झाडुन झाल्यावर कितीतरी वेळ आई नुसतीच पायरीवर बसलेली. कुठेतरी एकटक पहात. आज्जी असती तर तीने आईला असे बसूच दिले नसते. झाडलोट झाल्यावर तीला हातपाय धुवायला पाणी दिले असते आणि सोबत चहाचा कप हातात दिला असता.
अर्थात आज्जी असती तर आई अशी एकटक कुठेतरी कोपर्यात पहात पायरीवर बसलीच नसती. न थांबता नुसती सुसाट बोलत सुटली असती. न थांबता. आज्जी काय बोलतेय ऐकतेय या कडे न लक्ष्यही देता.
आज्जीचे अंगण तीच्यासारखेच लख्ख रहायला हवे. या वर्षी किल्ला नाही.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46778
आज्जीचे अंगण तिच्यासारखे करायचे हे तर ठरवलं . पण तिच्यासारखे म्हणजे नक्की कसे तेच समजत नव्हते. आज्जीचे अंगण तिच्यासारखे म्हणजे एकदम कापसागत मऊ करायचे. पाटणला आज्जी रोज एकदातरी माझ्या तोंडावरून हात फिरवायची. आणि अलाबला काढायची. अलाबला केल्या नंतर काहितरी पुटपुटायची. तीने तसे केलं माझ्या तोंडावरून हात फिरवला की कायतरी कापूस फिरवल्यागत होणार . आणि मी मी हसणार . मी हसलो की आज्जी पण हसणार. आज्जी हसली की तीच्या तोंडात एकच दात दिसायचा. मग ते बघून मी पुन्हा हसणार. मग मी विचारणार आज्जी तुझे दात कशे पडले. की आज्जी म्हणणार . अरे ते पडले नाहीत. तुझे दात पडले होते ना ते नवे दात तुला आलेच नाहीत. मग तू एकदा रात्री माझ्या स्वप्नात आलास आणि माझे दात खेळायला म्हणून घेऊन गेलास. गेलास तो गेलासच सकाळपर्यंत परत आलाच नाहीस. सकाळी उठून बघतेय तो काय माझ्या तोंडात हा एकच दात शिल्लक . मग मी तुझ्याकडे पाहिलं. तर तू हातात पारलेचे बिस्कीट घेऊन दाताने कडाकड तोडत होतास. मी विचारलं तर म्हणालास तुझे दात मी पतंग लावायच्या स्पेशल खळीने मला चिकटवले.
आज्जीचे हे काही पटायचे नाही. कारण एक तर पारलेचे बिस्कीट कधीच कडाकडा आवाज करून तुटत नाही. आणि दुसरे म्हणजे मला एकदा तुटलेला दात आपोआपच आला होता. पण आज्जी जे म्हणायची ना की पतंगाच्या खळीने दात चिकटवले. ते खरे असेल बहुतेक. कारण ती खळ आज्जीनेच करायला शिकवली होती. गरम पाण्यात सरस उकळून खळ करायची. इतकी घट्ट चिकट व्हायची की त्याने पतंग तर चिकटायचाच पण ज्या बोटाने खळ लावली ती बोटंही चिकटून बसायची. मी एकदा गण्याला ती खळ बोटाला लावूब चुटक्या वाजवायला सांगणार आहे. शाळेत बाई म्हणायच्या तशी त्याच्या जीभेला पण ती खळ लावायला हवी. म्हणजे तो बोलायचा जरा कमी होईल.
पण ती खळ एकदम भारीच व्हायची. अगदी ढग फाटले तरी चिकटवून जोडता आले असते इतकी चिकट. आम्ही पतंग उडवताना लहान मुलांना मोठा झब्बू मिळायचा नाही. एकतर त्या झब्बू एवढी आमची उंची. त्यातून तो वर उडायला लागला की आवरायला आला पाहिजे. काहिकाही झब्बू तर इतके मोठे असायचे की ते उडवताना त्यातून फर्र फर्र असा आवाज यायचा विमानागत. आमी मुले त्याला विमान झब्बू म्हणायचो. पतंगाच्या वेळेस आकाशात कुठे विमान झब्बू दिसतोय काय ते दिवसभर बघत रहायचो.
विमान झब्बु म्हणजे सगळ्यात भारी . तो आकाशात एकदा आला की बाकी सगळ्या पतंगी एकदम गायब होणार. एश्टी आली की बैलगाड्या सायकलवाले रस्ता मोकळा करून देतात तसे मोठ्ठ्या झब्बूला आकाश मोकळं करून देणार. त्या मोठ्या झब्बू ला टसर देणारा आणखी एखादा झब्बू आकाशात आला की मग मज्जा यायची. एकमेकाना हूल देत कधे गोते खात तर तर कधी एकदम वर जाऊन लप्पा मारत खाली येत ते दोन्ही झब्बू एकमेकाना खेळवत रहाणार. रस्त्यावर त्या दोन्ही झब्बूंची मारामारी पहायला पोरांचे गर्दी होणार.
हा लाल झब्बू बाब्याचा आन तो मासा झब्बू इक्बाल्याचा. आता टसन बघ. इक्बाल्या बघ कसा कापतोय
म्हाईतीये का . इक्बाल्या चा मांजा म्हणजे स्पेशल मांजा असतो. मांजा बनवताना तो त्यात अंडी टाकतो. अंड्यामुळे मांजाला शक्ती येते.
ह्या . ते सोड. आन बाब्या म्हैती हाय का कशाचा बनवतो ते. साखळी छाप धागा घेतो . काचा कुटून टाकतो . आणि खळ करताना मंत्र म्हणून खळीला शक्तिमान बनवतो. त्याची खळ इतकी पावरफुल्ल आसते की पेच लावला तर सामनेवाला एकदम बघतच रहाणार. बाब्याचा मांजा एकदम अदृष्य . दिसणारच नाय. पतंग कापला गेल्यावर समजणार की कापला गेलाय म्हणून.
ह्या हे तर कायच नाय. इक्बाल्या ने एकदा मांजाला शक्ति मिळावी म्हणून एकदम पावरफुल्ल लोखंड चिकटतं ना त्या लवचुंबकाचा चुरा पण टाकला होता. सामनेवाल्याचा पतंग नुसता कटणारच नाय तर ह्याच्या मांज्याला त्याचा मांजा चिक्टून बसणार. सामनेवाल्याचा पतंग बायको बनून याच्या पतंगासोबत यायला पायजे. आशी आयडिया . पण त्यात कायतरी गडबड झाली फोर्मेल्यात. लवचुंबकाचा चुरा जरा जास्तच पडला होता . इक्बालचा पतंग एकसारखा तारेत आणि पत्र्यालाच अडकायला लागला.
मग त्याने तो मांजा बदलला. पण तो इतका भारी होता की नुसता चक्रीला गुंडाळला होता तरी त्याला टाचण्या चिकटायच्या. इतका पावरफुल्ल.
मला एकदा बघायचा होता तो मांजा. म्हणून मी आन गण्या अत्तरगल्लीत इक्बाल्या रहायचा तिकडे गेलो होतो. तिथे एक बारीक म्हातारा बसला होता. दाढी आणि केस लाल रंगाचे होते. बहुतेक त्याने चुकून भिंतीला लावायची काव डोक्यावर पाडून घेतली असावी. तो बसला होता ती लोखंडी खुर्ची जवळची जागाही पानाच्या पिचकार्यामुळे लालभडक झाली होती.
"क्या चाहिय्ये". म्हातार्याच्या केसाइतकीच त्याची जीभही पान खाऊन लालभडक झाली होती.
इक्बाल्या कुठे आहे. " मी घाबरतच विचारले. त्याच्या बोलण्याने
" हम्म्म्म्म्म" त्या म्हातार्याने आम्हा दोघांनाही पायापासून डोक्यापर्यंत पाहिले. "क्यो... इक्बाल्या .... इक्बाल चाचा नै तो कमसे कम चिच्चा नै बोल सकते. " तो म्हातारा आमच्यावर ओरडलाच." बात करेनेकी तमीज नै आन चले इक्बाल्या कु पुकारने. चलो भाग जावो इदरसे. पुन्हा इथे दिसलात ना तो तंगडीच तोडके रख दुंगा" भाग चल्लो"
म्हातार्याच्या ओरडण्यामुळे आम्ही घाबरलो आणि पळत सुटलो. बाहेर गल्लीच्या बाहेर आल्यावर कोणीतरी सांगितले की त्या म्हातार्याचे च नाव इक्बाल्या होता. आमी समजत होतो की इकबाल्या म्हणजे कोणीतरी आमच्या इतकाच चौथी तला मुलगा असेल म्हणून.
बाब्याच्या घरी जाऊन त्याला भेटायची आमची टाप नव्हती. तो म्हणजे नक्की कुणीतरी असाच इकबाल्यासारखा एकदम आजोबा असणार.
तर काय सांगत होतो. आज्जीची ती खळ एकदम स्पेशल . आम्हाला मोठ्ठा झब्बू उडवता यायचा नाही एकतर आमची उंची, आणि दुसरे म्हणजे आमचे वजन. तानुमामा तर म्हणायचाही की त्याने एक मोठ्ठा झब्बू पकडला होता. तो इतका मोठा आणि जबरदस्त ताण आसलेला होता की त्याला एखादा लहान मुलगा सहज लटकु शकला असता. त्याला म्हणालो की दाखव म्हणून तर म्हणाला कोणीतरी तो पुन्हा कापला. बहुतेक तो इकबाल्याच असेल .
आम्हाला फक्त छोटे पतंग उडवायला मिळायचे. मग तो मोठा दिसावा म्हणून त्याला लांबच लांब शेपूट जोडायचो. काहिवेळा ते शेपूट इतके लांब असायचे की पतंग कितीही वर गेला तरी शेपूट फारतर चिंचेच्या झाडाच्या वरच्या पानाला टेकायचे. कधी कधी शेपटी झाडात अडकयची. पण तुटायची नाही.
आज्जीची खळ अगदी भारीच. अर्थात आज्जीचे सगळेच भारी असायचे. तीने अगदी अंगण झाडले तरी ती एकसारखे झाडायची. अगोदर अंगण झाडणार. मग त्यावर शेणसडा टाकणार. तो सडा वाळला की त्यावर मग दारासमोरच्या लिंबाखालच्या तुळशी वृंदवना समोर गेरू ने एक चौकोन आखणार. त्यात रांगोळी चे ठिपके काढणार. पांढर्या शुभ्र रांगोळीने रेषा काढणार. पाने फुले काढून झाली की त्यात कुठे कुठे एखादे पान हिरव्या रंगाने भरणार. एखाद्याच फुलाच्या पाकळीत हळदी भरणार तर कुठेतरी कोपर्यात काढलेली कळी पांढरी शुभ्र करणार. आभाळाचा लख्खा आकाशी रंग, लिंबाची जाळीदार हिरवीगार सावली , गेरूचा विटकरी रंग, रांगोळीचा पांढरा शुभ्र रंग हळदीचा पिवळा जर्द आणि कुंकवाचा लाल रंग , बघणाराला रांगोळीची भूलच पडणार.
दुसर्या दिवशी नवी रांगोळी. आणि कधी जर तुळशी वृंदवनातल्या तुळशीला नैवेद्य दाखवायचा असेल तर या रंगीत चित्रात केळीच्या पोपटी हिरव्या पानावर वाढलेली भाताची मूद त्यावर पिवळ धम्मक वरण, केशरी शिरा या रंगांची भरच पडायची. आज्जीला चित्रकला साठी आख्खं अंगण मिळायचं.
आज्जी ठेवायची तसे अंगण करायचे . आईने अंगण झाडुन घेतले होते. शेजारच्या कदम काकुंकडून अर्धी बादली शेण आणले. त्यात पाणी मिसळून छान शेणसडा टाकला. मग त्यानेच थोडी माती घेऊन भिजवली आणि तुळशी व्रूंदावन लिंपून टाकले. तोवर शेणसडा वाळला होता.. गेरूने अंगणाला बाहेरून एक छान चौकट आखली. तुळशी वृंदवनपण गेरूने रंगवले. आता अंगण थोडेतरी आज्जीच्या अंगणासारखे वाटायला लागले.
मग आईने रांगोळीचे ठिपके मांडायला सुरवात केली. वीस ठिपके वीस ओळी अशी मोट्ठी रांगोळी . एक एक रेघ जुळत होती. शंकरपाळी चौकोन तयार झाले.
एवढे होईतो संध्याकाळचे सहा वाजले. दिवेलागण झाली. आईने दारासमोरचार आणि तुळशी वृंदावना शेजारी तीन पणत्या लावल्या. घरातले दिवेही लावले.
तानुमामाने आकाश कंदीलाला वायर आणि बल्ब लावून तो खिडकीच्या समोर लावला. एव्हाना सात वाजून गेले होते
इतके होऊनही अंगण अगदी आज्जीच्या अंगणासारखे दिसायला तयार नव्हते. अजून काहितरी हवे होते . काय ते समजत नव्हते.
पणत्या लावून झाल्यावर आईने मला हातपाय धुवायला लावले. मग ती आणि तानुमामा दोघेही आज्जीच्या तुळशी वृंदावनासमोर बसले. मलाही सांगितले.
कोणी सुरवात केली माहीत नाही पण आम्ही तिघेही " दिव्या दिव्या दिपत्कार. कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला सर्व देवांपाशी." म्हणून लागलो.
शांताकारम भुजगशयनम पद्मनाभं सुरेशं
,विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम ,
लक्ष्मी कांतम कमलनयनम योगिभिर्ध्यनगम्यम ,
वंदे विष्णू भवभयहरणं सर्वलोकैक नाथम
म्हणता म्हणता. एकटक दिव्याकडे पाहू लागलो. आज्जीच्या त्या घंटेसारख्या किनर्या आवाजातले श्लोक मला ऐकू यायला लागले. . तानुमामा पण एकदम शांत झाला . अचानक आई हुंदके देऊन रडायला लागली तानुमामा तीच्या पाठीवरून हात फिरवत होता. त्याचेही डोळे भरून आले होते. मलाही खूप रडावसे वाटत होतं .आज्जी च्या अंगणात काय कमी होतं ते न सांगताच समजलं आम्हा तिघानाही. आज्जीचे अंगण तीच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हते.
अचानक एक गार वार्याची झुळूक आली. डोक्यावर लिंबाचे पान पडले म्हणून वर पाहिले. काळेभोर आकाश पूर्ण चांदण्याने भरले होते. आकाशात दिवाळी होत असावी इतके.
तिथे वीस ठिपके वीस ओळी पेक्षाही मोठ्टी रांगोळी काढलेली होती. मी तानुमामाला ती रांगोळी दाखवली.
तानुमामा म्हणाला आपल्या रांगोळीला उत्तर म्हणून आज्जी तेथे रांगोळी काढतेय . खरंच असेल ते. नाहीतरी इतकी सुंदर रांगोळी आज्जीशिवाय दुसरे कोण काढणार होते.
(क्रमश )
प्रतिक्रिया
16 May 2020 - 6:36 pm | भीमराव
छान आहे हे पण.
17 May 2020 - 9:44 pm | विजुभाऊ
धन्यवाद.
मी पण एंजाॅय करतो लिहीताना.
दोन भागांमधे जरा अंतर पडतेय हे तितकेच खरे