फक्त चौदा हजारात घर ! हि किती सालातली गोष्ट आहे ?

कंजूस's picture

23 Feb 2021 - 6:20 am | कंजूस

घराच्या आठवणी आवडल्या आणि समोर दिसलेही.
पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या सर्वांकडेच मोठी घरे नव्हती. मोठमोठ्या इमारती श्रीमंत व्यापाऱ्यांनी बांधलेल्या त्यात भाडेकरू. घरं लहान असली तरी आजुबाजूला सोयी सवलती खूप. शाळा, कॉलेजेस,वाहतूक,वाचनिलयं,मैदानं. शि।क्षण आणि करमणूक सोपं.
आता काळ बदलला.

सिरुसेरि's picture

23 Feb 2021 - 9:11 pm | सिरुसेरि

घराच्या आठवणी आवडल्या . +१

गणेशा's picture

23 Feb 2021 - 9:34 pm | गणेशा

मस्त...

माझे उरुळी कांचन चे घर आठवले...

सौंदाळा's picture

23 Feb 2021 - 9:43 pm | सौंदाळा

छान लेख आणि आठवणी,
लेखात गावाचा उल्लेख दिसला नाही.