कण

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 5:51 pm

नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो. माणसांची रूक्ष नजर मात्र उत्पादना पलीकडे जात नाही. मी ही तसाच तुझ्या नजरेतून विश्व मिठीत घ्यायला उत्सुक होतो. नदी वाहतच राहते. प्रवाहात असणारी माणसे आणि दगडे दोन्हीही झिजतात. दोघांत फरक तरी काय असतो म्हणा! या प्रवाहाचा कधीकधी प्रपात होतो असं ऐकलंय. तिथे सगळी मांडणी विस्कटते; 'बिघडते' असं नाही म्हणता येणार, कारण प्रवाह थांबत नाहीच. फक्त आधीचे सोबती आता सोबत नसतीलही कदाचित आणि म्हणून ते 'सोबती'ही नसतील. तीच गोष्ट दगडांची, एक गोष्ट फक्त भिन्न. माणसं व्यवहारी असतात, चटकन नवे सोबती शोधतात. दगडांची सोबत सुटली तर ते मात्र फक्त प्रवाहाशी एकरूप होतात. दरी, डोंगर, खाचखळगे, धबधबे या कशातही प्रवाहापासून अलग होत नाहीत. अशा सुट्या दगडांची मग वाळू होते कालांतराने. आपल्या सोबत्याचा निदान एक 'कण' पुन्हा भेटेल या अपेक्षेने...

धोरणविचारलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Feb 2021 - 7:22 pm | मुक्त विहारि

आवडले