दोसतार - ४७

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 May 2020 - 12:05 pm

अचानक एक गार वार्‍याची झुळूक आली. डोक्यावर लिंबाचे पान पडले म्हणून वर पाहिले. काळेभोर आकाश पूर्ण चांदण्याने भरले होते. आकाशात दिवाळी होत असावी इतके.
तिथे वीस ठिपके वीस ओळी पेक्षाही मोठ्टी रांगोळी काढलेली होती. मी तानुमामाला ती रांगोळी दाखवली.
तानुमामा म्हणाला आपल्या रांगोळीला उत्तर म्हणून आज्जी तेथे रांगोळी काढतेय . खरंच असेल ते. नाहीतरी इतकी सुंदर रांगोळी आज्जीशिवाय दुसरे कोण काढणार होते.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46822

अंगणात दिवाळीचा किल्ला बनलाच नाही. अंगणात फटाके ही वाजवावेसे वाटले नाही. नुसता कचरा. गल्लीत मात्र फटाक्यांची मजा बघितली. गण्याने त्याच्या दादाकडून एक बाण मिळवला होता. पण तो उडवायचा कसा हेच समजत नव्हते. त्याच्या दादा एक हातात उदबत्ती आणि दुसर्‍या हातात बाण . . अंगठा आणि पहिले बोट यात बान पकडायचा वातीला उदबत्ती लावायची. वात सुरसुरत जाणार. मग थोड्यावेळाने बाणाच्या वातीकडच्या टोकाकडून ठिणग्या यायला लागणार. त्या ठिणग्यांचा जोर वाढत जाणार आणि एका ठराविक वेळेला तो बाण स्वतःच दादाच्या बोटातून सुटका करून घेत आकाशात झेपावणार.
कितीतरी वेळा पाहूनही बाण हातात घेऊन त्याला वात लावायला मी आणि गण्या दोघाम्च्याही अंगात तेवढा दम नाही. गण्याच्या दादाला हे माहीत असणार म्हणूनच त्याने गण्याला बाण दिला असेल. जातोय कुठे म्हणत.
भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी गण्या बाण घेऊन आला. तो लावायचा कसा हाच प्रश्न होता. लवंगी फटाका हाता पेटवून फेकता येत होता. तो काय पेटवला , वात जरा सुरसुरायला लागली की फेकून देता यायचा. फेकताना जवळ कोणी नाही इतकंच बघायचं.. तो अगदी जवल पडला तरी आवाज मोठा येणार इतकेच. बाकी काही नाही. पण वात सुरसुरायचा अगोदरच फेकला तर मात्र पंचाईत व्हायची. कधीकधी पडल्यामुळे वात विझते . पुन्हा उडवण्यासाठी पडलेला फटाका शोधून काढावा लागतो. त्यातच सापडलेल्या फटाक्याची वात संपलेली असेल तर तो फुसका आहे की चांगला आहे तेच कळत नाही. असे फटाके आम्ही संध्याकाळी वेगळ्या कामासाठी बाजूला ठेवतो.
गल्लीत वाजलेल्या फटाक्यांच्या कागदाचा ढीग झालेला असतो. अशा ढीगातून न वाजलेले फटाके बाजूला काढायाचे एत. सोलून त्यातली दारू एका कागदावर काढायची. कचर्‍याच्या कागदाच्या ढिगाला पेटवून द्यायचे . ते चांगले पेटले की त्यात ही दारू ओतायची. भक्कन आवाज करत दारू पेट घेते. हे उद्योग दुपारी सगळ्यांच्या आया झोपल्या की मगच करता येतात. त्या आगीत मग शिल्लक राहिलेल्या टिकल्या वगैरी टाकायच्या. कधीकधी कचर्‍यात जर न उडालेला एखादा फटाका असेल तर तो एकदम ढॉप्प करून फुटणार. तो तसा फुटला की आमची पळापळ होणार. कारण त्या फटाक्याच्या आवाजाने कोणाची तरी आई नाहीतर आज्जी जागी होणार आणि मेले दुपारी तरी झोपु देतील तर शप्पथ म्हणत बाहेर येवून तोंडाचा पट्टा सोडणार.
दिवाळीत आणखी एक मज्जा या वेळेस टंप्याने सांगीतली होती. टाईम बाँब. म्हणजे तो तसा युद्धात असतो तसा नाही पण टाईम बाँब. खर्‍या टाइम बाँबला जसे काही वेळाने उडवता येते तसे हे आमचे हे नवे अस्त्र. चांगला भला मोठ्ठा दंड्या फटाका चौकोनी नाहीतर सुतळी बाँब मिळाला तर उत्तमच. चौकोनी अ‍ॅटम बाँब हा आतून सुतळी बोंबच अस्तो . फक्त तो खोक्यात ठेवलेला असतो म्हणून त्याला चौकोनी अ‍ॅटम बाँब म्हणायचे इतकेच. हे म्हणजे एखाद्या शेतकर्‍याने टाय कोट घालून यायचे आणि लोकांनी त्याला रामभाऊ ऐवजी मिस्टर जॉन म्हणायचे इतकेच.
आपल्याला काय आवाज महत्वाचा. टाईम बाँब करायचा म्हणजे फार काही अवघड नाही. सुतळी बाँब घ्यायचा. त्याची वात तशीच ठेवायची. नेहमीसारखी काढायची नाही. अख्ख्या उदबत्तीच्या खालच्या टोकाला वातीचे टोक बांधायचे. उदबत्ती पेटवल्यावर वातीपर्यंत पोहोचायच्या आत ती विझणार नाही. आणि वात जमिनीवर पडणार नाही अशा पद्धातीने दगडाचा आधार घेऊन हा टाइम बाँब पेटवायचा. त्यावर एखादे डबडे उपडे करून ठेवायचे.तासाभरात उदबत्ती वातीपर्यंत पोहोचते. वातीला ठिणगी लागली की सुतळी बाँब ढुम्म . डबडे आर्यभट्ट उपग्रह उडाल्यासारखे आकाशात उंच उडणार. त्या वेळेस आपण अ‍ॅटमबाँब च्या कुठेच जवलपास रहायचे नाही. एखादे कुत्रे जवळ असेल तर ते घाबरून शेपटी पायात दुमडून धूम पळत सुटणार . पळताना वाटेत कोणी असेल तर ते त्यालाही पाडणार.
ते कुत्रे कसे पळाले हे भेटणार्‍या प्रत्येकाला सांगायचे. प्रत्येक वेळेस डबडे किती उंच उडाले ती उंची आणि कुत्रे किती मोठे होते ते आकार वाढत जाणार.
या गण्याने टाईमबाँबचा पहिला प्रयोग अब्दूल बेकरीवाल्यावर केला . तो नेमका त्या वेळेस काही उचलायला म्हणून सायकलवरून उतरून खाली वाकला होता. सुतळीबाँब चा अचानक ढुम्म आवाज आल्यावर. तो दचकला इकडे तिकडे कोणीच दिसत नसताना आवाज कसला आला तेच कळेना. घाबरून त्याने सायकलवर टांग मारली. पण गडबडीत सायकल बाजूला राहिली आणि सायकलच्या हँडलला धरून नुसतीच उडी झाली. सर्कशीत कोणी पाहिले असते तर अख्ख्या सर्कशीने त्याची उडी डोक्यावर घेतली असती. अब्दौल्याने आम्हाला पाहिले नाही म्हणून बरे नाहीतर त्याला टाईमबाँब चा जनक कोण ते समजले असते. नक्की सांगतो. दुसर्‍या दिवशी अब्दुल्याच्या गल्लीत भुताळी फटाका याचीच चर्चा असणार.
आमच्या पुढे मुख्य प्रश्न होता. बाण कसा उडवायचा. जमिनीत एखाद्या ढिगार्‍यात झेंडा रोवतात तसा बाण रोवून उडवायचा . चिखलाचा एक ढीग केला. त्यात बाण खोचला. पण तो चिख्खल फारच पात्तळ होता. बाण कितीही सरळ उभा केला तरी उदबत्ती लावायच्या वेळेस नेमका आडवा व्हायचा. आडवा बाण लावल्यावर कुठे जाईल हे काय सांगता येतय का. मागे कुणीतरी रस्त्यावर बाणआडवा लावला होता. तो सरसरत एकदम आण्णा भोसल्यांच्या माळवदावर घुसला होता. तरी बरे माळावदावर कोणी नव्हते म्हणून. नाहीतर युद्धच झाले असते. आण्णांचे माळवद पेटले नाही हे पण नशीबच.
मग गण्याने कुठून तरी दोन विटांचे तुकडे आणले. त्या दोन विटांना अगदी चिकटून उभे केले त्यांच्या मधल्या सापटीत बाणाची कांडी रोवली. बाण पडू नये म्हणून आणखी दोन छोटे दगड पण लावले. हे झाल्यावर मघाशी केलेल्या चिखलात आणखी थोडी माती टाकली. आणि ती त्या बाणाच्या काडीभोवती एकदम दाबून बसवली. काय बिशाद होती आता बाणाची पडायची. आता रोवलेला बाण पंधरा ऑगष्ट च्या झेंड्याच्या काठीसारखा दिसायला लागला.
बाण उभा राहीला आता त्याची वात पेटवायची. इतका सरळ ठेवलेला बाण आकाशात नक्की सरळ जाणार. आणि विझला की सरळ खाली येणार.
गण्याने उदबत्ती पेटवली. आम्ही दोघेही ओणवे झालो. बाणाच्या वातीला उदबत्ती लावली. आणि झटकन मागे झालो. बाणाची वातीजवळ ठिणगी चा ठिपका दिसायला लागला. वात थोडी सुरसुरली. मग थोडा वेळ शांततेत गेला. आमच्या छातीचे ठोके जोरात ऐकु यायला लागले. वात आणखी एकदा सुरसुरली. बाणाच्या गोल पुंगळीच्या खालच्या टोकाकडून ठिणग्यांची कारंजे सुरू झाले. आमच्या चेहेर्‍यावरही ते दिसत असेल त्या वेळेस. मग नळ सुरू केल्यावर पाणी यावे तशी ठिणग्यांची जोरदार धार सुरू झाली. ही ठिणग्यांची धार वाढली की बाण आकाशात झेपावणार. ठिणग्यांची धार मोठी व्हायला लागली. आणखी मोठी झाली. आता नक्की उडणार बाण .
मी गण्याकडे पाहिले. गण्या त्या ठिणग्यांच्या धारेकडेच पहात होता. त्याच्या डोळ्यात ठिणग्यांचे प्रतिबींब दिसत होते. बाण आता जोरात ठिणग्या सोडत होता. आख्खा एक मिनीट झाला असेल. काय झाले कळाले नाही पण अचानक त्या ठिणग्यांच्या नळातील ठिणग्या येणे बंद झाले. आम्ही तसेच. उभे. बाणाजवल गेलो आणि अचानक ठिणग्या पुन्हा सुरू झाल्यातर बाण उगाच शर्टात नाहीतर चड्डीत शिरायचा. बराचे वेळ तसेच उभे राहिलो .ठिणग्या यायच्या पूर्ण बंद झाल्या . बाण विझलाय का हे दगड मारून बघता आले असते पण त्या दगडाने बाण आडवा झाला आणो तो जर विझला नसेल तर उगाच कोणाच्या तरी घरात घुसायचा. समोरच्या बाळेशा च्या दुकानात घुसलातर दिवाळीत फटाक्यांच्या ऐवजी बाळीशाच्या शिव्यांचेच आवाज जोरात आले असते.
बराच वेळ बाणाकडून कोणतीच हालचाल झाली नाही. आम्ही त्याच्या जवळगेलो. बाण पूर्ण विझला होता. बाण त्याच्या त्या झेंड्यासारख्या स्टँडवरून ओढून काढायला गेलो तर काय तो निघतच नव्हता. जोर लावून ओढला तेंव्या कुठे निघाला गण्याने बाण विटांच्या मधे बसवताना पडुण नये म्हणून काठीचे टोक दुमडून त्यावर एक बारीक दगड घट्ट बसवला होता. वर घट्ट चिखलाचा गोळा होताच. एखादे हरबर्‍याचे रोपटे जमीनीत याचे तसे तो बाण चिखलाच्या गोळ्यात पूर्ण रुतला होता. बाणाला उडायचे झालेच तर स्वतःच्या वजनाबरोबर दोन विटांचे तुकडे चिखला चा गोळा हे सगळे वजन घेऊन उडावे लागले असते.अर्थातच हे एवढे ओझे घेऊन बान उडणे शक्यच नव्हते. सोनसळे सरांच्या शब्दात सांगायचे तर त्या ओझ्याने बाण तिथेच गतप्राण झाला. आमच्या बाणाला आम्ही जमिनीवरच बंदी बनवून उड उड म्हणत होतो.
तानुमामाला हे सांगणे शक्यच नव्हते. त्याला माझ्या चेहेर्‍यावरून समजले असावे.
उद्या एक गम्मत करायची आहे. सकाळी लवकर उठ. तानुमामाने आईकडे बघत मला सांगितले.
काय गम्मत आहे.
ते सकाळी समजेल. लवकर उठ.
लवकर म्हणजे किती लवकर
जितक्या लवकर उठशील तितक्या लवकर समजेल
लवकर उठायचे तर घड्याळात गजर लावायला पायजे. गजराचे घड्याळ तर सातारला होते.
मग लक्षात आले. फटाक्याचा टाईम बाँब लावून ठेवायचा. उदबत्ती ओली करून ठेवली तर टाईमबाँबची उडायची वेळ वाढवता येते . एका उदबत्तीला अर्धा तास. ओली केली तर एक तास. आत्ता रात्रीचे दहा वाजलेत. सकाळी पाच वाजता उठायचे तर निदान पाचसहा तरी उदबत्त्या लागतील. आणि नवी उदबत्ती नुसत्या ठिणगीने पेटत नाही त्यासाठी पणती किंवा काडीपेटीची काडीच लागते. काडीपेटीची काडी उदबत्तीच्या ठिणगीने पेटते. मग बरोबर. हीच आयडीया. उदबत्तीला तळाला नवी उदबबत्ती बांधायची. ती पेटावी म्हणून त्या सोबत काडीपेटीतली काडी गुल असतो त्या टोकाकडून बांधायची. गुल पेटला की उदबत्ती पेटेल. मग ती शिवटच्या टोकाला ठिणगी होऊन जाईल. शेवटच्या टोकाला नवी उदबत्ती आणि नवी काडी गुल असलेल्या बाजूने असेल. ही उदबत्ती संपायला आली की नव्या उदबत्तीची काडी गुल असल्यामुले पेटेल ती नव्या उदबत्तीला पेटवेल. अशा सहा उदबत्त्यांची एक मोठी माळ करायची. आणि पलंगाखाली ठेवायची. सहव्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला मोठ्ठा दंड्या फटाका वातीला बांधून ठेवायचा. सहावी उदबत्ती शेवटच्या टोकापर्यंत यायला सकाळचे पाच साडेपाच होणार. दंड्या फटाका उडणार. येवढा मोठा दंड्या फटका अगदी पलंगाखाली ढाम्म करून उडाल्यावर कुंभकर्णाला सुद्धा जाग यायला पाहिजे.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 May 2020 - 1:16 pm | आनन्दा

केला का असा गजर तयार?

केला असेल तर तो किती वाजता फुटतो हे वाचायला उत्सुक आहे..

विजुभाऊ's picture

23 May 2020 - 1:15 pm | विजुभाऊ

हा हा हा