ती:
मेजावरल्या शंखशिंपल्यांसारखी तुझी पत्रं,
रंगीबेरंगी... मोहवणारी...
कानाला नुसता स्पर्श केला तरी
अनाहत हळवी साद घालणारी...
कधी गंभीर, कधी शांत,
तर कधी सहस्र लाटांनी उधाणून,
कवेत घेणारी.
इतस्ततः उडू पहाणा-या उतावीळ मनाला
कधी हलकं वजन ठेऊन सांभाळणारी...
तर कधी आपल्या नुसत्या अस्तित्वानं
मनाला प्रसन्न करणारी...
मेजावरल्या शंखशिंपल्यांसारखी तुझी पत्रं,
तुझ्याकडं बोलावणारी...
अजून जमलं नाहीये पण
जेव्हा परतून येईन तेव्हा,
तुझ्याकडे पोचणारी
एक तरी वाट
माझ्यासाठी राखून ठेवशील ना ???
- प्राची अश्विनी
तो:
समुद्र अथांग असला
तरी किनाऱ्याला
घरी परतणाऱ्या
असंख्य पायवाट फुटतात,
समुद्राची गाज मनात साठवून
जीवनाची साज गायला...
मनाला ओहोटी लागली
की त्याच पायवाटेने
भरतीचे किनारे गाठायचे
स्तब्ध उभं राहून
थकलेल्या पायांवर
लाटा घ्यायच्या
संतत लाटांमधून
आपण पुढे जायचं
खेद मागे सोडायचे..
शब्दांच्या अगणित
अतृप्त सागरात
पाय भिजवायला
उदासी किनारे मागे सोडायला
भेटत रहायचे
कधी निशब्द
कधी घडी करून सामानात दडवलेल्या
जीर्ण स्मृतीतून
तर
कधी नवीन पत्रांकातून..
@tul
प्रतिक्रिया
24 Jul 2020 - 12:13 pm | रातराणी
सुरेख!! मालिका आवडली!
27 Jul 2020 - 8:56 pm | कुमार१
छान होती.