"सुमना, निघतो गं." रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं.
"हो बाबा या. आणि हो, संध्याकाळी दाजी काका येणार आहेत तेव्हा ओफिसधून लवकर या. मी, सुशांतलाही सांगितलं आहे. तो ही संध्याकाळची त्याची डिप्लॉयमेंट उद्या करतो आहे. मी ही आज स्टुडीओतून लवकरच येणार आहे." सुमनाने, स्वतः चा डबा बॅगमध्ये ठेवत ठेवत सांगितलं.
"पण आज तू उशिरा निघाली आहेस का? कारण ८.३० वाजले गं" .. रावसाहेबानी विचारलं.
" हो.. आज ९.३० वाजता जाणार आहे मी. आज डेमो आहे क्लायंटला माझ्या डिझाईनचा. त्यामुळे डायरेक्ट तिकडेच जाईन. बर, तुम्ही निघा.. मी ही आता अंघोळ वगैरे आटोपून घेते." असे म्हणत सुमना आत वळली. रावसाहेब निघून गेले.
रावसाहेब म्हणजे अनंतराव पेठे, नामवंत वकिल. शहरात त्यांच्याबद्दल खूप आदर. पत्नी आनुसयाला जाऊन १५ वर्ष झालेली. मुलगा सुशांत खूपच लहान होता. पण त्यांनी दुसरं लग्न नाही केलं. सुशांत वयात आल्यावर आपल्या पसंतीने त्यांनी त्याचं लग्न सुमनाशी लाऊन दिलेलं. सुमनावर मुलीपेक्षा जास्ती माया त्यांची. सुमना घरी आल्या आल्या तिच्या हाती सगळं घर सोपवून "मुली, आता या घराबरोबर ही दोन बाळही सांभाळ तू." त्यांनी स्वतःचा आणि सुशांतचा उल्लेख बाळं असा केलेला पाहून सुमना खुदकन हसली होती.
सुमना इंटीरियर डिझाईनर होती. वयानुसार वेगवेगळ्या फॅशन्स करणे.. नटने .. मुरडणे..तिचा छंद होता. रावसाहेबांना तिचं खूप कौतुक होतं.
रावसाहेब गाडीत बसले.. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. आजूबाजूला तुरळक दुकानं उघडली होती. कोणी रस्त्यावर पाणी मारत होतं. कोणी रस्ता झाडून काढत होतं. दूधवाले दूधाचे कॅन घेऊन त्यांच्या दूधावाला स्पेशल एम ए टी गाडीवरून निघाले होते. १० मिनिटे अशीच गेली. आज कोण कोण अशील येणार आहेत भेटायला असं म्हणत त्यांनी आपल्या ब्रिफकेस मधून डायरी उघडली. "देवदत्त माने.. ९.१५ वाजता... अरे!!!!!!! छे!! अरे, पांडू, जरा गाडी घराकडे वळव रे. मान्यांची फाईल स्टडीरूममध्येच राहिली काल रात्री. घेऊन जाऊया. त्यांचीच पहिली आपॉईनमेंट आहे."
"घेतो सर.." म्हणत पांडूने गाडी वळवली.
-----
घरी आल्यावर त्यांच्याकडे असलेल्या लॅच कीने त्यांनी दार उघडलं आणि ते स्टडीरूमकडे निघाले. हॉलमधून डाविकडे वळले. आणि वाटेत असणार्या सुशांत्-सुमनाच्या बेडरूमकडे सहजच त्यांचं लक्ष गेलं....... आणि....... ते तिथल्या तिथे थिजले...
सुमना.. ......नुकती अंघोळ करून आलेली.. केस पुसत.. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर पाठमोरी उभी... .. फक्त टॉवेलमध्ये. ती तिच्याच नादांत गुणगुणत्..घरात कोणीही नाही या समजूतीने बिनधास्त होती. तिचे नितळ पाय.. तिची ओली पाठ.. ओले केस.. रावसाहेब क्षणभर भान हरपल्यासारखे बघतच राहिले. "छे!!! छे!!! काय हे.... श्शी!! " वीज संचारावी तसे ते पटकन तिथून बाजूला झाले. हॉल मध्ये आले आणि डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिले. आपण हे काय केलं...?? अनुसयाबाई गेल्यापासून कोण्याही स्त्रीस्पर्शापासून दूर राहिलेले.. मोहावर विजय मिळवलेल रावसाहेब आज एकदम सुमनाचं सौदर्य पाहून विचलीत झाले होते. सारखी त्यांच्या डोळ्यासमोर सुमना येत होती.. टॉवेलमध्ये अर्धवस्त्रांकित... तिचं ते स्वतःच्याच मस्तीत गुणगुणणं.. केस झटकणं.. मानेवर, छातीवर पाठीवर क्रिम लावणं .. त्यांच्या नजरेसमोरऊन जात नव्हतं.... बराच वेळ ते तसेच बसून होते.. "हे पाप आहे.. हे पाप आहे.. असं नकोय व्हायला".. मन सारखं समजावत होतं. पण जे पाहिलं होतं.. ते विसरणं केवळ अशक्य होतं..
"सर.. जायचं का?" पांडूने आत येऊन विचारलं.
"अं.... अं.. हो.. हो. आलोच" म्हणत रावसाहेब उठले. कसलीशी चाहूल लागल्याने सुमना बाहेर आली. मरून रंगाचा स्लिवलेस सल्वार कमिझ आणि त्यावर काळि ओढणी.. केस ओलेच होते अजून.. रावसाहेबांना आज सुमना किती रेखिव आहे हे जाणवलं. त्यांना आज ती विलक्षण सुंदर दिसत होती. ते तिच्याकडे पहातच राहिले.
"हे काय बाबा, तुम्ही परत कधी आलात?? काही राहिलं का?" सुमनाने गोंधळून विचारलं.
तिच्या आवाजाने ते भानावर आले. "अं.. हो. अगं ती मानेंची फाईल राहिली स्टडीरूम मध्ये."
"थांबा मी आणून देते." म्हणते सुमना गेली आणि ती फाईल घेऊन आली. ती फाईल रावसाहेबांसमोर धरत ती म्हणाली,"ही घ्या."..... "बाबा... अहो बाबा.. ही घ्या ना फाईल". रावसाहेब भानावर आले. फाईल घेत असताना सुमनाच्या हाताला त्यांचा स्पर्श झाला. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. तो स्पर्श त्यांना हवाहवासा वाटू लागला.
"सुमना.......... अगं........" रावसाहेब बोलता बोलता थांबले.. "...... काही नाही..येतो मी"
"बाबा.. काय झालं?? काही होतय का?" सुमनाने विचारलं.
"नाही काही नाही.." एक सुस्कारा टाकत रावसाहेब वळले. दरवाज्यातून बाहेर पडताना त्यांनी एकवार सुमनाकडे पाहिलं.... त्यांची नजर.. काहीतरी वेगळी होती आज.. सुमनाला हे जाणवलं. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते रावसाहेब.. काय असेल बरं?? सुमनाने घड्याळ पाहिलं.. आणि तीही आवरायला गेली.
दिवसभर रावसाहेबांसमोर पाठमोरी सुमनाच येत होती. जितकं ते लक्ष कामावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते तितकी ती जास्त आठवत होती. मेंदू सांगत होता.. नाही हे योग्य नाही, ती तुझी मुलगी आहे.. पण मन ऐकायला तयार नव्हतं. स्वतःला आरशात न्याहाळत असलेली सुमना.. केसांवरून हात फिरवणारी सुमना.. हात वर उंचावून केसांवरून ड्रायर फिरवणारी सुमना.. हाता-पायावर मन लावून क्रिम लावणारी सुमना.. आणि शेवटी त्या मरून काळ्या रंगात खुलून दिसणारी सुमना.. तिची नाना रूपं त्यांच्या समोर येऊ लागली.. लक्ष कुठेच लागत नव्हतं. कोणीतरी गळा घोटतं आहे असं वाटायला लागलं. मनातली मळमळ बाहेर पडत नव्हती. इतक्यात फोन वाजला.सुमनाच होती फोनवर. "हॅलो, बाबा.. अहो किती वाजले?? लवकर येणार होतात ना? दाजीकाका येतील इतक्यात.. निघा बघू लवकर." सुमनाने भडिमार केला. "अं.. हो. निघत निघतो." म्हणत ते फोन ठेऊन उठले.
घरी त्यांचा भाऊ म्हणजे दाजीकाका.. आलेले होते. गप्पा रंगत होत्या. चेष्टामस्करी चालू होती. पण सुमानाकडे पाहण्याचे रावसाहेब टाळत होते. सुमानाच्याही हे लक्षात आलं. चुकुन काही देताना घेताना सुमनाचा स्पर्श झाला तर.. .. चटकन हात काढून घेत बाजूला. तिचं लक्ष नसताना तिच्याकडे पहात.. पण तिच्याशी नजरानजर करण्याचं टाळत होते.. सुमनाला जाणवलं.. काहीतरी वेगळ आहे आज. काहीच समजत नाहिये. बाबा नेहमी सारखे नाहियेत. त्यांची नजर.. नजरेत काहीतरि वेगळं आहे.. आपल्या हाताला स्पर्श झाला तर चटकन हात बाजूला घेणं... नक्की काय झालंय..?
जेवणं झाल्यावर ती आवरा आवरी करत होती. रावसाहेब स्वयंपाकघरात आले.. "सुमना.......... आज सकाळी फाईल विसरली आहे हे लक्षात आल्यावर मी लगेचच आलो होतो घरी......................"
"बाबा.............................." सुमना तिथल्या तिथे थिजली. रावसाहेबांच्या वागण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला होता.
"शक्य झाल्यास मला माफ कर...." राव साहेब त्यांच्या खोलीत निघून गेले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरे दिवशी सकाळी..
"काल पर्यंत तर सगळं नीट होतं गं.. आज एकदम काय झालं हे" सुशांत रडत होता..सुमना सुन्न होऊन बसून होती आणि समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं.
(डिस्क्लेमर : कथेतील पात्रं पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणाला त्यांचा स्वतःशी संबंध वाटला तर लेखिकेला दोष देऊ नये.)
- प्राजु
प्रतिक्रिया
21 Nov 2008 - 10:47 pm | शितल
प्राजु,
वेगळ्या घाटणीची कथा भावली, पण शेवट वाचुन मात्र मन सुन्न झाले.
21 Nov 2008 - 10:57 pm | बिपिन कार्यकर्ते
चाकोरीबाहेरचा विषय. आटोपशीर कथा. आवडली.
बिपिन कार्यकर्ते
21 Nov 2008 - 11:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कथा आवडली.
21 Nov 2008 - 11:11 pm | श्रीकृष्ण सामंत
फार छान लिहिलं आहे.वाचायला खूप आवडलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
21 Nov 2008 - 11:21 pm | पिवळा डांबिस
कथेची सुरवात आवडली, पण शेवट नाय पटला....
आँ!! नाही म्हणजे काहीतरी नुसतं नजरेस पडलं....
तेही मुद्दाम प्रयत्न करून नव्हे तर अपघाताने, योगायोगाने....
म्हणून एकदम जीव दिला?
आमच्या हितल्या बीचवर गेला असता म्हातारा तर! काय झालं असतं त्याचं?:)
सडेतोड,
पिवळा डांबिस
(लग्नापूर्वी ही लुक्ड...... सो लुक्डा!!!)
21 Nov 2008 - 11:35 pm | टारझन
आमच्या हितल्या बीचवर गेला असता म्हातारा तर! काय झालं असतं त्याचं?
पण त्याला अपराधी नसतं ना वाटलं ... आमच्या इथं क्लबात आला असतां तर काय झालं असतं ? तिथंच गार झाले असते राव साहेब,,,, असो ...
22 Nov 2008 - 9:19 am | टवाळचिखलू
कथा आवडली ..
पिडां ... हे काय ... मी कालच हे वाक्य चोरुन सिग्नेचर मध्ये टाकले होते ....
आता परत बदला .....
- चिखलू
लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
21 Nov 2008 - 11:23 pm | टारझन
दूधवाले दूधाचे कॅन घेऊन त्यांच्या दूधावाला स्पेशल एम ए टी गाडीवरून निघाले होते.
हा हा हा .. हे लैच्च आवाडलं ... गवळ्यांकडे येझदी पण असते ... :)
बाकी कल्लास कथा .. आपण खल्लास .. रावसाहेबांसारखा मी ही व्याकूळ होउन वाचत होतो. वर्णनाकलेला तोड नाही तुझ्या.
गद्य आणि पद्य विभागात उत्तम लेखण ...
पण मला हे कळलंच नाही
समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं.
कलेवर म्हणजे "पार्थिव" हे नक्की ना ?
(हळवा) टारूबाळ
22 Nov 2008 - 1:36 am | टारझन
स्वर्गापेक्षा थायलंड्/फिलिपिन्स चं टिकीट स्वस्त होतं असं वाटून गेलं ...
(व्यवहारी) टारपाइन्स फ्रॉम टारलँड
21 Nov 2008 - 11:40 pm | यशोधरा
छान लिहिले आहेस प्राजू, पण शेवट एकदम झाल्यासारखे वाटले..
21 Nov 2008 - 11:44 pm | अनामिक
कथा आवडली
21 Nov 2008 - 11:59 pm | शशिधर केळकर
शीर्षक ही छान! या कथेत रावसाहेबांचे अचानक परतणे, सुमनचे त्या तशा स्थितीत असणे आणि कथेच्या शेवटी त्यांचा अकस्मात शेवट - सारेच अगदी अकल्पित! आणि अगदी आटोपशीर. आवश्यक तिथे वर्णनही अगदी ठाशीव रेखाटले आहे. मजा आली.
22 Nov 2008 - 12:47 am | रेवती
शेवट अनपेक्षित.
एका बैठकीत लिहून काढलीयेस का कथा?
वातावरणनिर्मीती एकदम जमलीये म्हणून विचारलं.
रेवती
22 Nov 2008 - 12:54 am | प्राजु
सकाळी उठल्यापासून डोक्यात विषय घोळत होता. सगळी कामं करता करता हीच कथा आकार घेत होती डोक्यात. आणि वेळ मिळाल्या मिळाल्या बसले लिहायला आणि पूर्णच केली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Nov 2008 - 12:53 am | प्रभाकर पेठकर
दोनच शेवट होऊ शकत होते. सुमनावर बलात्कार आणि तिची आत्महत्या किंवा रावसाहेबांची अपराधी भावना आणि त्यांची आत्महत्या. दूसरी घटना तशी विपरित पण हृदयस्पर्शी. पण शेवट अजून जरा खुलवायला हवा होता, असे वाटते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
22 Nov 2008 - 12:57 am | llपुण्याचे पेशवेll
छान कथा . पेठकरकाका म्हणतात त्याप्रमाणे २च शेवट शक्य आहेत. पण हा शेवट जास्त भावला.
जरा वयाचा हिशोब सोडला तर कथा छान आहे. :)
पुण्याचे पेशवे
22 Nov 2008 - 1:10 am | अनिरुध्द
कथा एकदमच छान आहे. आवडली. माणसातलं माणूसपण शिल्लक असलं की शेवट हा असाच व्हायचा.
22 Nov 2008 - 1:27 am | कपिल काळे
अकल्पित शेवट. माफी मागून प्रकरण मिटेल असे वाटले होते. पण ते न होता रावसाहेब अपराधी भावना सहन न झाल्याने स्वतःचा अंत करुन घेतात हे धक्कातंत्र कथेचा विषय प्रभावीरित्या मांडून जाते.
डिप्लॉयमेंट हा शब्द वकिली व्यवसायासंदर्भातील आहे का?
http://kalekapil.blogspot.com/
22 Nov 2008 - 1:30 am | प्राजु
डिप्लॉयमेंट हा शब्द सुशांतच्या संदर्भात आहे. आणि तो माझ्या माहितीप्रमाणे सॉफ्टवेअर प्रोफेशन संदर्भात आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Nov 2008 - 1:37 am | कपिल काळे
--
23 Nov 2008 - 6:06 am | सर्किट (not verified)
:-) :-) :-)
वारणानगर कुठेशी आले रे ?
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
23 Nov 2008 - 8:37 am | कपिल काळे
इथे विषयांतर होइल . ख.व बघ. तिथे उत्तर आहे.
इतर इच्छुकांनी तिथे बघावे
http://kalekapil.blogspot.com/
22 Nov 2008 - 1:34 am | मीनल
कथेच नाव कथेला अगदी अनुरूप आहे.
पण असा `शेवट` नको होता असं वाटलं.
मीनल.
22 Nov 2008 - 1:42 am | ऋषिकेश
हटक्या विषयावरची आटोपशीर कथा आवडली. कथाविषय तर लै भारी
शेवट मात्र काहिसा कैच्या कै वाटला. तोच शेवट असा अचानक न होता रावसाहेबांच्या मनातील बोच अधिक गहिरी होत- त्यांचे विचार उलगडत- झाला असता तर सहज तरीही धक्कादायक वाटला असता..
-(कथाप्रेमी) ऋषिकेश
22 Nov 2008 - 1:56 am | चतुरंग
प्रसंगांचे वर्णन आणि भावनांची आंदोलने पकडण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.
संवेदनशील व्यक्तीच्या हातून अजाणतेपणे घडलेल्या गोष्टीची किती टोकाची बोच लागून राहते आणि त्याचे प्रायश्चित्त झाल्याखेरीज त्यातून त्याच्या अंतरात्म्याला स्वस्थता कशी लाभत नाही असा मोठा आवाका असलेलं कथाबीज आहे.
वर पेठकरकाका म्हणतात तसे दोनच शेवट असू शकतात. हा शेवटही पटला पण ती अस्वस्थता आणखी वाढत वाढत असह्य झालेली दाखवायला हवी होतीस.
कथा पूर्ण करायला थोडी घाई केलीस असे वाटते. लोणच्यासारखे कथाबीज मुरवत ठेऊन कथेचा उत्तरार्ध नीट खुलवला असतास तर कथा एकदम वेगळ्याच उंचीवर गेली असती.
पु.ले.शु.
चतुरंग
22 Nov 2008 - 3:49 am | सर्किट (not verified)
फक्त दोनच शेवट असं का म्हणता?
उदा.
१. सून मुलाला घटस्फोट देते आणि रावसाहेबांशी पाट लावते..
२. रावसाहेब हिमालयात जातात.
३. रावसाहेब स्वतःच्या वासनांवर मुक्ती मिळवण्यासाठी (अ) मोठ्ठा यज्ञ घालतात (ब) गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करतात (क) गांधीजींचे तंत्र अवलंबतात (ड) समुपदेशनाचे वर्ग उघडतात.
४. मुलाला हे सहन होत नाही म्हणून तो रावसाहेबांचा खून करतो
आणखीही अनेक आहेत..
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
22 Nov 2008 - 3:53 am | मुक्तसुनीत
१. सून मुलाला घटस्फोट देते आणि रावसाहेबांशी पाट लावते.. : लेखक : चंद्रकांत काकोडकर
२. रावसाहेब हिमालयात जातात. : लेखक : शरच्चंद्र चटर्जी
३. रावसाहेब स्वतःच्या वासनांवर मुक्ती मिळवण्यासाठी
(अ) मोठ्ठा यज्ञ घालतात : लेखक : पु ना ओक
(ब) गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करतात लेखक : दासगणू
(क) गांधीजींचे तंत्र अवलंबतात लेखक : स्वामी शिवानंद ( ब्रह्मचर्य हेच जीवन वाले)
(ड) समुपदेशनाचे वर्ग उघडतात. लेखक : टेक अ वाईल्ड गेस !
४. मुलाला हे सहन होत नाही म्हणून तो रावसाहेबांचा खून करतो : लेखक : बाबा कदम
22 Nov 2008 - 3:58 am | सर्किट (not verified)
ठ्ठ्ठ्ठ्ठो.....
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
22 Nov 2008 - 4:15 am | चतुरंग
तुमची कल्पनाशक्ती चौपाटीवर मुक्तपणे विहार करते आहे! ;)
चतुरंग
22 Nov 2008 - 2:59 pm | विनायक प्रभू
मुक्त का सुनित? वाईल्ड गेस- हा हा हा-खीखी खी
22 Nov 2008 - 8:55 pm | सुनील
खो खो खो
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Nov 2008 - 4:13 am | चतुरंग
सर्वसामान्यपणे हे दोनच शेवट असू शकतात असे माझे मत होते पण कथा फझी लॉजिकच्या साडग्यातून काढलीत म्हणता कथेला कलाटणी देणारे नव्हे, तर कोलांटी मारायला लावणारे हे शेवटही अशक्यप्राय नाहीत! ;)
चतुरंग
22 Nov 2008 - 4:22 am | सर्किट (not verified)
कोलांटी मारायला लावणारे हे शेवटही अशक्यप्राय नाहीत!
विशेषतः कथेचे नाव "अकल्पित" असल्याने, काहीही अशक्यप्राय नाही.
- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
22 Nov 2008 - 6:05 am | मनीषा
कथा चांगली आहे ... ती वाचत असताना याचा शेवट काय असेल ही उत्सुकता होती .
... आणि अगदी अकल्पित शेवट .
रावसाहेबांना अपराधी वाटणं अगदी स्वाभाविक आहे.... पण म्हणून आत्महत्या ..?
22 Nov 2008 - 7:58 am | अनिल हटेला
कथा आवडली !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Nov 2008 - 8:15 am | मदनबाण
कथा आवडली.. अपराधी वाटणे हे समजलं पण म्हणुन आत्महत्या हे नही पट्या..
अप्सरांसमोर ॠषी मुनींचे तप टिकत नाही,, तर रावसाहेब म्हणजे सामान्य माणुस !!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
22 Nov 2008 - 9:36 am | अभिरत भिरभि-या
कथा आवडली ..
स्वतःच्या कथेत १० म्हातार्यांना मारल्यामुळे रावसाहेबांना का मारले असे प्रश्न नाही विचारु शकत ;)
22 Nov 2008 - 12:34 pm | स्वाती दिनेश
प्राजु,कथा आवडली.
शेवट जरा घाईत पूर्ण केलास असे वाटते.उत्तरार्ध खुलवायला हवा होतास ह्या पेठकर आणि चतुरंग ह्यांच्या मताशी सहमत.
स्वाती
22 Nov 2008 - 4:01 pm | शाल्मली
<<प्राजु,कथा आवडली.<<
+१
--शाल्मली
22 Nov 2008 - 2:03 pm | जैनाचं कार्ट (not verified)
छान कथा !
आवडली !
रावसाहेबांची व्यक्तीरेखा व मनोभाव व्यवस्थीत व्यक्त झाले आहेत हेच यश !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
22 Nov 2008 - 2:11 pm | विनायक प्रभू
प्राजुतै,
लय भारी
22 Nov 2008 - 2:16 pm | वेताळ
सामान्य कथाबीज...... जीएं च्या बद्दल मिपावर चर्चा चालु असल्यामुळे ह्या कथेत जीए अधुनमधुन डोकावतात.अपघाताने घडलेल्या प्रसंगातुन म्हातारा इतका बिथरतो जरा पटणे अवघड जाते.तिच्या देहाबद्दल त्याच्या मनात आसक्ती निर्माण झाली नसतान देखिल आत्महत्या.त्यामुळे ही कथा सामान्य ठरते.जर का म्हातारबुवानी तिच्याशी नकळत लगट केली असती व त्या पश्चातापात आत्महत्या केली असती तर ठीक.परंतु तसे न होता ते सरळ आत्महत्या पटत नाही.कथालेखन प्रयत्न मात्र उत्तम. पुढच्या लेखनास शुभेच्छा.
वेताळ
22 Nov 2008 - 2:28 pm | जयेश माधव
जयेश माधव
कथा खुपच छान आहे,पण शेवट असा व्हायला नको होता
रावसाहेबा॑नी सुमनला अश्या अवस्थेत पहाणे आणि त्या॑चा शेवट
त्या॑च्या मरणाने होणे,कथा एकदम स॑पल्यासारखी वाटते.
बाकी झकास!!
जयेश माधव.
22 Nov 2008 - 2:30 pm | सहज
सुरवात चांगली झाली शेवट अकल्पित.
22 Nov 2008 - 2:38 pm | झकासराव
कथा चांगली आहे. :)
रावसाहेबानी आत्महत्या केली ह्याचाच अर्थ त्याना चुकुन अर्धवस्त्रांमधे दिसलेली सुमना ह्यापेक्षा आपल्या मनात ते पाहुन नंतर वासनेचे विचार आले ही टोचणी जास्त असेल.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
22 Nov 2008 - 3:06 pm | जयवी
प्राजु..... कथानक छानच ! कुठेही फापटपसारा न होता अगदी सहज उतरलीये.
तुझी लेखणी काव्यासोबतच गद्यात ही तितकाच सहजसुंदर विहार करतेय. अशीच लिहिती रहा :) !!
22 Nov 2008 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार
कथा चांगली आहे पण शेवट पटला नाहि. हेच कधिकाळी ब्रम्हदेवाच्या सुद्धा बाबतीत घडले होते असा दाखला आपली पुराणे देतात. वकिली क्षेत्रातील माणुस सर्व थरातुन वावरलेला असतो, असा माणुस भावनेच्या भरात आयुष्य संपवतो हे थोडे अवघड वाटत आहे पटायला येव्हडेच. राग नसावा :)
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
22 Nov 2008 - 5:35 pm | विसोबा खेचर
हम्म! कथा बरी वाटली...
काही शंका -
१) रावसाहेब, झोपेतल्या झोपेत जातात?
२) की आपलं अपराधी थोबाड पुन्हा सुनबाईला दाखवायला नको म्हणून आत्महत्या करतात? :)
"काल पर्यंत तर सगळं नीट होतं गं.. आज एकदम काय झालं हे" सुशांत रडत होता..
बिचार्याला आपल्या बापाचे धंदे माहीतच नाहीत! :)
पण चालायचंच! मला विचाराल तर एखाद्याला असा मोह होऊ शकतो..त्यात काही फारसं अनैसर्गिक आहे असं मला वाटत नाही..परंतु..
रावसाहेब स्वयंपाकघरात आले.. "सुमना.......... आज सकाळी फाईल विसरली आहे हे लक्षात आल्यावर मी लगेचच आलो होतो घरी......................"
"बाबा.............................." सुमना तिथल्या तिथे थिजली. रावसाहेबांच्या वागण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला होता.
या वर्णनावरून रावसाहेब सुनबाईच्या अंगचटीला गेले असावेत ते मात्र अंमळ धक्कादायक आहे.. :)
एरवी,
नुकती अंघोळ करून आलेली.. केस पुसत.. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर पाठमोरी उभी... .. फक्त टॉवेलमध्ये. ती तिच्याच नादांत गुणगुणत्..घरात कोणीही नाही या समजूतीने बिनधास्त होती. तिचे नितळ पाय.. तिची ओली पाठ.. ओले केस..
मरून रंगाचा स्लिवलेस सल्वार कमिझ आणि त्यावर काळि ओढणी.. केस ओलेच होते अजून.. रावसाहेबांना आज सुमना किती रेखिव आहे हे जाणवलं. त्यांना आज ती विलक्षण सुंदर दिसत होती. ते तिच्याकडे पहातच राहिले.
प्राजूने वर्णन केलेली सुमना, रावसाहेबांनाच काय, मला सुद्धा आवडली! बेट्या सुशांतची एकंदरीत मज्जा आहे बुवा! ;)
असो, एखाद्या चालू मामंजीला त्याची सुनबाई लागू असणं ह्याची प्रत्यक्ष आयुष्यातली एखाद-दोन उदाहरण माझ्या माहितीतली आहेत.. कशी ते विचारू नका..;)
असो, वर म्हटल्याप्रमाणे एकूणात कथा बरी वाटली...
आपला,
(चालू मामंजी) तात्या. :)
22 Nov 2008 - 8:13 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Nov 2008 - 8:56 pm | सुनील
कथा आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.