वासुकाका

Primary tabs

अभिबाबा's picture
अभिबाबा in जनातलं, मनातलं
21 May 2020 - 12:37 pm

वासुकाका

आमच्या आधीच्या अर्ध्या पिढीतले. . . आयुष्याच्या अर्ध्यावरच गेले. . .

किरकोळ बांधा व सरळ लांब केस.पण जात चाललेले केस मागे घेऊन तेल लावून ते चापून चोपून बसवण्याच्या वासू काकांचा नेहमीचाच खटाटोप. एक पांढरा सदरा व स्वच्छ लेंगा. आपल्या शरीराच्या रंगाशी असलेल कॉन्ट्रास्ट मॅचिंग त्यानी आयुष्यभर बाळगलं, अगदी पांढऱ्या समुद्रावरच्या भागोजी शेठ कीर वैकुंठ धामापर्यंत !

एकूणच वासु काकांचा नीटनेटके राहण्याकडे कल होता.त्यांनी ना कधी कसले व्यसन केले ना कसला शैाक केला.पण नाटके पहाण्याचा छंद मात्र त्यांनी जोपासला.

श्रीराम नाट्य मंदिरातलया नाटकाची पाटी लागली रे लागली की सोहोनी पेंटरांच्या दुकानाची फळी उघडण्यापूर्वी बुकिंगसाठी तिकिटांच्या रांगेत वासुकाका हजर. नंतर नंतर तर पेंटरनी त्यांचं बुकिंग पहिल्या दिवसालाच ठरवून टाकल होत. वासु काकांची नाटकाला बसायची जागाही ठरलेली होती,आणि लोकांनाही त्या जागेच तिकीट न घ्यायची सवय लागली होती.

झाडगावात परटवण्याच्या नदीकडे जायच्या बोळामध्ये वासु काकांचअगदी चंद्रमौळी आणि मुलाबाळांनी भरलेल
घर होत. त्यांच्या दोन भावांची पानपट्टीची दुकाने होती, एक माझ्या घराजवळ, तर दुसर गाडीतळावर. पण सर्व भावंडे व त्यांची कुटुंबे त्या छोट्याश्या घरात आनंदाने एकत्र राहायची. दिवसातून दोन तीन वेळा तरी वासु काकांच्या आमच्या घरावरून फेऱ्या होत असत. अर्थात वाटेत दोन्ही भावांच्या दुकानांना त्यांचा दोन तीन मिनिटांचा थांबाही असेच असे. यामुळे वासूकाका मला बऱ्याचदा भेटत असत.

वासुकाका म्हणजे जातिवंत कम्पाऊंडर. प्रथम गाडीतळावरील डॉक्टर सावंतांकडे होते व डॉक्टर वारल्यानंतर ते डॉक्टर केळकरांच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करू लागले. काही वर्षे त्यांनी तिथे काम केले.डॉक्टर बा.ना.सावंत आजोबा माझ्या आजोबांच्या रोजच्या बैठकीतील असलेमुळे सावंत आजोबांच्या दवाखान्यात आम्हा भावंडांना संचाराची पूर्ण मुभा होती.

डॉक्टर सावंतांचा दवाखाना गाडीतळावरील पाथरे यांच्या घरात होता. आता तिथे नवीन इमारत झाली असली तरी अगोदर तिथे जुने एक मजली घर होते, व तिथे पहिल्या मजल्यावर डॉक्टर सावंतांचा दवाखाना होता. दवाखान्यात जाण्याचा लाकडी जिना इतका तिरका आणि चढाचा होता की तो जिना चढेपर्यंत पेशंटच काय पण बरोबरच्या माणसालाही धाप लागायची. 'वर जाण्याचा रस्ता' हा विनोद अशाच कोणत्या तरी दवाखानयावरून निघाला असावा असं वाटतं.तसा डॉक्टरनी आधारासाठी जाडजुड राजू म्हणजे दोरखंड जिन्याच्या बाजूने बांधला होता,अगदी वरपासून खालपर्यंत! परंतु त्याचा वापर आम्ही शाळेतली मुलं लोमकळायला करायचो.

जिना चढून वर गेल्यावर बाहेर पेशंट बसायचा वरांडा होता. नंतर एक खोली होती.ती खोली ओलांडून डॉक्टरांकडे जावं लागे. या मधल्या खोलीमध्ये औषध द्यायचा काऊंटर केल्यामुळे एका बाजुला डॉक्टरांकडे जायची वाट झाली होती आणि दुसऱ्या बाजूला वासुकाकाच साम्राज्य.

आतल्या बाजूला घडवंचीवरच्या वेगळ्या आकाराच्या रंगांच्या बाटल्या. त्यातच पुन्हा सुट्ट्या गोळ्यांचे प्लास्टिकचे डबे, चिकटपट्ट्या, सुया कात्र्या, बॅडेजेस, मलमांच्या डब्या. त्यातच एका बाजूला सतत पेटत असलेला स्टोव्ह व त्यावर इंजेक्शन द्यायच्या सिरिंजेस उकळत ठेवलेलया.

अशा सगळ्या शस्त्रागारात सराईतपणे वावरणाऱ्या वासु काकांबद्दल आम्हा मुलांना नेहमीच आदर वाटायचा. त्यात पुन्हा पेशंटला बाटलीतून औषध देताना डोस किती दाखवणाऱ्या षटकोनी पट्ट्या बाटलीचे माप घेऊन पटापट करायची हातोटीही वासू काकांचीच.आम्ही बरेच वेळा अशा पट्ट्या करायचे प्रयत्नही केले, पण कचरा होण्यापलीकडे काहीच जमल नाही. आणि त्याचा त्रास वासूकाकाना व्हायचा. शेवटी आम्ही तह केला. त्यानुसार मधुन मधुन वासूकाका आम्हाला रंगीत कागदाच्या पट्ट्या करून देत असत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्यात नवीन वर्गात गेलो की नव्या वह्यांना कव्हरे घालून आम्ही वासूकाकांकडे घेऊन जात असू, आणि वासूकाका त्यावरील लेबलच्या सभाेवती नक्षीदार पट्टय़ा करुन चिकटवून देत असत.

आमचा हा सगळा कारभार वासू काकांच्या साम्राज्यात चालत असे. डॉक्टर अजिबात याबाबत बोलत नसत. उंचेपुरे, गोरेपान व रुबाबदार डॉक्टर डोक्यावर हॅट व हातात काठी घेऊन जिन्याच्या पायऱ्या चढू लागले की सगळे चिडीचूप होत. आमच्या वासुकाका बरोबरच्या गप्पांना डॉक्टरांनी कधी हटकले नाही. वासुकाकासुद्धा पेशंटला औषधाच्या गोळ्या देत असताना आम्हाला काही ना काही सांगत असत. शाळेच्या धडपडीत कुणाला खरचटल, लागलं तर आमचे डॉक्टर वासूकाकाच असायचे. एका छोटय़ा स्टुलावर बसून हलक्या हाताने वासुकाका लालभडक आयोडीन लावून चिकटपट्टी लावायचे. वर पुन्हा मुकादमांच्या श्रीखंड वडीची जिलेटिन कागदात वळलेली पुडीही देत असत.

वासुकाका व डॉक्टरांच्या दवाखान्यावर आम्हा मुलांचे आणखी एका गोष्टीसाठी खूप प्रेम असेआणि लक्षही असे. आमच्या लहानपणी औषध कंपन्या डॉक्टरांना आपल्या औषधांची माहिती व जाहिरात असलेले टिपकागद देत असत. वेगवेगळ्या रंगांचे, आकाराचे आणि गुळगुळीत आर्ट पेपरवर तयार केलेले. त्यात पुन्हा काही टिपकागदांच्या आतल्या रेषांवर घडय़ा घालून त्यांच्या करंजीसारखा खोका करता यायचा.हे सगळे टिपकागद म्हणजे आमचा जीव की प्राण. दैात, बोरू अ‍ाणि टाक शाळेत घेऊन जायच्या त्या काळात अशा वस्तू मिळणं म्हणजे पर्वणी असायची. त्यात पुन्हा नवनवीन प्रकारचे टिपकागद शाळेतल्या वस्तू विनिमयात महत्त्वाचे चलन ठरायचे. पेन्सिलचे तुकडे, खडू, पोस्टाची तिकिटे, सिगारेटची रिकामी पाकिटे, गोळ्या आणि काजूच्या मोसमात काजूच्या बिया अशा वस्तूंच्या या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये या टिप कागदांना खूप मागणी असायची.

मग वासू काकांना मस्का मारून हे सगळे टिपकागद गोळा करायचा कार्यक्रम चालत असे. या सगळ्या वस्तू प्रथम डॉक्टरांच्या टेबलावर येत असत. त्यामुळे डॉक्टर नसताना हळूच डॉक्टरांचे टेबल तपासून वासूकाका अशा संबोधनाने हे सर्व टिप कागद जमा करत असू व गड किल्ले जिंकल्याच्या थाटात दवाखान्यातल्या दोराला लोंबकळे घेत खाली दिल्ली दरवाजात येत असु. दवाखान्यातून परत येताना वासूकाका समोरच्या पानपट्टीवर थांबले की तेव्हापासूनच वासू काकांशी बोलून दवाखान्यातील नवीन आवक काय याची माहिती मिळवायला लागायची.

आम्ही खरोखरच आजारी पडलो तर मात्र हेच वासूकाका जाताना मुद्दाम वाट वाकडी करून घरात अगदी वर पर्यंत येऊन चौकशी करून जायचे. जाताना आमच्या घरात काम करणाऱ्या माणसाला घेऊन जायचे व डॉक्टरांना विचारून औषध पाठवायचे. वेळप्रसंगी त्यांनीही स्वतःहून अैाषध अ‍ाणुन दिले अ‍ाहे.रत्नागिरीसारख्या छोट्या गावात इथे सगळेच जण अगदी घरातलेच असल्यासारखे वावरायचे. पण वासुकाका मात्र खऱ्या अर्थाने घरातले होते.

माझ्या लहान पणातला आणखी एक अविस्मरणीय अनुभवही वासू काकांशी निगडित आहे.पार्टीशनच्या बाजूला एका जाड पुठयाच्या पेटीत एक चकचकीत पिचकारी ठेवलेली असे. आमचा कान कधी ठणकायला लागला की डॉक्टर कानात बॅटरी मारुन मग आम्हाला वासू काकांच्या हवाली करायचे. मग त्या छोटय़ा स्टुलावर मला बसवून वासुकाका खोक्यातील पिचकारी काढत असत व ती स्वच्छ पुसून पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने ती भरत असत. स्वतःच्या डाव्या हातात काजू बी सारखा ट्रे धरून माझा दुखऱ्या कानाखाली ते गालाजवळ धरायचे व पिचकारीचा जोरदार फवारा कानात मारायचे. कानाला विलक्षण गुदगुल्या करणाऱ्या या फवाऱ्यामुळेच बहुदा आमच्या कानाचा ठणका बरा होत असे. नंतर मात्र त्याची सवय लागली.मग कधी कान नीट असला तरीही वासुकाकाना मी गळ घालत असे,व कधीतरी अर्धी तरी पिचकारी कानात फवारायची मेहरबानी वासुकाकांनी केली आहे.

कानात छोट्या बाटलीत दोनचार थेंब टाकायच्या आजच्या जगाला त्या वेळच्या अशा अनुभूतीची कल्पनाही येणार नाही. माझ्या आयुष्यात मात्र अशा अनेक अनुभवामागचे सर्वेसर्वा वासूकाका होते.

अशा या वासुकाका बरोबरचया आरोग्यमय अनुभवाची अखेर डॉक्टरांच्या जाण्यामुळे झाली. गाडी तळावरील जिन्याला कायमचे कुलूप लागले. वासूकाका डॉक्टर केळकरांच्या दवाखान्यात काम करू लागले. डॉक्टर केळकरांचा दवाखाना बाजारात असल्यामुळे आणि तोवर आमची शाळा संपल्यामुळे केळकरकाकांच्या दवाखान्यातल्या वासुकाका यांचे बरोबरच्या भेटीही हळू हळू कमी झालया.सोहनी पेंटरांच्या दुकानासमोरच्या तिकिटांच्या रांगेत मात्र वासूकाका कधीतरी दिसत असत.

आता सगळेच बदलले आहे. पार्टीशनचे आडुन बाटल्यांना पट्ट्या चिकटवून डोस देण्याची सोय करणारे कंपाऊंडर व तशी औषधे देणारे डॉक्टर नावालाच उरले आहेत. आता सगळा प्रिस्क्रिप्शनचा जमाना आहे.

वासू काकांचं घरही अ‍ाता खूप मोठ झालय. बोळाचा रस्ता झालाय आणि तोही डांबरी.एक हायस्कूलही निघाले आहे वासूकाकांच्या घराशेजारी.

मात्र खंत एकच आहे या सगळ्यात. . .

की

वासूकाका अ‍ाता नाहीत. . . !

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

21 May 2020 - 4:20 pm | सिरुसेरि

सुरेख व्यक्ती चित्रण . कानात फवारायच्या पिचकारीची आठवण मस्तच . बरेचदा कानाच्या दुखण्यावर शेवटचा उपाय म्हणुन कान धुण्यासाठी या पिचकारीचा वापर होत असे . हि पिचकारी हल्ली बघायला मिळत नाही .

किती सहज आणि नैसर्गिक लिहिलं आहे. वाह

त्यातून बालपण रत्नांग्रीस गेल्याने सर्वच संदर्भ अगदी मनात जागे झाले. आता खूप दशके संबंध नाही, पण बालपण ते बालपण.

गाडीतळ, श्रीराम नाट्य, झाडगाव, परटवणा.. अहाहा.. किती काळ झाला हे ऐकून.

श्रीराम नाट्य मंदीरचं पुढे सिनेमागृहात रुपांतर झालं का?

लता टॉकीज, श्रीराम आणि राधाकृष्ण अशी टॉकीजत्रयी होती. तेवढीच होती एकूण गावात. त्यातही श्रीराम राधाकृष्ण आमने सामने, लताही तिथून अगदी जवळ.

नाट्यमंदिर म्हणजे तिथे एकच. गोगटे कॉलेजच्या आवारात खातू नाट्यमंदिर (चूकभूल देणे घेणे). ते ओपन एअर असल्याने पावसाळ्यात बंद. तरी अतीव उत्साहाने तिथे बालनाट्ये पाहिली होती.

वासुकाका हे व्यक्तिचित्र अगदी तपशीलवार आहे. लहानपणची रत्नागिरीतली कंपाऊंडरयुक्त क्लिनिके आठवली.

लता, श्रीराम आणि राधाकृष्णला कीती पिच्चर बघीतलेयाची गणतीच नाही. आणी बाहेर गाडीवरचा वडापाव ईंटरव्हलला, नाहीतर मग छायाचे पॅटीस पिच्चर संपल्यावर.
जवळ फार पैसे नव्हते पण काय सुखाचे दिवस होते.

हो हो, "लता"ला दोन रुपये तिकीट होते. त्या वेळी अत्यंत पातळ आणि एकरंगी(हिरव्या, गुलाबी इ) कागदावर ती तिकिटे छापलेली असत. त्यावर रोजचे "खेळ" लिहिलेले असत.

छाया म्हणजे छाया गेस्ट हाऊस म्हणताय का? वणजू मालक होते ना? (चुभुदेघे)

बाकी श्रीरामबाहेरच्या त्या वडापाव गाडीवर मध्यंतरात एकच गर्दी उसळत असे.

शिवाय जवळपास सारे गाव एकमेकांना ओळखत असल्याने सर्वच थेटर्सचे मालक वडिलांच्या ओळखीचे असत, ते बाहेर येऊन येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांशी सलगीने बोलतानाही दिसत. नंतर श्रीरामच्या बाजूला चंदा आईस्क्रीम दुकानही लागले होते.

त्याकाळी म्हणजे सत्तर ऐंशी दशकात रत्नागिरी न बदलण्यासाठी प्रसिद्ध होतं. पाचोळाही इकडचा तिकडे हलत नसे वाऱ्याने. पण काळ बदलला तिथेही बहुधा.

आता यातल्या बहुतांश गोष्टी बदलल्या असतील.

नेत्रेश's picture

22 May 2020 - 9:44 pm | नेत्रेश

"रत्नागिरी न बदलण्यासाठी प्रसिद्ध होतं" - हे एकदम बरोबर. पण आता ते गावही राहीले नाही, आणी मोठे शहरही झाले नाही. त्या वेळी मारुतीमंदीरला जवळ जवळ संपणारे शहर पार कुवारबाव च्या पुढे वाढले आहे. उगीचच जागेच्या, घरांच्या, दुकानांच्या किंमती कोट्यांवधीत गेल्या आहेत. कुठुन एवढी लोक रत्नागिरीत आली समजत नाही.

मन्या ऽ's picture

21 May 2020 - 4:49 pm | मन्या ऽ

सुंदर व्यक्तीचित्रण! लेख आवडला.
बोरु, दौत आणि टाक शाळेत वापरायचा.. साधारणपणे किती वर्ष लोटली असावीत? असा विचार मनात डोकावला..

बोलबोलेरो's picture

21 May 2020 - 5:00 pm | बोलबोलेरो

सुन्दर चित्रण!!

बोलबोलेरो's picture

21 May 2020 - 5:01 pm | बोलबोलेरो

आणी वासूकाकान्चे देखिल

जेंव्हा मिपा सुरू झाले असावे... पण हे वेळोवेळी कात टाकायचे चक्र मात्र थांबलेले दिसते असेच लेख वाचून वाटले अर्थात मे बी आयम टू यंग ओर अनवाईज टू आप्रिशीट ब्युटी ऑफ धिस व्यक्तीचित्रण

शेखरमोघे's picture

21 May 2020 - 6:38 pm | शेखरमोघे

सुन्दर व्यक्तिचित्रण.

दैात, बोरू अ‍ाणि टाक शाळेत घेऊन जायच्या त्या काळात . . . या सर्व (आणि त्या काळातील इतरही अनेक आता गूढ वाटतील अशा गोष्टी जसे पाटी आणि तिच्यावर लिहिण्याच्या वेगवेगळ्या तर्‍हेच्या पेन्सिली) गोष्टी एके काळी वापरल्या असल्यामुळे अनेक पुसटलेल्या आठवणी पुन्हा उजळल्या.

सुमो's picture

22 May 2020 - 7:33 am | सुमो

छान व्यक्तीचित्रण.

खूप सुंदर व्यक्ती चित्रण . ज्यांनी हा परिसर अनुभवाला त्यांच्या साठी तर विशेष मेजवानी. अशी अनेक माणसे आयुष्यात भेटत असतात आणि त्यांच्या आठवणींचे घर हृदयात कायमचे करून जातात.

संजय क्षीरसागर's picture

22 May 2020 - 9:02 am | संजय क्षीरसागर

असंच लिहित रहा.