दोसतार - ४५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 May 2020 - 10:34 pm

किल्ल्यात एक गुहा पण करायची आणि शेवटच्या दिवशी त्या भुयार करायला वापरलेल्या डबड्यात मोठ्ठा दंड्या फटाका लावायचा. धुडूम ... अख्खा किल्ला हादरून जातो. किल्ल्यातली माती उडते त्यावरच्या झाडाझुडपांसह. मस्त मजा येते रे" टंप्या.
हे असले काही पाटणला नसायचे. तिथल्या दिवाळीची गम्मत काही वेगळीच.

मागील दुवा http://misalpav.com/node/46671
पाटणला किल्ला करायचा तर अगोदर जमीन सपाट करायला लागते. अंगणात जिथे म्हणून सपाट जमीन सापडेल तिथे तुळशीचे सदाफुलीचे नाहीतर कोरफडीचे रोप आज्जी लावायची. मोगर्‍याचे झाड होते. तगरीचे पण होते. दोन्ही झाडांची गम्मत दाट पाने तीही जवळ्जवळ काळपट म्हणावी इतकी गडद हिरवी आणि त्यावर आलेली पांढरी शुभ्र फुले. जर कोणी अगदी पहाटे उठून पाहिले तर त्याला तगरीच्या त्या झाडावरची नुसतीच फुले दिसणार. आकाशातल्या चांदण्या दिसल्यागत. बाकी सगळीकडे अंधार , थोड्याशा उजेडात चमकणारी पाने आणि त्यावर उमललेली ती पांढरीशुभ्र तगरीची स्वस्तीक फुले. आज्जी म्हणायची की चांदणं नांदायला येतं.
जोडीला मोगर्‍याची उमलू पहाणारी फुले त्यांचा तो अत्तर घमघमाट. . पहाटेची थंडी , दवामुळे ओलसर झालेली जमीन कुठेतरी लांबवरून येतोय वाटणारा चंद्री म्हशीच्या गळ्यातील घंटेचा आवाज. गुंगीच येणार. त्यात कधीतरी एकदम जमीनीतून विहीरी जवळून धुके यायला सुरवात होणार. त्या तसल्या धुक्यात आपण चालायला लागलो की कधेकधी आळस द्यायला तोंडाचा आ केला की तोंडातूनही कारखान्याच्या चिमणीतून येतो तसा धूर बाहेर येणार. तोंडाचा गोल आ करून तानूमामा तसा धूर काढून दाखवायचा तेंव्हा तो स्वतःच एक कारखाना वाटायचा. थोड्यावेळाने आज्जी उठणार मग पाण्यासाठी बंब पेटवणार. शेणी पाला काटक्या कुटक्या चा तो धूर होणार. त्या धुराचा वास मोगर्‍याच्या वासात मिसळणार. आज्जी अंघोळ करून चुलीवर चहा चढवणार त्या चहाला धूराचा मोगर्‍याचा आणि चहाचा वास येणार. पितळी तांब्यातून तो चहा बशीत ओतून घेताना त्या वरची वाफ वर वर जात त्या धुक्यात मिसळणार. विहीरीवरच्या पाण्यावरचं रेंगाळणारं धुकं , तगरीच्या झाडावरचं चांदणीचं धुकं मोगर्‍याच्या पानावरचं सुगंधानं घघमणारं धुकं , पितळी ताम्ब्यावरचं झाकलेली बशी काढल्यावर थोडं थांबून बाहेर येणारं धुकं आणि शेणकुटाच्या चुलीतून वर जात थेट छपराच्या कौलातून बाहेर येणारा धूर, हे सगळं तिथंच उन्हं यायची वाट बघत तिथंच रेगांळत बसणार.
हे सगळ बघताना किल्ला करायला विसरायलाच होतं .
आज्जीनं शेणसडा घालून सारवलेलं अंगण आंघोळीनंतर आईने बाळाचा भांग पाडावा तसे दिसत असतं. ते मोडायला नको वाटतं. किल्ला घरात करायचा तर घरात सगळीकडे ही गर्दी असते. स्वैपाक घरात कसले कसले डबे एकावर एक ठेवलेले , चुली जवळ फडताळ . तिथे आज्जीची जागा. आज्जी तिथे बसून सगळीकडे लक्ष्य ठेवणार. मधूनच गाणार. कोयलीया बोले अंबुवा डार पर... रुतू बसंत की देत संदेसवा . काय कळायचं नाही पण आज्जी अशी गाणे गायला लागली की एकदम कायतरी भारी वाटतं. आज्जी कुठे शिकली काय माहीत. पण तीचं एक भजनी मंडळही होतं एकदा तिथे एक किर्तनकार बाई आल्या होत्या. किसाताई म्हणून. त्या काहीतरी गोष्ट सांगता सांगता एकदम मधेच गाणे गायला लागायच्या. " राधीकेचा नवरा खेळतो भवरा भवरा भवरा " आणि गाणे म्हणता म्हणता एक गिरकी घ्यायच्या. त्यांचे बघून बाकी बायका पण गिरकी घ्यायच्या. गाणे म्हणताना गिरकी घेऊन म्हणायला इतकं सोप्पं जात नाही. एक दोघीजणी तर एकदम तोल जाऊन दुसर्‍यांच्या अंगावर पडल्या त्याम्च्यामुळे त्या ज्यांच्यां अंगावर पडल्या त्यांचाही तोल गेला. सिनेमात स्टँडला लावलेल्या सायकली एक पडली की बाकीच्या पडतात तशा त्याही पडल्या.
पण गिरकी घेऊन गाणे म्हणायची मज्जाच वेगळी. खैके पान बनारसवाला म्हणायचं आणि म्हणताना छोरा गंगा किनारेवाला आलं की ते म्हणत म्हणत एक गिरकी घ्यायची.
म्हैबूबा म्हैबूबा हे आख्खे गाणे गिरकी घेऊनच म्हणायचे आहे. मी प्रॅक्टीसही केले होती. फक्त आज्जीच्या त्या राधीकेचा नवरा खेळतो भवरा गाण्यावर भवरा म्हणताना गिरकी घ्यायला जमत नव्हते.
पाटणला अंगणात किल्ल्यासाठी जागा शोधणे हे अगदी सोप्पे वाटणारे काम सकाळपासून दुपारपर्यंत चालणार. अंगणात तुळस, मोगरा, तगर यांची झाडे गोकर्णाचा मांडव या जागा सोडून आज्जीने बाकीचे सगळे अंगण लख्ख सारवून ठेवलेले. किल्ला करायचा तर ते उकरावे लागणार. अंगण उकरले तर आज्जी काही बोलायची नाही पण आज्जीने इतके छान केलेले अंगण मोडायला नको वाटायचे.
मग तानूमामा शेतातल्या पडवीत एखादा कोपरा देणार. तिथे अगोदरच असलेला एखादा मातीचा ढिगाराच किल्ला म्हणून ठरवायचा. त्यात थोडेसे खुरपून रस्ते वगैरे बनवणार. पण त्यात काही मज्जा नाही. इतक्या लांब किल्ला पहायला कोणी यायचेच नाही. आणि आलेच तर त्याला परत जायची घाई.
किल्ला बनवायचा तर मग तो नीट पहायला पाहिजे की. त्यातले पडलेले सैनीक , कागदाच्या खिडक्या दुमडलेली घरे , चाक तुटलेल्या प्लास्टीकच्या गाड्या , ढाल तलवार वाले मावळे , तोफ डागणारे सैनीक , कुस्ती खेळणारा पैलवान , एकच पंखा वालं विमान , काड्यांच्या रहाटाची विहीर. सिंह असलेली गुहा, आणि किल्ल्याच्या वर सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज.
या वर्षी आज्जी नाही. आज्जीचे ते अंगण सुद्धा अस्ताव्यस्त झालेले . रोज भांग पाडणार्‍या पोराने कितीतरी दिवसात भांगच पाडलेला नव्हता. आल्या आल्या आईने आज्जीचे अंगण लख्ख झाडून काढले. पुन्हा नीटनीटके केले. कोपर्‍यातल्या तगरीच्या झाडाची आळी नीट केली . मोगरीच्या झुडुपाला पाणी घातले.
झाडुन झाल्यावर कितीतरी वेळ आई नुसतीच पायरीवर बसलेली. कुठेतरी एकटक पहात. आज्जी असती तर तीने आईला असे बसूच दिले नसते. झाडलोट झाल्यावर तीला हातपाय धुवायला पाणी दिले असते आणि सोबत चहाचा कप हातात दिला असता.
अर्थात आज्जी असती तर आई अशी एकटक कुठेतरी कोपर्‍यात पहात पायरीवर बसलीच नसती. न थांबता नुसती सुसाट बोलत सुटली असती. न थांबता. आज्जी काय बोलतेय ऐकतेय या कडे न लक्ष्यही देता.
आज्जीचे अंगण तीच्यासारखेच लख्ख रहायला हवे. या वर्षी किल्ला नाही.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

तुमचं सगळं लिहून पुर्ण झालं ना कि परत एकदा एका लायनित वाचुन काढणार आहे. छान चालू आहे.

विजुभाऊ's picture

12 May 2020 - 9:35 pm | विजुभाऊ

धन्यवाद

बांवरे's picture

13 May 2020 - 1:09 am | बांवरे

वाचतोय भाउ. परत आधीचे दोन भाग वाचून मग हा भाग वाचतोय.
लिहीत रहा !

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 May 2020 - 8:38 pm | बिपीन सुरेश सांगळे

विजुभौ
छान हो
दिवाळीच्या किल्ल्याची आठवण आली