इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने |
.
.
.
म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की.
आणि कळत अथवा झेपत नसलेल्या गोष्टी आवडू नयेत असं थोडंच आहे? आता नाही आम्हाला चेस मधलं काही कळत. पण म्हणून बुद्धिबळ आवडू नये असं थोडंच आहे? लोकं तासनतास एका जागी बसून, चौकोनी चेह्ररे करून त्या बोर्डावर नक्की काय गडबड करतात ते बघावंच एकदा म्हणून त्या ६४ घरांच्या खेळाबद्दल कुतुहल निर्माण झालं. आणि वेगवेगळ्या मोहर्यांच्या चाली कळेपर्यंत मजल गेली. त्यात लहानपणी सकाळ मध्ये रघुनंदन गोखले अतिशय मनोरंजक समीक्षा लिहायचे. "कामस्कीच्या रे लोपेझला कार्पोवने क्वीन्स गॅम्बिटचे चोख प्रत्युत्तर दिले", "स्पास्कीने कारो-कान ची भक्कम तटबंदी उभारली", "गेलफंडने डाव्या फळीतून घुसून पांढर्या मोहर्यांची कत्तल करायला सुरुवात केली" असलं जबरदस्त वर्णन वाचून त्या पटावर खरोखरचं युद्ध सुरु असल्याचा भास व्हायचा. सिसीलियन डिफेन्स, किंग्ज इंडियन डिफेन्स, तोर्रे अॅटॅक, नाजदॉर्फ इंग्लिश अॅटॅक वगैरे नावं ऐकायला जाम भारी वाटायची.
ह्याच वर्णनात वाहवत जाऊन कॉलेजमध्ये असताना आमच्या सुई, तार्या, गिगो वगैरे मित्रमंडळींना त्यांच्या मॅचेसच्या वेळी cheer करायला गेलो आणि दलेर मेहेंदीची कॉन्सर्ट समजून जावं आणि धृपद गायनाची मैफल निघावी तसं झालं. छ्या! इतकं गांभीर्य आपल्याला नाही झेपत. आणि पुन्हा इतका वेळ विचार करायचा? वर त्याला विरंगुळा, खेळ म्हणायचं? इथे आपला attention span इंजीनियरिंगच्या परीक्षेत कधी १० मिनिटांवर नाही गेला. तेवीस मिनिटांपेक्षा जास्त बूड एका जागी टिकत नाही हे उमगलं - तसा पौगंडावस्थेतील बहुतेक प्रेमप्रकरणांसारखा आमच्या ह्या क्रशचा देखील चक्काचूर झाला. आणि "ज्याला राजा actually मरण्यापूर्वीच तो मरणार हे कळतं - आणि जो आपला राजा आडवा करून शरणागती पत्करतो - तो भारी चेस प्लेयर" असा एक सोपा समज करून घेऊन आम्ही बुद्धिबळाला अलविदा केला.
जरी बुद्धिबळाशी सूत जमवण्याची शक्यता नाहीशी झाली तरी तोपर्यंत एक नाव हा क्रश निदान आठवणीत कायम राहील ह्याची खात्री देत होतं - "विश्वनाथन आनंद."
भारताचा सर्वांत तरुण "इंटरनॅशनल मास्टर" आणि पहिला वहिला "ग्रॅन्डमास्टर." साक्षात कार्पोव, कास्पारोव, कामस्की, क्रामनिक, मायकल अॅडम्स, टोपालोव सारख्या दिग्गजांच्या नजरेला नजर आणि बुद्धीला बुद्धी भिडवणारा "आपला" माणूस. दीड हजार वर्षांपूर्वी त्याच्याच परिसरातून एका महान दार्शनिकानी आसेतु हिमाचल फिरून सनातन धर्माची भारताला पुन्हा ओळख करून दिली होती. तद्वतच हिंदुस्थानात जन्मलेल्या खेळाची हिंदुस्थानाला पुन्हा ओळख करून दिली - ते स्फुल्लिंग पुन्हा चेतवलं ते विश्वनाथन आनंदने.
आनंदनी भारतात बुद्धिबळाचा एका अर्थी जागर केला. Candidates Tournament, FIDE cycle, PCA World Chess Championship, FIDE World Chess Championship... आनंद एकापाठोपाठ एक शिखरं पादाक्रांत करत गेला. काल मनिला मध्ये काय झालं? लिनारेसला माहौल कसा असेल? यंदा Wiijk aan Zee कधी? Dortmund चा ड्रॉ कसा लागतोय? अशी उत्सुकता पहिल्यांदा जागवली ती आनंदने. भारतीय खेळात भारताचा झेंडा जगभर फडकवत ठेवला तो आनंदने.
Rapid chess चा बादशहा, तब्बल सात वर्षं FIDE चा विश्वविजेता, पद्मभूषण पुरस्कार दिला जाणारा पहिला खेळाडू आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे अगणित मुला-मुलींना बुद्धिबळाचं वेड लावणारा स्फूर्तिस्तंभ - विश्वनाथन आनंद.
१९८७ मध्ये आनंद ग्रॅन्डमास्टर झाल्यावर दिव्येंदू बरुआ, प्रवीण ठिपसे, शशिकिरण कृष्णन, हरिकृष्णा, कोनेरू हंपी असा भारतीय ग्रॅन्डमास्टर्सचा जो धडाका सुरू झाला तो ह्या वर्षी १४ वर्षांच्या लिऑन मेंडोन्सापर्यंत चालू आहे. गेल्या ३४ वर्षांत भारताने जगाला ६७ ग्रॅन्डमास्टर्स दिले आहेत आणि ह्याची मुहूर्तमेढ रोवली ती विश्वनाथन आनंद ने.
त्याहीपेक्षा मोठी गोष्ट त्याने केली ती म्हणजे आमच्या क्रिकेटप्रेमात आंधळ्या झालेल्या देशाला एक वेगळा हीरो दिला. बुद्धीमान असण्याला - अभ्यासू / घासू असण्याला, स्कॉलर असण्याला ग्लॅमर दिलं! बुद्धिबळपटूंच्या ४-५ पिढ्या आनंदला बघत, त्याच्याशी एक दिवस खेळण्याचं स्वप्न उराशी घेऊन मोठ्या झाल्या आहेत हा त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीला भारताने केलेला सलाम आहे. बुद्धिबळ हा अत्यंत क्लिष्ट, कठीण आणि चिकाटीचा अंत पाहणारा खेळ आहे आणि भारताच्या बौद्धिक संपदेला ह्यापेक्षा तगडं आव्हान ते कोणतं? All India Chess Federation च्या कॅलेंडरवर वर्षभरात तब्बल ९२ अधिकृत स्पर्धा आहेत आणि त्यांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे ह्यात कुठेतरी सिंहाचा वाटा मद्रासच्या ह्या कलंदराचा आहे.
"एक दूजे के लिये" आठवतोय? एकमेकांची भाषा कळत नसताना वासू आणि सपना आकंठ प्रेमात बुडतात. विश्वनाथन आनंदवर क्रश व्हायला बुद्धिबळ कशाला कळायला पाहिजे? आपण तर पांढरा पहिली मूव्ह करतानाच्या त्याच्या चेहर्यावर दिसणार्या समुद्राच्या गांभीर्याच्या आणि नजरेतल्या अस्मानी खोलीच्या प्रेमात आहोत.
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.
जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रिया
10 Feb 2021 - 5:22 pm | मुक्त विहारि
लेख आवडला ..
बाय द वे,
तुम्ही चेस हा प्रकार कधी, 4-6-8-10-12,-14, असा पार्टी पाडून खेळला आहात का?
आमच्या रूमवर एकच चेस बोर्ड होता आणि खेळाडू, कमीतकमी 4...
त्यामुळे, चेस मध्ये डबल्सच्या मॅचेस, आमच्याच रूममध्ये चालायच्या...
304, पण तिघांत खेळू शकतो, हा पण एक शोध तिथलाच ..
चेस डबल्स, हा एक अतिशय मनोरंजक प्रकार आहे ... फक्त दोनच पथ्ये पाळायची ....
1. दारू हवीच ....
2. अतिशय जीवलग मित्र हवेत ...
खूप भांडायचो पण लगेच विसरायचो ....
10 Feb 2021 - 8:05 pm | सौंदाळा
वा, मॉर्गन भाऊ फॉर्मात आहेत.
मस्तच, लिहीत राहा.
शांत, सुस्वभावी, वलयापासून दूर राहणारा आनंद हा माझा कायम आवडता खेळाडू राहिला आहे.
राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही? एक सुवर्णपदक नक्की झालं असत आपलं.
(बिलियर्ड बद्दल पण गीत सेठी, अशोक शंडील्यकडून मिळाले असते)
10 Feb 2021 - 10:57 pm | टवाळ कार्टा
म्याच "बघणेबल"असली पाहिजे हा निकष असेल कदाचित ;)
11 Feb 2021 - 10:10 am | तुषार काळभोर
मधल्या मकरंद अनासपुरेच्या टेनिस ची आठवण झाली!
11 Feb 2021 - 9:45 am | Bhakti
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.
वाह!!!
15 Feb 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा
व्वा, जेपी साहेब !
15 Feb 2021 - 1:43 pm | नीलस्वप्निल
तुमचे सर्व लेख वाचनीय असतात... मजा येते वाचुन...