तुकोबांचे निवडक अभंग

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Jun 2020 - 7:23 pm

|| पांडुरंग पांडुरंग ||

तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात !
ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता ! संपुर्ण तुकाराम गाथा विकिसोर्स वर ज्याने उपलब्ध करुन दिलीये त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत !

संपुर्ण श्रीतुकाराम गाथा :

https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...

आता जसे आठवत जातील तसे अभंग खालील प्रतिसादात लिहुन ठेवता येतील !
----

आपल्याला थोडाजरी नीरक्षीरविवेक असेल ना कि मग ते वाईटातुनही चांगलं सापडत जातं आपोआप. मिपावरील काही प्रतिसाद पाहताना संत तुकाराम चित्रपटात (म्हणजे आपल्या विष्णुपंत पागनीसबुवांच्या सात्विक चित्रपटात हं), वापरलेला अभंग अचानक मनात डोकवुन गेला -

अहं म्हणे ब्रह्म | नेणे भक्तीचे ते वर्म | तुका म्हणे क्षण | नको तयाचे दर्शन ||

मग थोडीशी शोधाशोध केल्यावर संपुर्ण अभंग सापडला , अन त्यासारखाच अजुन एक अभंगही सापडला !

2114
विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥
मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥
हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥
सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥
अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥4॥
तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥5॥

2117
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥
धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिनी ॥ध्रु.॥
न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥
जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥
हरिभक्तिविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥
तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥5॥

अवांतर :
१. विकिसोर्स वरील गाथेत अनेक प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत विशेष करुन जोडाक्षरे बहुतांश ठिकाणी गंडली आहेत , पण आपल्याला त्याने काय फरक पडतो , आपल्याला अर्थाशी घेणेदेणे आहे !
२. इथे कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाहीये की समजाऊन सांगायचे नाहीये. अभंग स्वतःच्याच रेफरन्स साठी काढुन ठेवलेले आहेत ! हे सारं स्वान्तःसुखाय आहे :)

|| पांडुरंग पांडुरंग||

वाङ्मयकविताआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2025 - 10:32 pm | प्रसाद गोडबोले

वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥
चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥3॥
तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥

मुक्त विहारि's picture

24 Feb 2025 - 7:18 am | मुक्त विहारि

विशेषतः

चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं ।

आणि

आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥3॥

------

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2025 - 6:38 pm | प्रसाद गोडबोले

याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥
ठाकला तो कांहीं केला परउपकार । केलें हें शरीर कष्टवूनी ॥१०॥
वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥

प्रसाद गोडबोले's picture

25 Feb 2025 - 11:59 pm | प्रसाद गोडबोले

अवांतर : जनाबाईंचा एक अभंग

वेदांतीं हें बोलिले । सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥
लागा लागा भक्तिवाटा । धरा हेंचि नेमनिष्‍ठा ॥२॥
वेदबाह्य तें कर्म । सांडीं, न करीं अधर्म ॥३॥
तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्‍ठ म्हणे जनी ॥४॥

जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||

https://www.youtube.com/shorts/_XNegCENn2o

राम !

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न वहावा८| तुझा विसर नवहावा याजसाठी केला अटटाहास शेवटचा दिस गोङ वहावा || माझा खूप आवडता व बरयापैकी कळलेला एकमेव अभनग, लाडकया तुकोबारायानचा. आपलयाला खूप जमिनीवर ठेवणारे सनत्सरेषठ.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2025 - 6:30 pm | प्रसाद गोडबोले

नाम दुसी त्याचें नको दर्शन । विष तें वचन वाटे मज ॥1॥
अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें॥ध्रु.॥
काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥2॥
काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥3॥
तुका ह्मणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥4॥