(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल थोडेसे....... )
अलंकारिक मराठीत "एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करणे" म्हणजे सरळ सरळ लबाडी करणे - पण चेंडूफळीच्या (म्हणजे "सुद्द म्हराटीत" क्रिकेटच्या) खेळांत गोलंदाजाने असे लपून छपून नव्हे तर राजरोस करणे - नव्हें सगळे प्रेक्षक पाहात असताना, एका हातावर थुंकून, त्यावर दुसऱ्या हाताने चेंडू घासत, आणि मग तोच चेंडू आपल्या पाटलोणीवर (किंवा इतरत्र) घासत गोलंदाजी करणे यांत कुणालाच काही चुकीचे वाटत नव्हते. किंबहुना असे करणे हें चेंडूफळीच्या कायदेकानूंना संपूर्णपणे अनुसरून मानले जात असे - कोरोना दारी उभा राहून भिववी पर्यंत! याच कायदेकानूंना संपूर्णपणे अनुसरून घाम, केसांचे तेल, मैदानावरची माती (हाताला लावून मग) असे काही बाही चेंडू घासण्याकरता वापरणेही पंचांना विवाद्य वाटत नसे. असा प्रकार जरा जास्तच प्रमाणांत करणारे - लांब नखे वाढवून किंवा मैदानावर आणलेल्या पेयांच्या बाटल्यांची झाकणे वापरून चेंडूची शिवण उसवणे - मात्र ball tampering चे आरोपी ठरत.
आता मात्र गोलंदाजांच्या अशा प्रकारच्या "हातचलाखी"वर मर्यादा येणार आहेत.
कोरोना दारी उभा राहून भिववू लागल्यावर International Cricket Council (ICC) ने COVID-१९ च्या वातावरणांत नवे नियम काय असावेत याची शिफारस करण्याकरता "कुंबळे समिती" नेमली. या समितीने चेंडू घासण्याकरता "थुंकी"वापरणे निषिद्ध ठरवले आहे. घाम वापरण्याबद्दल कांहीच उल्लेख नसल्याने कदाचित तेव्हढे एकच अस्त्र फिरकी गोलंदाज आता वापरू शकतील.
या नव्या नियमांमुळे गोलंदाजांच्या "कौशल्या"वर आणि एकूणच खेळावर काय परिणाम होईल हे कांही काळ नव्या नियमांप्रमाणे झालेल्या सामन्यांचा अभ्यास झाल्यावर मगच ठरवता येईल.
कांही फिरकी गोलंदाजांना हे "नवे" नियम जाचक वाटतात. शेन वॉर्नच्या मते चेंडूच्या वजनातच थोडा असमतोल करून, त्यामुळे चेंडू फिरवता येण्यासारखा ठेवणे याचा प्रयोग व्हायला हवा. जेव्हा खेळाचे मैदानच निर्जीव आणि फलंदाजांना मदत करणारे असते तेव्हा फिरकी गोलंदाजच आपापले कौशल्य वापरून आपापल्या शैलीने वेगवेगळ्या तऱ्हेने चेंडू वळवत, फलंदाजांवर मात करण्याच्या प्रयत्नांत सामन्यातील चुरस टिकवून ठेवतात. जर त्यांचे (कांही प्रमाणांत थुंकीमुळे वाढवलेले) कौशल्यच या नवीन नियमांमुळे खच्ची होत असेल तर काही काळ तरी (नवीन "साधनांचा" शोध लागेपर्यंत) सामने रंगतदार होण्यावर देखील मर्यादायेतील.
आतापर्यंत टोपी, चष्मा, रुमाल, चेंडू किंवा घाम पुसायची फडकी अशा तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या वस्तू पंचांकडेसोपवणे हे सर्वमान्य होते. इथून पुढे, नव्या नियमांप्रमाणे, वैयक्तिक उपयोगाची कुठलीही वस्तू पंचांकडे देणे (त्यांतून संसर्ग होणे शक्य असल्यामुळे) हे चालणार नाही. म्हणजे अशा वस्तू आपल्याजवळ बाळगत गोलंदाजी करावी लागल्याने पुन्हा गोलंदाज गोत्यात!
गोलंदाजांना असलेल्या "जुन्या संवयी" लक्षात घेऊन, पंचाना जर गोलंदाजांच्या चेंडूच्या वापरांत कांही "आक्षेपार्ह" वाटले,तरीही कांही प्रमाणांत गोलंदाजांना फक्त ताकीद देऊन, नवीन नियमांचे पालन करायला भाग पाडण्याची मुभा पंचांना नवीन नियमांत दिली आहे. पण जर अशा ताकीद देण्यानंतर देखील जर अपेक्षित सुधारणा होत नसेल तर पंच कांही मर्यादेत "अपराधी पक्षाला काही धावांचा दंड" देखील ठोठावू शकतात. असे नियम नवीनच असल्यामुळे त्यांना "डकवर्थ-लुईस" अशासारखे कांही नांव (अजून तरी) देण्यात आलेली नाही!!
नव्या नियमांप्रमाणे पंचांकडेसोपवलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये जर खेळ चालू असतांना एखाद्या खेळाडूला कोरोना - संसर्ग झाल्याची शंका आल्यास त्याच्याकरता बदली खेळाडू ठरवण्याबद्दलचे निर्णय घेणे हाही एक कठीण भाग आहे. कोरोना - संसर्ग नसण्याची खात्री करून घेण्याकरता वेळोवेळी खेळाडूंचे तापमान पाहणे हे बंधनकारक झाले आहे.
बऱ्याच प्रमाणांत पंचांवर सोडलेल्या अशा निर्णयांकरता "Third Umpire"ची सोय उपलब्ध नसल्याने पंचांवर मोठीच जबाबदारी आलेली तर आहेच पण वादविवादालाही जागा निर्माण झाली आहे.
या सगळ्याच नव्या नियमांची जगभरातली पहिली अंमलबजावणी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मध्ये ८ जुलै २०२० पासून होऊ घातलेल्या सामन्यांपासून होईल. वेस्ट इंडीजचा संघ इंग्लडमध्ये पोचलेला असून, सध्या मँचेस्टरमध्ये त्यांच्या करता - संसर्ग टाळण्याच्या सगळ्या प्रतिबंधक उपायांसह - राखून ठेवल्या ठिकाणी राहून सराव करत आहे.
या सगळ्या सामन्यांकरता प्रेक्षकांना हजर राहण्यास मज्जाव आहे आणि म्हणून Social Distancing चे नियम पाळण्याकरता काय करावे लागेल हा प्रश्न आपोआपच सोडवला गेला आहे. अर्थातच त्यामुळे तिकिटाचे आणि प्रेक्षकांच्या खाण्यापिण्याच्या सोयी पुरवण्याच्या कंत्राटांचे उत्पन्न England and Wales Cricket Board (ECB) ला मिळणार नाही त्यामुळे त्यातून जो हिस्सा स्थानिक क्रिकेट संस्था इ.इ. यांच्या हातांत पडतो त्यालासुद्धा कात्री लागेल. प्रेक्षकांना प्रत्यक्ष हजर राहता येत नसल्यानें जरी दूरचित्रवाणीवर पाहणाऱ्यांची संख्या वाढेल तरी सध्याचे एकूण आर्थिक हवामान पाहता जाहिरातीवर खर्च करण्यास मोठे जाहिरातदार कितपत तयार असतील याबद्दल अनिश्चितता असेलच. इतरत्र देखील या वर्षी साधारण अशीच परिस्थिती असल्यामुळे आणि बरेच सामने रद्द झाल्याने किंवा पुढे ढकलले गेल्यामुळे जगभरांत तिकीटविक्रीतून तसेच जाहिराती आणि प्रसारणातून मिळणारे उत्पन्न - ज्यांमधून खेळाडू, स्थानिक आणि राष्ट्रीय नियंत्रक, प्रसारक आणि खेळाशी संबंधित व्यक्ती आणि संस्था त्यांच्या करता कमाई करतात - बरेच कमी असेल.
एवंच नवीन नियमांमुळे क्रिकेटच्या खेळाचे काहीही होवो, इंग्लंडमध्ये आणि इतरही देशांत काही काळ तरी (कोरोनावर काहीतरी तोडगा निघेपर्यंत ) या खेळाशी संबंधित सगळ्याच व्यक्ती आणि संस्था यांचे - एरवी भरमसाठ असणारे - उत्पन्न मात्र बरेच कमी होणार आहे. या सगळ्या उलथापालथीचा ताळेबंद आणखी कांही काळानंतरच काढता येऊ शकेल.
असेही शक्य आहे की इंग्लंड आणि इतरही देशांतील खेळाडू आणि नियंत्रक या वर्षांत फार मोठे उत्पन्न गमावल्यामुळे आर्थिक अडचणीत येतील आणि त्यामुळे कदाचित जगातील सगळ्यांत श्रीमंत नियंत्रक असलेल्या Board of Control for Cricket in India (BCCI) ला इतर देशांना तात्पुरती आर्थिक मदत देखील करावी लागेल!!
(क्रमशः)
प्रतिक्रिया
1 Jul 2020 - 12:09 pm | आनन्दा
रोचक आहे..
1 Jul 2020 - 8:26 pm | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभार
1 Jul 2020 - 2:12 pm | कुमार१
रोचक आहे.
1 Jul 2020 - 8:26 pm | शेखरमोघे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
8 Jul 2020 - 9:19 pm | शेखरमोघे
या इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील सामन्यात घडलेले आणखी काही जे थोडेसे वेगळे, पण कोरोनाशी संबंधित नसलेले
https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/england-and-wes...