एक दिवस माझ्या बहिणीने मला पुण्यात चालणाऱ्या ‘मैत्र’ नावाच्या ग्रुपबद्दल सांगितले. हा ग्रूप बायकांकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींची लेक्चर्स आयोजित करतो. माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. किती नामी कल्पना आहे! माझा चेहरा पाहून माझी बहिणीने त्या ग्रुपबद्दल आणि तो ग्रुप चालवणाऱ्या तिच्या मैत्रिणीबद्दल, मेधा पूरकरबद्दल, सांगितले. माझी उत्सुकता वाढतच गेली. ही कल्पना तिला सुचली कशी, तिला हा असा ग्रुप का सुरु करावासा वाटला असेल हे जाणून घेण्याकरता मी मेधाला भेटायचे ठरवले.
मेधाशी बोलताना मला मुख्यत्वे हे समजले की ‘मैत्र’चा उद्देश बायकांना बौद्धिक खाद्य पुरवणे इतकाच मर्यादित नव्हता, जो माझा समज होता. किंबहुना त्या उद्देशाने ‘मैत्र’ ग्रुप सुरु केला गेला नव्हता. हे ऐकून माझी उत्सुकता तर अधिकच वाढली.
आणि मग मेधाशी बोलताना ‘मैत्र’चा आणि खुद्द मेधाचा इथवरचा प्रवास उलगडत गेला......
सामाजिक बांधिलकीचे बाळकडू तिला तिच्या माहेराकडून मिळाले होते. तिचे आई, बाबा, काका, आजी, आजोबा, दादा सगळेजण संघात होते, संपूर्ण आयुष्यभर सामाजिक उपक्रमात सहभागी होत होते. त्यामुळे समाजात योगदान करणे तिच्या रक्तात होते. तिने स्वतः सुद्धा कॉलेजच्या दिवसांमध्ये सामाजिक कार्य केलेले होते. त्यावेळी ससूनशेजारी जो अनाथ बालकाश्रम आहे तिथे ‘टच थेरपी’ द्यायला जात असे. तसेच रेणूताई गावस्कर यांचा एकलव्य न्यास ट्रस्टतर्फे पुण्यात लहान मुलांसाठी आणि बायकांसाठी तिने संस्कारवर्ग चालवायला मदत केली होती.
तिने सोशालोजीमध्ये आणि फ्रेच भाषेमध्ये एम.ए. केले आहे. आज ती Symboyosis च्या फ्रेच भाषा विभागाची प्रमुख आहे. तिचा प्रेमविवाह झाला होता आणि ती नोकरी आणि संसारात रमली होती. मात्र पुढे लग्नाला १० वर्षे झाल्यावर तिच्या वैवाहिक आयुष्यात फारच मोठी उलथापालथ झाली.
तिच्याच भाषेत सांगायचे तर “या अचानक आलेल्या वादळाने माझे संपूर्ण आयुष्य ढवळून निघाले. या अनपेक्षित धक्क्याने मला डिप्रेशन आले. मी स्वतःला कमी लेखायला लागले, अनेक गोष्टीत रस घेणारी मी, एकटी राहू लागले. माझा आत्मविश्वास पुरता ढासळला. या सगळ्या दिवसांमध्ये माझ्या मैत्रिणींनी मला खूप साथ केली. हळूहळू मी स्वतःला सावरू लागले. लग्नापूर्वी मी नॅशनल लेव्हलची स्विमर होते. सर्वात प्रथम मी माझे पोहणे परत सुरु केले. त्यामुळे आधी जशी आनंदी, स्ट्रॉंग आणि बॅलन्सड् होते, तशी परत माझी मलाच सापडू लागले. माझा आत्मविश्वास परत आला. आत्मविश्वासाने जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हा परत सावरले गेल्याचा आनंद अवर्णनीय होता. ते साल होते २०१४.”
मेधा हे सांगत असताना मला तिचा खूप अभिमान वाटला. तिने वेळीच स्वतःला सावरले. स्वतःच्या डिप्रेशनचा स्वतःवर वाईट परिणाम करून न घेता, सहानुभूती गोळा करत न बसता, तिने फक्त ते पान शांतपणे उलटून टाकले. हे पाहून मी निशब्द झाले होते. पण माझे अजून आश्चर्यचकित होणे बाकी होते.
मेधाला डिप्रेशनच्या दरम्यान जाणवले की आजूबाजूच्या सुशिक्षित सुखवस्तू मध्यम वर्गातल्या बायका संसारात स्वतःला प्राधान्य देत नाहीत. प्रत्येकीच्या संसारात वरवर सगळे छान असते. पण कुटुंबातील इतरांच्या अपेक्षा पुऱ्या करताना, त्या स्वतःला दुय्यम समजू लागतात, आणि हळूहळू आपल्याला काय आवडते, आपल्याला काय हवय हे सगळे जणू विसरूनच जातात. स्वतःपासून त्या दूर जातात. स्वतःला वेळ देत नाही. तिला स्वतःला काय आवडते आणि काय आवडत नाही हे ती स्त्री माहीत करून घेत नाही, स्वतःमधले गुण तिलाच माहीत नसतात. सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांना स्वतःला आयुष्यात काय मिळवायचे आहे हे सुद्धा माहीत नसते. आणि मग या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांचा आत्मविश्वास ढासळत जातो. त्या संसारात एकट्या पडतात.
मेधाच्या मते एखाद्या संकटामुळे तुम्ही स्वतःलाच सापडत जाता. हीच वेळ असते, जेव्हा तुम्हाला तुमची नव्याने ओळख होते. त्या काळातील तिचे स्वगत असायचे .... “मी आयुष्यभर माझ्याबरोबर असणार आहे. मी सगळ्यात आधी माझ्याशी मैत्री केली पाहिजे. मी स्वतःला ओळखायला हवे. मला काय आवडते, मला काय काय करता येते, मला काय शिकायला हवे आहे? हे आपले आपल्याला माहीत असायला हवे. स्वतः ठाम असण्याकरता, स्वतः स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याकरता..... आपण स्वतःकडे वरचेवर लक्ष द्यायची गरज असते, स्वतःला वेळोवेळी स्ट्रॉंग करायची, अपडेट करायची गरज असते.”
मेधाने विचार केला कि जर मी स्वतःला परत रुळावर आणलय, स्वतःला स्ट्रॉंग बनवलय, तर मग आजूबाजूच्या सर्व बायकांना पण स्ट्रॉंग बनवू शकते, आत्मनिर्भर बनवू शकते. याच उद्देशाने प्रेरित होऊन मेधाने बायकांकारता एक ग्रुप सुरु करायचे ठरवले. ज्यातून त्यांना काहीतरी शिकता येईल, त्यांच्या विचारसरणी मध्ये फरक पडेल, त्यांच्या मनाला उभारी येईल, स्वतःच्या वेगवेगळ्या गुणांची ओळख होईल.
तिला त्यांना आत्मविश्वास मिळवून द्यायचा होता. मेधाला बायकांना समजावयाचे होते की प्रत्येकीचे आयुष्य सुंदर असते आणि आपण ते कोणत्याही वळणावर पुन्हा नव्याने उभे करू शकतो. पण मनात जर नकारात्मकता असेल तर तुमचीच एनर्जी वाया जाते, सृजनशक्ती संपते, मानसिक वाढ खुंटते. आणि एक - तुमच्यावर अवलंबून असणारी पुढची पिढी तुमच्याकडे एक आधार म्हणून पाहत असते याचे सुशिक्षित स्त्रियांनी भान ठेवायला हवे. ती जबाबदारी त्यांनी ओळखायला हवी.
अश्या सर्व स्त्रियांकरता मैत्रीचा हात पुढे करण्याच्या उद्देशाने तिने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मैत्र’ नावाचा ग्रूप सुरु केला. दर महिन्याला ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी मैत्र ची सेशन्स असतात. २०१६ साली सुरु झालेल्या मैत्रचे आता पुण्यात ८ ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुप मध्ये १५-२० मेम्बेर्स असतात. एक अशी १२ सेशन्स मेधा प्रत्येक ग्रुपकरता आयोजित करते. साधारण दीड तासाचे एक सेशन. अत्यंत अनौपचारिक वातावरणात ही सेशन्स एखाद्या मेम्बरच्या घरात केली जातात.
प्रत्येक सेशनला एखाद्या तज्ञ व्यक्तीला लेक्चर देण्यासाठी बोलावले जाते. भावनांचे नियोजन शिकवणारे, आर्थिक बाबीविषयी सज्ञान बनवणारे, शारीरिक तंदुरुस्तीचे आहाराचे महत्व पटवणारे, मानसिक आरोग्य विषयक जागरूक करणारे, अध्यात्मिक विषयाची महती सांगणारे, शरीर आणि मन यांचा परस्पर संबध अधोरेखित करणारे.... असे अनेकविध विषय आत्तापर्यंत चर्चिले गेले. अश्या बहुश्रुत होण्यामधून प्रत्येकीला स्वतःचे विश्व सापडू लागले, त्या सजग आणि सक्षम बनत चालल्या होत्या.
‘मैत्र’मधून तिने अजून एक उपक्रम चालवला आहे आणि तो म्हणजे बायकांना त्यांचे मन मोकळे करण्याकरता एक श्रोता द्यायचा. आज संपूर्ण समाजात अश्या प्रकारच्या मानसिक आधाराची गरज वाढत चालली आहे. बरेचदा बायकांना त्यांची दुखे: जवळच्या नात्यातल्या व्यक्तीशी बोलता येत नाहीत. अश्या वेळेस एक थोडी जवळची, थोडी दूरची व्यक्ती असेल तर बायका जास्त मोकळ्या होऊन त्यांचे प्रश्न, त्यांची दुखः बोलून दाखवतात. जर तुम्हाला कोणी ऐकून घेणारा मिळाला नाही तर मनात स्लो पॉयझनिंग होते. म्हणून अश्या बायकांना व्यक्त होण्यासाठी मेधा एक प्रशिक्षित श्रोता पुरवते. सध्या या श्रोत्याची भूमिका मेधा स्वतः, तिची मैत्रीण स्वाती उपाध्ये आणि मेधाची मंजिरी आत्त्या, या तिघीजणी निभावतात. मेधा म्हणते “श्रोत्याच्या भूमिकेत आम्ही फक्त ऐकून घेतो. कोणताही सल्ला त्या क्षणी देत नाही किंवा त्या व्यक्तीला हि तुझे काय चुकले काय बरोबर आहे ते सांगायला जात नाही. या वेळी बायकांना फक्त श्रोता हवा असतो. असा श्रोता मिळाला कि बायकांचं मन मोकळं होतं, त्यांना उभारी मिळते, बळ चढते. कधीकधी फक्त ‘ऐकून घेणं’ इतकेच आवश्यक असते, पुरेसे असते.”
तसेच सामाजिक ऋण फेडण्याच्या हेतूने तिने मैत्रच्या माध्यमातून काही उपक्रम हाती घेतले आहेत. ‘दुसऱ्याला दिले कि आपली समृद्धतेकडे वाटचाल सुरु होते’ हे तिने तिच्या घरातच पहिले होते. देहू गावातील स्नेह्सावली या वृद्धाश्रमाकरता वर्षातून दोन वेळा कडधान्ये दिली जातात. सिंहगडाच्या पाथ्याशी असलेल्या वृद्धाश्रमाला गहू दिले जातात. या दोन्ही वृद्धाश्रामांना दिवाळीचा फराळ पाठवला जातो. तसेच आपल्याकडच्या चांगल्या अवस्थेतील पण आता उपयोगात नसलेल्या सायकली गोळा करून त्या सांगली आरग/लक्ष्मी वाडी येथे एका शाळेत दिल्या गेल्या आहेत.
मेधाचा तिच्या मैत्रिणीबरोबर, स्वाती उपाध्ये बरोबर, ‘प्रतिबिंब’ नावाच्या ग्रुपतर्फे एक अथवा २ दिवसांचे शिबीर घेते, जिथे बायकांना ‘मी कोण आहे’ हे शोधायला शिकवतात. मला या शिबिराची देखील उत्सुकता होती, म्हणून मी एका शिबीराला गेले होते. माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी सुंदर असा हा अनुभव होता. फक्त एक-दोन दिवसात बायकांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळ्या खेळांमधून, लेक्चरमधून आणि क्विझमधून त्या दोघी सहजतेने बदलून टाकतात.
आता मैत्र चा punemaitra नावाचा ब्लॉग आहे. फेसबुक पेज देखील आहे. काळाची गरज ओळखून नुकतेच त्यांनी या जून महिन्यापासून ऑनलाइन सत्र सुरु केले आहे. ‘मैत्र’ झपाट्याने बहरते आहे.
मैत्रने अनेक जणींच्या आयुष्यात बदल घडवला. त्यांच्या भावनांना वाट देणारा, एकमेकीबरोबर संवाद साधायला, एकमेकीबरोबर शिकायला प्रगत व्हायला एक व्यासपीठ दिले. कित्येकजणी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या. त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळाला. त्या स्वतःला ओळखायला शिकल्या, स्वतःला वेळ देवू लागल्या. स्वतः मध्ये झालेले बदल पाहून बायका स्तंभित झाल्या. अनेक बायका लिखाणातून व्यक्त होऊ लागल्या. त्यांना आत्मविश्वास आला.
एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे मेधाने तर भरारी मारलीच पण बरोबरीने तिने इतर अनेक जणींना ही भरारी मारायला शिकवले. स्वतः मधला ‘स्व’ शोधायला शिकवले. आत्मनिर्भर आणि सक्षम व्हायला शिकवले. समाजात ठामपणे उभे राहायला शिकवले. प्रत्येकीला स्वतःची ओळख तयार करायला शिकवले.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे.
ह्या कवितेत सांगितल्या प्रमाणे तिच्याकडून अनेक विषयामधील माहिती,अनेक उपक्रमात भाग घ्यायची संधी, सगळे सगळे घेता येईल. पण ‘मला जर संकट आले तर मी तर त्यातून भरारी घेईनच, पण जोडीला अनेक जणींना हात देवून यशस्वी होईन’ हि तिची विजीगिषु वृत्ती सगळ्यांनी घ्यायची गरज आहे.
समाजाला एक नवा दृष्टीकोन मिळवून देणारी... समाज सशक्त करणारी.... एक युग प्रवर्तक मेधा.
प्रतिक्रिया
16 Jun 2020 - 12:43 pm | कुमार१
चांगला उपक्रम
शुभेच्छा !
16 Jun 2020 - 10:32 pm | जेडी
चांगला उपक्रम,ब्लॉग ची लिन्क द्या.
19 Jun 2020 - 3:36 am | पारुबाई
https://punemaitra.wordpress.com/
हा त्या संस्थेचा ब्लॉग आहे. तिथून तुम्ही संपर्क करू शकता.
https://www.facebook.com/medha.purkar
अथवा हे तिचे फेसबुक पेज आहे.
16 Jun 2020 - 10:39 pm | जेडी
ब्लॉग ची लिन्क
17 Jun 2020 - 2:00 am | वीणा३
उत्तम उपक्रम आणि चांगली माहिती, धन्यवाद !!!
17 Jun 2020 - 10:53 am | रातराणी
छान उपक्रम. @पारुबाई, एखाद्या वृत्तपत्रात शोभेलसं नेटकं,माहितीपूर्ण तरीही कंटाळवाणं होणार नाही असं लेखन केले आहे. खूप आवडले.
19 Jun 2020 - 3:37 am | पारुबाई
खूप खूप धन्यवाद