(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल थोडेसे....... )
आधीचे संबंधीत लिखाण
खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग १: क्रिकेट https://misalpav.com/node/47116
भारतात खेळला जाणारा "पायचेंडू" (किंवा जास्त जवळचा वाटणारा फुटबॉल , ज्याला अमेरिका आणि इतर कांही देशांत "सॉकर / Soccer" म्हटले जाते) जगभरातला लोकप्रिय खेळ आहे. सुमारे २०० देशातले २५ कोटी लोक हा खेळ खेळतात. २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे प्रसारण ११२ कोटी लोक (त्या वेळेपर्यंतचा एक जागतिक विक्रमी आंकडा) जगभरातून दूरचित्रवाणीवर पाहात होते. अशाच मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावरच्या सामान्यांना प्रेक्षकवर्ग मिळतो. त्यामुळे या खेळाचा एक प्रचंड मोठा जागतिक महत्वाचा आर्थिक पैलूदेखील आहे.
अशा या जगभर लोकप्रिय असलेल्या खेळावर कोरोनाचा काय परिणाम होतो आहे हे समजण्याकरता थोडा लांबचा वळसा घ्यायला हवा.
एखाद्या नाटकांत जेव्हा काहीतरी मोठे घडण्याची नाटकाच्या परिणामाकरता जरूर असते, पण प्रत्यक्ष रंगमंचावर ती घटना शक्य तितकी आटोपशीर दाखवणेही जरूर असते तेव्हा बरेच नाटककार एक अतिशय सोपी युक्ती करतात. अशी मोठी घटना दाखवण्याच्या मालिकेतला एखादा टप्पा असतो "पडद्यात गलबला" आणि मग त्याच्या आधारे इतर घटना अशा रचल्या जातात की त्या सगळ्यांतून मोजक्याच साधनांतून देखील त्या पूर्ण घटनेचा आभास निर्माण होतो. जसे एखादे महायुद्ध देखील फक्त मोजकेच लोक प्रत्यक्ष रंगमंचावर प्रेक्षकांसमोर आणवून परंतु नुसताच "गलबला" नांवाचा घाऊक आणि ठोकळेबाज आवाज न ऐकवता कांही बंदुका, कांही आरोळ्या, कांही धावपळ, कांही कण्हणे अशा थोड्याशा वेगवेगळ्या आवाजांचा कलात्मक वापर करून, अर्थात फक्त नाटकापुरते पण परिणामाकरित्या, दाखवता येते.
आता जगभर लोकप्रिय असलेल्या फुटबॉलच्या खेळावर कोरोनाचा काय परिणाम होतो आहे आणि त्यांत "पडद्यात गलबला" तंत्र कुठे उपटले हे समजण्यासाठी आणखी थोडा लांबचा वळसा घ्यावा लागेल. त्यातले एक वळण तर अगदी अनपेक्षितरित्या ट्युनिशियामधून निघते.
पण त्या आधी या लिखाणाचा थोडा अळणी भाग म्हणजे नियमावलीतील बदल (अळणी असल्यामुळे थोडक्यात) .....
- सामन्याच्या काळांत तीन खेळाडूंना बदलले जाण्याऐवजी खेळाडूंमध्ये पांच पर्यंत बदल केलेले चालतील, पण खेळात व्यत्यय टाळण्याकरता हे बदल ठरावीक वेळेत करावे लागतील
- सामन्याआधीचे दोन्ही संघाच्या खेळाडूंचे एकमेकांशी हस्तान्दोलन आणि सामना संपल्यानंतरचा मैदानावरच होणारा विजयोत्सव (की ज्यांत खेळाडू एकमेकांच्या फार जवळ येतात) रद्द
- सामन्याच्या वेळी पंच आणि खेळाडूंच्या व्यतिरिक्त फक्त वैद्यकीय मदतनीस, मैदानाची काळजी घेणारे असे विवक्षित कामांकरता जरूर अशा तऱ्हेचे लोक हजार राहू शकतील
- प्रेक्षकांना मैदानात हजर राहता येणार नाही.
आणि असे लांब लांब वळसे का घ्यावे लागत आहेत हे समजण्याकरता थोडेसे .......
एखादा गवई किंवा वक्ता किंवा कसलेला नट जेव्हां प्रेक्षकांच्यापुढे कांही तरी सादर करत असतो तेव्हा त्याला पदोपदी प्रेक्षकांचा प्रतिसाद पडताळायचा असतो. एकदा वाहवा, टाळ्या, हंशा अशा पावत्या मिळू लागल्यावर आपली कला आणि तिचे सादरीकरण आणखीनच फुलवत हे कलावंत प्रेक्षकांना आणखीही उत्तेजित करण्याच्या प्रयत्नात आपल्या आणखीनच चांगल्या कसबांचे प्रदर्शन करत रहातात आणि मग सगळ्यांचीच आनंदाची पातळी उंचावत रहाते.
एखादा फुटबॉल (किंवा कुठल्याही खेळाचा) सामना चालू असतांना तुम्ही जर मैदानाच्या जवळपास असाल, तर प्रत्यक्ष सामना पहाता न आला तरी केवळ आवाजाच्या जोरावरून, पंचांच्या कर्कश्श शिट्टयांवरून आणि प्रेक्षकांच्या गलक्यावरून सामना किती रंगला आहे याचा बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो.एखादा कसोटीचा क्षण जवळ असतानाचा मैदानातला पडलेला आवाज जेव्हा शिट्या, कर्कश्श वाद्ये आणि कल्लोळात पुन्हा उंचावतो तेव्हा काहीतरी निर्णयकारक झाल्याची कल्पना येते आणि त्यानंतर एक मोठा सामुदायिक सुस्कारा ऐकला तर काहीच निष्पन्न झाले नाही हे ही समजते. पंचानी corner किंवा penalty वगैरे कांही जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष चेंडू लाथाडला जाईपर्यंत ते त्याचा निकाल दिसेपर्यंतच्या प्रेक्षकांच्या आवाजातील चढ उताराप्रमाणे, किंवा अगदी एखाद्या खेळाडूला चेंडूवर पकड मिळाल्यापासून त्यांतून निर्णायक स्वरूपाचे काही घडेपर्यंतच्या प्रेक्षकांच्या आवाजी पावतीनुसार खेळाडूंचे स्फुरण देखील कमी जास्त उंचावत सामन्यातील रंगत कमी जास्त होत रहाते. आणि त्यामुळेच अशा खेळाची लोकप्रियता, त्यातून सगळ्यांना मिळणारा आनंद (आणि उत्पन्न) टिकून (आणि वाढत) राहून दरवर्षी नवी उंची गाठत राहातात.
आता प्रेक्षकच नाहीत तर हे स्फुरण कसे चढणार?
या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी अनेक पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते संक्षिप्त रूपांत मांडणेही लांबलचकच होणार असल्याने त्यात अनेक वळणे असणे क्रमप्राप्त आहे. अळणी भाग म्हणजे नियमावलीतील बदल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांवर मात करण्याचे प्रयत्न , यांमध्ये ते नियम सगळ्यांनाच लागू असल्यामुळे, कलात्मकतेला काहीच वाव नाही. प्रेक्षकांच्या अनिवार्य अनुपस्थितीवर मात करण्याकरता घेतली जाणारी वळणे मात्र तंत्रज्ञान, प्रेक्षकांच्या खेळ पाहतानाच्या मनोवृत्तीचे ठोकताळे आणि अर्थात त्या सगळ्या विषयीचे अर्थशास्त्र वापरून बनत असलेली विविध प्रकारची खिचडी (वेगवेगळ्या आवडीप्रमाणे तसेच वेगवेगळ्या खिशांना परवडेल अशी बनवणे जरूर असल्यामुळे) असली तरी ती वेगवेगळ्या "कलाकारांकडून"अतिशय कलात्मक रित्या बनवली जात आहे.
सध्यापुरता फक्त त्या खिचडीच्या फोडणीचा वास. . .
(भाग २ अपूर्ण)
(क्रमशः)
प्रतिक्रिया
8 Jul 2020 - 10:38 am | कुमार१
वाचतोय..